अनुभव – संकेत बांद्रे
ही गोष्ट माझ्या काकांसोबत खूप वर्षांपूर्वी घडली होती. आम्ही सगळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी गेले होती. माझ्या काकांना मात्र सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे ते आमच्या सोबत आले नाहीत. आम्ही ३ दिवस आधीच आलो होतो. त्या वर्षी पावसाचे आगमन लवकरच झाले होते. पण पुढच्या २ दिवसात कळले की काकांची सुट्टी मंजूर झाली आहे. ते अगदी खुश झाले. उशिरा का होईना गावाला जायला मिळणार होते. त्यांनी आम्हाला फोन करून कळवले की मी लवकरच गावाला यायला निघतोय. फोन मीच उचलला. पण पाऊस जास्त असल्याने आवाज व्यवस्थित ऐकू येत नव्हता. काका म्हणाले की मी आज संध्याकाळी ६ वाजता निघतोय. तेवढ्यात माझे आजोबा मागून सांगून लागले “अरे त्याला सांग रात्री येऊ नकोस..” पण त्यांना आजोबांचा निरोप देई पर्यंत फोन कट झाला. मी पटकन त्यांना फोन लावायचा प्रयत्न केला पण पुन्हा फोन काही लागलाच नाही. तिथे काका गावाला येणाऱ्या ६ वाजताच्या बस मध्ये बसले. क्षणार्धात बस ने वेग पकडला. गावाकडच्या जुन्या सुखद आठवणी काढून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले होते. हळू हळू बस शहरातून बाहेर पडली तसे थंडगार वारा खिडकीतून आत येऊ लागला. काका ना गाढ झोप लागली.
बराच वेळ उलटला. अचानक कंडक्टर चा आवाज कानावर आला “चला तुमचा स्टॉप आला.. उतरणार की नाही..” काका पटकन उठले आणि दरवाज्याकडे चालत गेले. काकांसोबात काही इतर प्रवासी खाली उतरले. तिथून पुढे जायला काही जण दुसऱ्या वाहनाची वाट पाहत थांबले. पण काकांना कधी एकदा गावात घरी पोहोचतो असे झाले होते. पावसाचा जोर अजूनही कमी झाला नव्हता. पण काकांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एकदम निडर, शरीराने धडधाकट. कसलाही विचार न करता त्यांनी घराच्या दिशेने चाल मांडली. गावातले रस्ते म्हंटले की स्ट्रीट लाईट असून नसल्यासारखे. त्यामुळे त्यांनी मोबाईल चा फ्लॅश लाईट सुरू केला होता. एका हातात छत्री, पाठीवर बॅग आणि दुसऱ्या हातात मोबाईल. त्यांच्या सोबतीला गावात येणारे कोणीही भेटले नव्हते. बरेच अंतर ते एकटे चालत आले. तितक्यात त्यांना रस्त्यावर एक रोड रोलर दिसला. बहुतेक रस्त्याचे काम चालू असेल असे त्यांना वाटले. पण ते चालत येत असताना रस्ता नवीन वाटत नव्हता. त्याला ओलांडून ते पुढे आले पण तरीही पुढचा रस्ता जुनाच भासत होता. असाच कोणी तरी पार्क केला असेल असा विचार करून ते पुढे चालत राहिले.
काही अंतर पुढे गेल्यावर अचानक मागचा रोड रोलर चालू झाला. त्याच्या हेडलाईट चा खूप मोठा प्रकाश झोत रस्त्यावर पडला. आणि पुढची वाट प्रकाशमय झाली. त्यांना जरा आश्चर्य च वाटले कारण मघाशी त्यांनी पाहिले तेव्हा कोणीही दिसले नाही. त्यांनी मागे वळून पाहिले पण तो लाईट इतका होता की त्यावर कोण बसले आहे ते दिसायला मार्ग नव्हता. म्हणून त्यांनी वळून आपल्या वाटेने चालायला सुरुवात केली. तितक्यात मागून एक भरडा आवाज कानावर पडला “एकटाच जातोय का रे..”. आता मात्र त्यांच्या मनात भीती ने घर करायला सुरुवात केली होती. पण तरीही त्यांनी हिम्मत करून उत्तर दिले. “हो बस जरा उशिरा पोहोचली..” पण त्यांनी जसे उत्तर दिले तसे तो रोड रोलर ही त्यांच्या मागे येऊ लागला. त्यांनी झपाझप पावले टाकायला सुरुवात केली. घर तसे तिथून खूप लांब नव्हते. जसे ते गावाच्या वेशीवर आले तसे अचानक तो लाईट बंद झाला. मागून रोड रोलर येण्याचा आवाज ही एका एकी थांबला. काकांनी धावयलाच सुरुवात केली. तितक्यात त्यांचा फोन वाजला.
माझ्या वडिलांनी त्यांना फोन केला होता कुठे आहेस विचारायला. काका यायला निघाले आहेत आणि आता गावाच्या वेशी जवळ आहेत हे कळताच ते लगेच गाडी घेऊन निघाले. काही मिनिटात त्यांची भेट झाली. ते खूप घाबरले होते. वडिलांना बहुतेक काय घडले असावे याची कल्पना आली होती. ते म्हणाले “बस पटकन गाडीवर..”. घरा जवळ आल्यावर त्यांनी काकांना विचारले “काय झालंय.. एवढा का घाबरला य.” त्यावर काकांनी सगळा प्रकार सांगितला. ते म्हणाले की जेऊन घे आणि झोप शांत पणें. आपण उद्या बोलू. दुसऱ्या दिवशी वडिलांनी काकांना सगळे काही सांगितले. ते म्हणाले “तुझ्या सोबत जो काल बोलत होता ना तो त्याच रस्त्यावर रोड रोलर खाली येऊन मरण पावला होता. तेव्हापासून तो रात्री अपरात्री येणाऱ्या लोकांना दिसतो. काही इजा पोहोचवत नाही पण त्याचा आवाज ऐकून लोक घाबरतात. गावातले लोक म्हणत्यात की तो खूप चांगला माणूस होता त्यामुळे तो कधी कोणाला विनाकारण त्रास देत नाही. तितक्यात बाहेरून आवाज आला “चला सगळे गणपती आणायला..” माझे वडील बाहेर गेले पण काकांच्या मनात कालचाच प्रसंग घोळत राहिला..