अनुभव – संकेत राजणे
माझे गाव यवतमाळ शहरात आहे. हा किस्सा साधारण ३-४ वर्षांपूर्वीचा आहे. ते पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी माझी मोठी आई म्हणजे काकी घरी राहायला आली होती. ती खूप अस्वस्थ असायची. एरव्ही पेक्षा काही तरी वेगळं आहे ये मला जाणवायचे आणि पण बद्दल मी घरी कधी काही बोललो नव्हतो. पण एके दिवशी माझ्या घरी तिला या बद्दल बसवून विचारले की काही झाले आहे का.. कसला त्रास होतोय का. तेव्हा तिने आम्हाला सांगितले की गेले काही दिवस सतत तिला एकच विचित्र स्वप्न पडतेय. तिला स्वप्नात वाघ दिसतोय. आम्हाला हे ऐकून वेगळेच वाटले.
एक दोन वेळेला आलेले स्वप्न आपण समजू शकतो पण रोज हे एकच स्वप्न पडण्याचं कारण काही तरी असावं अस सगळ्यांना वाटलं. म्हणून मग आमच्या गावी कुलदैव तेला जाऊन देव कार्य आणि गाव जेवणाचा कार्यक्रम करण्याचे निश्चित केले. जेणेकरून काही वाईट साईट असेल तर ते निघून जाईल. सगळे नीट ठरवून, तयारी करून आम्ही गावी गेलो. त्या दिवशी नेमका खूप पाऊस होता. पण तरीही ठरल्या प्रमाणे अगदी सुरळीत सगळा कार्यक्रम पार पडला. मंदिरातून सगळे आवरून गावातल्या घरी आलो. त्याच दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे आमच्या राहत्या घरी यायला निघणार होतो.
पण गावातून निघायला आम्हाला खूपच उशीर झाला. सगळे लोक कार मध्ये होते, सामानासाठी ट्रक होता त्यातही काही होते. आणि ४-५ जण बाईक वर होते त्यात माझा मित्र ही होता. जवळपास अर्धा प्रवास झाल्यावर आम्ही चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबलो.मोबाईल मध्ये पाहिले तर १०.३० वाजले होते. दोन अडीच तास गाडीत बसल्यामुळे मला जरा हवा खायची इच्छा झाली म्हणून मी मित्राला म्हणालो की मी तुझ्या सोबत बाईक ने येतो. आमच्या सोबत असलेल्या गाड्या पुढे निघाल्या आणि आम्ही चहा पीत गप्पा करत काही मिनिट नंतर निघालो.
इतक्या वेळ पावसाने उसंत घेतली होती पण अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. आता रत्यात कुठे थांबायला ही जागा नव्हती. कारण तो परिसर निर्मनुष्य होता. वस्ती तर नाहीच पण दोन्ही बाजूला उंच झाडे. आम्ही बाईक चा वेग कमी ठेवला होता आणि तसेच पावसात भिजत जात होतो. तितक्यात आम्हाला रस्त्यात एक पूल लागला. त्या पुलाजवळ आलो तसे समोरून एक ट्रक येताना दिसला. आणि त्यात एक स्कॉर्पिओ ट्रक ला ओव्हरटेक करत येत होती. तो पुलाचा रस्ता खूप अरुंद होता त्यात जोराचा वारा आणि पाऊस म्हणून आम्ही पुल लागण्या आधी असलेल्या रस्त्यावर गाडी थोडी खाली उतरवली. आणि पुलाच्या रेलिंग जवळून अगदी हळु वेगात नेऊ लागलो.
मित्राचे लक्ष बाईक चालवत असल्यामुळे पुढे रस्त्यावर आणि त्या ट्रक मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ वर होते. पण माझे लक्ष अचानक पुलाच्या खाली असलेल्या मोठा पोल वर गेले. तिथे उभ राहता येईल इतकी जागा होती आणि तो खालचा पोल ज्यावर पुल बांधला गेला होता तो खूप बाहेरच्या बाजूला होता. म्हणजे वरून ही तो नीट दिसत होता. मला दिसले की पांढरट आकृती तिथे उभी आहे. चेहरा अतिशय विद्रूप आणि जळालेला भासत होता. केस एकदम विचित्र कुरतडलेले वाटत होते. जसे तो ट्रक आम्हाला पास होऊन पुढे गेला तसे वातावरणात अचानक बदल जाणवला.
वाऱ्याचा वेग इतका वाढला की मित्राला बाईक वर नियंत्रण ही ठेवता येत नव्हतं. बाईक चा वेग अवघा ताशी ३०-४० असावा पण तरीही बाईक जणू पुलाच्या त्या डाव्या बाजूला ढकलली जात होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल त्यामुळे इथे थांबून तरी काय करणार. मी मित्राला काहीच बोललो नाही. तो कशी बशी बाईक चालवत राहिला. साधारण १० मिनिटांनी सगळ काही शांत झालं. त्या भागापासून आम्ही लांब आलो होतो. मनात एक विचार येऊन गेला ” ते जे काही उभ होत त्याची हद्द बहुतेक संपली असावी..” आणि नुसत्या विचाराने अंगावर शहारे आले. पुढे गेल्यावर कळले की आमच्यासोबत असणारी सगळी लोक थांबली आहेत. मी त्यांना विचारले की तुम्हाला पुलावरून येताना काही दिसले का..? पण त्यांच्यापैकी एकालाही काहीच दिसले नव्हते.