अनुभव – पायल गोतरणे

गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे जी माझ्या काकांसोबत घडली होती. ते आमच्या गावालाच रहायचे. ते जिथे कामाला होते ती कंपनी गावापासून बरीच लांब होती. त्यात त्यांना रात्रपाळी ही करावी लागत असे. त्यांची अजिबात इच्छा नव्हती पण नाईलाज होता. काम महत्त्वाचे होते आणि ते सोडून चालणार नव्हते म्हणून त्यांनी निमूटपणे रात्रपाळी ला काम करायला जाऊ लागले. एक गोष्ट चांगली होती आणि ती म्हणजे गावातला एक मित्र ही त्यांच्या सोबत त्याच कंपनी मध्ये कामाला होता. त्यामुळे प्रवासात त्यांना एकमेकांची सोबत व्हायची. तो मित्र गावाच्या वेशी जवळ च राहायचं. एकदा असेच रात्र पाळी करून ते दोघेही घरी परतत होते. रात्रीचे १२ वाजून गेले होते. तसे त्यांची ही नेहमीची वेळ होती, म्हणजे रोजच उशीर व्हायचा. मित्राचे घर आल्यावर तो त्यांचा निरोप घेऊन घरी निघून गेला आणि काका आपल्या वाटेला लागले. गावचा परिसर असल्यामुळे सगळे काही एकदम शांत आणि सामसूम झाले होते. संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. मित्राचे घर सोडून थोडे पुढे आल्यावर एक चिंचेचे झाड लागते. ते त्या झाडा जवळून जाऊ लागले तसे त्यांचे लक्ष त्या झाडाखाली गेले आणि ते तिथे पाहतच राहिले. 

तिथे एक बाई उभी होती. काकांना वाटले की गावातली बाई असावी आणि उशिराच्या एस टी ने अलीकडच्या बस स्टॉप वर उतरून कोणाची वाट पाहत असावी. पण त्यांच्या मनात दुसरा विचार ही आला की एखादी एकटी बाई इतक्या रात्री का येईल आणि अशी झाडाखाली का थांबेल. त्यांनी बघून दुर्लक्ष केलं आणि आपल्या वाटेने चालत राहिले. तसे ती बाई काकांच्या मागे मागे येऊ लागली. त्यांना जरा विचित्र च वाटले. जस जशी ती बाई त्यांच्या जवळ येत होती तसे वातावरणात गारवा निर्माण होऊ लागला. तितक्यात तिने काकांना आवाज दिला.. “दादा थांबा.. मला पण गावातच यायचं आहे..” काकांनी मनात केले की बहुतेक हिला एकटीला गावात जायला भीती वाटली असावी म्हणून ही कोणाची तरी वाटा बघत तिथे थांबली असेल.. ते थांबले आणि म्हणाले “ठीक आहे या आपण सोबत गावात जाऊया..”. ते दोघे चालत निघाले. एक दोन प्रश्न उत्तरांची देवाण घेवाण झाली. काकांचे घर आले तसे ते म्हणाले “चला माझे घर आले, तुम्ही नीट जा ताई..”. काकांच्या घरा समोर विठ्ठल रखुमाई चं देऊळ असल्यामुळे त्यांनी देवळाकडे पाहून देवाचे नाव घेतले तसे ती बाई एकदम थांबली आणि मागे सरकली. 

तसे काकांना लक्षात आले की हा प्रकार दिसतो तसा नाहीये. त्या काळी गावातल्या लोकांना अश्या गोष्टी पटकन ध्यान्यात यायच्या. त्यांनी विठ्ठल नामाचा जप सुरू केला तसे बघता बघता ती बाई उलटी धावत सुटली आणि जोरात विचित्र आवाजात ओरडत गावाच्या बाहेरच्या दिशेने पळू लागली. काका तो जीवघेणा प्रसंग पाहतच राहिले. काही वेळात ती अंधारात कुठे तरी दिसेनाशी झाली. काका देवाचे आभार मानून घरी आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी गावात विचारपूस केली पण त्यांना त्या बाई बद्दल जास्त काही कळू शकले नाही. पण देवाच्या कृपेने वेळेत ते त्या देवळा पाशी आले आणि सुखरूप पणे त्यांची त्यातून सुटका झाली होती. 

Leave a Reply