अनुभव – शौनक धाकुलकर 

मी सध्या अकरावी ला शिकतोय. लहान पणापासून मला भय कथा ऐकण्याची खूप आवड आहे. हा अनुभव मला माझ्या आई ने सांगितला होता. जो तिला जवळपास १७ वर्षांपूर्वी आला होता. तेव्हा आई च्या एका मैत्रिणी चे लग्न होते म्हणून आई माहेरी जाणार होती. आणि मग तिथून आजी, आजोबा, माझा मामा आणि माझ्या दोन मावश्या असे एकूण ६ जण लग्नाला जाणार होते. लग्न दुसऱ्या गावी असल्याने ट्रेन ने प्रवास करावा लागणार होता. स्टेशन पर्यंत जाण्यासाठी २ रिक्षा केल्या. ट्रेन संध्याकाळी साडे सात ची होती. आजी आजोबा, मामा आणि मोठी मावशी एका रिक्षात बसले तर लहान मावशी आणि आई दुसऱ्या रिक्षात बसले. साधारण ५ च्या सुमारास ते निघाले होते. आमच्या घरापासून रेल्वे स्टेशन खूप च लांब होत. साधारण तास तरी लागणार होता. म्हणून ते सगळे लवकरच निघाले होते म्हणून ट्रेन सुटणार नाही.

माझ्या मावशी चे नाव अंजली आहे. आई आणि मावशी गप्पा गोष्टी करता होत्या. कारण आई बऱ्याच दिवसांनी माहेरी गेली होती. बराच वेळ उलटून गेला आणि त्या दोघींना लक्षात च आले नाही की रिक्षा वाल्याने चुकीच्या दिशेने रिक्षा वळवली. आई ने सहज बाहेर नजर फिरवली तर तिला जाणवले की परिसर ओळखी चा दिसत नाहीये. अगदी जंगल पट्टी चा भाग वाटत होता. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी आणि त्या रस्त्यावर इतर कोणतेही वाहन नव्हते. त्यात अंधार पडायला सुरुवात झाली होती. आई ने प्रसंगावधान राखून मावशी ला स्कार्फ बांधायला सांगितला. दोघींनी ही ठरवले की वेळ निघून जाण्या आधी चालू रिक्षातून खाली उडी मारायची. 

ठरल्या प्रमाणे दोघींनी एकत्र उडी मारली. पण उडी मारल्या नंतर अवघ्या एका क्षणा साठी आई चे लक्ष ड्रायव्हर सीट कडे गेले आणि तिच्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. कारण त्या सीट वर कोणीही नव्हत. तिच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. आपण ज्या रिक्षात बसलो त्या ड्रायव्हर चा चेहरा पहिला होता की नाही. ड्रायव्हर सीट रिकामी कशी असू शकते मग रिक्षा कशी चालत होती. या विचारात असतानाच मावशी ने आई ला भानावर आणले. दोघींनाही हाताच्या कोपऱ्याला आणि पायाला बरेच खरचटले होते, मार ही लागला होता. त्याच अवस्थेत रस्त्याच्या उलट दिशेने पळू लागल्या जिथून रिक्षा आली होती. तो परिसर अनोळखी होता आणि त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त गर्द झाडी होती.

दिशा ही कळायला मार्ग नव्हता. पण त्या दोघी ही धावत च राहिल्या. बऱ्याच वेळानंतर त्यांना एक वाडा नजरेस पडला. जो रस्त्यापासून थोड्या आतल्या बाजूस होता. कोणाची मदत मिळेल या आशेने ते त्या वाड्याच्या दिशेने निघाल्या. मदत जरी मिळाली नाही तरी तिथे निदान आसरा मिळेल किंवा लपता येईल. वाड्याचे फाटक उघडुन ते आत आले. आश्चर्य म्हणजे मुख्य दरवाजा उघडाच होता. मावशी पटकन आत गेली आणि मागून आई सुद्धा आत येऊन दरवाजा लाऊन घेतला. दोघींना ही थोडंसं हायस वाटलं. पण तितक्यात दारा वर जोर जोरात थापा पडू लागल्या. एक विचित्र गोष्ट म्हणजे इतका आवाज ऐकून सुद्धा वड्यातल कोणीही पाहायला किंवा दरवाजा उघडायला आल नव्हत. जे दोघींनाही खूप विचित्र वाटलं. बऱ्याच वेळा नंतर तो आवाज यायचा थांबला. 

तसे आई ने मागे वळून पाहिलं. तो एक भला मोठा प्रशस्त वाडा होता. त्या भागात जास्त समान नव्हते फक्त जुन्या धाटणीची काही लाकडी कपाटे होती. ती भान हरपून तो वाडा पाहत राहिली पण तितक्यात तिच्या लक्षात आले की मावशी कुठेच दिसत नाहीये. तिने शोधायचा प्रयत्न केला पण ती कुठेच दिसली नाही. आई पुन्हा दरवाज्याजवळ गेली पण दरवाज्याला आतून कडी होती. एका गोष्टी पासून वाचायला गेलो खरे आणि दुसऱ्या संकटात येऊन सापडलो असे तिला वाटले. मावशी ला शोधता शोधता ती नकळत एका खिडकी जवळ येऊन उभी राहिली. तर तिला जाणवले की कोणी तरी तिचे केस ओढतय. ती झटकन बाजूला झाली. पण तिला फक्त एक हात दिसला जसे खिडकीबाहेर कोणी तरी उभ राहून तिचे केस खेचले असावे.

एव्हाना संध्यााळ झाली होती. अंधार गडद होऊ लागला होता. तिने मावशीला हाक मारायला सुरुवात केली. कारण या जागेतून त्या दोघींना ही बाहेर पडायचे होते. ती आता त्या वाड्यातल्या खोल्यांमध्ये जाऊन पाहू लागली तसे तिला जाणवले की तो वाडा बऱ्याच वर्षांपासून बंद असावा कारण सगळ्याच गोष्टींवर खूप धूळ आणि जाळोखे साचले होते. पण दार उघड कसं हे मात्र तिला उमगत नव्हत. तिने एका खोलीचा दरवाजा उघडला आणि तितक्यात तिचे लक्ष समोर गेले. समोरच्या भिंतीवर काही तरी होत. ती दबक्या पावलांनी पुढे जाऊ लागली. जसे तिला लक्षात आले तसे तिचे सर्वांग शहारले. एक बाई भिंतीवर पाली सारखी सरपटत जात होती. मोकळ्या केसांमुळे चेहरा झाकला गेला होता. नेसलेली साडी ठिकठिकाणी फाटलेली, जळालेली जाणवत होती. 

आई तो भयाण आणि किळसवाणा प्रकार पाहत होती. पण हे सगळे इतक्यावरच थांबणार नव्हत. त्याच खोलीत एका कोपऱ्यातून कसलीशी हालचाल जाणवली तसे आई चे लक्ष त्या बाई वरून त्या खोलीच्या कोपऱ्यात गेलं. तिथे एक माणूस उभा होता आणि एका वेगळ्याच आवाजात कण्हत होता. हा सगळा प्रकार जणू स्वप्नवत भासत होता. तिला भीती ने भोवळ येणार तितक्यात कोणी तरी तिचा हात धरला आणि ती भानावर आली. पाहिले तर मावशी होती. ती सुद्धा खूप घाबरली होती पण आपल्या बहिणीला वाचविण्यासाठी कसलीच परवा ना करता आली होती. हा प्रकार तिने आधीच पाहिला होता आणि म्हणून च ती लपून राहिली होती. ती आई ला म्हणाली की एका संकटातून वाचण्यासाठी आपण इथे आलो पण इथे त्याहून ही भयानक प्रकार आहे असे वाटतेय. त्या दोघींनी देवाचे नाव घेतले आणि वाड्याच्या मुख्य दरवाज्याची कडी उघडुन बाहेर धावत सुटले.

कसे बसे रस्त्यावर आले. एव्हाना अंधार ही गडद झाला होता. तितक्यात त्यांना एक माणूस उभा दिसला. दोघींनीही त्याला विनंती केली आणि आम्ही रस्ता चुकलो आहोत इतकेच सांगितले. त्यावर तो म्हणाला की काळजी करू नका. माझी स्वतःची रिक्षा आहे मी सोडतो तुम्हाला. त्याच्या बोलण्यावरून तरी तो सभ्य वाटत होता. पुढे थोड्या अंतरावर त्याने रिक्षा उभी केली होती. त्या जाऊन रिक्षात बसल्या. पुढच्या अर्ध्या पाऊण तासात त्याने स्टेशनवर आणून सोडलं. घडलेल्या प्रकारामुळे हातात जे काही समान होत ते धावपळीत कुठे तरी पडलं होत. त्यामुळे त्यांच्याकडे द्यायला पैसे ही नव्हते. 

त्यांनी विनंती केली आणि स्तेशनात गेल्या. आजी आजोबा मामा वैगरे त्यांची वाट पाहत थांबले होते. हा सगळा प्रकार जवळपास दीड पावणे दोन तासात घडला होता. ट्रेन २ अडीच तास लेट झाली होती. त्यांनी पटकन पैसे घेतले आणि त्याला द्यायला गेले. पण ना तो माणूस दिसला ना त्याची रिक्षा. त्यांनी बराच शोध घेतला पण तो काही त्यांना दिसला नाही. आई ला कुठे तरी वाटून गेले की त्या माणसाच्या रुपात सक्षात स्वामी समर्थ येऊन त्या संकटातून वाचवून गेले. त्यांनी स्वामींचे मनोमन आभार मानले. त्या पुन्हा आई आजोबा जवळ गेल्या तसे ते त्यांना विचारू लागले की इतका उशीर कसा काय झाला, आम्ही खूप काळजी करत होतो, फोन ट्राय केला पण तो ही बंद.

आई आणि मावशी ने वेळ मारून नेण्यासाठी रिक्षा खराब झाली मग काही अंतर चालत यावे लागले दुसरी रिक्षा पकडण्यासाठी असे काही तरी कारण सांगितले. दुसऱ्या दिवशी लग्न आटोपून घरी आल्यावर त्यांनी घडलेला भयानक प्रकार घरी सांगितला. तेव्हा आजोबा म्हणाले की तो पलीकडच्या जंगलाचा भाग चांगला नाही. तुम्ही तिथे कसे गेलात हे मला अजून कळले नाहीये. पण तो वाडा. त्या बद्दल मी बरेच वर्ष ऐकून आहे. लोक म्हणतात की तिथे एका जोडप्याला जिवंत जाळलं होत म्हणून त्यांचा आत्मा तिथे भटकतो आणि त्या वाड्यात आलेल्यांना जिवंत सोडत नाही. पण स्वामींची कृपा म्हणून तुम्ही या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडू शकलात. 

Leave a Reply