अनुभव – दिग्विजय हिनुकले

माझे कुटुंब म्हणजे मी, माझ्या ३ बहिणी आणि माझे आई वडील असे ६ जण एका भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहायचो. त्या बिल्डिंग मध्ये खाली बँक होती आणि वर आमचे घर होते. खालचे तिन्ही फ्लॅट मिळून ती बँक होती. आमच्या मजल्यावर एक फ्लॅट बँकेची कागदपत्रे, फाईल्स वैगरे ठेवण्यासाठी वापरला जायचा आणि दुसरा फ्लॅट रिकामा होता जो आम्ही राहायला आल्यापासून बंद च असायचा. संध्याकाळी बँक बंद झाली की मग आमच्या बिल्डिंग मध्ये कोणीही नसायचे. फक्त आमचा एक च फ्लॅट. त्यामुळे रात्री नुसते खाली काही आणायला जायचे म्हंटले तरी भीती वाटायची. ती बिल्डिंग मुंबई पुणे हायवे ला लागून होती. हे सांगायचे कारण की त्या भागात नेहमी खूप भयानक अपघात व्हायचे. म्हणजे वर्णन करता ही येणार नाही असे. एकदा अश्याच एका सुमो गाडी चा अपघात झाला आणि त्यात बसलेल्या कुटुंबातले बरेच जण जागच्या जागीच गेले. एम्ब्युलांस येई पर्यंत त्यांची प्रेत बरेच तास आमच्या बिल्डिंग च्याच समोर ठेवली होती. 

असे कित्येक अपघात, त्यात मरण पावलेले लोक मी पहायचो. अश्याच एका भीषण अपघातात एका माणसाच्या माने वरून ट्रक गेल्यामुळे त्याचे शरीर एका जागेवर तर डोके दुसरीकडे फरफटत गेले होते. ती सगळी प्रेत एम्ब्यूलांस येई पर्यंत आमच्या बिल्डिंग समोर ठेवली जायची. आणि मग कधी काही घ्यायला म्हणून दुकानात जायला बाहेर पडायचो तेव्हा हे सगळे दिसायचे. हा सगळ्या प्रकारा मुळे अनपेक्षितपणे मनात एक भीती बसली होती. कदाचित म्हणून च रात्री कधी बिल्डिंग मधून बाहेर जायचा योग आला की भीती वाटायची. तिथं सकाळी साडे चार ला पाणी यायचे आणि तासाभराने म्हणजे साडे पाच ला जायचे. घर पहिल्या मजल्यावर असल्यामुळे खाली नाली आणि मोटर चालू करायला पहाटे उठावे लागायचे. मी जेव्हा ही मोटर लावायला खाली जायचो आणि मोटर लावायचो तेव्हा नेहमी माझ्या मागे कोणी तरी असल्याची चाहूल जाणवायची. पण कोणी दिसायचे नाही. इतकेच नाही तर आमचा एक च फ्लॅट असल्यामुळे मला रात्री खाली गेट लॉक करायला जावे लागायचे. 

वर येताना ही मला माझ्या मागून कोणी तरी चालत येत असल्याचे भास व्हायचे. कधी कधी धावतच मी वर यायचो आणि घरात येऊन सुटकेचा निःश्वास सोडायचो. मला फक्त भास व्हायचा की त्या बिल्डिंग मध्ये खरंच तसे काही होते याची खात्री नव्हती. पण जेव्हा मी काही दिवस आजारी पडलो तेव्हा माझी ताई मोटर लावायला गेली आणि तिला ही अगदी तसाच भास झाला. मी या सगळ्या बद्दल घरी सांगितले. पण इतक्या सहज हा फ्लॅट बदलून दुसरी कडे राहायला जाणे शक्य नव्हते. फक्त आम्हा घरातल्या ना नाही तर हे अनुभव इतरांना ही आले. एकदा माझा चुलत भाऊ सुट्टीत घरी रहायला आला होता. तेव्हा त्याला न सांगून सुद्धा तो टेरेस वर झोपायला गेला. काही केल्या त्याला झोप लागत नव्हती. म्हणून तो असाच टेरेस च्याच काठड्याजवळ जाऊन उभा होता. नकळत त्याचे लक्ष पहिल्या मजल्यावर वरच्या एका फ्लॅट च्याच बाथरूम खिडकी कडे गेले. तिथं त्याला एक माणूस म्हणजे त्याची सावली दिसली. त्याला माहित होते की आमच्या मजल्यावर सगळे फ्लॅट बंद आहेत. तो घाबरून धावत खाली आला. 

आम्हाला त्याने सगळे सांगितले. मी जाऊन खात्री ही केली पण तो फ्लॅट खूप महिन्यांपासून बंद होता. आम्ही त्याला समजावले की तुला भास झाला असेल. पण मनोमन मला खात्री होती की तिथे नक्की त्याने काही तरी पाहिले असेल. बरेच वर्ष आम्ही त्या फ्लॅट मध्ये राहिलो. तसे आम्हाला कधी हानी झाली नाही पण अनुभव यायचे हे मात्र नक्की. कदाचित आम्हा सगळ्यांचा देव गण होता हे कारण असावे. काही वर्षांनी ताई चे लग्न झाले. ताई आणि दाजी आमच्या घरी आले होते. ताई ३-४ दिवस घरी राहणार होती. दाजी जेवण वैगरे करून मग त्यांच्या घरी जाणार होते. जेवण उरकायला बराच उशीर झाला. बारा वाजत आले होते. आम्ही त्यांना बराच आग्रह केला की खूप रात्र झाली आहे उद्या सकाळी जा पण त्यांनी एकले नाही. मी त्यांना खाली सोडून पुन्हा वर आलो. त्यांनी बाईक सुरू केली तर त्यांना जाणवू लागले की बाईक मागून कोणी तरी घट्ट धरून ठेवली आहे. तरीही त्यांनी बाईक जोरात रेज करून कशी बशी तिथून काढली. गेट मधून ते बाहेर पडले आणि जसे पुढच्या ब्रीज वर पोहोचले त्यांना एक माणूस दिसला. 

तो रस्त्याच्या अगदी मधोमध उभा होता. ते जस जसे त्याच्या दिशेने पुढे जाऊ लागले त्यांना दिसले की त्या माणसाला डोकेच नाहीये. फक्त त्याचे शरीर रस्त्याच्या मधोमध उभे आहे. देवाचे नाव घेत त्यांनी गाडी जेमतेम बाजूने काढली पण ते त्यांच्या मागे बराच वेळ पळत राहिले. आणि काही वेळा नंतर दिसेनासे झाले. हा सगळा प्रकार त्यांनी घरी पोहोचल्यावर आम्हाला फोन करून सांगितला. त्या दिवसानंतर मात्र त्यांच्यात विचित्र बदल जाणवू लागला. दुसऱ्या दिवशी ते घरी आले, जेवण करून बेडरूम मध्ये जाऊन झोपले. ताई सगळे आवरून त्यांच्या बाजूला झोपायला गेली. तसे ते अचानक उठले आणि अतिशय घोगऱ्या आवाजात बोलू लागले. सांगू लागले की मला जेवायला दे, मला खूप भूक लागली आहे. ताई म्हणाली की आपण आत्ताच तर जेवलो. तसे ते पुन्हा चिडून जेवायला मागू लागले. ताई घाबरून बेडरूम मधून बाहेर आलो आणि त्यांचे असे वागणे आई ला सांगितले. त्यांच्या आई ने लगेच ओळखले. 

त्यांनी दाजिंचा हात धरून बाहेर आणले आणि साई बाबांच्या फोटो समोर बसायला लावले. पण त्यांच्या शरीरात जे कोणी होते ते मात्र ऐकायला तिथे बसायला तयार नव्हते. त्यांनी अंगारा घेऊन लावला आणि घराचे दार उघडले. त्या चिडून म्हणाल्या की जो कोणी आहे त्याने आत्ताच्या आत्ता बाहेर जा. माझ्या पोराला त्रास देऊ नकोस. तरीही कितीतरी वेळ त्यांचे ओरडणे चालूच होते. आईने आणि ताईने त्यांना धरून ठेवले होते. काही वेळानंतर ते शांत झाले आणि तिथेच झोपून गेले. ताई ला वाटले की ते बरे झाले असावेत. पण तसे नव्हते. दोन दिवसांनी ते ऑफिस ला गेले आणि त्यांच्या शरीरात जे कोणी होते त्यांनी पुन्हा त्यांचा ताबा घेतला. रागात डेस्क वरचा कंप्युटर फेकून दिला आणि पुन्हा वेगळ्याच आवाज ओरडू लावले. ताई ला कळल्यावर तिने आम्हाला फोन करून कळवले. माझ्या आजी ने पुजाऱ्याला सांगून उपाय समजून घेतला. 

उपाय असा होता की अमावस्येच्या दिवशी घरातल्या एकाने तीन रस्त्यावर उतारा ठेऊन यायचा. कोणीही हाक मारली तरी मागे पाहायचे नाही. माझी आजीच हे करायला तयार झाली. तिला हे सगळे चांगले माहीत होते. ती आमच्या घरी आली. रात्री १२ ला ती उतारा घेऊन ब्रीज जिथे संपतो तिथे ३ रस्त्यावर उतारा ठेवायला गेली.  आजी जसा तो उतारा ठेऊन मागे वळली तसे तिला मागून हाका ऐकू येऊ लागल्या. पण आजी ने एकदाही मागे वळुन पाहिले नाही. गप गुमान घरी चालत आली. इतके सगळे झाल्यावर मात्र आम्ही तो फ्लॅट सोडायचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे राहायला गेलो. 

Leave a Reply