July 15, 2020

तळेगाव – एक चित्तथरारक अनुभव – मराठी भयकथा

Reading Time: 4 minutes

अनुभव – अपूर्वा बापट

साधारण ४ वर्षांपूर्वी माझे वडील तळेगाव ला कामानिमित्त शिफ्ट झाले होते. त्यांनी तिथे एक फ्लॅट भाड्यावर घेतला होता. कंपनी त्यांना राहायला घर देत होती पण तिथे फॅमिली ला घेऊन यायला मनाई होती. म्हणून त्यांनी थोड्याच अंतरावर एका बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर 1BHK फ्लॅट भाड्यावर घेतला होता. जॉब ला जॉईन होताच ते तिथे शिफ्ट झाले आणि मग शनिवार रविवारी मी आणि माझी आई दोघेही तळेगाव ला जात असत. ती बिल्डिंग तशी बरीच जुनी होती. तस बघायला गेलं तर परिसर आणि आजूबाजूची लोक छान होती पण तिथे गेल्यावर मला नेहमी विचित्र वाटायचं. बिल्डिंग ३ मजल्यांची होती. प्रत्येक मजल्यावर ४ फ्लॅट होते पण आमच्या शिवाय त्या मजल्यावर कोणीच राहत नव्हत. ते तीन फ्लॅट खूप वर्षांपासून बंद आहेत असं वाटायचं आणि ही गोष्ट मला जरा खटकली होती. पण या गोष्टीचा माझ्या आई बाबांना काही फरक पडत नव्हता. त्यांना तळेगाव च वातावरण आणि शांतता खूप आवडतं होती.

1BHK फ्लॅट असल्याने आई बाबा बेडरूम मध्ये आणि मी बाहेर हॉल मध्ये झोपायचे. आम्ही जवळपास सगळे शनिवार रविवार तिथे जायचो. पण जेव्हा ही मी तिथे असायचे मला रात्री कधीच नीट झोप लागायची नाही. मी पूर्ण रात्र जागी असायचे. आणि कधी झोप लागलीच तर विचित्र स्वप्न पडून मी दचकून जागी व्हायचे. मला इतके विचित्र आणि भयानक स्वप्नं कधीच पडायची नाही. त्या स्वप्नांत मला दिसायचे की कोणी तरी अदृश्य शक्ती माझ्यावर हावी होऊन मला मारायचा प्रयत्न करतेय, कधी ती मला केसाला पकडून अपटते य., तर कधी माझा गळा कापते य. अतिशय विचित्र आणि भयानक स्वप्न. पण ही गोष्ट मी कधी च माझ्या आई बाबा ना सांगितली नाही. कारण मला माहीत होत की ते स्वप्न आहेत म्हणून विसरून जा असे म्हणतील आणि दुर्लक्ष करतील. पण नंतर मला झोप लागत नाही म्हणून मी आई सोबत तळेगाव का जाणं बंद केलं.

मे महिन्यात माझी परीक्षा संपली आणि सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या की आपण कुठे तरी छोटीशी ट्रीप काढू. त्यावर मी म्हणाले की आपण माझ्या दुसऱ्या घरी म्हणजे तळेगाव ला जाऊ. सगळे तयार ही झाले आणि आम्ही दुसऱ्या आठवड्यात तिथे जायचा प्लॅन केला. आम्ही सगळ्या मुली असल्यामुळे बाबा आमच्या घरी येणार होते म्हणजे आम्ही सगळ्या जणी तिथे एन्जॉय करू शकू. आम्ही एकूण ५ जणी होतो. सकाळी लवकरच पोहोचलो आणि मग फ्रेश होऊन दिवसभर बाहेर फिरत राहिलो. अंधार पडण्याआधी आम्ही घरी परतलो. टीव्ही लाऊन गप्पा सुरू झाल्या. वेळ अगदी मजेत जात होता आणि सगळे खूप खुश होते. काही वेळा नंतर आम्ही जेवण आटोपून झोपायची तयारी केली. दोघी जणी बेडरूम मध्ये झोपायला गेल्या. आणि माझ्या सोबत दोघी जणी बाहेरच टीव्ही पाहत बसलो. आमच्या छान गप्पा चालू होत्या. बोलता बोलता आमच्यातली एक मैत्रीण झोपून गेली.

मी आणि माझी खास मैत्रीण सोनिया आम्ही दोघीच जागे होतो. तस तर आम्हाला झोप येत नव्हती पण तरीही आम्ही लाईट बंद करून पडून राहिलो.

मला झोप लागते न लागते तोच पुन्हा पूर्वी सारखे भयानक स्वप्न पडले आणि मी दचकून जागी झाले. आणि विचित्र गोष्ट म्हणजे अगदी तसेच काहीसे सोनिया सोबत झाले. आम्ही एकमेकींकडे पाहू लागलो आणि विचारले स्वप्न पडले का? आणि आम्ही दोघींनी होकारार्थी माना डोलव ल्या. थोड्या वेळ आम्ही काहीच बोललो नाही कारण स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी मनातून विचारातून जात नव्हत्या. पण नंतर मी सोनिया ल म्हणाले अग अशी स्वप्न मला इकडे आल्यावर नेहमी पडतात आणि मला कधीच झोप लागत नाही. त्यावर ती म्हणाली की अग मला ही पडल पण जाऊदे आपण जास्त विचार नको करूया. आणि झोपायचा प्रयत्न करू. तीच ऐकून मी पुन्हा झोपणार तितक्यात दारावर जोरात थाप पडली. आम्ही दोघी उठून बसलो आणि घाबरलेल्या अवस्थेत एकमेकींकडे पाहायला लागलो. मी पटकन माझा फोन हातात घेतला आणि पाहिले तर रात्रीचे २ वाजून गेले होते. 

मी हळूच पुटपुटले की आता या वेळेस कोण असेल. या मजल्यावर तर आजूबाजूला तरी कोणी राहत ही नाही मग दरवाजा कोणी वाजवला. आम्ही खूप घाबरलो होतो म्हणून जागच्या हललो सुद्धा नाही. बाकी ३ मैत्रिणी इतक्या गाढ झोपल्या होत्या जसे त्यांना काही ऐकूच आले नाही. बराच वेळ उलटुन गेला आणि सगळे शांत झाले. जे कोणी होत ते परत गेलं असेल असं समजून आम्ही पुन्हा अंथरुणात पडलो आणि पुन्हा अतिशय जोरात २ दा ढकलला गेला. जसे की कोणी तरी बाहेरून दरवाजा जोरात आत ढकलून उघडण्याचा प्रयत्न करतेय. आता मात्र आम्ही दोघी प्रचंड घाबरलो. मी माझ्या बाजूला झोपलेल्या मैत्रिणीला उठवले आणि विचारले की तुला काही ऐकू येतंय का ? पण ती इतक्या गाढ झोपेत होती की काहीही न बोलता तशीच झोपून गेली. मी आणि सोनिया हातात हात घेऊन एकमेकींना घट्ट पकडून बसलो होतो.

काहीच कळायला मार्ग नव्हता. इतक्यात हॉल ची खिडकी अचानक उघडली आणि सोनिया जोरात किंचाळली. सगळ्या मैत्रिणी जाग्या झाल्या. बेडरूम मधून २ मैत्रिणी धावतच बाहेर आल्या. बाहेर अजिबात वारा नव्हता तरीही खिडकी जोरात उघडली होती. घरात आणि बाहेर काळोख असल्याने आम्हाला काहीच दृष्टीस पडत नव्हते. एका मैत्रिणीने पटकन लाईट लावले. मी आणि सोनिया ने घडत असलेल्या गोष्टी सांगितल्या. त्यावर त्या दोघी म्हणाल्या की आपण सगळे आहोत ना एकत्र, अस काही नसते उगाच घाबरु नका. पण मला आणि सोनिया ला घडत असलेला प्रकार खरा आहे हे माहीत होत. आम्ही भीती ने जागचे हल लो सुद्धा नव्हतो. हे सगळे घडत असताना पहाटे चे ४ वाजत आले होते. सगळे पुन्हा झोपून गेले पण मला आणि सोनिया ला काही झोप लागत नव्हती. 

शेवटी आम्ही दोघी उठलो आणि हॉल च्या खिडकी तून बाहेर पाहायला लागलो. समोर च बंद घराची खिडकी दिसली. खिडकीचा एक भाग उघडा होता. त्यातून आत पाहण्याचा प्रयत्न केला पण त्या घरात मिट्ट अंधार पसरला होता. तितक्यात खिडकीतून एक हात बाहेर आला आणि खिडकीचा दुसरा दरवाजा ही उघडला. आमची वाचाच बंद झाली. ते घर तर गेले कित्येक वर्ष बंद आहे पण मग आत कोण आहे. आमच्या सर्वांगावर शहारे आले होते आणि भीतीने अंग थरथरत होते. आम्ही त्या घरातल्या काळोखात निरखून पहात होतो. पुढच्या क्षणी २ डोळे चमकले, सामान्य माणसापेक्षा ते नक्कीच वेगळे आणि मोठे होते. आत जे काही होत ते आता आमच्यावर नजर रोखून होत. कदाचित त्याला आमची चाहूल लागली होती. इतक्यात बिल्डिंग खालचे कुत्रे जोरात भुंकायला लागले तसे आमचे लक्ष विचलित झाले, आम्ही भानावर आलो आणि खिडकी बंद करून आत गेलो. 

मी पाहिले तर पहाटे चे ५ वाजत आले होते. सोनिया का म्हणाले की इकडे थांबण्या त अर्थ नाही, आपण पहाटे ची पहिली ट्रेन पकडून मुंबई ल निघून जाऊ. आम्ही सगळ्यांना उठवले आणि घडलेला प्रकार सांगितला. आपण आत्ताच निघतोय असे म्हंटल्यावर कोणी काही जास्त बोलले नाही. आम्ही पटापट आवरून साधारण ७ वाजता घरातून बाहेर पडलो. घराला कुलूप लावताना माझे लक्ष दरवाजावर गेले. त्यावर मातीने बरबटलेल्या हाताच्या पंजा चे निशाण होते. घराला सेफ्टी डो अ र असतानाही चक्क आतल्या दरवाजावर कोणी तरी थाप मारली होती. काही क्षणासाठी मी विचारात गढून गेले पण मैत्रिणी ने हाक मारल्यावर मी भानावर आले आणि कसे बसे कुलूप लावून मागे वळले. 
आई बाबा मला असे अचानक घरी बघून जरा घाबरले च. मी घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि बाबा ना ते घर सोडायला सांगितले. त्या दिवसा नंतर बाबांनी उरलेले भाडे देऊन ते घर सोडलं आणि पुन्हा आम्ही तळेगाव ला कधीच गेलो नाही. अजूनही सोनिया भेटली की आमचा या बद्दल विषय निघतो. पण आम्ही दोघेही त्या बद्दल जास्त बोलणे टाळतो. याआधी आमचा अश्या गोष्टींवर विश्वास नव्हता पण या घटनेनंतर त्या अस्तिवात आहेत यावर विश्वास बसू लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares