लेखक – डॉ. रोहित कुलकर्णी

भाग १ – https://www.tkstoryteller.com/bhutanchi-yaatra-bhag-1-bhaykatha-tkstoryteller/

राघव आता या जगात राहिला नव्हता. त्याच्या मृत्यूची बातमी सगळ्या गावात पसरली होती. सगळ्यांना वाटले की राघव घराच्या छतावरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. राघवच्या मित्र मैत्रिणींना राघवच्या मृत्यूची बातमी कळाली आणि त्याच्या अकस्मात जाण्याने त्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला होता. दुसऱ्या दिवशी सगळे जण राघवच्या गावी आले. त्या सर्व मित्र मैत्रिणींमध्ये त्याची खास मैत्रीण पूजा देखील होती. खरंतर पूजा आणि राघव दोघे एकमेकांवर प्रेम करत होते पण त्यांनी त्यांचे प्रेम कधीही एकमेकांसमोर व्यक्त केलेले नव्हते. राघव आता या जगात नाही हे ऐकल्यानंतर पूजा पूर्णपणे तुटली होती. असं काही होईल यावर तिला विश्वासच बसत नव्हता करण जाण्याच्या आदल्या रात्री कितीतरी वेळ ते एकमेकांसोबत फोन वर गप्पा मारत होते. तेव्हा तर राघव अगदी आनंदात होता आणि आज पहाटे अशी बातमी यावी.. राघवचे प्रेत बघताच क्षणी पूजाने टाहो फोडला आणि सगळ्यांसमोर तिने तिच्या राघव वर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. तिला खूप यातना होत होत्या. तू मला असं कसं सोडून जाऊ शकतोस, मी माझं पूर्ण आयुष्य तुझ्या सोबत घालवायचे स्वप्न बघत होते , मी योग्य वेळ बघून तुला लग्नासाठी मागणी घालणार होते , पण तू त्या आधीच मला सोडून गेलास, अस म्हणत जोर जोरात रडू लागली. 

तिला तिचे मित्र मैत्रिणी सावरत थोडे बाजूला घेऊन आले. काही वेळात राघवचे सगळे नातेवाईक गावामध्ये जमा झाले. त्यांनी राघवचे अंतिम विधी संध्याकाळ पर्यंत करायचे ठरवले कारण काही लांबचे नातेवाईक अजूनही यायचे बाकी होते. सगळे तयारी मध्ये व्यस्त झाले. काही वेळानंतर त्यांच्या मित्रांमधील कोणाच्या तरी लक्षात आले की पूजा कुठे दिसत नाही. सगळी मुलं मुली पूजाला शोधू लागले. तिला शोधत काही जण गावाच्या वेशीपर्यंत आले. तेव्हा त्यांना दिसले की पूजा गावाच्या वेशी जवळ एकटीच जाऊन बसली आहे आणि कोणाशीतरी बोलत आहे. पण ती कोणा सोबत बोलत आहे हे कोणाला कळेना. कारण तिच्या आजुबाजुला कोणीही दिसत नव्हते. ती स्वतःशीच बोलत होती. सगळ्यांना वाटले की राघव असा अचानक सोडून गेल्यामुळे तिला मानसिक झटका बसला असावा. काही जण तिच्याकडे अवाक होऊन बघत होते तर इतरांना तिची कीव वाटत होती. तेवढ्यात पूजा अचानक उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव बदलले. तिचा चेहरा पांढरा पडला. डोळे विस्फारले आणि तिच्या तोंडून वाक्य बाहेर पडले “राघव , अरे राघव थांब ना , कुठे चालला आहेस ?? राघव , मला पण येऊ दे ना ” अस म्हणत ती अतिशय वेगाने पाळत सुटली.

काही जण तिला सावरायला तिच्या मागे गेले तर काही घाबरून तिथे च थांबले. पण ती अतिशय जोरात धावत गेली आणि झाडी झुडपात निघून गेली. मागे पाळणाऱ्या ना कळलेच नाही की काही क्षणात ती कुठे निघून गेली. त्यांच्या ग्रुप मधल्या काही मुलांनी त्यांच्या बाईकस् काढल्या आणि ते पूजा ला शोधायला निघाले. इथे पूजा आता एक नदीच्या किनाऱ्यावर आली होती. इतका वेळ पूजाला ती काय करत होती याचं काहीच भान नव्हत. पण आता तिला शुद्ध आली. तिचे हावभाव पूर्ववत झाले. तिने आजूबाजूला पाहिले आणि जरा गोंधळली च. विचारात पडली मी इथे कशी आले ?? मी तर गावाच्या वेशीवर बसले होते. मग आता इथे कशी. तिचे लक्ष तिच्या पायांकडे गेले. तिच्या पायाला अनेक जखमा झाल्या होत्या कारण ती अनवाणी किती तरी वेळ पळत होती. तिला कसलेही भान नव्हते त्यामुळे काटेरी झुडपा तून पळत असताना तिला बरेच लागले होते. पळून पळून तिचे पाय दुखायला लागले होते. एव्हाना संध्याकाळ झाली होती आणि हळु हळू अंधार पडायला सुरुवात झाली होती.. तितक्यात दूर कुठे तरी पूजाला काही मशाली दिसू लागल्या. अचानक वातावरणात गारवा जाणवू लागला. 

आजूबाजूला धुकं पसरल. पूजा पुरती घाबरली होती पण आता काय करावं तिला समजत नव्हतं. आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं. हळु हळु तिला त्या भयानक वाद्यांचा आवाज येऊ लागला आणि कोणी तरी स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारत ओरडतय, रडतंय अस तिला वाटू लागले. तो जीवघेणा आवाज ऐकून मात्र आता ती घाबरली. आणि बेंबीच्या देठापासून ओरडत पळत सुटली. ती कुठे जाते आहे तिला काहीच समजत नव्हत. पण कोणी तरी होत जे तिच्या पाठीमागे पळत असल्याचा तिला भास होत होता. जीवाच्या आकांताने ती पळत सुटली, पायाखाली येणारे दगड-धोंडे आणि काटे तिला तळपायात टोचत आणि घुसत होते. त्यात याआधीच्या जखमा देखील दुःखत होत्या. पन त्या वेदनांकडे दुर्लक्ष करत ती जिवाच्या आकांताने ती पळत होती. आपल्या मागे कोण आहे हे बघायची देखील तिची हिम्मत होत नव्हती. पळता पळता तिच्या पायाला जोरात ठेच लागली आणि ती पडली. तोच तिला मागून आवाज आला , “पूजा, तुला लागलं तर नाही ना ?? दूर का पळतेस तू ?? मी तुझ्यासाठीच इथवर आलो आहे , ” हे ऐकल्यावर पूजाच्या हृदयात अगदी चरर झालं , करण तो आवाज राघवचा होता. तिने झटकन मागे पाहिले. राघव अर्धनग्न अवस्थेत तिच्या समोर उभा होता. त्याच्या एक हातात चाबूक तर दुसऱ्या हातात मशाल होती. सर्व अंगावर भस्म लावलेले होते.

त्याच्या डोक्याला जब्बर दुखापत झाली होती. राघवला अचानक समोर पाहून ती घाबरली पण दुसऱ्याच क्षणी तिनी राघवच्या डोळ्यात बघितले आणि तिचे अश्रू अनावर झाले. राघवच्या देखील डोळ्यात पाणी आलं होतं. ती राघव जवळ आली आणि त्याच्या डोक्याच्या जखमेवर हात फिरवण्यासाठी हात पुढे नेला असता तो हात राघवच्या आर पार गेला. ती राघव ला जरी पाहू शकत असली तरी त्याला स्पर्श करू शकत नव्हती. तेव्हा राघव म्हणाला ” मी तुझ्या पासून आता खूप दूर गेलो आहे पूजा.. आणि माझ्या जवळ जास्त वेळ देखील नाही. माझ्या शरीराचे एकदा अंत्य संस्कार झाले की मला मुक्ती मिळेल. तू इथपर्यंत आलीस कारण मी तुला इथं घेऊन आलो आहे. माझ्यासोबत जे घडलं आहे ते पुन्हा कोणासोबत पण घडू नये. म्हणून मी तुला इथे बोलावले आहे “. तिला काही कळेनासे झाले. त्याने त्याच्या सोबत घडलेली सर्व हकीकत पूजा ला सांगितली. त्या रात्रीची ती भयानक गोष्ट ऐकतांना पूजाला दुःख आवरलं नाही आणि ती हुंदके देत आपले अश्रू पुसत होती. तिच्या मनात असंख्य प्रश्न होते. राघवचे बोलणे संपल्यावर तिने त्याला विचारले , ” पण ते लोक आणि त्या बायका कोण आहेत ?? ते का लोकांना मारत आहेत ?? जशी तुझ्या शरीराच्या अंतिम संस्कारानंतर तुला मुक्ती मिळणार म्हणतोयस , तशी त्यांना अजून मुक्ती का नाही मिळाली ?? “..

त्यावर राघव म्हणाला हे ते लोक आहेत ज्यांच्या शरीरावर अंत्य संस्कार झालेलेच नाहीत, गेली कित्येक वर्षे ते असेच भटकत आहेत. यातील कोणाचा खून झाला आहे. तर कोणाचा अपघात आणि पोलीस यांच्या घरच्यालोकांना शोधण्यात अपयशी ठरल्यामुळे यांच्या शरीरावर योग्यरीत्या अंत्य संस्कार झाले नाहीत आणि यांना अजूनही मुक्ती मिळाली नाही. त्यांना मुक्ती मिळत नसल्याने त्यांनी त्यांचा राग माझ्या सारख्यांवर काढला. जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी त्यांना मुक्ती मिळवून देईल अशी हमी दिली. ” अरे पण तू कसकाय त्यांना मुक्ती देशील ?? ” पूजा ने विचारले. त्यावर राघव म्हणाला “गावाच्या वेशीपाशी तुला एक मोठं पिंपळाचे झाड दिसेल. त्या झाडाच्या खोडाला एक छोटंसं छिद्र आहे. त्या छिद्रात एक पुडी ठेवली आहे. त्या पुडी मध्ये त्या सर्व अतृप्त आत्म्यांच्या शरीरावरचे थोडे थोडे भस्म आणि त्या बायकांच्या कपळाची हळद काही प्रमाणात बांधून ठेवली आहे. त्यात त्यांचा काही प्रमाणात अंश देखील आहे. ती घेऊन जा आणि माझ्या शरीराच्या बाजूला ठेऊन दे. माझ्या शरीरासोबत त्यांच्या अंशाचा देखील अंत्य संस्कार होईल आणि त्यांना देखील मुक्ती मिळेल.

इतके ऐकल्यावर पूजा ने विचारले “तू यासाठी माझीच निवड का केलीस ? तू या कामासाठी दुसऱ्या कोणालाही निवडू शकला असतास. खासकरून तुझ्या मित्रांना, तुझ्या जवळच्या मित्राला. त्यावर राघवने उत्तर दिले. हा जो विधी तू करणार आहेस तो विधी करण्यासाठी मला अश्या व्यक्तीची गरज होती की त्या व्यक्तीसोबत माझं जन्मतः कोणतं ही नातं नसावं. पण माझं त्या व्यक्तीवर आणि त्याच प्रमाणे त्या व्यक्तीच माझ्यावर अगदी मनापासून खरं प्रेम असायला हवं. तरच त्या व्यक्तीला मी माझ्या मृत्यूनंतरही दिसू शकेन आणि आणि त्याच्या सोबत मी संवाद साधू शकेन. मी किती तरी मित्रांना हा का दिल्या पण कोणीही माझा आवाज ऐकू शकले नाही. कोणी मला बघू देखील शकले नाही. पण गावाच्या वेशीवर तू मला बघितलं आणि माझ्यासोबत बोलायला म्हणून आलीस. इतरांना तू बोलतांना दिसत होतीस पण मी दिसत नव्हतो. तुझ्या मनावर परिणाम झाला असा विचार करून लोक तुला वेडी समजतील म्हणून मी तुला गावापासून दूर घेऊन आलो. पूजा माझं तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे ग , पण मला हे तुला सांगायला खुप उशीर झाला. त्यावर पूजा म्हणाली माझं पण.. मला तर तुझ्यासोबत लग्न करायची इच्छा होती, मी शिक्षण पूर्ण होताच तुला लग्नासाठी मागणी घालणार होते. दोघांच्याही डोळ्यात टचकन पाणी तरळल.

तू मला बघू शकलीस आणि बोलू शकलीस यातच मला समजलं आपलं प्रेम किती निरागस आणि खरं आहे, राघव म्हणाला. माझं आयुष्य छोटं होतं पण मला त्या आयुष्यात माझ्यावर खरं प्रेम करणारी व्यक्ती मिळाली यातच मी माझं भाग्य समजतो. दोघांच्या डोळ्यात पाणी आले पण आपल्या मनातली गोष्ट शेवटच्या भेटेला का होईना सांगता आली याचं त्यांना समाधान होतं. आता राघवला त्याच्यामध्ये काही तरी फरक जाणवू लागला. त्याने पूजा ला सांगितले बहुतेक माझ्या अंत्यविधी सुरू झाला आहे, तू पटकन ती पिंपळाच्या झाडातली पुडी माझ्या प्रेताजवळ नेऊन ठेव. नाहीतर या अतृप्त आत्म्यांना मुक्ती मिळायला अजून किती वर्षे लागतील काही सांगता येणार नाही आणि ते अजून किती निरपराध लोकांचे प्राण घेतील हे देखील सांगता येणार नाही. आपण या जन्मात तर एकमेकांना जास्त वेळ देऊ शकलो नाही पण पुढच्या जन्मी आपण पुन्हा भेटू आणि नक्कीच एकत्र येऊ. दोघांनी एकमेकांना शेवटचं स्मित हास्य करून निरोप दिला आणि पूजा पळत वेशी जवळच्या पिंपळाच्या झाडापाशी गेली. झाडाच्या त्या खोडामधल्या छिद्रातून पुडी काढली आणि गावात आली. राघवच्या पार्थिवाला सगळे लोक शेवटचा नमस्कार करत होते. पूजा ने देखील नमस्कार करता करता अलगत पुडी राघवच्या पायाच्या खाली ठेवली.

आता सगळे पुरुष मंडळी पार्थिवाजवळ आली. त्यांनी पार्थिव उचलले आणि त्यांची पावले स्मशानभूमी कडे निघाली. सगळ्या बायकांनी टाहो फोडला. पूजाला देखील अतिशय दुःख झाले होते पण आपल्या राघवने त्या अतृप्त आत्म्यांना मुक्ती देत अनेक लोकांचे जीव वाचवले याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. ती पळतच परत नदीकिनारी गेली तिथे राघव तिचीच वाट बघत उभा होता. आता त्या दोघांनी एक मेकांकडे पाहिले. डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर एक स्मित हास्य देखील होते , त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते पण त्यांची नजर एकमेकांशी खूप काही बोलतं होती. त्यांना ठाऊक होत यांनतर ते परत एकमेकांना भेटू शकणार नाहीत पण आज त्या शेवटच्या क्षणामध्ये ते सारं काही साठवून घेण्याचा प्रयत्न करत होते. जसं राघवच्या चीतेला अग्नी देण्यात आला , राघव हळू हळू दिसेनासा होऊ लागला , जाता जाता त्यांनी एकमेकांना पुढच्या जन्मी एकत्र येण्याचे वचन दिले आणि आणि शेवटची आपल्या प्रेमाची कबुली दिली. हळू हळू राघव पूजाच्या नजरेपासून दूर होत पूर्णतः दिसेनासा झाला आणि त्या सगळ्या अतृप्त आत्म्यांना कायमची मुक्ती मिळाली …..

Leave a Reply