लेखक – डॉ. रोहित कुलकर्णी

राघवचा जन्म एका खेडेगावातला. त्याच्या आई वडिलांची इच्छा होती की राघवने पुढे जाऊन चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर बनावे. तसा मुळातच तो खूप हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा आणि दहावीला असतांना तर तो जिल्ह्यातून पहिला आला. म्हणून त्याचा आणि त्याच्या आई वडिलांचा गावात मोठा सत्कार करण्यात आला. त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि १२ वी ला ही त्याला चांगले गुण मिळाले. त्यामुळे एक बी बी एस ला त्याचा नंबर लागला. त्याच्या आई वडिलांची स्वप्न पूर्ती होत होती. त्याचे शिक्षण चालू होते. अभ्यासाच्या ताणामुळे त्याला काही वर्ष आपल्या गावात यायला जमलेच नाही. अधून मधून त्याचे आई वडील त्याला शहरात भेटायला यायचे. शेवटी त्याने काही दिवस सुट्टी घेऊन गावाला जायचा निर्णय घेतला. जवळपास ४ वर्षांनी तो गावात आला. त्याला भरपूर बदल झालेले दिसले. गावातली लोकं आधी सारखी एकमेकांसोबत मिळून मिसळून राहत नव्हती. अनेकांचे आपआपसात वाद होत होते. राघव आल्या आल्या आपल्या आजी आजोबांना भेटला.

ते ही आपल्या लाडक्या नातवाला इतक्या वर्षानंतर भेटून खूप खुश झाले. दोघांच्या ही डोळ्यात पाणी तराळल. त्याने त्यांच्या सोबत बऱ्याच गप्पा मारल्या. बोलता बोलता त्याच्या जिगरी मित्राचा धन्याचा विषय निघाला तसा तो त्याला भेटायला त्याच्या घरी गेला. धन्या तेव्हा म्हशी धुत होता. अचानक राघव ला समोर बघून धन्याला विश्र्वासच बसला नाही. हातातले काम तसेच टाकून त्याने राघव ला कडकडून मिठी मारली. दोघे अनेक वर्षांनी एकमेकांना भेटले होते. दोघं जण नंतर गावात एक फेरफटका मारायला बाहेर पडले. राघवला गावातल्या लोकांच्या वागण्यात फरक दिसत होता , कोणीच एक मेकांसोबत प्रेमाने वागत नव्हतं. जिथे पाहू तिथे भांडण, ओरडणे, मारामाऱ्या चालू होत्या. राघव ने न राहवून धन्याला विचारले त्यावर तो म्हणाला “जाऊ दे रे.. हे सगळे गावातल्या राजकारणामुळे, सरपंचाच्या मुलीने तालुक्यातल्या एका मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले, तेव्हा पासून विरोधक त्याला बोलतात आणि मग त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमी मारामाऱ्या होत असतात, तू लक्ष नको देऊस.. सोड.. चल आपण शेतात जाऊ..”.

राघव ने तो विषय तिथेच सोडून दिला. दोघे मस्त शेतात गेले, बैलगाडी वर शेतात एक चक्कर मारून आले. मजा मस्ती करण्यात त्यांना वेळेचं भानच राहिले नव्हते. आता दिवे लागायची वेळ झाली होती. आजी आजोबा काळजी करतील म्हणून राघव लगबगीने घरी निघाला. त्याचा मित्र ही त्याच्या घरी निघून गेला. जेवण झाले आणि आजोबांनी राघव चे अंथरूण केले. तसे राघव म्हणाला की आपण सगळे आज गच्ची वर झोपायला जाऊ. तसे आजी आजोबा म्हणाले “बाळा आम्हाला थंड वातावरण काही सहन होत नाही, उगाच वर झोपलो तर आजारी पडू.. त्यामुळे आपण खालीच झोपू ” या वर राघव म्हणाला “तुम्ही झोपा घरात, मी एकटा गच्चीवर जाऊन झोपतो”. राघव आपले अथरूण घेऊन गच्चीवर गेला. आकाशातल्या चांदण्यांकडे एकटक तो बघत होता. थंडगार हवा सुटली होती. त्यात रातकिड्यांचा मंद आवाज. मध्येच कुठून तरी २,३ काजवे नजरेसमोर यायचे. खूप वर्षांनंतर राघव अश्या सुंदर वातावरणात झोपला होता. त्याने आपल्या मैत्रिणीला म्हणजे पूजा ला फोन केला आणि तिच्या शी गप्पा मारू लागला.

आज दिवसभरात केलेल्या धमाल गोष्टींबद्दल तो तिला तो सांगत होता. दिड दोन तास गप्पा मारून झाल्यावर त्याने मोबाईल वर वेळ बघतली तर 12:30 वाजले होते. पूजाला ही झोप आली होती. त्यांनी मोबाइल ठेवून दिला आणि थोड्या वेळात राघवला झोप लागली. तासाभराने त्याला जाग आली. घशाला कोरड पडली होती म्हणून तो पाणी पिण्यासाठी उठला. त्याच आकाशात लक्ष गेलं. चंद्र ढगाआड गेला होता, चांदण्याही दिसत नव्हत्या त्यामुळे आधी पेक्षा गडद अंधार पसरला होता. रातकिंड्याचा आवाज देखील येत नव्हता त्यामुळे वातावरणात एक भयाण शांतता पसरली होती. राघव जरा विचारात पडला. थोड्या वेळापूर्वी इतकं सुंदर वातावरण होत, ते अचानक काही वेळात इतकं भकास का वाटू लागलंय. तो असा विचार करत असतानाच एक विचित्र आवाज त्याच्या कानावर पडू लागला. वाद्य वाजवन्याचा आवाज येत होता. राघव तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. तसे हळु हळू वाद्यांचा आवाज स्पष्ट होत गेला. तो उठून कठड्याजवळ येऊन उभा राहिला.

त्याला दुर काही मशाली दिसू लागल्या. त्याच्याच घराच्या दिशेने त्या येत होत्या. इतक्या रात्री हे कोण आहेत हे तो पाहू लागला. काही वेळात २०-२५ जण हातात मशाली घेऊन अर्धनग्न अवस्थेत एक वेगळाच आवाज करत येत होते. ओरडत, रडत येत होते. त्यातले काही जण आपल्या शरीरावर चाबकाचे फटके मारत होते. त्याचा आवाज ही परिसरात घुमत होता. काही जण वाद्य वाजवत होते, त्याचाही आवाज खूप भीतीदायक वाटत होता. असा आवाज राघव ने या आधी कधीच ऐकला नव्हता. हळु हळु ते त्याच्या घराजवळ येऊ लागले. त्यांच्यात काही स्त्रिया देखील असल्याचे राघव च्याच लक्षात आले. त्या स्त्रियांनी आपले केस मोकळे सोडले होते. हिरव्या रंगाची साडी नसली होती. त्या वेगळ्याच आवाजात ओरडत होत्या आणि आपली मान गरागरा फिरवत होत्या. हे सगळे भयाण दृश्य बघून राघवच्या तोंडचे पाणीच पळाले. त्याला दरदरून घाम फुटला. तो हे सगळे दृश्य धडधडत्या काळजाने लपून पाहत होता. बघता बघता ते राघव च्याच अगदी घराजवळ आले आणि त्यांचे ओरडणे, रडणे, वाद्य वाजवणे एकाएकी थांबले.

परिसरात पुन्हा एकदा जीवघेणी शांतता पसरली. त्यात त्याने आवंढा गिळ ला. त्या जीवघेण्या शांततेत तो आवाज ही स्पष्ट ऐकू आला. आता पुढे काय होतंय ते तो पाहू लागला. घामाने अगदी ओलाचिंब झाला होता. तितक्यात खाली वाकून बघत असताना राघवच्या कपाळा वरून एक घामाचा थेंब टपकन खाली पडला. आणि जे व्हायला नको होत ते झालं. त्यातल्या काही बायकांना राघव ची चाहूल लागली आणि त्याने झटकन वर पाहिलं. त्यांची नजरानजर झाली. त्यांचे विस्कटलेले केस, लालभडक डोळे पाहून राघव पुरता घाबरला. त्याच्या हातापायातला त्राण च निघून गेला. त्याची इच्छा असताना ही तो तिथून हलू शकत नव्हता. कोणीतरी फक्त नजरेने जखडून ठेवल्यासारखे त्याला झाले होते. त्या बायक्या त्याच्या कडे पाहत विक्षिप्त पणे हसू लागल्या. तितक्यात नकळतपणे तो वरून खाली त्यांच्या पुढ्यात येऊन पडला. जागेवरून हलता येत नसले तरी तो भयाण प्रकार बघायला नको म्हणून त्याने डोळे बंद केले. पण जसे त्याने डोळे मिटले तसे सगळे काही एकदम शांत झाले. बराच वेळ तो तसाच पडून राहिले. काही वेळाने त्याने हिम्मत करून डोळे उघडले आणि त्याला धक्काच बसला.

त्या बायका त्याच्या समोर मांडी घालून बसल्या होत्या आणि काही तरी खात होत्या. त्याने डोळे नीट उघडुन पाहण्याचा, काय चालले आहे समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळले की त्या बायका एका जिवंत मांजरीला ओरबाडून खात आहेत. ती मांजर असहाय्य होऊन त्यांच्या तावडीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. राघव मात्र केविलवाण्या नजरेने त्या मांजरीच्या डोळ्यात बघत होता. तितक्यात अचानक एकीने मांजरीच्या मानेचा चावा घेतला आणि माने पासून पोटपर्यंतचा भाग टर्रकन फाडला. अवयवांचा एक लगदा बाहेर आला आणि त्या सोबतच रक्ताची एक धार राघवच्या चेहऱ्यावर उडाली. आता मात्र त्याला कसलीच शुद्ध राहिली नव्हती. ती फक्त विस्फारलेल्या डोळ्यांनी समोर घडत असलेला किळसवाणा आणि तितकाच भयानक प्रकार पाहत होता. हळु हळु त्या बायका त्याच्या दिशेने सरकत येऊ लागल्या आणि त्यांनी राघवचा गळा धरला. तो मात्र अर्धमेल्या सारखा निपचित पडून होता. त्यांना प्रतिकार करण्याची देखील शक्ती उरली नव्हती. हळु हळु त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली आणि तो बेशुद्ध झाला.

काही वेळानंतर नकळत त्याचे डोळे उघडले आणि त्याने समोर पाहीले. ते सगळे जण त्याची च वाट पाहत होते. त्याच्या हातात एक मशाल दिली गेली. त्याने त्या मशालीच्या प्रकाशात स्वतःकडे पाहिले तर तो ही आता अर्धनग्न अवस्थेत होता. त्याच्या लक्षात येत नव्हते की हे काय चालू आहे. त्याने मागे वळून पाहिले आणि त्यांच्या सर्वांगातून विजेची एक तीव्र लहर गेली. पायाखालची जमीनच सरकली. मागे त्याचे प्रेत तसेच पडले होते आणि तो.. तो आता या मानवी जगात नव्हताच. त्या बायका त्याला पुन्हा त्या २०-२५ जणांमध्ये घेऊन गेल्या. परत त्या भयावह वाद्यांचा आवाज सुरू झाला. आणि त्या सगळ्यांनी पुन्हा रडत, ओरडत ती यात्रा सुरू केली. आता राघव ही रडत, ओरडत हातात मशाल घेऊन चालू लागला.

Leave a Reply