अनुभव – राहुल गायकवाड
मी १२ वी ला शिकत होतो जेव्हा ही घटना माझ्या सोबत घडली होती. तसा आता मी राहायला शहरात आहे पण बहुतेक शिक्षण मी गावाकडे असताना पूर्ण केले. त्या दिवशी चुलत भावाचा फोन आला आणि तो म्हणाला की गावाला यावे लागेल, आपल्या ला कॉलेज मध्ये बोलावले आहे. मी नक्की येतो असे सांगून फोन ठेऊन दिला. १८ तारखेला कॉलेज मध्ये जायचे होते त्यामुळे मी एक दिवस आधी सकाळी च गावाला जायला निघालो. जवळपास ७ तासांचा प्रवास करून मी गावी पोहोचलो. खूप खुश होतो कारण २ वर्षानंतर गावात येण्याचा योग आला होता. त्या दिवशी सगळ्या जुन्या मित्रांना भेटलो, गावात फिरलो. त्यात रात्र कधी झाली कळलेच नाही. घरून काकांचा फोन आला की घरी कधी येतोस, ९ वाजायला आले, आम्हाला वाटले की प्रवास झालाय म्हणून थकला असशील पण आल्यापासून तू बाहेरच आहेस.
तसे त्यांना मी म्हणाली की “घराजवळच आहे मी.. येतो ५-१० मिनिटात.” मित्रांचा निरोप घेऊन मी घरी आलो. आल्या आल्या मी मस्त जेवण वैगरे केले. तो पर्यंत सव्वा दहा होऊन गेले. मी शहरात राहत असल्याने मला सिगारेट पिण्याचे व्यसन लागले होते. म्हणून मी काही तरी कारण सांगून घराबाहेर पडलो. चुलत भावाला फोन केला आणि सांगितले की मित्राचा फोन आलाय असे सांगून मी बाहेर सिगारेट प्यायला आलोय.. कुठे सोय होईल का.. मी आता घरापासून बराच लांब आलोय. इथे बाजूला गुरांचा दवाखाना आहे तिथे थांबलोय. माझे बोलणे चालू असतानाच मला साधारण ५५-५६ वर्षांचा एक व्यक्ती दिसला. तो तिथे सिगारेट पितच उभा होता. माझे बोलणे ऐकुन त्यांनी मला विचारले “तू प्रकाश चा मोठा मुलगा ना..”. मी स्मित हास्य करत हो म्हंटले. तितक्यात त्यांनी खिशातून सिगारेट चे पॅकेट काढले आणि माझ्या समोर धरत म्हणाले “घे..” तसे मी जरा घाबरतच म्हणालो “नाही हो.. मी असे काही नाही घेत..” त्यावर ते म्हणाले की तुझे बोलणे ऐकले मी.. घे ओढ..”. तरीही मी नाही म्हणत होतो. यांनी उगाच घरी सांगितले तर पुन्हा वाद होतील.
पण ते इतका आग्रह करू लागले की मला सिगारेट घ्यावी लागली. सिगारेट अर्धी ओढून झाली असेल तेव्हा ते एक वाक्य म्हणाले जे मी कधीच विसरू शकत नाही.. ते म्हणाले “ही तुझी शेवटची सिगारेट.. नको ओढत जाऊस रे.. माणसाचे आयुष्य कमी होत चाललंय याने..” त्याचे बोलणे ऐकून मी जरा ओशाळलो आणि हातातली सिगारेट फेकून दिली. मी त्यांना सॉरी म्हणून घरी निघून आलो. सकाळी उठून आम्ही कॉलेज ल गेलो आणि परतत असताना आमच्या घराजवळच्या गल्लीत आलो. सहज एका घरातल्या खिडकीतून आत लक्ष गेले आणि त्याच व्यक्ती चा फोटो दिसला. त्यावर हार होता. मी घाबरून भावाला विचारले “हे कोण आहेत रे.. काल रात्री मला हेच भेटले होते आणि सिगारेट ओढायला दिली होती..” त्यावर तो हसू लागला आणि म्हणाला की कसे शक्य आहे, तुला दुसरे कोणी भेटले असेल. आठ महिन्यांपूर्वी ते कॅन्सर ने गेले. खूप सिगारेट ओढायचे रे..” मी हे सगळे ऐकून सुन्न च झालो. तेव्हा पासून मी ठरवले की ती शेवटची सिगारेट. त्या नंतर मी सिगारेट ला कधीच हात सुद्धा लावला नाही.