अनुभव – मेनका गावडे
हा अनुभव माझ्यासोबत २०१८ साली घडला. मी तेव्हा मुंबई ला नोकरी करत होते. माझ्या मामाच्या मुलीचे म्हणजे सोनिया चे लग्न असल्यामुळे मी गावी कोकणात जाणार होते. ठरल्या प्रमाणे मी माझ्या मावशीचा मुलगा आणि चुलत मामा असे आम्ही तिघे रात्रीच्या ट्रेन ने गावाला जायला निघालो. साधारण ८-९ तासांचा प्रवास केल्यानंतर आमच्या स्टेशन वर येऊन पोहोचलो. तिथं माझ्या मामाचा मुलगा लक्ष्मण आम्हाला घ्यायला आला होता. आम्ही त्याच्या गाडी मध्ये सगळे सामान ठेवले आणि घरी यायला निघालो. काही वेळातच आम्ही घरी पोहोचलो. लग्न घर असल्यामुळे सर्व नातेवाईक त्याचप्रमाणे ज्यांना मी कित्येक वर्ष भेटले नव्हते ते ही आले होते. आम्ही ज्या दिवशी आलो त्याच दिवशी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. संध्याकाळी सगळा कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी लग्न होते. लग्न तिथेच असल्याने सगळ्यांची तयारी सुरू झाली. दंगा, मस्ती, गडबड, गोंधळ तेवढीच मजा येत होती. त्यातच आम्हा सर्व भावंडांचे फोटो काढायचे चालू होते. ते तर लग्नात आवश्यक असते.
माझे सगळे मामेभाऊ बहिणी म्हणजे प्रिय, समीर, नागेश, कशिष हे लग्नाला आले होते. या सगळ्यांना भेटून कित्येक वर्ष झाली होती. त्यामुळे वेगळाच आनंद झाला आणि अजुन मजा आली. लग्न सुरळीत पार पडले. सोनिया तिच्या सासरी गेली. लग्नाला आलेले काही नातेवाईक ही आपल्या गावी, घरी गेले. मी काही दिवस गावी राहण्याचे ठरवले. मामी ला ४-५ दिवसांनी हॉस्पिटल मध्ये रूटीन चेक अप साठी न्यायचे होते. कारण १ महिन्यांपूर्वी मामी ला हार्ट अटॅक आला होता त्यामुळे त्यांनी काही महिने न चुकता चेक अप ला यायला सांगितले होते. मामा ने मला सांगितले की तू मामी सोबत हॉस्पिटल मध्ये जा. पण तिथले जास्त काही माहीत नसल्याने माझ्या मामाच्या मुलाला समीर ला सोबत यायला सांगितले. हॉस्पिटल ला जायला २-३ तास लागणार होते म्हणून आम्ही कार घेऊन निघालो. मी, मामी, समीर आणि ड्रायव्हर असे आम्ही जायला निघालो. साधारण ३ तासात आम्ही पोहोचलो. लगेच तिथली जी काही प्रोसिजन होती ती पूर्ण केली आणि मामी ला वॉर्ड नंबर १२३ मध्ये दाखल केले.
त्या वॉर्ड कडे जाताना काहीस वेगळच वाटत होत. मुख्य इमारती पासून तो वॉर्ड लांब च होता. जस जस आम्ही त्या वॉर्ड कडे जात होतो तसतशी तिथली वर्दळ कमी होत होती. आम्ही तिथे पोहोचलो, मामी ला शिफ्ट करून सलाईन लावण्यात आली. संपूर्ण धावपळीत दमायला झाले होते त्यात रात्र कधी झाली कळलेच नाही. आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून चपाती भाजी चे पार्सल मागवले. जेवण आल्यावर तिथेच थोडा फेरफटका मारू लागलो. त्या वॉर्ड मध्ये अजुन काही पेशंट होते. पण तिथे एक वेगळ्याच प्रकारची शांतता होती. तो वॉर्ड बाहेर दिसणारा अंधार, थंडगार सुटलेला वारा आणि किर्र शांतता जणू खायलाच उठली होती. काही वेळात मी आणि समीर कंटाळलो म्हणून मोबाईल मध्ये गेम खेळू लागलो. पण गेम खेळून खेळून मोबाईल ची बॅटरी ही पूर्ण डाऊन झाली. मोबाईल चार्जिंग ला लावण्यासाठी मी स्विच बोर्ड शोधू लागले. मामी ज्या बेड वर झोपली होती त्याच बेड च्याच खिडकीजवळ स्विच बोर्ड होता. मी मोबाईल चार्जिंग ला लावला आणि आम्ही दोघे गप्पा मारत बसलो.
एव्हाना मामी झोपून गेली होती पण आम्हाला काही झोप येत नव्हती. ती रात्र खूप मोठी होती. वेळ जाता जात नव्हता आणि झोप येता येत नव्हती. मी साधारण तासाभराने मोबाईल किती चार्ज झाला हे पाहण्यासाठी उठले. खिडकी ला पडदा लावला होता तो थोडा बाजूला करून मी मोबाईल चेक करू लागले. तितक्यात मला कसलासा आवाज येऊ लागला. मी नीट लक्ष देऊन ऐकू लागले. एका बाई च्याच रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी दचकून तिथून बाजूला झाले. समीर ला समजलेच नाही की नक्की काय झाले. त्याने मला विचारले “काय ग.. मोबाईल झाला का चार्ज..?”. मी काहीच उत्तर न देता तशीच निशब्द उभी होते. त्यावर त्याने पुन्हा विचारले “काय झालं.. तू अशी घाबरलेली का दिसतेय..?”. त्यावर मी जे अनुभवले ते त्याला सांगितले. पण तो माझी चेष्टा करू लागला. माझ्यावर हसू लागला आणि म्हणाला “अग मेनका दिदी तुला काही तरी भास झाला असेल.. उगाच घाबरते स तू..” अस बोलून तो स्वतः मोबाईल आणायला गेला. मोबाईल चार्जिंग वरून काढत असतानाच तो सुद्धा २ मिनिट शरीराची काहीच हालचाल न करता तिथेच उभा राहिला.
कारण त्याला ही तो आवाज येत होता. त्याने हिम्मत करून बाहेर डोकावून पाहिले पण कोणीच नव्हते. पण रडण्याचा आवाज मात्र तिथूनच येत होता. आता मात्र आम्ही दोघे ही घाबरलो. वेळ पाहिली तर अडीच वाजले होते. सगळे जण झोपले होते आणि जागे होतो ते फक्त आम्ही दोघे. ती भयाण शांतता आणि त्यात कोणा बाईच्या रडण्याचा आवाज जणू आमचा जीव च घेईल असे वाटते होते. समीर आणि मी फक्त सकाळ होण्याची वाट पाहू लागलो. जिथून तो रडण्याचा आवाज येत होता तिथे परत जाऊन नक्की कोणी आहे का हे पाहण्याची हिम्मत आम्हाला झाली नाही. नक्की कोण असेल तिथे हा विचार करता करता आम्हाला झोप कधी लागली हे कळलेच नाही. पहाटे उजाडल्यावर हॉस्पिटल मध्ये वर्दळ सुरू झाली आणि मला जाग आली. उठल्या उठल्या लगेच धावत मी त्या खिडकीजवळ गेले. त्या खिडकीबाहेर नक्की काय आहे हे पाहण्याची मला उत्सुकता लागली होती. त्या खिडकी बाहेर डोकावले तर ती एक निर्जन जागा असल्याचे लक्षात आले. तिथं कोणी जात असेल असे ही वाटत नव्हते.
मामी ने अचानक आवाज दिला “काय झाले मेनका.. अशी लगेच उठल्यावर खिडकीजवळ जाऊन काय पाहतेस..?” मी काही नाही म्हणण्यासाठी नकारार्थी मान हलवत बाजूला झाले. तेवढ्यात समीर चहा नाश्ता घेऊन आला. आम्ही जरा फ्रेश झालो. काही वेळाने मामी ला दुसऱ्या मुख्य इमारतीच्या एका वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. संध्याकाळी परत तिची तपासणी केली. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. आदल्या रात्री जो प्रकार घडला त्या बद्दल मी आणि समीर काहीच बोललो नाही आणि कोणाला काही सांगितले देखील नाही. तिसऱ्या दिवशी मामी ला डिस्चार्ज मिळाला. घरी येण्यासाठी मामी चे सगळे सामान, औषधे पॅक केली आणि घरी यायला निघालो. या सर्व धावपळीत आम्ही कंटाळून गेलो होतो त्यामुळे हा प्रकार आम्ही विसरून ही गेलो. तीन दिवसांनी घरी आल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या. नेहमी सारखी धमाल मस्ती सुरू झाली. या घडल्या प्रकाराला दोन वर्ष झाली. सहजच एक दिवस माझे समीर सोबत याच विषयावर बोलणे झाले. मी समीर ला विचारले “समीर, त्या रात्री आपण जे अनुभवले ते सर्व खरंच होत का..? तो आवाज कोणाचा होता..?”
त्यावर समीर म्हणाला “मी दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता आणायला गेलो तेव्हा तिथल्या सिक्युरिटी गार्ड ला विचारले की वॉर्ड नंबर १२३ च्याच मागे नक्की काय आहे..? त्यावर सिक्युरिटी गार्ड ने प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि सांगितले ‘ त्या वॉर्ड च्याच मागे डेड बॉडी ज ठेवण्याचा वॉर्ड आहे.. तिथे ११ नंतर कोणी जात नाही.. फक्त इमर्जन्सी केस आली तर तिथे बॉडी ठेवण्यासाठी तो उघडतात.. गेले काही दिवस तो रात्री बंद च असतो..”