अनुभव – हर्ष चव्हाण

अनुभव ३ वर्षांपूर्वीचा आहे. मी आणि माझे ३ मित्र करण, शैलेश आणि रुपेश.. आम्ही सर्वांनी मे महिन्यात रुपेश च्या गावी जायचा बेत आखला होता. रुपेश च्या गावी त्याचा मोठा वाडा आहे आणि जवळच समुद्र किनारा आहे त्यामुळे रोजच्या धका धकीच्या जीवनातून काही दिवस विरंगुळा मिळेल आणि मजा करता येईल असे ठरले होते. काही दिवसांचा बेत आखला होता. त्यामुळे जाण्याआधी सगळे नियोजन केले आणि दिवस ठरवला. आम्हाला रात्रीचा प्रवास करायला खूप आवडतं त्यामुळे असा प्रवास करून कुठे जायचे म्हंटले की आम्ही रात्रीची वेळ च निवडायचो. या वेळी ही आम्ही रात्रीच निघायचे ठरवले. त्या दिवशी रात्री चे जेवण वैगरे आटोपून आम्ही सगळे रुपेश च्या घरी पोहोचलो. रुपेश ची ४ व्हीलर गाडी होती. येताना खूप काही सामान आणले नव्हते पण जे काही होते ते पटापट सगळे गाडीत भरले. रुपेश ने घरच्यांचा निरोप घेतला आणि साधारण सव्वा नऊ च्या दरम्यान आम्ही नाईट ड्राईव्ह ला सुरुवात केली. सगळ्यांची अगदीच मजा मस्ती सुरू होती, जुन्या गप्पा, एकमेकांची मस्करी वैगरे. बऱ्याच दिवसांनी एकत्र जमल्यामुळे वेळ अगदी छान जात होता. जवळपास ३ तासा नंतर वस्तीचा परिसर मागे पडला तसे रस्ता निर्मनुष्य भासू लागला. उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा हवेत हलकासा गारवा जाणवू लागला होता. संपूर्ण प्रवासात रुपेश च ड्राईव्ह करणार होता त्यामुळे मध्ये कुठे थाबण्याचा प्रश्न नव्हता. 

एव्हाना वाहनांची वर्दळ ही खूप कमी झाली होती. त्यात गेल्या काही मिनिटांत मला आमच्या गाडी व्यतिरिक्त एकही वाहन नजरेस पडले नव्हते. तितक्यात भर रस्त्यात अचानक आमची गाडी बंद पडली. पटकन मी रुपेश ला विचारले “काय रे.. काय झालं..”. आता अचानक गाडी बंद पडण्याचे कारण त्याला ही कळले नव्हते म्हणून तो खाली उतरत म्हणाला “माहीत नाही रे, थांब चेक करतो..”. त्याच्या मागोमाग आम्ही सगळेच गाडीतून खाली उतरलो. मी चौफर नजर फिरवली तर दिसले की आमची गाडी अश्या भागात येऊन बंद पडली आहे जिथे अजिबात वस्ती नाही. दूर दूर वर एकही घर नजरेस पडत नव्हते, जाणवत होता तो फक्त अंधार.. स्ट्रीट लाईट स असून नसल्यासारखे होते आणि त्यात दोन स्ट्रीट लाईट मधले अंतर बरेच असल्यामुळे अंधार इतका गडद भासत होता की काही कळायला मार्ग नव्हता. रुपेश गाडी चे बोनेट उघडून नक्की काय बिघाड झालाय ते पाहू लागला. मी त्याच्या जवळ चालत जाऊ लागलो तेवढ्यात मला मागून कोणीतरी जोरात धक्का दिला. आधीच अंधार होता त्यामुळे नीट काही दिसत नव्हते. मला वाटले की माझा मित्र करण माझ्याशी मस्ती करतोय. तसे ही त्याला मस्करी करायची खूप सवय होती. म्हणून मी जरा वैतागत च विचारले “काय रे.. धक्का कशाला दिलास.. मस्करी करायची वेळ नाहीये ही..” तसे तो आश्चर्य चकित होत मला म्हणाला ” अरे मी कधी दिला तुला धक्का..?” त्याचे असे बोलणे ऐकून मला जरा राग आला आणि मी अजून चिडत म्हणालो “खोटं नको बोलुस तू..”. 

करण जरा शांत झाला आणि बोलला ” मी धक्का नाही दिला तुला, पाहिजे तर शैलेश ला विचार..”. शैलेश ही त्याची बाजू घेत म्हणाला “करण माझ्या समोरच आहे, तो तुला कुठून धक्का देईल..”. मला जरा गोंधळल्यासारखे झाले पण मी तो विषय तिथेच सोडून दिला. रुपेश जवळ आल्यावर त्याला विचारले ” काय रे भावा काय प्रोब्लेम झालाय..?” तसे रुपेश म्हणाला ” अरे काही कळतच नाहीये, गाडीत काहीच प्रोब्लेम नाहीये, गाडीच्या इंजिन मध्ये ही काहीच प्रोब्लेम दिसत नाहीये..” आमचे संभाषण चालू असताना मला जाणवले की करण सतत मागे वळून बघतोय जसे त्याच्या मागे कोणी तरी आहे. मी त्याला विचारले ” काय रे करण, कोणी आहे का मागे, थोड्या थोड्या वेळाने मागे वळून का बघतोय..?” तसे तो जे म्हणाला ते ऐकून माझ्या मनात धडकीच भरली. तो म्हणाला ” कोणीतरी मागून मला बोलावते आहे, माझ्या नावाने हाक मारतय..” मी त्या दिशेला जाऊन बघितले पण तिथे कोणीही नव्हते.  एव्हाना रुपेश गाडीत जाऊन बसला आणि स्टार्टर मारून गाडी चालू करायचा प्रयत्न करू लागला. मी कारण ला समजावत म्हणालो “अरे भास झाला असेल रे तुला, कोणीच नाहीये तिकडे..” त्यावर तो म्हणाला ” मी खर सांगतोय भावा, कोणीतरी मला मागून बोलवत य..” एव्हाना मला कळून चुकलं होत की इथे काही तरी गडबड आहे. मी पुढे काही बोलणार तितक्यात शैलेश इशारा करत सांगू लागला “श.. शांत व्हा..” माझा एके क्षणासाठी हृदयाचा ठोकाच चुकला.  बहुतेक त्याला काही तरी ऐकू आले जे तो आम्हाला ही ऐकण्यासाठी खुणावत होता. आम्ही तिघे ही शांत झालो. 

तसा एक वेगळाच आवाज येऊ लागला. आम्ही सगळेच तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. माझे काळीज भीतीने धड धडू लागले. गडद अंधार, निर्जन रस्ता आणि त्याच्या मधोमध आम्ही अडकून पडलो होतो. असे वाटू लागले की तो आवाज हळु हळु आमच्या दिशेने पुढे सरकतो य.. तितक्यात रुपेश चे प्रयत्न यशस्वी ठरले आणि गाडी सुरू झाली. तसे आम्ही तिघही धावत गाडीत जाऊन बसलो. आता पर्यंत रुपेश ला बाहेर घडणाऱ्या घटनांची जाणीव नव्हती. त्याला मी म्हणालो “रुपेश लवकर इथून गाडी काढ, इथे आपल्या शिवाय अजुन कोणी तरी आहे..” माझे बोलणे ऐकून तो हसतच म्हणाला “तुम्ही किती पण घाबरवा मी नाही घाबरणार.. मी फासणाऱ्या तला नाही.. माझ्याशी मस्करी करू नका..”. त्याला आमच्या बोलण्यावर विश्वास च बसत नव्हता. आम्ही त्याची मस्करी करतोय असेच त्याला वाटत होते. सगळे काही शांत झाले असे वाटलेच होते पण तितक्यात रुपेश अतिशय वेगात गाडी पळवू लागला. आम्ही सगळेच घाबरलो आणि त्याला विचारू लागलो की काय झाले, इतक्या स्पीड मध्ये का घेतोय गाडी पण तो काहीच उत्तर देत नव्हता. एके क्षणी मला वाटले की नक्की गाडी रस्त्याखाली उतरून मोठा पघट होणार. तसे माझी नजर त्याच्या हाताकडे गेली. त्याचे हात अक्षरशः थरथरत होते. तो प्रचंड घाबरला होता आणि घामाने ओला चिंब झाला होता. 

मी त्याला पुढे काहीच विचारले नाही. मित्रांना ही मी इशारा करून शांत राहायला सांगितले. अर्धा पाऊण तास होऊन गेला. त्या निर्जन परिसरातून लांब आल्यावर रुपेश ने गाडी थांबवली. आम्ही त्याला पाणी दिले. तो शांत झाला आणि त्याने पुढे जे काही सांगितले ते आमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडच होते. तो म्हणाला “आपण तिथून निघालो आणि गाडीचा फ्रंट मिरर थोडा वाकडा झाला होता म्हणून मी तो नीट करू लागलो. तेव्हा तुझ्या आणि शैलेश च्या मध्ये एक बाई बसलेली दिसली. ती फक्त समोर रस्त्याकडे पाहत होती. पांढरे शुभ्र डोळे जणू तिला बुबुळ च नव्हती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास च बसला नाही. मी एकदा नाही दोन तीन वेळा पाहिले तेव्हा मला खात्री पटली. मी जास्त विचार न करता गाडी तिथून सुसाट पळवायला लागलो. तुम्ही मला विचारात होता पण माझी दातखीळ च बसली होती. त्या भागापासून लांब आल्यावर हिम्मत करून मी पुन्हा एकदा फ्रंट मिरर मध्ये पाहिले, तेव्हा ती तिथे दिसली नाही आणि माझ्या जिवंत जीव आला. त्याने सांगितलेला भयानक प्रसंग ऐकून आम्ही ही निशब्द झालो होतो. आम्ही त्याला धीर देऊन पुन्हा गाडीत बसलो आणि पुढच्या प्रवसाला लागलो. सकाळी गावी पोहोचलो. रात्री चा प्रकार अजूनही मनात घर करून बसला होता. आम्ही विचारही केला नव्हता की अस काही घडेल, असे काही भयानक अनुभवायला मिळेल. आज ३ वर्ष झाली या घटने ला पण जेव्हा ही रात्री प्रवास करून जाण्याचं म्हंटल की ती काळी रात्र आठवते आणि तो प्रसंग अंगावर काटे आणल्याशिवाय राहत नाही. 

Leave a Reply