अनुभव – ओम सिंग परदेशी
अनुभव साधारण ५ वर्षांपूर्वीचा म्हणजे २०१५ साल चा आहे. आमचे एकत्रित पद्धतीचे कुटुंब आहे. रहायला साताऱ्याला आहोत. घरात ५ काका काकू, आजी आजोबा आणि आम्ही ७ भावंडं राहतो. नुकतीच परीक्षा संपली होती आणि मे महिन्याची सुट्टी लागली होती. त्यामुळे मग घरच्यांनी गोव्या ला जायचा बेत आखला. आम्ही एकूण १६ जण गोव्याच्या ट्रीप ला जाणार होतो आणि बाकीचे घरीच थांबणार होते. त्या सोळा जणांमध्ये आम्ही ६ भावंडं नक्कीच होतो. जाण्यासाठी आम्ही सतरा सिटर मिनी बस ट्रॅव्हल्स कडून बुक केली होती. फक्त आमच्यासाठी. आणि आमच्यातले २-३ जण ड्राईव्ह करणार होतो. १२ मे रोजी जेवण वैगरे आटोपून रात्री साधारण दीड वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली. सातारा ते गोवा असा प्रवास अगदी मजेत सुरू झाला. गप्पा गोष्टी करत, गाणी ऐकत आम्ही प्रवास करत होतो. रात्री ३ वाजता आम्ही हायवे ला येऊन पोहोचलो.
तिथेच थोड्या वेळ हॉल्ट घेऊन फ्रेश व्हायचे ठरले. तसे आम्ही एका छोट्या चहाच्या टपरी जवळ थांबलो. चहा घेतला, थोडे फ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. पण आम्हाला कोणालाही माहीत नव्हते की इथून पुढचा प्रवास किती भयानक असणार आहे. हायवे वर असल्यामुळे बस चा वेग साधारण ६०-७० होता. मे महिना असला तरीही रात्रीची वेळ असल्यामुळे वातावरणात गारवा वाटत होता. बऱ्याच वेळ मजा मस्ती करून सगळे झोपले होते. मी सुद्धा पेंगत होतो. माझे सर्वात लहान काका गाडी चालवत होते. बस बऱ्याच वेगात होती आणि तितक्यात अचानक त्यानी करकचून जोरात ब्रेक मारला. आम्ही सगळे खडबडून जागे झालो. वाटले की एखादा अपघात झाला की काय. म्हणजे अश्या वेळी इतक्या जोरात ब्रेक मारला म्हणजे नक्की कोणी तरी आडवे आले असणार आणि त्याला चुकवण्यासाठी ब्रेक मारला असणार. आम्ही सगळे ड्राइव्हर सीट जवळ गेलो आणि समोर पाहू लागलो. पण आमच्या समोर दुसरे एकही वाहन नव्हते. आम्ही काकांना विचारले की काय झाले.
तसे ते म्हणाले की मला रस्त्याच्या मधोमध कोणी तरी उभे दिसले आणि म्हणून मी घाबरून जोरात ब्रेक मारला. तसे माझे मोठे काका म्हणाले की तुला भास झाला असेल, उगाच घाबरवलेस आम्हाला. त्यावर ते काका म्हणाले की “मला थोड अस्वस्थ वाटतंय, मी जरा मागे बसून काही वेळ विश्रांती घेतो, तुमच्यापैकी कोणी तरी गाडी चालवा..” तसे माझे वडील म्हणाले ” हो तू मागे जाऊन बस.. मी चालवतो..” जवळपास १५-२० मिनिट झाले असतील आणि पुन्हा जोरात ब्रेक मारला गेला. माझे वडील ही तेच म्हणाले जे काका म्हणाले होते. रस्त्याच्या मधोमध कोणी तरी उभ होत म्हणून मी दचकून ब्रेक मारला. त्यांनाही अगदी तसाच अनुभव आला. आता मात्र सगळे जरा घाबरले. मी त्यांच्या चेहऱ्यावरची भीती पाहू शकत होतो. माझ्या वडिलांसोबत आजोबाही तिथे च ड्रायव्हर सीट च्याच बाजूला एक आडवी सीट असते तिथे बसले. आमच्या घरात सर्वजण जरा जास्तच देव देवस्की करायचे त्यामुळे लगेच देवाची गाणी आणि भजने सुरू झाली. आता मात्र माझे वडील अगदी हळु कमी वेगात गाडी चालवत होते.
त्या रात्री हायवे वर वाहनांची वर्दळ अगदीच कमी होती. अधून मधून एखादा मालवाहू ट्रक शेजारून जोरात ओवरटेक करून निघून जात होता. त्या व्यतिरिक्त एकही वाहन दिसत नव्हते. काही किलोमिटर नंतर माझ्या वडिलांना रस्त्याकडे ला एक बाई उभी दिसली. आजूबाजूचा परिसर अगदी निर्मनुष्य होता, म्हणजे वस्तीही दिसत नव्हती. त्यात इतक्या रात्री ही बाई इथे काय करतेय हा प्रश्न पडणे त्यांना साहजिक होते. जस जशी गाडी जवळ येत गेली तसे त्यांना दिसले की तिच्या अंगावर बरेच दागिने आहेत, हातात एक काळी मांजर आहे. आणि एका हाताने ती आमच्या गाडी ला हात करून थांबवत होती. त्यांच्या बाजूला बसलेले माझे आजोबा माझ्या वडिलांना म्हणाले की गाडी जितक्या वेगात नेता येईल तितक्या वेगात ने, कुठे ही बघू नकोस. फक्त सरळ समोरच्या रस्त्यावर पाहत रहा. आपले संपूर्ण कुटुंब आपल्या सोबत आहे, त्या सगळ्यांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. वडिलांना एव्हाना कळून चुकले होते की हा प्रकार दिसतो तसा नाहीये, काहीतरी विपरीत घडण्याचे संकेत मिळत आहेत.
नंतर जे काही घडले ते कल्पना शक्तीच्या पलीकडचे होते. आमची गाडी जस जशी तिच्या जवळ जाऊ लागली तसे त्या बाई चा आकार मोठा होत गेला. जेव्हा गाडी तिच्या अगदी जवळ गेली तेव्हा ती इतकी मोठी झाली होती की तिच्या हाता खालून आमची संपूर्ण गाडी गेली. हा भयाण प्रसंग एखाद्या वाईट स्वप्नसारखा भासत होता. माझे वडील बराच वेळ गाडी चालवत राहिले. त्यांनी स्वतःला सांभाळले होते आणि त्या भागातून निघून आम्हाला खूप पुढे आणले होते. ब्रम्ह मुहूर्त संपून पहाट होऊ लागली. रस्त्याकडे ची दुकानेही उघडताना दिसू लागली. काही वेळानंतर आजोबांनी वडिलांना गाडी रस्त्याकडे ला घ्यायला सांगितली. आम्ही पुन्हा एका चहाच्या टपरीवर थांबलो. साधारण ४.३० होऊन गेले होते. चहा पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पण सगळे इतक्या वर थांबणार नव्हते कारण आमच्या सोबत जे घडले ती फक्त एक सुरुवात होती.
आम्ही तिथून पुढे निघालो आणि आम्हाला चकवा लागला. पुढचे २ तास आम्ही वेड्यासारखे एकाच ठिकाणी फिरत होतो. वडिलांना काही केल्या रस्ताच सापडत नव्हता. कोणताही मार्ग पकडला की पुन्हा आम्ही त्याच एका विशिष्ट ठिकाणी यायचो. आमच्यासाठी ना रस्ता बदलत होता ना वेळ. बऱ्याच वेळा नंतर एक कार आमच्या समोर दिसली. वडिलांनी त्या कार ला ओव्हरटेक केला आणि त्यांना विनंती केली की आम्हाला रस्ता सापडत नाहीये तुम्ही आम्हाला रस्ता दाखवाल का.. तसे ते गृहस्थ म्हणाले की माझ्या गाडी मागून या. सुदैवाने ते ही गोव्याला च चालले होते. माझ्या वडिलांनी त्या कार च्याच मागे गाडी घेतली. करत मागे स्वामी समर्थांचा फोटो लावला होता. त्या गाडीच्या मागे जात पुढच्या काही तासात आम्ही सुखरुप गोव्यात येऊन पोहोचलो. त्या माणसाने पुढे गाडी थांबवली तसे वडिलांनी ही थांबवली. ते खाली उतरून त्या व्यक्तीचे आभार मानण्या आधी आम्हाला मागे उठवायला आले.
अवघ्या काही सेकंदात ते खाली उतरले आणि पाहतात तर काय.. तिघे एकही गाडी नव्हती. त्यांनी रस्त्यावर दोन्ही दिशेला पाहिले पण तिथे दूरपर्यंत तू गाडी कुठेच दिसली नाही. वडिलांना कळले होते की या संकटातून आपल्याला, आपल्या कुटुंबाला देवाच्या कृपेनेच वाचवले. आम्ही आमच्या ठरलेल्या हॉटेल वर पोहोचलो. तिथे गेल्यावर सहज म्हणून त्या गाडीचा नंबर देऊन चौकशी करायला सांगितली. वडिलांनी त्या गाडीचा नंबर लक्षात ठेवला होता. दुसऱ्या दिवशी त्या गाडी बद्दल माहिती मिळाली. दोन वर्षांपूर्वी त्या गाडी चा घाटात पडून अपघात झाला होता. हे ऐकून आम्ही निशब्द झालो होतो. आजपर्यंत हे गूढ आम्ही उलगडू शकलो नाही.
Dada mahinyala 15-16 anubhav tari takat ja please