अनुभव – अक्षय घाडगे

हा प्रसंग २०१८ च्याच ऑक्टोंबर महिन्यातला आहे. तेव्हा मी औरंगाबाद ला एम् आय टी इन्स्टिट्यूट मध्ये बी टेक च्याच तिसऱ्या वर्षाला होतो. प्रोजेक्ट सबमिशन अगदी तोंडावर आल होत. वेळ कमी असल्यामुळे रात्रीचे जागरण करून रिसर्च करून प्रोजेक्ट चे काम करावे लागत होते. आमचे थ्री बी एच के रो हाऊस होत. त्यात आम्ही एकूण ८ जण राहत होतो. सगळे मुंबईचे. त्यातले २ जण काही कामानिमित्त मुंबई ला गेले होते तर अजून एक जण आपल्या मित्राकडे गेला होता. त्यामुळे १ रूम रिकामीच होती. त्या रो हाऊस ला हॉल, किचन, खाली एक बेडरूम आणि वर पहिल्या मजल्यावर अजुन दोन बेडरूम होत्या. आणि त्याच्यावर टेरेस ही होते. त्या दिवशी आम्ही जेवण करताना कधी नव्हते ते भुतांच्या गोष्टींचा विषय निघाला आणि मग आमच्यात त्यावरूनच चर्चा झाली. बऱ्याच वेळ झाल्यानंतर आम्ही उठून आप आपल्या रूम मध्ये झोपायला गेलो. 

खालच्या बेड रूम मध्ये २ जण झोपले होते आणि वरच्या बेडरूम मध्ये प्रत्येकी एक एक जण झोपला होता. मी माझ्या प्रोजेक्ट चे काम करत बसलो होतो आणि पहिल्या मजल्यावरच्या बेडरूम मध्ये एकटाच होतो. आम्हाला कपडे इस्त्री करायला एक मोठे टेबल होते, त्यावरच मी काम करत बसलो होतो. साधारण २ वाजले असतील. थंडीचे दिवस होते म्हणून अभ्यास करत असताना सोबत चहा चा कप ही घेऊन बसलो होतो. वातावरण शांत असल्यामुळे अभ्यासात एकदम मग्न झालो होतो. जवळपास पावणे तीन झाले असावेत. तितक्यात मला खालच्या मजल्यावरून कसला तरी आवाज आला. मला वाटले की कोणी तरी उठले असेल म्हणून मी दुर्लक्ष करून पुन्हा आपल्या कामाला लागलो. पण १० मिनिट होत नाहीत तसे पुन्हा आवाज येऊ लागला. या वेळेस मी जरा त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागलो. तो आवाज पैंजण चा होता. अगदी हळु हळू कोणी तरी चालत जातंय असा. मी उठून खाली गेलो. 

मला वाटले की नक्की मित्र मला घा बरवयला बाईक ची चावी घेऊन असा आवाज करत असतील, किंवा मोबाईल मध्ये मुद्दामून हा साऊंड प्ले करत असतील. मी खाली जाऊन त्यांच्या बेडरूम चा दरवाजा हळूच उघडला आणि पाहिले तर ते दोघेही गाढ झोपले होते. मला वाटले की झालेल्या चर्चे मुळे मला नक्कीच नको नको ते भास होत आहेत. मी पुन्हा वर गेलो आणि जाताना किचन मध्ये ही डोकावून गेलो. पुन्हा माझ्या कामाला बसलो. ३ वाजायला दोन मिनिट बाकी होते तसे मला तोच आवाज पुन्हा येऊ लागला. आता मात्र मी खात्रीने सांगू शकत होतो की हा माझा भास नक्कीच नाही. खरंच खाली कोणी तरी आहे. मी जिन्यावरून पुन्हा खाली येऊ लागलो. अर्ध्या पायऱ्या उतरून मी खाली आलो आणि किचन मध्ये डोकावले. तसे दिसले की इंडक्षन चा स्विच ऑन झालाय आणि त्याचा रेड लाईट दिसतोय. १० मिनिटापूर्वी मी जेव्हा पाहिले तेव्हा तर ते बंद होते. मी किचन मध्ये तो स्विच बंद करायला गेलो आणि मुख्य दरवाज्याकडे लक्ष गेले. तिथे एक सावली डोकावून मला पाहत होती. अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला. 

भीती ने जणू अंगच गळून गेले. इतक्या थंडीतही दरदरून घाम फुटला. मी तसाच धावत वर गेलो आणि दरवाज्याला आतून कडी लाऊन घेतली. कोणालाही उठवले नाही. पण प्रोजेक्ट काहीही करून पूर्ण करायचे आहे असा विचार करून लॅपटॉप वर बसलो. निदान केलेले काम सेव करू यासाठी ५ मिनिट द्यायचा विचार केला. मी रूम मधला सी एफ एल् चा बल्ब लावला पण तो अचानक लूक लुकु लागला. काही क्षणा पूर्वी घडलेला प्रकार आणि आता हे असे. मी घाबरून लॅपटॉप तसाच सुरू ठेऊन बेड वर जाऊन झोपलो आणि अंगावरून ब्लँकेट घेतले. नंतर कधी झोप लागली मला कळले नाही. दुसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार मी मित्रांना सांगितला. पण त्यांनी मला भास झाला असेल, असे काही नसते असे सांगून दुर्लक्ष केले. जवळपास १ महिन्या नंतर आमची परीक्षा संपली तसे आम्ही मुंबई ला आलो. आजही कधी तो प्रसंग आठवला की मनात एक वेगळीच भीती निर्माण होते. हे लिहिताना ही माझ्या अंगावर किती वेळा शहारे येत होते माझे मलाच माहीत..

Leave a Reply