अनुभव – हर्ष चव्हाण

ही घटना जेव्हा घडली तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मावशीकडे राहायला जायचो. खूप खेळायचो मजा मस्ती करायचो. दर वर्षी प्रमाणे त्या वर्षी ही जशी सुट्टी लागली तसे मी मावशीकडे राहायला गेलो. पण जसे अपेक्षित होते तसे अजिबात घडले नाही. मावशी खूप वेगळीच वागत होती. माझ्याशीच नाही तर सगळ्यांशी. मी तिचा असा स्वभाव या आधी कधीच पाहिला नव्हता. ती छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत होती. तसे जास्त बोलत नव्हती पण जेव्हा बोलायची तेव्हा अगदी चिडून बोलायची. खूप बदलली होती. 

मला येऊन ४-५ दिवस झाले होते. मावशीचे वागणे काही बदलले नव्हते. पण त्या रात्री खूप विचित्र गोष्ट घडली. आम्ही सगळे झोपलो होतो. मी तर अगदी गाढ झोपेत होतो. तितक्यात मला कोणी तरी बोलण्याच्या आवाजाने जाग आली. मला वाटले की घरा बाहेर कोणी तरी असेल कारण आवाज वेगळा वाटत होता. मी उठलो आणि पाहायला गेलो. खरं तर मावशी झोपेतून उठून विचित्र आवाजात बोलत होती. मी लांबूनच तिला पाहत होतो. तिचे बोलणे मला काही कळत नव्हते. पण नंतर मी ती नक्की काय बोलतेय ते समजण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा कळले की ती एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलतेय “मला मुक्ती पाहिजे”. 

आता मात्र मी पुरता घाबरलो. हा प्रकार साधा नसल्याचे मला लक्षात येऊ लागले. मी धावत जाऊन माझ्या दादा ला उठवले. तो ही गाढ झोपेतून उठत म्हणाला “काय रे काय झाले”. मी अतिशय घाबरलेल्या स्वरात म्हणालो “दादा बघ ना मावशी कशी करतेय”. त्याने माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत ओळखले की काही तरी विपरीत घडतेय. तो झटकन उठला आणि मावशीला पाहायला गेला. आम्ही दोघेही तिच्या खोलीत गेलो. त्याने मावशीला उठवायला सुरुवात केली पण ती काही दाद देत नव्हती. झोपेत होती की अजुन काही हेच कळत नव्हत. शेवटी दादा ने थोडे पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यावर टाकले तेव्हा ती शुध्दीवर आली. 

ती रात्र मला काही झोप लागली नाही. पुढचे २-३ दिवस सतत तोच विचार मनात घोळत होता. जसं जसे दिवस पुढे सरकत होते मावशीची अवस्था खूप च भयानक होऊ लागली होती. ती दिवसभर फक्त एकच वाक्य बोलायची “मला मुक्ती हवी आहे”. पण त्या दिवशी जे घडले ते मी कधीही विसरू शकणार नाही. त्या दिवशी मावशी गप्प गप्प होती. आणि अचानक उठून संपूर्ण घरभर धावू लागली. वस्तूंची आदळ आपट करू लागली. आम्ही सगळ्यांनी मिळून तिला घट्ट धरून ठेवले. पण ती कोणालाही ऐकत नव्हती. आम्ही बोलू लागलो की आपल्या घराजवळच्या हनुमान मंदिरात हिला घेऊन जाऊ. आमचे बोलणे ऐकून ती जोरात ओरडली “मला मुक्ती हवी आहे”. या वेळेस हे वाक्य जेव्हा मी तिच्या तोंडून ऐकले तेव्हा त्यात दोन वेगळे आवाज ऐकायला आले. 

माझ्यासाठी हे सगळे खूप भयानक होते. त्या एका आवाजाने माझी बोलतीच बंद झाली. मावशीच्या आवजासोबत अजुन एक आवाज होता. माहीत नाही कोणाचा. दादा ने जाऊन शेजाऱ्यांना बोलावून आणले. तिचे अंग खूप जड झाले होते. तिला आवरायला जवळपास ५ माणसं बोलवावी लागली. तिला आम्ही कसे बसे जवळच्या मंदिरात घेऊन गेलो. पण जसे आम्ही मंदिरासमोर आलो तशी ती अतिशय जोराने ओरडू लागली. तिला आम्ही जेमतेम आत मंदिरात घेऊन गेलो. गुरुजींनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तसे ती एका वेगळ्याच आवाजात बोलू लागली.

तेव्हा सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. त्यांच्या शेजारी घरकाम करायला येणाऱ्या एका बाईने काही महिन्यांपूर्वी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ती बाई मावशीच्या अंगात आली होती. गुरुजींनी मंत्र वैगरे म्हणून तिला मावशीच्या अंगातून बाहेर काढले आणि तिचे शरीर पुन्हा धारण न करण्याचे वचन घेतले. मावशी बेशुद्ध च होती. तिला आम्ही घरी घेऊन आलो. पुढचे काही दिवस मावशीचे अंग खूप दुखत होत. आम्ही काही दिवसांनी तिला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा तिला विश्र्वासच बसला नाही. देवाच्या कृपेने पुन्हा कधी असा प्रसंग कधीच तिच्यावर ओढवला नाही.

Leave a Reply