अनुभव – समीक्षा गायकवाड

मी एक फ्रीलांसर फोटोग्राफर आहे. ही गोष्ट २ वर्षांपूर्वीची आहे. मी माझ्या आत्याकडे एका कामानिमित्त अलिबाग ला गेले होते. माझ्या आत्त्याला ४ मुल आहेत. २ मुली ज्यांची लग्न झाली आहेत आणि २ मुल. त्यातला एक म्हणजे मंगेश दादा. तो माझ्याहून ५ वर्षांनी मोठा आहे. त्या दिवशी मी घरी बसून खूप कंटाळले होते म्हणून मी मंगेश दादा ल म्हणाले की आपण वर्सोळी ला फिरायला जाऊ. मला शांत ठिकाणी जायला खूप आवडते. म्हणून मग दादा ने मित्राची बाईक मागितली आणि आम्ही दोघं जायला निघालो. 

त्या समुद्रकिनारी एक स्मशान आहे आणि तिथे सहसा कोणी फिरकत नाही. पण तरीही बाईक असल्यामुळे मी दादा ला हट्ट केला की बाईक आपण खाली नेऊन त्या दिशेला जाऊ. आम्ही स्मशाना जवळ आलो तसे दादा म्हणाला समीक्षा बस या पुढे नको आपण परत जाऊया. शेवटी मी जास्त हट्ट न करता ठीक आहे म्हंटले तसे दादा ने बाईक वळवली आणि त्याला बाईकच्या साईड मिरर मधून मागे काही तरी दिसले.

तसे तो म्हणाला “समीक्षा लवकर बस आणि मला घट्ट पकडून ठेव. देवाचे नाव घेत रहा आणि डोळे बंद कर”. मी त्याला विचारले तर तो मला ओरडला की मी जे बोलतोय ते कर. तसे मी घट्ट डोळे मिटून देवाचे नाव घेत होते. दादा ही अतिशय वेगात गाडी चालवत होता. मला सतत जाणवत होत की माझ्या मागे कोणी तरी बसलय. माझ्या अगदी जवळ मला खेटून. पण मी मागे न पाहता फक्त देवाचे नाव घेत राहिले आणि काही वेळात आम्ही घरी येऊन पोहोचलो. 

तसे दादा म्हणाला “तुला म्हणालो होतो तिथे नको जाऊयात पण तू ऐकले नाहीस. एक जळालेली बाई, आपला पाठलाग करत होती. अक्षरशः तिची चामडी गळत होती. कधी आपल्या पुढे कधी आपल्या मागे तर कधी आपल्या बाईक वर. त्या २ मिनिटाच्या अंतरावर मी अर्धा तास गाडी चालवत होतो. जेव्हा आपण त्या झाडाखाली आलो जिथे हनुमानाची एक मूर्ती आहे तेव्हा ती अचानक थांबली. कदाचित तिची हद्द तितकीच असावी.” आम्ही दोघंही तापाने फण फणत होतो. आमचं नशीब की दुसरे काही माहीत नाही पण यातून देवानेच सुखरूप बाहेर काढले.

Leave a Reply