अनुभव क्रमांक – १ – साईराज

घटना माझ्या वडिलांसोबत आणि त्यांच्या मित्रा सोबत घडली होती. तेव्हा ते कॉलेज मध्ये शिकत होते. ते पाचही मित्र बाईक घेऊन एके ठिकाणी राईड ला गेले होते. त्याच ठिकाणी काही दिवस मुक्काम करून मग परतीच्या प्रवसाला लागले. ट्रॅफिक लागू नये म्हणून रात्रीच निघाले. काही तासांचा प्रवास झाला असेल. साधारण ३ वाजत आले होते. ड्राईव्ह करून बराच वेळ झाला होता. ते एका निर्जन रस्त्याला लागले. दोन्ही बाजूला गर्द झाडी होती. सगळे त्यांच्यात धुंदीत बाईक चालवत होते. तितक्यात त्यांच्यातल्या एका मित्राला रस्त्याकडे ला कोणीतरी उभी दिसले. तो माझा वडीलांच्या मागे च बाईकवर बसला होता. जसे त्याची बाईक जवळ गेली तसे तो म्हणाला “ते बघ तिथे कोणी तरी उभे आहे”.

त्यांच्या बाईक जवळ च होत्या म्हणून त्या सगळ्यांनी त्या दिशेला पाहिले. तिथे एक बाई उभी होती. त्या मित्राला वाटले की ही बाई अश्या निर्जन ठिकाणी ते ही इतक्या रात्री काय करतेय. विचार करत असतानाच त्यांच्यातला दुसरा मित्र संदीप म्हणाला “या बाईला लिफ्ट देऊया का..?”. तसे माझे वडील झटकन म्हणाले “रात्री ची वेळ आहे आणि ही जागा बरोबर वाटत नाहीये”. वडिलांची गोष्ट सगळ्यांना च पटली. ते अगदी निमूटपणे तिच्या समोरून बाईक घेऊन जाऊ लागले. तिला ओलांडून पुढे गेल्यावर त्यांनी बाईक चा वेग कमी करून सहज म्हणून मागे वळून पाहिले तर त्या रस्त्यावर कोणीही नव्हते. आता सगळ्यांना एकदाच असा भास होणे शक्य नव्हते. काही क्षणापूर्वी ती तिथेच रस्त्याकडे ला होती आणि आता दिसेनाशी झाली होती.  

पुढच्या दोन अडीच तासात ते घरी पोहोचले. त्यांचा मित्र संदीप आजारी पडला होता. खूप डॉक्टरांकडे दाखवून आणले पण त्याला काही फरक पडत नव्हता. सगळ्यांना शंका होती की हे काही तरी बाहेरचे आहे. त्यांनी त्या बद्दल चा उपाय करायला सुरुवात केली आणि हळु हळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. बरीच वर्ष उलटली. सगळे मित्र आप आपल्या मार्गाला लागले, सगळ्यांची लग्न ही झाली. त्यांनी असेच एके वर्षी सगळ्या कॉलेज मित्रांचे गेट टुगेदर ठेवले होते. सगळे मित्र एकत्र जमले होते. तेव्हा त्या ट्रीप चा विषय निघाला आणि सगळ्यांनी उत्सुकतेने संदीप ला विचारले “त्या रात्री नक्की काय झाले होते..? आपल्या सगळ्यांनाच ती बाई दिसली होती मग तुलाच इतका त्रास का आणि कसा झाला..?” त्यावर तो सांगू लागला “मला या गोष्टी बद्दल बोलायला कधीच आवडत नाही पण तुम्हाला म्हणून सांगतो.. 

त्या बाई ला ओलांडून जात असताना तुम्ही कोणीच तिच्याकडे पाहिले नाही, तुमचे लक्ष समोर होते. पण मी तिला पाहिले. तिने माझ्या कडे पाहून स्मित हास्य केले. मी सहज म्हणून तिच्या पायाकडे पाहिले आणि माझ्या शरीरातला सगळा त्राण च संपला. ती जमिनीपासून काही फूट वर हवेत तरंगत होती..” त्या नंतर कोणीही या बद्दल कसलाच विषय काढला नाही. कारण सगळ्यांना कळून चुकले होते की संदीप त्या प्रसंगानंतर आजारी का पडला होता..

अनुभव क्रमांक – २ – शुभम पाटील

या प्रसंगाला आता जवळपास ३ वर्ष उलटून गेली. हा भयानक प्रसंग माझ्या सोबत आणि माझ्या भावा सोबत घडला होता. माझ्या एका मित्राचे लग्न ठरले होते. त्याचे गाव माझ्या गावापासून बरेच लांब होते. त्यामुळे मी माझ्या भावाला म्हणालो की तू ही चल माझ्या सोबत म्हणजे आपल्याला बाईक घेऊन जाता येईल. आणि तू असलास किनलग्न आटोपल्यावर लगेच निघता ही येईल. माझ्या आई ने आम्हाला बजावून सांगितले होते की संध्याकाळी घरी यायचा प्रयत्न करा. उगाच तिथे उशिरा पर्यंत थांबून मग रात्री निघू नका. मी आई च्याच बोलण्या कडे दुर्लक्ष करत फक्त हो म्हणालो. दुसऱ्या दिवशी सकाळी च आम्ही बाईक घेऊन निघालो. साधारण १० वाजता आम्ही लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचलो. 

मित्राचे लग्न सुरळीत पार पडले आणि दुपारचे जेवण वैगरे आटोपून आम्ही थोडा वेळ थांबलो. माझा भाऊ म्हणाला की आपण थोड्या वेळ थांबून मग घरी जायला निघू उगाच उशीर नको. साधारण ४ ला सगळे आटोपल्यावर आम्ही घरी जायला म्हणून मित्राचा निरोप घ्यायला गेलो. पण माझा मित्र हट्ट करू लागला की इतक्यात कुठे चाललात. रात्रीचे जेवण इथेच करायचे आहे. मी त्याला समजावू लागलो की रात्रीच्या जेवणासाठी थांबलो तर घरी पोहचायला बराच उशीर होईल पण तो काही आमचे ऐकायला तयार नव्हता. शेवटी तो उत्सव मूर्ती असल्यामुळे त्याचे ऐकण्याशिवय आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. मी आणि माझा भाऊ शेवटी तिथेच थांबलो. 

रात्रीचे जेवण आटोपून निघायला जवळपास १०.३० वाजले. माझ्या मनात सतत विचार चालू होता की घरी आई काळजी करत असणार. आम्ही मित्राचा निरोप घेऊन घरी जायला निघालो. त्या गावाची वेस ओलांडून बाहेर आलो तसे माझा भाऊ म्हणाला की आल्या मार्गाने नको, थोडे पुढे गेल्यावर आतून एक रस्ता आहे. तिथून गेलो तर आपला बराच वेळ वाचेल. तो रस्ता खरे तर मला सुद्धा माहीत होता. तो रस्ता शेतातून जात होता. मी त्याचे ऐकले नाही पण तो सांगू लागला की आधीच उशीर झालाय आणि आपण त्या शॉर्ट कट ने गेलो नाही तर आपल्याला अजुन उशीर होईल. शेवटी मी नाईलाजाने हो म्हणालो आणि आमची बाईक त्या रस्त्याला लागली. साधारण १५ मिनिट झाली असतील. आम्हाला एक आवाज ऐकू येऊ लागला. एका बाईच्या रडण्याचा..

आम्ही बाईक चाच वेग कमी केला आणि मी भावाला विचारले “तुला कसला आवाज ऐकू येतोय का रे..?” तसे तो म्हणाला “हो.. येतोय.. एका बाईचा रडण्याचा आवाज येतोय..” आम्ही चोहो बाजूंनी नजर फिरवू लागलो. कोणी दिसतेय का ते पाहू लागलो. मी बाईक चा वेग कमीच ठेवला होता. तितक्यात समोर पडणाऱ्या बाईक हेड लाईट च्याच प्रकाशा त दिसले की समोरच्या एका झाडाच्या फांदीवर कोणी तरी बसले आहे. बाईक जस जशी त्या दिशेने जाऊ लागली तसे जाणवले की ती एक बाई आहे. आवाज ही हळु हळु स्पष्ट होत चालला होता. आम्हाला कळून चुकले की तो रडण्याचा आवाज याच बाई चा आहे. आम्ही त्या झाडा जवळून बाईक घेऊन जाऊ लागलो तसे तिचा चेहरा दृष्टीस पडला. 

तिला पाहून माझे डोकेच सुन्न झाले. चेहरा अगदी छिन्न विच्छिन्न होता. जबडा विस्फारून ती माझ्या अगदी डोळ्यात बघत होती. ते दृश्य पाहून माझ्या शरीरातला त्राण च संपला. पण माझा भाऊ मला भानावर आणत म्हणाला.. तिथे पाहू नकोस, आपल्याला इथून लवकरात लवकर दूर जायचेय.. गाडीचा वेग वाढव. त्याच्या त्या बोलण्याने मी भानावर आलो. मी बाईक चा वेग वाढवला. कच्चा रस्ता असल्यामुळे वेग वाढवून ही बाईक नीट चालवता येत नव्हती. तरीही जमेल तितक्या वेगात मी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. तितक्यात माझे लक्ष साईड व्ह्यू मिरर मध्ये गेले आणि उरला सुरला त्राण ही संपला. ती बाई आमच्या बाईक च्याच मागे अतिशय वेगात धावत येत होती. माझा भाऊ प्रचंड घाबरला होता. ती इतक्या वेगात धावत येत होती की आम्हाला काही कळतच नव्हते. 

ती आता आमच्या अगदी जवळ येऊन पोहोचली आणि तिने भावाच्या पाठीवर जोरात वार केला. तिची तीक्ष्ण नख भावाच्या पाठीत अक्षरशः रुतली आणि त्वचा फाडत च बाहेर निघाली. भाऊ वेदनेने ओरडू लागला. तसे मी होता नव्हता सगळा त्राण एकत्र करून बाईक एक्सी लरे ट केली आणि अतिशय जोरात घेतली. तसे ती बाई विचित्र आवाजात किंचाळली. त्या नंतर आम्ही मागे वळून एकदाही पाहिले नाही. घरी आल्यावर बाईक तशीच टाकून घराकडे धावलो. मी जोरात दरवाजा वाजवू लागलो आणि दार उघडायला सांगू लागलो. पण आमच्या सोबत घडलेला प्रसंग इतका भीषण होता की मला तिथे दारातच भोवळ आली आणि खाली कोसळलो. जाग आली तेव्हा हॉस्पिटल मध्ये होतो. तापाने फणफणत होतो. बाजूला नजर गेली तर भाऊ ही बाजूच्या बेडवर च होता. 

त्याची अवस्था माझ्या पेक्षा वाईट होती. माझ्या आजोबांनी काय झाले विचारल्यावर मी त्यांना सगळे सांगितले. जवळपास २ दिवसांनी माझा ताप हळु हळू उतरला. मी हा प्रसंग माझ्या उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. 

Leave a Reply