लास्ट इयर आमच्या इंजिनिअरिंग ची सेंड ऑफ पार्टी होती. ती संपल्यावर आम्ही मित्रांनी रात्री मरिन ड्राइव्ह ला जायचा प्लॅन केला. साधारण 11 च्या सुमारास आम्ही ठाण्याहुन निघालो. आम्ही तिघ जण होतो. मी, रिशी आणि अमित. रिशी डोंबिवली ला, अमित बदलापूर ला तर मी ठाण्याला राहतो.त्या दिवशी आमच्यापैकी कोणीही ड्रिंक वैगरे केले नव्हते. गाडी अमित ची असल्यामुळे तोच ड्राइव्ह करत होता.
काही वेळातच आम्ही मारिन ड्राइव्ह ला आलो. मजा मस्ती केली, थंड हवेचा आस्वाद घेत टाईमपास ही बराच झाला. आणि आम्ही पुन्हा ठाण्याला यायला निघालो. आम्ही येताना मुद्दामून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ने आलो कारण आम्हाला सी लिंक ची मजा घ्यायची होती.
आम्ही जसे बोरिवली क्रॉस केले तसे गाडीत आमचे भूतांचे किस्से रंगायला लागले. तेव्हा साधारण 2.30 वाजले होते आणि आम्ही घोडबंदर रोड वर होतो.
रिशी तसा थोडा भित्रा आहे. त्यामुळे इतक्या रात्री तो घरी डोंबिवली ला न जाता आजची रात्र माझ्याच घरी थांबेल आणि म्हणून आम्ही दोघं ठाण्याला उतरून अमित त्याच्या घरी बदलापूर ला एकटाच ड्राइव्ह करत निघणार असे ठरले.
आम्ही अमित ला सांगितले की इतक्या रात्री एकटा जाऊ नकोस, आजची रात्र माझ्याच घरी थांब पण अमित ऐकायला तयार नव्हता. आम्हाला कारण कळत नव्हते की तो इतक्या रात्री का एकटा जायला निघाला आहे. आम्हाला राहवून असे वाटत होते की एखादी अदृश्य शक्ती त्याला तसे वागायला आणि करायला भाग पडतेय.
मी अमित ला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की बदलापूर चा रोड तेवढा सेफ नाही म्हणून जाऊ नकोस पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
3 वाजता आम्ही ठाण्यात माझ्या कॉम्प्लेक्स च्या खाली येऊन पोहोचलो. मी आणि रिशी गाडीतून उतरलो आणि अमित एकटाच घरी जायला निघाला.
आम्ही काही मिनिट तिथेच रेंगाळत गप्पा करत लिफ्ट पर्यंत आलो आणि तितक्यात अमित चा फोन आला. अमित प्रचंड घाबरला होता. तो म्हणाला की “तुम्ही काय मला शिव्या शाप दिल्या का, मी परत येतोय”
आम्ही घाबरून बाहेर कॉम्प्लेक्स च्या गेट कडे धावत आलो. अमित रिटर्न आल्यावर मी त्याला गाडी पार्किंग मध्ये लावायला सांगितली. पण अमित इतका घाबरला होता की त्याला गाडी पार्क करायला जवळपास 25 मिनिट लागली. ज्या मुलाने मारिन ड्राइव्ह पर्यंत आरामात गाडी चालवली त्याच मुलाला पार्किंग करायला इतका वेळ लागत होता. आम्ही त्याला विचारायचा प्रयत्न केला की इतके काय झालंय पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता.
शेवटी गाडी कशी बशी पार्क करून अमित गाडीतून उतरला आणि आम्हाला काय घडले ते सांगू लागला “जसे मी कार घेऊन कॉम्प्लेक्स च्या बाहेर पडलो आणि घोडबंदर रोड ला पोहोचला तसे गाडीत विचित्र गोष्टी घडायला सुरुवात झाली. त्याला भास झाला की गाडीच्या बॅक सीट वर कोणी तरी बसलंय. तशी चाहूल जाणवताच गाडीची हेड लाईट बंद चालू व्हायला लागली.
म्युझिक सिस्टीम मधून भयंकर आवाज येऊ लागले, कारण रिशी च्या मोबाईल चे ब्लुटूथ अचानक कनेक्ट झाले होते. काही तरी विपरीत घडणार हे मी लगेच ओळखले आणि गाडी पुन्हा तुझ्या घराच्या दिशेने वळवली.
हे सांगताना अमित च्या चेहऱ्यावरची भीती आणि मनात दाटलेले भय स्पष्ट दिसत होते. घडलेला प्रसंग ऐकून आम्हीही घाबरलो. जास्त काही न बोलता आम्ही तिघेही घरात आलो. मनात देवाचे नाव घेत झोपलो पण त्या रात्री कोणालाच नीट झोप लागली नाही.
सकाळी उठल्यावर आई ला घडलेला किस्सा सांगितला तेव्हा आई म्हणाली की काल रात्री अमावस्या होती. अमित चे नशीब बलवत्तर म्हणून त्याला पुन्हा घरी यायची बुद्धी सुचली नाही तर काहीही विपरीत घडू शकले असते.