अनुभव – सचिन

घटना बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. मी अगदी लहान होतो ८-१० वर्षांचा. त्या वेळी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की गावी जायचो आणि २ महिने तरी राहायचो. मी साताऱ्याचा आहे. गावात आमचा प्रशस्त वाडा आहे. पूर्वी गावाला एक वाड्याचे मोठे कुंपण होते पण नंतर कालांतराने बाहेरच्या भागात ही वस्त्या झाल्या आहेत. आमचे कुटुंब खूप मोठे आहे आणि गावात एक वाडा तर होताच पण त्याच बरोबर एक मोठे घर ही होते. आम्ही त्या वेळी मोठ्या घरात राहायचो. त्या घरा शेजारी एक ओढा होता म्हणजे घराच्या मागून चालत गेले तर अवघ्या १-२ मिनिटांवर.. 

माझे गावातले खूप मित्र होते आणि आम्ही सुट्ट्यांमध्ये खूप मजा करायचो. सकाळ झाली की जे घरा बाहेर पडायचो ते थेट संध्याकाळी ६ ला घरी यायचो. कधी दुपारी जेवायला यायचो पण कधी ते सुद्धा नाही. आम्हाला ६ ला घरी यावे लागायचे कारण त्या काळी गावात रात्री लाईट नसायची. तो दिवस मला अजूनही चांगला च आठवतेय. आम्ही सगळी मुलं घरा समोरील रस्त्यावर खेळत होतो. दुपारचे २ वाजून गेले असतील. खूप कडक उन पडलं होत. खेळताना आमचा बॉल ओढ्याच्या दिशेने गेला. तसे आमच्यातले दोन मित्र राहुल आणि प्रवीण तो बॉल शोधायला गेले.

त्या ओढ्याच्या बाजूला बरीच गर्द झाडी होती त्यामुळे त्यांना बॉल शोधून आणायला वेळ लागणार होता. म्हणून आम्ही जवळच्या एका झाडाखाली थांबायला चालत जाऊ लागलो तितक्यात ते दोघे ही धापा टाकत धावत आले. ते खूप घाबरले होते आणि काहीच बोलत नव्हते. फक्त एकच वाक्य म्हणाले ” ओढ्याच्या मधोमध कोणी तरी आहे.. ” 

आम्ही जवळपास १५-२० मुले होतो. सगळ्यांनी ओढ्याच्या दिशेने धाव घेतली. आमच्यात काही वयाने मोठी मुलं ही होती ती ही आमच्या सोबत आली. बॉल शोधायचे राहिले बाजूला पण तिथे कोण आहे हे पाहायला सगळे जास्त उत्सुक होते. आमच्या त्या भागात त्या काळी खूप माकडे असायची. आम्ही जात असताना ती आमची वाट अडवायचा प्रयत्न करू लागली. मला एके क्षणासाठी वाटले की ती आम्हाला त्या ओढ्यावर जाण्यापासून रोखत आहेत. पण आम्ही त्यातून वाट काढत ओढ्यावर येऊन पोहोचलो. मला दिसले की आमच्या पासून काही अंतरावर ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला एक बाई केस मोकळे सोडून उभी आहे. लांब असल्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता.

या वेळी तिथे कोणाचे असणे मला तरी पटत नव्हते. कारण भर दुपारी कोणत्याच गावातल्या बायका कपडे वैगरे धुवायला येत नाही. त्यात ती बाई एकटी अगदी कंबरे पर्यंत पाण्यात उभी राहून पाण्यावर हळुवार पणे हात फिरवत होती. समोर काय पाहतोय ते आम्हाला उमगत नव्हत. काही वेळा नंतर मित्रांचे बोलणे कानावर पडले आणि कळले की आमच्या पैकी फक्त ३ जणांना ती दिसतेय. बाकीच्यांना काही दिसत नव्हते. त्यांना सांगून पाहिले पण त्यांचा विश्वास च बसत नव्हता.

ते म्हणत होते की कोण बाई, कुठे दिसतेय, त्या ओढ्याच्या पाण्यात कोणीही नाही. आमचे बोलणे सुरू असतानाच आम्हाला जोराची एक किंकाळी ऐकू आली आणि घाबरून आम्ही सगळे तिथून धावत सुटलो. सगळे ओरडत आप आपल्या घराच्या दिशेने धावत आलो. आमचे असे ओरडणे ऐकून काही जण बाहेर आले तसे आम्ही त्यांना त्या प्रसंगाबद्दल सांगितले. 

त्यातली ८-१० मोठी माणसे लगेच त्या ओढ्यावर गेली पण तिथे त्यांना कोणीच दिसले नाही. आम्ही लहान असल्यामुळे त्यांना नीट समजून सांगू शकलो नाही की आम्ही नक्की काय पाहिले. माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात पहिला भयानक प्रसंग होता. त्या काळी लहान असताना काही कळले नाही पण तो प्रसंग आजही स्मरणात तसाच आहे. ती खरंच एखादी वेडी बाई ओढ्यात उभी होती की ते एखादे अमानवीय होते ते माहीत नाही. पण मग राहून राहून एक प्रश्न उद्भवतो की ती आमच्यापैकी फक्त ३ जणांना का दिसली होती..? .

Leave a Reply