ही गोष्ट आहे २०२० साल ची. मी बाहेर गावी गेलो होतो आणि माझ्या गाडीवरून घरी परतत होतो. बरीच रात्र झाली होती. साधारण १० वाजले असावेत. रस्ता पूर्ण निर्मनुष्य झाला होता. अजुन बराच वेळ लागणार होता घरी पोहोचायला. जिथून जात होतो तो परिसर ही मला ओळखीचा नव्हता. मी विचार केला होता की घरी लवकर जाऊन मस्त पैकी जेवण करून झोपून जायचे. म्हणजे सकाळी लवकर उठून व्यायाम वैगरे करता येईल पण कसले काय. हा विचार करत असतानाच गचके खात  माझी गाडी बंद पडली. खाली उतरून गाडी ला किक मारू लागलो पण तरीही गाडी चालूच होत नव्हती. आता हिला काय झाले.? बिघाड होण्यासारखे काही कारण च नव्हते कारण अवघ्या काही दिवसांपूर्वी मी गाडीची सर्व्हिसिंग केली होती. आता घरी कसे जाणार. मी गाडी ढकलत रस्त्याकडे ला आणून उभी केली.

तेवढ्यात मला दिसले की जिथे आपण उभे आहोत तिथून अगदी समोरच रेल्वे स्टेशन आहे. रात्र झाल्यामुळे मला परिसराचा अंदाज आला नाही म्हणून कदाचित रेल्वे स्टेशन आहे हे ही लक्षात आले नाही. मी गाडी ढकलत च रेल्वे स्टेशन पर्यंत घेऊन गेलो आणि त्या आवारात च पार्क केली. स्टेशनात आलो पण सगळी कडे शुकशुकाट होता. त्यात संपूर्ण प्लॅटफॉर्म वर अंधार होता. म्हणजे काही लाईट होते प्लॅटफॉर्म वर पण ते खूप लांब होते. त्यामुळे त्याचा प्रकाश ही नीट पडत नव्हता. असून नसल्यासारखे.. मला या स्टेशन बद्दल माहिती होते पण या आधी इथे येण्याचा किंवा दुसरीकडून या स्टेशन वर उतरण्याचा योग आला नव्हता. त्या भागातल्या स्टेशनांकडे जणू रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष च केलय.

खिशातून मोबाईल काढून फ्लॅश लाईट सुरू केला आणि तिकीट काऊंटर शोधू लागलो. प्लॅटफॉर्म च्या एका कोपऱ्यात होते ते काऊंटर. तिथे गेलो पण तिकीट खिडकी ही बंद. बराच वेळ ठोकून , हाका मारून एका व्यक्तीने तिकीट काऊंटर उघडले. मी तिकीट काढले, पुढची ट्रेन कधी आहे ते विचारून घेतले आणि पुन्हा प्लॅटफॉर्म वर आलो. एक नजर सगळीकडे फिरवली आणि दिसले की प्लॅटफॉर्म वर च काय पण संपूर्ण स्टेशनात मी एकटाच आहे. तितक्यात मला जाणवले की एक वक्ती माझ्या दिशेने चालत येतोय. मला जरा हायसे वाटले की मी एकटा नाही, सोबत आहे मला. तो व्यक्ती माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला “ असे काय उभे आहात , काय विचार आहे, चोरी वैगरे करायचा विचार आहे की काय ? “ तो एक कॉन्स्टेबल होता, जे रेल्वे मध्ये सुरक्षे साठी तैनात असतात त्यातलाच एक.

मला जरा रागच आला कारण तो मला थेट चोर समजून बोलत होता. मी म्हणालो “ चोरी..? काय बोलताय. माझी गाडी बंद पडली म्हणून ट्रेन ने चाललोय मी.. “ त्यावर तो म्हणाला “ ठीक आहे.. बसा इथे बाकावर.. या स्टेशन वर लोक कमी असतात म्हणून चोरी करायला सोपं जातं, त्यामुळे इथे चोरांचा सुळसुळाट झालाय. माझ्यावर जबाबदारी दिली आहे.” इतके बोलून तो अंधारात गुडूप होऊन गेला. मी मात्र विचारातच पडलो की चोर कसे असतील. इथे चोरी करायला, पाकीट मारायला लोक च नाहीत. असो. मी तसाच बाकावर बसून राहिलो. काही वेळ उलटून गेला. ट्रेन चा ही पत्ता नव्हता बहुतेक लेट झाली होती. तितक्यात तो व्यक्ती परत आला. मी त्याला विचारले “ ११.३० ची ट्रेन रोज लेट असते का..? “ त्यावर तो नाही म्हणाला. मी त्याला पुन्हा एक प्रश्न केला “ या स्टेशन वर इतका अंधार आहे, लाईट ही जास्त नाहीयेत. तुम्हाला एकटे काम करताना भीती नाही वाटत का ? “ तसे तो म्हणाला “ भीती कसली. आणि लाईट मी बंद ठेवले आहेत, थांबा इथला लाईट चालू करून येतो “ 

मी विचार केला की काय माणूस आहे हा.? चोऱ्या होतात सांगतोय आणि सगळे लाईट ही बंद करून ठेवलेत. मला काही कळणार तोच माझ्यासमोर एक टिसी येऊन उभा राहिला. मी एकदम दचकलो. त्याला मी तिकीट दाखवले. तितक्यात मला एकदम लोकांचा आवाज येऊ लागला. बाजूला पहिले तर बरीच लोक प्लॅटफॉर्म उभी होती. मला गोंधळल्यासारखे झाले कारण काही क्षणापूर्वी संपूर्ण प्लॅटफॉर्म रिकामा होता आणि आता अचानक इतकी लोक कशी आणि कुठून आली. मला शंका येऊ लागली की इथे काही तरी विपरीत घडतेय. काय करावे काही कळत नव्हते. माझी गाडी ही बंद पडली होती. डोक्यात नको नको ते विचार येत होते. तो कॉन्स्टेबल, नंतर टी सी आणि आता ही सगळी लोक अचानक कुठून आली. काही कळणार तितक्यात माझा मोबाईल वाजला. मी फोन उचलला तर माझा मित्र रवी विचारत होता “ अरे कुठे आहेस तू..? घरी नाही आलास अजुन. ? तुझ्या आई चा फोन येऊन गेला मला. तुझ्या घरचे वाट पाहत आहेत. एवढा उशीर का झाला.? “ त्यावर मी म्हणालो “ उशीर..? उशीर कुठे झालाय अजुन.. ११ पण नाही वाजलेत.. मी रेल्वे स्टेशन वर थांबलोय ट्रेन ची वाट बघत” 

“ अरे भाई काय बोलतोय. वेळ बघ परत एकदा.. “ मी जरा गोंधळलो आणि वेळ पाहिली तर रात्रीचे २ वाजून गेले होते. मी एकदम शहारलो. म्हणजे गेले ३ तास मी या प्लॅटफॉर्म व बसून आहे..?

 रवी ने विचारले “ तू नक्की कोणत्या रेल्वे स्टेशन वर आहेस मला सांग मी येतो घ्यायला.” 

मला माहित होत की या रेल्वे स्टेशन वर काही तरी विपरीत घडत आहे. मी रवी ला म्हणालो की तू ते मला घ्यायला आणि फोन कट केला. तितक्यात प्लॅटफॉर्म वरच्या होत्या नव्हत्या लाईट ही एकदम बंद झाल्या. अगदी गडद अंधार पसरला. मी उठलो आणि प्लॅटफॉर्म वरून बाहेर पडू लागलो तसे जोरात कोणी तरी येऊन मला धडकले. तो धक्का इतका जोरात होता की मी खाली पडलो. अंधार असल्यामुळे काहीच नीट दिसत नव्हत. मी उठायचा प्रयत्न करू लागलो तसे मला माझ्या पायांवर थंडगार हातांचा स्पर्श जाणवला. मी झटकन पाय मागे घेतले आणि मोबाईल चा फ्लॅश लाईट सुरू करून त्या दिशेला पाहिले. पण समोर कोणीच नव्हतं. मी खात्री करण्यासाठी चौफेर नजर फिरवली पण तिथे माझ्या व्यतिरिक्त कोणीच नव्हत. आता मात्र मला एक क्षण ही तिथे थांबायचे नव्हते. मी तिथून बाहेरच्या बाजूने धावत सुटलो.

मला माहित नाही काय होत त्या प्लॅटफॉर्म वर. पण जे होत ते खूप विचित्र होत. कसा बसा मी बाहेर आलो. धावत आल्यामुळे धाप लागली होती. तेवढ्यात समोरून रोडवरून कोणी तरी पळत येताना दिसले. आता हे काय नवीन.. एका भयानक प्रसंगातून बाहेर पडलो आणि आता हे. आधीच माझ्या अंगात त्राण उरला नव्हता. मी इतका घाबरलो होतो की रस्त्याकडे च्या एका मोठ्या खड्यात उतरून लपून बसलो. समोरून पळत येत असणाऱ्या गोष्टी कडे मी लक्ष देऊन होतो. तितक्यात माझ्या नावाने हाक ऐकू आली तेव्हा मला कळले की तो रवी आहे. मी तिथून उठून रवी कडे धावत गेलो आणि भीती ने मला रडू च कोसळले. मी रवी ला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावर रवी म्हणाला.. “ जाऊदे सगळं.. जास्त विचार करू नकोस.. आधी घरी जाऊ कारण तुझ्या घरचे तुझी खूप वाट पाहत आहे.. “ मी आणि रवी त्याच्या गाडीवर पुढच्या काही तासात घरी पोहोचलो. पण या प्रसंगानंतर मी त्या भागात आणि त्या रेल्वे स्टेशन वर पुन्हा कधीच गेलो नाही..

Leave a Reply