अनुभव – अथर्व शिंदे

हा अनुभव ही बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या आजीला आला होता. त्याकाळी गावात पाण्याची सोय नव्हती. रात्री ३ च्या सुमारास पाणी यायचे आणि ते ही येईलच याचा काही नेम नसायचा. पण तरीही सगळी लोक पाण्याची भांडी रात्री च नळासमोर लाऊन ठेवत असत. आजी ही रात्री जाऊन पाण्यासाठी भांडे ठेवून नंबर लावत असे आणि मग रात्री ३ ला पाण्याचा आवाज आला किंवा शेजारच्या लोकांची चाहूल लागली की उठून इतर भांडी घेऊन पाणी भरायला जायची. घराशेजारी काही अंतरावर पाण्याचा नळ होता, आणि तिथून वरच्या बाजूला एक दगडाची खाण होती. जिथून मशीन च्या साहाय्याने मोठी दगड काढली जायची. एके रात्री आजी ला अचानक पाण्याच्या आवाजाने जाग आली. नळ जोरात सुरू होऊन आणि त्यातून पाणी वाहण्याचा आवाज येऊ लागला. म्हणून ती धडपडत उठली आणि पटापट घरातली इतर भांडी घेऊन बाहेर पडली. काही वेळात ती नळा जवळ आली. तिला एक विचित्र गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे आज कोणीही पाणी भरायला आले नव्हते. त्याच विचारात तिने नळाखाली हंडा लावला आणि तो भरायची वाट पाहू लागली. बराच वेळ झाला असेल. तिने घरून आणलेली भांडी ही भरत आली होती. तितक्यात तिला कोणाच्या तरी गप्पा मारण्याचा आवाज आला. 

तो आवाज त्या खाणीच्या दिशेकडून येत होता. तेव्हड्यात सगळे पाणी भरून झाले म्हणून ती हंडा कळशी घेऊन घरी जायला निघाली. पण तिला जाणवू लागले की कोणीतरी आपल्याकडे लक्ष ठेऊन आहे. पण नंतर वाटले की उगाच नको ते भास होत आहेत. घरी जाऊन ती हंडा कळशी ठेऊन उरलेली भांडी घ्यायला परत नळाजवळ आली. आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथल्या एका लाईट च्या खांबाखाली एक बाई होती आणि आजीकडे एक टक पाहत होती. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तिने लाल साडी नेसली होती, हातात सोन्याच्या बांगड्या होत्या, बहुतेक अंगावर इतर ही दागिने असावेत. पण ते दिसत नव्हते कारण तिचा चेहरा केसाने झाकला गेला होता. आजीची नजर तिच्या पायापासून वर गेली. तितक्यात तिला जाणवले की त्या केसांतून तिची भेदक नजर आजीलाच न्याहाळतेय. ते पाहून अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. ती थरथरत्या हाताने हंडा उचलायला खाली वाकली पण तो तिला काही उचलता येईना. एरव्ही दोन हांडे सहज उचलणारी आजी आज मात्र अगदी हतबल झाली होती. तिने पाणी ओतून अर्ध्याहून जास्त हंडा तसाच रिकामा केला आणि तो घेऊन झपाझप पावले टाकत घराकडे जाऊ लागली. तसे ती बाई सुद्धा आजीच्या मागून चालू लागली. 

आजी कशीबशी घरी आली, दरवाजा लाऊन घेतला. पण काही वेळ उलटत नाही तोच दारावर जोरात थापा पडू लागल्या. त्या आवाजाने माझे वडील आणि काका जे त्या काळी अगदी लहान होते ते रडत उठले. आजीने त्यांना जवळ घेऊन संपूर्ण रात्र जागून काढली. पाहा होईपर्यंत बाहेर पैंजण चा आवाज येत होता. घराबाहेरच्या गल्ली तून बहुतेक ती बाई फेऱ्या मारत होती. सकाळी जेव्हा आजीने हा अनुभव शेजाऱ्यांना सांगितला तेव्हा ते सुद्धा म्हणले की त्यांना सुधा रात्री पैंजनांचा आवाज येत होता. हा अनुभव सांगताना आजीच्या चेहऱ्यावर आजही ती भीती मला जाणवली. 

Leave a Reply