अनुभव – महेश डुंबरे

काहींचा भूतप्रेतावर ठाम विश्वास असतो त्यापैकी मी सुद्धा एक आहे आणि मी सुद्धा अशी खरी व भयंकर कथा अनुभवली आहे ती अगदी सिनेमातील कथेप्रमाणे वाटेल पण तेवढीच खरी आहे. गोष्ट 2002 म्हणजेच जवळपास २० वर्षांपूर्वची आहे. ही घटना घडण्याअगोदर मी अतिशय साहसी अर्थातच रात्री-अपरात्री बिनधास्त फिरणारा, भूत प्रेत यावर अजिबात विश्वास न ठेवणारा व त्यांचं हासू करणाऱ्या पैकी एक होतो. पण त्या काळ रात्रीने माझ्या आयुष्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला.

वर्ष २००२. १२ वीची परीक्षा नुकतीच संपली होती. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपल्या गावी गेलो होतो. तसा मी विलेपार्ले, मुंबई येथे वास्तव्यास आहे. शनिवार होता. आणि काही जणांना माहीतच असेल की दूरदर्शनवर पूर्वी फक्त शनिवार व रविवारी रात्री चित्रपट लागत असत. मी आणि माझा चुलतभाऊ नवनाथ जो गावीच असायचा आम्ही रात्री एक चित्रपट पाहत बसलो होतो. तो आधीच बऱ्याच वेळा पाहिल्यामुळे जास्त लक्ष देऊन पाहत नव्हतो. घरातली सगळी मंडळी ८.३० लाच झोपून गेली होती. माझ्या चुलत भावाला तो चित्रपट खूप आवडायचा आणि आमचा चांगलाच सलोखा होता म्हणून त्याला सोबत म्हणून आम्ही दोघेच हा चित्रपट पाहत होतो. चित्रपट रात्री साधारण १ वाजता संपत असत. १२.३० झाले असतील. अचानक माझे लक्ष घरातील पाळीव बोक्याकडे गेले. तो दरवाजाच्या खाली असलेल्या एका त्रिकोणी फटीतून बाहेर अगदी टक लाऊन पाहत होता. माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला बऱ्याच वेळा हाक देऊन बोलावले. एरव्ही एका हाकेत माझ्याकडे पळत येणारा बोका, आता मात्र ३-४ वेळा बोलावून सुद्धा आला नाही. त्याने साधे माझ्याकडे पाहिले सुद्धा नाही. फक्त एक टक लाऊन तसाच भ्याड नजरेने बाहेर काही तरी बघत होता.

चित्रपट संपला व आम्ही दोघं बाहेर ओट्यावर असलेल्या खाटेवर नेहमी प्रमाणे झोपण्यास आलो. सगळी मंडळी घरातच झोपायची पण आम्ही लहान मूल थ्रिल म्हणून गावी बाहेर मस्त खाटेवर झोपायचो. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी झोपण्यापूर्वी लघवी करण्यासाठी घरामागे गेलो. अश्यावेळी बहुधा माझे भाऊ हे जास्त मागे, आतल्या भागात न जाता थोड्या बाजूलाच लघवी करत असत. पण मी शहरात राहणारा, जरा लाजाळू त्यामुळे संकोच वाटायचा. आणि त्यात अंधाराची वैगरे अजिबात भीती नाही. पाहिलेल्या चित्रपटाचे गाणं गुणगुणत मी घरापासून काही अंतरावर असलेल्या मागच्या झाडीत गेलो. आणि लघवी करायला सुरुवात केली. आमच्या घराची दिशा अशी की घरामागे दूर पर्यत घरांच्या रांगा होत्या. रात्रीच्या अंधारात त्या घरातले बल्ब अगदी टीमटीमणारे काजव्यांसारखे भासायचे. ४००-५०० फुटांवर घरे एका बाजूला ती घरे आणि दुसऱ्या बाजूला नदीकडे एक आधारलेला रस्ता. कारण तेव्हा त्या रस्त्याला स्ट्रीट लाईट नव्हते. तो रस्ता अगदी नदीपर्यंत जायचा. माझ्या माहितीप्रमाणे तो रस्ता बहुधा नदीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरला जायचा कारण तिथूनच पुढे काही अंतरावर एक स्मशानभूमी होती. गावात एखादे मयत झाले की त्या रस्त्यावरून अंतयात्रा निघायची. त्या रस्त्याकडे पाहतच मी लघवी करत होतो.

तितक्यात मला त्या रस्त्यावरून कोणीतरी माझ्या दिशेने चालत येताना दिसले. सुरुवातीला वाटले की बराच वेळ त्या अंधाऱ्या रस्त्याकडे बघत असल्यामुळे मला भास होत असावा. पण नाही तिथून खरंच कोणीतरी चालत येत होत. ती मानव सदृश्य आकृती जस जशी जवळ येऊ लागली तसे मला जाणवू लागले की ती एक बाई आहे. नववधू वाटत होती, नव्वारी साडी, कपाळावर भल मोठ कुंकू जे मला लांबूनही नीट दिसत होत. केस मोकळे सोडले होते आणि असे वाटत होते की नुकताच नदीवरून स्नान करून आली असावी. तिचा गोरापान चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता, म्हणजे आजही मी पाहिला तरी लगेच ओळखेन. ती जस जशी माझ्या दिशेने येऊ लागली तसे मला हुंदके देत रडण्याचा आवाज येऊ लागला. मला जरा आश्चर्यच वाटलं कारण ती बाई रडत नव्हती, फक्त समोर बघून चालत होती. आणि तिथे आमच्या दोघांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. त्यामुळे तो रडण्याचा आवाज नक्की कुठून येतोय ते मी शोधू लागलो. मी तेव्हा लहान असल्यामुळे नक्की काय घडतंय हे कळत नव्हत, त्यात मी शहरात असायचो त्यामुळे मी अश्या गोष्टींपासून अनभिज्ञ होतो. तितक्यात मी भानावर आलो आणि जाणवले की रात्रीचा १ वाजून गेलाय. आणि इतक्या रात्री नदीवर कोण कशाला अंघोळीला जाईल. ही बाई नक्की कोण आहे, कुठे चालली आहे. 

मनात तर्क वितर्क सुरू झाले. कदाचित हिच्या नवऱ्याने हिला मारले असावे म्हणून अशी रात्री बाहेर पडली असेल. बघुया कोणाच्या घरी जातेय. तिच्या मागे जाण्याआधी मी घराकडे एकदा नजर टाकली तर भाऊ दिसला नाही. तसे मी पुन्हा त्या अंधाऱ्या रस्त्याकडे नजर फिरवली. आणि बघतो तर काय ती बाई कुठेही दिसली नाही. काही वेळापूर्वी मी जेव्हा तिला बघितले तेव्हा ती अश्या ठिकाणी होती जिथून घर ही बरेच लांब होते. मी तरीही त्या आजूबाजूच्या परिसरात ती कुठे दिसतेय का ते पाहू लागलो. आणि तितक्यात अचानक जाणवले की आपण एखादा अनैसर्गिक गोष्टीचा अनुभव ता घेतला नाही. मन अस्वस्थ झालं. अशी रात्री अपरात्री एखादी स्त्री आंघोळ करून बाहेर का फिरेल, आणि अवघ्या ५-७ सेकंदात दिसेनाशी कशी होईल. मला आता भीतीने दरदरून घाम फुटला. हातपाय लटपटू लागले. तसाच धडपडत पळत जाऊन नवनाथ भाऊच्या गोधडीत शिरून भीती ने त्याला घट्ट मिठी मारली. इतक्यात जणू कुठून तो बोका आला आणि लगेच उडी मारून आमच्या दोघांमध्ये आला. जो कधीच आमच्या मध्ये झोपत नसे. आणि तसे ही मला असे मांजर किंवा बोका अंथरुणात आलेला आवडत नाही. पण त्या रात्री मला तो सोबत आधार देऊन गेली. एक एक क्षण मला अगदी एका तासासारखा वाटू लागला. 

त्या गोधडी बाहेर डोकं काढायची ही हिम्मत होत नव्हती. सारखं वाटतं होत की मी बाहेर पाहिले आणि ती समोरच उभी दिसली तर..? याच विचारात ती संपूर्ण रात्र सरून गेली. सकाळी मला झोपेत थरथरत असल्याचे पाहून भावाने माझ्या कपाळावर हात ठेवत विचारले “काय रे.. काय झाले.. तुला एवढा ताप कसा काय भरलाय..?” त्याचे बोलणे ऐकून काकू काळजीपोटी घरातून बाहेर धावत आली. मी रात्रीचा सगळा प्रसंग तसाच थरथरत सांगितला. त्यावर ते हसू लागले आणि म्हणाले की तू स्वप्न पाहिले असशील. आमचे बोलणे सुरू असतानाच काका काकू ला म्हणाला “कशाला ग पोरांना रात्री बाहेर झोपू दिले, एक तर काल अमावस्या होती..” हे ऐकताच माझ्या मनात भीतीची अजुन एक लहर उमटून गेली. कारण काल जर अमावस्या होती तरीही त्या मिट्ट अंधारात त्या बाईचा चेहरा स्पष्ट कसा काय दिसला. माझी तब्येत अजूनच बिघडली.

जवळपास ३-४ दिवस तापाने फणफणलो. त्यानंतर बरेच दिवस सर्वांनी थट्टा केली. पण माझी आई मला ओळखून होती. ती घरी आल्यावर मला जवळ घेतले, माझ्यावर विश्वास ठेवला. आईच्या कुशीत आल्यावर एक दिलासा वाटल, सुरक्षित वाटू लागले. आणि मी हळु हळु या घटनेतून सवृ लागलो. या घटनेने माझे आयुष्य पार बदलून टाकले. गावाला गेल्यावर रात्री कधीही घराच्या मागे त्या झाडी जवळ जायची हिम्मत झाली नाही. मला आज ही त्या सुंदर स्त्रीचा चेहरा स्पष्टपणे आठवतो आणि ती भयाण अमावस्येची रात्र आठवते. तो नदीचा स्मशानाकडे जाणार रास्ता असा भयानक अनुभव देऊन कधीच वाटले नव्हते. 

Leave a Reply