हा जीवघेणा प्रसंग माझ्या सोबत ५ मार्च २०१८ च्या रात्री घडला होता.
मी एक बदली ड्रायव्हर असल्याने मला भाडे घेऊन कुठेही जावे लागायचे. त्या दिवशी मला साहेबांनी कॉल केला आणि एका गावातले भाडे आहे म्हणून सांगितले. आता मी जिथे होतो तिथून ते गाव बरेच लांब होते. दुपारी कळवल्यामुळे मी संध्याकाळी ४ वाजता निघालो. मी अर्ध्या रस्त्यात पोहोचलो होतो तितक्यात साहेबांचा पुन्हा फोन आला. ते म्हणाले की दुसऱ्या दिवशी अर्जंट भाडे आहे सकाळी ९ ला गाडी इथे हवी आहे. मी विचार केला की फक्त ड्रॉप करायचे आहे त्यामुळे रात्री पोहोचून जेवण वैगरे आटोपून लगेच निघालो तर पहाटे आरामात पोहोचता येईल.
पण त्या गावात मी रात्री १०.३० च्याच सुमारास पोहोचलो. ज्यांना सोडायला आलो होतो त्यांनी मला जेवण वैगरे दिले तसे मी सगळे आटोपून जायला निघालो. पण ते म्हणाले की तुम्ही एकडेच झोपा आणि पहाटे निघा. पण दुसऱ्या दिवशी भाडे असल्याने मला निघणे भाग होते. पण ते गृहस्थ काही ऐकत नव्हते. ते मला जाऊन द्यायला तयारच नव्हते. मी बदली ड्राइवर असल्याने मला १४-१५ तास ड्राइविंग करणे काही नवल नव्हते.
त्यांनी आग्रह धरला होता म्हणून मी शेवटी त्यांचेच ऐकून त्यांना म्हणालो की मी गाडी मध्येच झोपतो. तसे मी त्यांच्या बंगल्याच्या आवारात गाडी पार्क करून त्यातच झोपलो. पण बराच वेळ झाला तरी झोप लागत नव्हती. मला दुसऱ्या दिवशी भाडे असल्याने लवकर पोहोचणे भाग होते. म्हणून रात्री १.३० च्याच सुमारास गेट उघडून गाडी ढकलत हळूच बाहेर आणली. पुन्हा जाऊन गेट बंद केला. काही मिनिट थांबून पाहिलं की कोणी बाहेर येतंय का पण कोणाला कसली चाहूल लागली नाही हे कळताच मी सुसाट गाडी पळवत निघालो.
त्या गावात अगदी स्मशान शांतता पसरली होती. रस्ता बरा असल्याने मी गाडी वेगात घेत, जोरात गाणी लावून माझ्याच धुंदीत ड्रायव्हिंग करत होतो. पण अचानक गाडी चे इंजिन गरम होऊन काटा रेड वर गेला आणि गाडी बंद पडली. निघताना मी गाडी चेक केली होती आणि असे होणे शक्यच नव्हते तरी ही गाडी चे इंजिन गरम होऊन गाडी रस्ताच्या मधेच थांबली होती. विचार केला की इथेच थांबू थोड्या वेळ म्हणजे गाडी जरा थंड होईल. मी आळस देतच गाडीतून खाली उतरलो. मी नेहमी रात्री अप्रत्री भाडे घेऊन जात असतो त्यामुळे भीती वैगरे कधीच वाटत नसे.
पण त्या परिसरात एक वेगळीच शांतता जाणवत होती. गाडी बंद पडली होती त्या ठिकाणापासून साधारण २०० मिटर अंतरावर मला एक शेड दिसली. म्हणून मी असाच चालत त्या दिशेने गेलो. त्या शेड जवळ गेल्यावर दिसले की मागे अनेक थडगी आहेत. ते एक स्मशान होते. मी लगेच मागे वळलो आणि पुन्हा गाडी जवळ आलो. गाडीचे बोनेट उघडून कूल ट चेक केलं तर मला धक्काच बसला. कूल ट पूर्ण भरलेले होते. आता मात्र मला घाम फुटायला लागला होता कारण कुल ट फुल असताना गाडी गरम होऊन बंद पडणे शक्यच नव्हते.
मी पटकन बो नेट बंद करून गाडीत जाऊन बसलो. अजूनही काटा रेड वर च होता पण तरीही मी गाडी स्टार्ट केली. आश्चर्य म्हणजे गाडी एका सेल मध्ये स्टार्ट झाली. तितक्यात माझे लक्ष साईड मिरर मध्ये गेले. त्या अंधाऱ्या रस्त्यावरून कोणीतरी अतिशय वेगात माझ्या दिशेने धावत येत होते. माझी तर भीतीने गाळण च उडाली होती. मी निरखून पाहिले तसे मला दिसले की ते जे काही धावत येत होते त्याच्या हातात सुऱ्या सारखे भले मोठे हत्यार होते. मागून अतिशय विचित्र आवाज कानावर पडत होता.
मी क्षणाचाही विलंब न करता गाडी चालू केली आणि अतिशय वेगात पळवायला सुरुवात केली. तसे मागे जे धावत येत होते त्याचा वेगही वाढला. आणि त्याच्या हातातले सुऱ्या सारखे ते तीक्ष्ण हत्यार माझ्या गाडीवर भिरकावले. मी फक्त पुढे पाहत तशीच गाडी चालवत राहिलो. साधारण तासाभराने मी हायवे वर येऊन पोहोचलो. एका पेट्रोल पंपा जवळ गाडी थांबवली आणि उतरून मागे पाहिले. गाडीच्या मागच्या काचेच्या खालचा पत्रा फाटला होता. मी तशीच गाडी घेऊन निघालो. सकाळी ७ ला त्या गृहस्था चा फोन आला. मी फोन ऑफ करून सकाळी बरोबर ९ ला गाडी साहेबांकडे सुपूर्त केली आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला.
त्यांनी मला धीर देऊन दुसऱ्या ड्राइवर ला पाठवून दिले. २ दिवसांनी मला माझ्या साहेबांचा फोन आला. ते मला म्हणाले की त्या गृहस्था चा मला फोन आला होता. त्यांनी मला बरेच काही सांगितले. ते म्हणाले “तुमच्या ड्राइवर ला मी सांगितले होते की इतक्या रात्री जाऊ नकोस पण त्याने माझे अजिबात ऐकले नाही. त्याचे नशीब चांगले म्हणून तो वाचला”
त्या घटने नंतर मी भाडे घेऊन गाडी वर जाणे सोडून दिले. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.