आपल्या प्राचीन साहित्यात वेताळाची खूप वर्णने आहेत. भूतनाथ हे त्याचे एक पर्यायी नाव. रक्त मांस खाणारा, स्वभावाने रागीट आणि शस्त्र धारी असा त्याचा उल्लेख आढळतो. वेतोबा, बेतोबा, बेताळ, भूतनाथ, आग्या वेताळ अश्या वेगवेगळ्या नावानी तो ओळखला जातो. प्राचीन महाराष्ट्रातल्या ग्रंथांमध्ये “वेताळ पंचविशी” या नावाने कथासंग्रहाची नोंद सापडते. या कथा संग्रहात विक्रमसेन नावाच्या प्रतिष्ठित राजाला वेताळाने सांगितलेल्या २५ कथा आहेत. आपण ज्याला विक्रम – वेताळ च्या कथा म्हणतो त्या याच.
वेताळाची स्वारी पाहिल्याचा हा बहुतेक एकमेव भयानक अनुभव.
अनुभव – आदित्य रासकर
ही घटना साधारणतः १९७६ साली पुण्यातल्या मुंढवा या गावी माझ्या वडिलांसोबत घडली होती. त्यावेळी माझे वडील १६ वर्षांचे होते. त्याकाळी गाव खूप कमी वस्तीचे होते. मोजकी १०-१५ घर आणि नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार शेती. आमचेही शेत घरापासून साधारण १०-१५ मिनिटांवर होते. आणि शेताजवळ एक सामान्य विहीर होती. त्यातून गावातले शेतकरी आप आपल्या शेताला पाणी देत असत. त्या विहिरीला बकुळीची विहीर असे नाव होते. याबद्दल सांगणे महत्त्वाचे कारण ती विहीर ४०० वर्ष जुनी होती. असे ऐकिवात आहे की त्या विहिरीत शिवकालीन दरवाजा आहे आणि पेशव्यांचे घोडे तिथे पूर्वी पाणी पिण्यासाठी येत असत.
वडिलांचा आणि आजोबांचा शेताला पाणी द्यायला जायचा रोजचा दिनक्रम होता. त्याकाळी शेतीच्या पंपासाठी विजेचा पुरवठा फक्त रात्रीच होत असे. त्या रात्री ही ते दोघे जेवण आटोपुन नेहमी प्रमाणे ११ च्या सुमारास शेतीला पाणी द्यायला घरातून बाहेर पडले. बाहेर गडद अंधार दाटला होता. कंदिलाच्या प्रकाशात वाट काढत ते शेतात येऊन पोहोचले. शेताला पाणी देई पर्यंत दीड वाजला. आजोबा वडिलांना म्हणाले ” तू मोटार बंद करून घरी ये मी पुढे निघतो.” एवढे बोलून आजोबा घराच्या वाटेने चालत निघून गेले. वडील पंप बंद करण्यासाठी विहिरी जवळ आले. पंप विहिरीत साधारण १० फूट आत बसवला होता आणि बाजूला दगडी थारोळे होते. वडील थोडे खाली उतरले आणि पंप बंद करून वर यायला वळले.
त्यांची नजर वर गेली आणि समोरचे दृश्य पाहून काळीज भीतीने धडधडू लागले. विहिरीच्या कठड्यावर दोन पुसट श्या पांढरट आकृत्या उभ्या दिसल्या. सुरुवातीला काही कळले नाही पण जागेवरच स्तब्ध होऊन ते निरखून पाहू लागले. त्या दोन्ही आकृत्या विहिरीच्या कठड्यावर उभ्या असल्या सारखे वाटत असले तरी कठड्यापासून बऱ्याच वर तरंगत होत्या. त्यांच्या वरचा भाग माणसाच्या शरिरासारखा असला तरी कमरेपासून खालचा भाग जणू धुरासारखा भासत होता. पाय नव्हतेच त्या आकृत्याना. कसलीही हालचाल न करता ते समोरचे दृश्य पाहत होते. तितक्यात त्या आकृत्यानी विहिरीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे येर झाऱ्या मारायला सुरुवात केली. आपण काय पाहतोय हे त्यांना कळत नव्हत. जीव मुठीत धरून ते सगळे पाहत होते. बघता बघता आणखी दोन आकृत्या त्यांच्यात सामील झाल्या आणि त्यांच्या सोबत फिरू लागल्या.
आता मात्र त्यांची भीतीने गाळण उडाली. अंगाला दरदरून घाम फुटला. आता आपले काही खरे नाही या भयाण प्रसंगातून आपले सुटणे अशक्य आहे असे त्यांना वाटू लागले. ते दबकुन दगडी थारोळ्याच्या मागे लपून बसले आणि घडत असलेला प्रकार धडधडत्या हृदयाने पाहू लागले. अचानक त्यांचे लक्ष दूरवरून येणाऱ्या उजेडाकडे गेले तसे ते बाहेर डोकावून पाहू लागले. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. समोरून तब्बल ४०-५० आकृत्या हातात मशाली घेऊन त्याच्या दिशेने सरकत येत होत्या. मध्यभागी एक तेजःपुंज आकृती घोड्यावर बसलेली होती. सोनेरी मुकुट, भरदार मिश्या आणि अतिशय तेजस्वी शरीर. ती स्वारी विहिरी जवळून जाऊ लागली तश्या त्या ४ आकृत्या त्यांच्यात सामील झाल्या. हळू हळू पुढे जात ती स्वारी विहिरीपासुन ५० मीटर वर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली वळली. बघता बघता मशालीचा प्रकाश अंधुक होत गेला आणि ते दृश्य गडद अंधारात कुठेतरी दिसेनासे झाले..
माझ्या वडिलांनी सरळ घराकडे धाव घेतली. ते प्रचंड घाबरले होते. धावत जात असताना २-३ वेळा धडपडून पडले पण त्यांना कसे ही करून आधी घर गाठायचे होते. घरी आल्यावर पाहिले तर अडीच वाजून गेले होते. त्यांच्या डोळ्यासमोरून ते दृश्य काही केल्या जात नव्हते. कोणाला काहीही न बोलता ते सरळ झोपून गेले. सकाळी जाग आली तेव्हा त्यांचे शरीर तापाने फणफणत होते. त्यांना नंतर कळले की त्या रात्री अमावस्या होती. घडलेला प्रकार त्यांनी आजी आजोबा आणि काही जाणत्या लोकांना सांगितला. तेव्हा अस समजल की त्यांनी जे पाहिलं ते दुसरे तिसरे काही नसून वेताळाची स्वारी होती. घोड्यावर बसलेली ती तेजःपुंज आकृती म्हणजे भुतांचा राजा वेताळ होता. पूर्वीच्या लोकांनी अमावस्येच्या रात्री निघणारी वेताळ ची स्वारी पाहिल्याचे ऐकिवात आहे.
ही घटना माझे वडील अजूनही सांगतात तेव्हा अंगावर भीतीने शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. ते दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर अगदी जसेच्या तसे आहे. अजूनही ती विहीर आणि चिंचेचे झाड तिथे आहे. तिथे गेल्यावर तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो.
Movie sarkhi story aahe.