लेखक – प्रथमेश बोत्रे

मी, माझी बायको राधिका आणि माझे मित्र व त्यांची कुटुंबे अशी जवळपास पंधरा ते वीस जण पावसाळ्यात पिकनिकला जायला निघालो.

प्रवास खुप सुखकर झाला. आम्ही ठरलेल्या हॉटेलवर पोहोचलो, सगळेच फ्रेश होऊन बाहेर फेरफटका मारायला निघालो. तिथले वातावरण, निसर्ग अद्भुत होता, आमच हॉटेलही जंगलाच्या जवळपास होते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात छोटे छोटे धबधबे, नद्या, काही वन्य प्राणी दिसायचे. पण पावसाळ्याचे दिवस त्यातही आम्ही जिथे आलो होतो तिथे तर खुपच पाऊस पडायचा. आम्ही सगळे फिरत असताना ही अचानक खुप जोरात पाऊस आला. माझे सगळे मित्र त्याच्या कुटुंबांना घेऊन हॉटेलकडे जाऊ लागले. पण माझ्या बायकोला मात्र पावसात भिजायची खुप हौस म्हणून तिने मलाही पावसात थोड्यावेळ थांबूया असा आग्रह केला, मी सुद्धा तिला नाही म्हणु शकलो नाही. आम्ही हॉटेल जवळच्या एका टेकडीवर चालत गेलो. राधिका पावसात मनसोक्त भिजली आणि मी मात्र फक्त तिलाच पाहत होतो. तिचे भिजलेले, ओले चिंब झालेले केस तिला अजूनच आकर्षित बनवत होते. तिच्या सौंदर्यात अजुन भर घालत होते. आम्ही बराच वेळ त्या टेकडीवर फिरलो, पावसाचा मनसोक्त आनंद घेतला. संध्याकाळ होत आली होती. 

माझे मित्र हॉटेलमध्ये आपापल्या कुटुंबासोबत गरम गरम चहा आणि कांदा भजीचा आस्वाद घेत होते. बराच वेळ झाला आम्ही त्याच टेकडीवरच्या भागात फिरत होतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की मी आणि माझी बायको हॉटेलवर आलोच नाही. त्यांनी आमचा फोन ट्राय केला पण तो सुद्धा जंगलात रेंज नसल्यामुळे लागत नव्हता. बराच प्रयत्न केल्यानंतर मात्र त्यांनी आमच्या बद्दल हॉटेलच्या स्टाफ ला सांगितले. हॉटेलचा स्टाफ ही चिंतेत पडला, ते म्हणु लागले, “इथे संध्याकाळी सहा नंतर बाहेर पडणे धोकादायक असते”. त्यांना वाटले की जंगली श्र्वापंदांची भीती असेल म्हणून स्टाफ असे सांगतोय. मित्रांनी विनंती केल्यानंतर हॉटेलचा स्टाफ लगेच आम्हाला शोधायला बाहेर पडला. पण तेवढ्यात आम्ही हॉटेलच्या दारात उभे ठाकलो. आम्हाला बघताच माझे मित्र मला शिव्या घालू लागले. त्यांच्या बोलण्या मागे काळजी च होती. इतक्यावेळ कुठे होता? असे प्रश्न विचारू लागेल. आम्ही मात्र पावसात भिजत मजा करत जरा फिरून आलो असे उत्तर देऊन विषय तिथेच संपवला.

सगळे नाश्ता करत असल्यामुळे आम्ही तिथेच थांबलो. हॉटेलच्या स्टाफ मधल्या एका वयस्कर व्यक्तीने आम्हाला टॉवेल आणून दिला. आणि तो आम्हाला म्हणाला, “अहो साहेब, हे तुमचे शहर नाही, इथे संध्याकाळी सहा नंतर बाहेर पडायचे नसते”. तसे राधिकाने पटकन विचारले “का हो काका? असे का बोलत आहात?”. त्यावर ते म्हणाले, “जाऊ द्या हो, तुम्ही शहरातली माणस तुम्हाला आम्ही काही सांगितले तर ती चेष्टा वाटेल”. पण मी त्यांना म्हणालो, “अहो काका सांगा ना, काय कारण आहे आम्ही नाही हसणार तुमच्यावर”. खुप विनंती केल्यावर ते आम्हाला म्हणाले की तुम्ही आधी नाश्ता करून घ्या.. मग तुम्हाला सगळे सविस्तर सांगतो. आम्हाला खूप उस्तुकता लागली होती की असे काय असेल इथे.. आम्ही पटापट नाश्ता उरकून घेतला आणि त्यांच्या जवळ गेलो. ते आम्हाला हॉटेल मध्ये एका बाजूला घेऊन गेले आणि सांगू लागले.. मी इथेच हॉटेल जवळ पण जरा जगलाच्या आतल्या भागात राहतो. तिथेच लहानाचा मोठा झालो. मी लहान असताना या परिसरात खूप विचित्र प्रकार घडायचे. 

गावातल्या तरुण मुली अचानक रात्री गायब व्हायच्या. आणि दोन तीन दिवसानंतर त्यांचे प्रेत गावाच्या वेशीवर सापडायचे. हे सगळे कोण करत होत कळायचे नाही. पण भयानक गोष्ट म्हणजे कधी त्या प्रेताचे डोळे नसायचे तर कधी नाक, ओठ कापलेले असायचे. कधी कधी तर हातापायाची बोट कापलेली असायची. दिवसेंदिवस असा प्रकार गावात खूप वाढत चालला होता. तेव्हा गावातल्या एका म्हाताऱ्या माणसाने सांगितले की गावा बाहेरच्या टेकडीवर एक बाई राहते. ती चेटूक करते. जवळपास वयाची पंच्याणवी ओलांडली असेल तिने. तिला गूढ विद्या ज्ञात आहेत. तीच हे सगळे करत असणार. त्या वृद्ध माणसाचे असे बोलणे ऐकल्यावर गावच्या सरपंचांनी लगेच हाताशी पंधरा वीस गाडी घेऊन टेकडी वर जायचे ठरवले. गावात एव्हाना भीती चे वातावरण पसरले होते. तिला गूढ विद्या येते हे ऐकल्यामुळे सगळे गावकरी घाबरले होते. पण आपण काही केले नाही तर गावातल्या तरुण मुली अश्याच बळी पडत राहतील असा विचार करून सगळ्यांनी तिथे जायचे ठरवले. 

२०-२५ गावकऱ्यांचा लावजमा तयारीनिशी तिथे जायला निघाला. रस्त्यात ते त्या म्हातारी बद्दल चर्चा करत होते. “कशी असेल रे ती बाई..?” एकाने प्रश्न केला. तसे दुसरा उत्तरला “मला वाटत अगदीच थकलेली थेरडी असणार, आपण जाऊन तिला दम देऊन येऊ मग ती आपल्या वाट्याला परत जाणार नाही”. बोलता बोलता ते तिच्या टेकडीवरच्या घराजवळ पोहोचले.. घर अगदी पडीक होते, घराच्या दारावर बरीच धूळ आणि जाळोखे साचले होते. आतमधे एकच दिवा मंद प्रकाश पसरवत होता. गावच्या सरपंचांनी तिला हाक मारली “म्हातारे ए! म्हातारे बाहेर येते का, तुला काळी जादू, चेटूक करायची लै हौस आहे ना? थांब आज तुला चांगलीच अद्दल घडवतो”. एवढे बोलुन सरपंच थांबले, पण आतुन काहीच प्रतिसाद आला नाही. आपल्याला म्हातारी काहीच उत्तर देत नाही हे कळल्यावर तर सरपंच फारच चिडले, “ए थेरडे मी तीन मोजायच्या आत बाहेर ये नाहीतर तुझ्या घरासोबत तुलाही जाळून टाकीन”.

असे म्हंटल्यावर आत हालचाल जाणवली आणि पैंजणाचा आवाज करत ती बाई बाहेर आली. तिला पाहून सगळ्यानी आपल्या भुवया उंचावल्या.

कारण ती बाई नव्वदीची वाटतच नव्हती उलट ती तर एखाद्या तिशीतल्या सुंदर तरुणी सारखी दिसत होती. याचाच अर्थ ती बाई गावातल्या मुलींचा बळी देऊन त्याच्या सौंदर्याचा सुंदर भाग कापून स्वतःकडे घ्यायची, आणि मग गूढ विद्या वापरून तो भाग आपल्या शरीरावर लावायची. त्यामुळेच ती इतकी वयस्कर असली तरी एखाद्या सुंदर तरुणी सारखी दिसत होती. गावकर्‍यांना खात्री पटली ह्या सगळ्यामागे हीच बाई आहे, तसे गावकर्‍यांनी तिला जाब विचारायला सुरुवात केली पण त्या बाईने मात्र नकार दिला. मी असे केलेच नाही, तुम्हाला गैरसमज झालाय असे म्हणत ती खोटं बोलू लागली. गावात घडणाऱ्या गोष्टी तीच करतेय याचा त्यांच्या कडे कोणताही पुरावा नव्हता. म्हणुन ते तिला फक्त धमकावून नाईलाजाने आप आपल्या घरी परतले. पुढचे काही दिवस सुरळीत गेले. पण त्या रात्री ती गावात आली आणि एका मुलीला ओढून नेताना गावकऱ्यांनी तिला पकडले. मग काय.. संतापाच्या, रागाच्या भरात तिला सगळ्यांनी धरून एका सुकलेल्या झाडाला बांधले आणि ते झाड पेटवले. 

त्या सुकलेल्या झाडाने पेट घेतला तसे तिचे ही अंग ही भाजू लागले, ती वेदनेने कळवळू लागली, ओरडू लागली. गावकऱ्यांना शिव्या, शाप देऊ लागली. आख्खे गाव तिला जळताना पाहत होते. तिची शुद्ध हरपण्या आधी ती अंगातली सगळी शक्ती एकवटून जोरात ओरडली “मी सोडणार नाही कोणाला.. जो या टेकडीवर माझ्या हद्दीत येईल त्याला मी संपवून टाकेन..”. इतके बोलून तिने जीव सोडला. त्यांनतर गावकऱ्यांनी त्या जागेवर जायला कायमची बंदी घातली.. त्यांचे असे हे बोलणे ऐकून आम्ही दोघेही सुन्न झालो होतो. ते पुढे म्हणाले ” हेच कारण होते साहेब, ह्यामुळेच आम्ही तुम्हाला शोधायला निघालेलो, असो आता खूप उशीर झालाय तुम्ही सगळ्यांनी जेवून झोपा, माझी ड्यूटी संपली आहे मी माझ्या घराकडे निघतोय”. आम्ही ठीक आहे म्हणत त्यांचा निरोप घेतला. ते गेल्यावर आम्ही मित्र एकमेकाकडे बघून हसु लागलो. आम्ही शहरात राहत असल्यामुळे भूत प्रेत ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता. हसता हसता माझे लक्ष राधिकाकडे गेले तिला मात्र घाम फुटला होता, कपाळावरचा घाम टिपत तिने माझा हाथ गच्च धरला. मी तिला धीर देत म्हणालो, भुत वगैरे अस काही नसत, काळजी करू नकोस.. तिने होकारार्थी मान हलवली.

खरेतर आम्ही दोघेही संध्याकाळी त्याच टेकडीवरच फिरायला गेलो होतो जिथे तिचे घर होते. सर्वांची जेवणं झाली, सगळे झोपायला रूमवर निघून गेले. आम्ही सुद्धा आमच्या रुमवर आलो. राधिका अगदी शांत होती, नीट जेवलीही नव्हती. मी तिला विचारले, “काय गं! एवढी गप्प का? असा चेहरा पाडून का बसली आहेस?”..

माझ्याकडे बघुन ती ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, “आपण त्या टेकडीवरच्या घरात जाऊन काही चुक तर केली नाही ना?”

त्यावर मी म्हणालो, “चुक? कसली चुक? तु पण या फालतु गोष्टींवर विश्वास ठेवतेस, भूत वैगरे अस काहीच नसते. त्या काकांनी ऐकीव कथा सांगितली आपल्याला.. त्यावर किती विश्वास ठेवायचा किती नाही हे आपल्यावर आहे. ” माझे असे बोलणे ऐकुन तिला धीर आला, आणि ती निवांत झोपी गेली, मी मात्र थोडावेळ जागाच होतो. रूमच्या बाल्कनीत जाऊन खिशातून एक सिगरेट काढली आणि त्याचे झुरके घेत त्या वृद्ध माणसाने आम्हाला सांगितलेली गोष्ट खरी असेल का ह्याचा विचार करु लागलो. बाहेर मिट्ट काळोख पडला होता. वातावरण तस शांत होत पण त्यात रातकिड्यांचा आवाज मात्र ती शांतता भंग करत होता. सगळीकडे थंड गार हवा पसरली होती, मी पटकन सिगरेट संपवली आणि झोपायला आत गेलो. दिवसभराचा थकवा असल्याने मला काही मिनिटांत गाढ झोप लागली. रात्री साधारण दोन-अडीच च्या सुमारास मला हलकी जाग आली. कोणाचा तरी आकडे पुटपुटण्याचा आवाज येत होता, “अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा”. मी डोळे उघडून बघायचा प्रयत्न केला पण डोळ्यावर भयंकर झोप होती. राधिका पैसे मोजत असेल असे मला वाटले. 

मी तिच्यावर ओरडलो, “काय ग.. तुला अक्कल आहे का? ही वेळ आहे का नोटा मोजण्याची, झोप गपचुप तुझ्यामुळे झोपमोड झाली माझी”. माझ्या ओरडण्यानंतर तो आकडे मोजण्याचा आवाज हळु हळू कमी होत बंद झाला. मी पुन्हा शांत झोपलो, साधारण अर्ध्या एक तासाने पुन्हा जाग आली, पुन्हा आकडे मोजण्याचा आवाज येत होता यावेळी मात्र आकडे खुप पुढे गेले होते,” एक लाख एकशेवीस, एक लाख एकशे एकवीस, एक लाख एकशे बावीस “. ह्यावेळी मात्र माझ्या मनात शंका आली की आम्ही एवढे पैसे कॅश मध्ये घेऊन आलोच नाही ट्रीपला. मग ही राधिका एवढे कोणाचे पैसे मोजत आहे?. मी डोळे चोळत उठू लागलो पण माझे अंग जड झाले होते, हातापायातली ताकदच निघून गेली होती. शरीराची डावी बाजू पूर्णपणे निकामी झाल्यासारखी वाटत होती. उठायची ताकद नसल्यामुळे मी जागेवरच पडून राहिलो. सकाळी जाग आली तेव्हा तोच कालचा स्टाफ मधला वृद्ध इसम मला जोरजोरात हलवून जागे करत होता. त्यांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर मला जाग आली. मी त्याला म्हणालो, “काय झाले काका?”

त्यावर तो म्हणाला, “साहेब खर सांगा काल तुम्ही आणि मॅडम त्या गावाबाहेरच्या टेकडीवर गेलेलात का?” हा असा प्रश्‍न ऐकुन माझी तर झोपच उडाली. मी कपाळावर आठ्या आणतच म्हणालो, “हो, पण काय झाले?” त्याने मला हात धरून अंथरुणातून उठवले आणि मला ओढतच रूमच्या बाहेर घेऊन गेला. आमच्या रूमच्या बाहेर पोलिस आले होते. मला काही कळेनासे झाले. मी जसा माझ्या रूम मधून बाहेर आलो तसे माझे मित्र आणि त्यांच्या बायका मला बघून रडू लागल्या. काय झालंय ते मी समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. तितक्यात खाली जमिनीवर एक प्रेत पांढऱ्या शुभ्र कपड्याने झाकून झाकून ठेवलेले दिसले. मी त्या प्रेताच्या जवळ गेलो तसे एका पोलिस हवालदाराने त्या प्रेताच्या चेहर्‍यावरचा सफेद कपडा बाजूला केला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती माझी बायको राधिका होती. मी तिला मिठी मारून रडू लागलो. तेवढ्यात माझे लक्ष तिच्या केसांवर गेले, कोणीतरी तिची केसं ओरबाडून काढली होती, डोक्यावर एकही केस शिल्लक ठेवला नव्हता.

मला त्या हॉटेल स्टाफ ने सांगितलेली गोष्ट आठवली आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.. तो म्हणाला होता, ती मांत्रिक बाई गावातल्या तरुण मुलींना मारून त्यांच्या सौंदर्याचा सुंदर भाग स्वताजवळ ठेवायची. कदाचित काल पावसात भिजलेले राधिकाचे केस फक्त मलाच आवडले नव्हते, माझ्या व्यतिरिक्त अजुन एका व्यक्तीचा त्या सुंदर केसांवर डोळा होता. ह्या धक्क्यातून सावरत नाही तोच काल रात्री घडलेला प्रसंग आठवला आणि अजून एक धक्का बसला. मला आठवले की रात्री रूममध्ये आकडे मोजायचा आवाज येत होता ज्याला मी राधिकाचा आवाज समजत होतो तो तिचा आवाज नव्हता तर.. त्या मांत्रिक बाईचा आत्मा राधिकाचे एकएक केस ओरबाडून काढताना आकडे मोजत होतो. मी केलेली एकेक चुक मला डोळ्यासमोर दिसत होती, पण आता ह्या सगळ्याचा काहीच उपयोग नव्हता, माझी राधिका मला कायमची सोडून गेली होती.. आता उरल्या होत्या त्या फक्त तिच्या आठवणी आणि पश्चाताप..

Leave a Reply