लेखक – सिद्धार्थ पुंडगे

समीर नुकताच एका जेवणाची ऑर्डर देऊन आपल्या गाडी जवळ आला. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होताच. गाडी चालू करणार तोच त्याच्या फोन वर पुन्हा एक मेसेज आला “युअर लास्ट ऑर्डर”. बराच उशीर झाल्याने तो आधीच वैतागला होता. पण जर ऑर्डर स्वीकारली नाही तर त्याचे पॉइंट्स कमी होतील या चिंतेने त्याने ती ऑर्डर स्वीकारली. मेसेज ओपन केला. एका हॉटेल चे नाव होते आणि डिलिवरी चा पत्ता शहराच्या बाहेरचा होता. नाईलाजाने तो हॉटेल च्या दिशेने निघाला. पावसाचा जोर वाढतच चालला होता. 

काही वेळात तो हॉटेल जवळ पोहोचला. तिथून पार्सल घेतले. त्याला ही ऑर्डर लवकरात लवकर पूर्ण करायची होती. त्याच विचारात त्याने मोबाईल काढला आणि पुन्हा एकदा डिलिवरी चा पत्ता पहिला. शहराबाहेरील पत्ता असल्यामुळे कुठून कसे जायचे, कोणत्या रस्त्याने गेलो तर लवकर पोहोचता येईल याचे गणित मांडणे सुरू केले आणि वेळ न दवडता वाटेला लागला. मनात असंख्य विचार चालू होते. दिवस भराच्या थकव्या मुळे कधी एकदा ही लास्ट डिलिवरी करून घरी पोहोचतो असे झाले होते.

बऱ्याच वेळा नंतर तो दिलेल्या पत्त्यावर येऊन पोहोचला. त्या दिवशी पावसाने कहरच केला होता. तो काही थांबायचे नाव घेत नव्हता. त्यात भर म्हणून त्या परिसरातील लाईट ही गेली होती. तो एका झाडा खाली आडोसा म्हणून उभा राहिला आणि आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना याची खात्री करू लागला. तितक्यात कडकडणाऱ्या विजेच्या प्रकाशात समोरचा बंगला दृष्टीस पडला. त्या बंगल्यात च त्याला डिलिवरी द्यायची होती. 

रस्ता ओलांडत त्या भकास दिसणाऱ्या बंगल्याकडे चालत जात असताना तो आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागला. तिथे कोणतीही वस्ती नव्हती. अगदी निर्मनुष्य परिसर. दुरून कुठून तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर येत होता. त्यात विजेचा कडकडाट. ते वातावरण कोणत्याही एकट्या माणसाच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी पुरेसे होते. बंगल्याचे गेट आत ढकलून तो दारा जवळ येऊन पोहोचला आणि बेल वाजवली. 

काही मिनिट वाट पहिली पण कोणीही दार उघडले नाही. तसे त्याने पुन्हा बेल वाजवली. पण या वेळीही काहीच प्रतिसाद आला नाही. म्हणून वैतागून त्याने दार वाजवले. पण पुन्हा तेच. शेवटी फेरी फुकट गेली असे समजून मागे वळला आणि मागून एक हाक ऐकू आली “समीर थांब”. तसे झटकन थांबून त्याने मागे वळून पाहिले. बंगल्याचे दार उघडे होते पण आत कोणी दिसत नव्हते. 

तो पुन्हा दाराकडे जायला निघाला तसे कोणी तरी आत येण्याची विनंती केली “आत या..!”. त्याच्या मनात अनेक प्रश्नांनी घर करायला सुरुवात केली होती. पण तरीही हिम्मत एकवटून तो आत शिरला तसे अतिशय घाणेरडा उग्र वास येऊ लागला. मांस सडण्याचा कुबट घाण वास. लाईट नसल्यामुळे काही दिसायला मार्ग नव्हता. कोपऱ्यात एक दिवा त्या मिट्ट अंधाराला दूर सारण्याचा प्रयत्न करत होता. पण तो असून नसल्यासारखा भासत होता. 

तो काही विचारणार तितक्यात त्याला जाणवले की आपले नाव माहीत नसताना ही आपल्या नावाने हाक कोणी मारली. तितक्यात आतल्या खोलीतून एक बाई बाहेर आली. तिचा चेहरा काही नीट दिसत नव्हता. तो काही बोलणार तितक्यात ती म्हणाली “साहेब पार्सल घेऊन पैसे देतील, थोड्या वेळ थांबा”. तसे हो म्हणत खिडकीबाहेर दिसणाऱ्या मुसळधार पावसाच्या सरी पाहत तो शांत बसून राहिला. तसे पुन्हा एकदा विजेचा कडकडाट झाला आणि काही क्षणापूर्वी पडलेल्या विजेच्या प्रकाशात समोर चे दृश्य दिसले तशी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 

समोर काही स्ट्रेचर होती आणि प्रत्येकावर माणसांची अर्धवट फाडलेली शरीर. आपण काय पाहतोय हे त्याला उमगत नव्हते. त्याचे काळीज भीती ने धडधडू लागले होते. तो दचकून काही पावले मागे सरकला आणि तितक्यात पुन्हा एकदा वीज पडून कडकडाट झाला. या वेळी त्याने त्या बाईला पाहिले. ती तिथेच अंधाऱ्या कोपऱ्यात उभी राहून समीर ला एक टक पाहत होती. तिची क्रूर नजर पाहून त्याला हृदय विकाराचा झटकाच यायचा बाकी राहिला होता. 

काही समजायच्या आत कसलीशी चाहूल जाणवली. आतल्या खोलीतून कोणीतरी चालत बाहेर येत होत. आता मात्र समीरची सहनशक्ती संपली होती. होती नव्हती हिम्मत एकवटून त्याने दरवाज्याकडे धाव घेतली. पण काही क्षणापुर्वी जिथून तो आता आला तिथे दरवाजा च नव्हता. वेगात धावत आल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे तो जोरात भिंतीवर आदळला. त्याच्या डोक्यावर जबर मार बसला आणि त्याची शुध्द हरपू लागली. समोरील दृश्य धूसर होत असतानाच त्याने मागे वळून पाहिले तर तिथे दोन आकृत्या त्याच्या बेशुध्द होण्याची वाट पाहत होत्या..

डोक्यावर बसलेल्या जबर मारामुळे समीर ची शुध्द हरपु लागली पण डोळ्या समोर अंधार पसरण्या ऐवजी त्याच्या समोर एक दृश्य तयार होऊ लागलं. सुरुवातीला जरी ते धुरकट वाटत असलं तरी हळू हळू ते दृश्य गडद होत गेलं. जशी एखाद्या सिनेमाची चित्रफीत च पाहतोय. आजू बाजूचा परिसर ओळखीचा वाटत नव्हता पण समोर काही लोक उभे होते. कोणा एका व्यक्तीला शुभेच्छा देत होते. जसे एखादा एक छोटासा सत्कार सोहळा चालूच होता. तो जरी सगळे पाहू शकत असला तरी त्याला आपल्या ठिकाण हून जराही हलता येत नव्हते. त्याने हात पाय हलवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्या शरिरावर त्याचा ताबा नव्हता. बराच वेळ प्रयत्न केल्या नंतर त्याने तो अट्टाहास सोडून दिला आणि समोर घडत असलेले ते दृश्य पाहू लागला.

त्याने आजू बाजूचा परिसर नीट पाहायला सुरुवात केली. एखादे हॉस्पिटल असल्या सारखे जाणवत होते. कोण्या एका डॉक्टर चा सत्कार होत होता. लोक त्यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करत होते. त्यातल्या एका पुष्प गूच्छावर “पोस्ट पोर्तम स्पेशालिस्ट” असे लेबल लावले होते. त्यांच्याकडे पाहून असे वाटतं होते की आपल्या डॉक्टर कीची कारकीर्द संपुवून ते निवृत्त होत आहेत. पण त्याच्या चेहऱ्यावर हवा तसा आनंद नव्हता. काही वेळात सगळे तिथून जाऊ लागले पण समीर तिथे असण्याची त्यांना कसलीच चाहूल लागत नव्हती. समीर ला काहीच उमगत नव्हते की त्याच्या सोबत हे नक्की काय घडतंय. काही कळण्याच्या आत झटकन त्याच्या समोरचे दृश्य बदलले. 

आता तो एका घरात होता. पुन्हा त्याच अवस्थेत. ना हलू शकत होता ना काही बोलू शकत होता. बराच वेळ काही घडले नाही. आणि अचानक दारावरची बेल वाजली. तसे आतल्या खोलीतून एक बाई बाहेर आली. आणि तिने दार उघडले. दारात अगदी त्याच्या सारखाच एक डिलिवरी बॉय हातात पार्सल घेऊन उभा होता. ती बाई त्याला म्हणाली “साहेब पार्सल घेऊन पैसे देतील, थोड्या वेळ थांबा”. काही वेळात आतल्या खोलीतून एक व्यक्ती बाहेर आला. तो व्यक्ती म्हणजे तेच डॉक्टर होते. बहुतेक उशीर झाल्यामुळे ते त्याला ओरडू लागले. समीर च्या मनातली चलबिचल क्षणोक्षणी वाढत होती. त्यांचे ओरडून झाल्यावर त्यांनी अतिशय वेगात दरवाजा बंद करत आदळला. आणि तावातावाने आतल्या खोलीत निघून गेले. तसे पुढच्या क्षणी काही तरी पडल्याचा आवाज आला. 

डॉकटर पुन्हा बाहेर धावत आले आणि दरवाजा उघडला. तो डिलिवरी बॉय दारात पाय घसरून पडला होता. डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्याला उचलून घरात आणले आणि त्याच्या वर उपचार सुरू केले. त्याच्या जखमेवर मलमपट्टी करण्याऐवजी नकळत पणे त्यांनी एक धारधार सुरा उचलला आणि त्याचे शरीर चिरायला सुरुवात केली. बघता बघता त्यांनी संपूर्ण शरीराची चिरफाड केली. त्यांना जाणवलं तसे काही क्षणासाठी ते दचकले आणि झटकन मागे सरकले. पण त्यांना भान येई पर्यंत बराच उशीर झाला होता.

त्यांना कळून चुकले होते की त्यांच्या हातून एक खून झालाय. ते त्या पोस्ट मोर्तम केलेल्या शरीराकडे एक टक बघत राहिले आणि बघता बघता हळू हळू त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटू लागले. त्यांना घडलेल्या चुकीचा पश्चात्ताप नव्हता. उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे हास्य दिसत होते. त्यांना जणू आपले नेहमीचे काम करत जगण्याचा एक पाशवी मार्गच सापडला होता.

समीर हे सगळे दृश्य अगदी धडधडत्या काळ जाने तिथेच उभे राहून पाहत होता. काही कळण्याच्या आत त्याच्या नजरे समोरचे दृश्य पुन्हा बदलले. पुन्हा तो त्याच घरात होता. तीच अवस्था. पण या वेळेस त्याने पाहिले की घराच्या पायरीवर ते ग्रीस सारखा एखादा चिकट पदार्थ लावत होते. ते झाल्यावर पुन्हा आतल्या खोलीत निघून गेले. पुन्हा दारावरची बेल वाजली. अगदी सगळे काही तसेच घडत होते. पण या वेळेस चा डिलिवरी बॉय वेगळा होता. तो ही तसाच पडला, त्याला ही आत आणले पण उपचार करण्या ऐवजी त्याचे ही बेशुधा अवस्थेत पोस्ट मॉर्तम झालं. 

समीर सगळे पाहू शकत होता पण हतबल असल्या कारणाने काहीच करू शकत नव्हता. त्याने त्याच्या डोळ्या देखत दोन जिवंत माणसांचे पोस्ट मॉर्टम पाहिले होते. पुन्हा तेच घडू लागले. एखाद्या स्वप्ना सारखे दिवस आणि रात्र एका क्षणात बदलत होते. बहुतेक काळ त्याच्या साठी त्याला काही दाखवण्यासाठी अगदी वेगात पुढे सरकत होता. पुन्हा दारा वरची बेल वाजली. आतल्या खोलीतून डॉक्टर बाहेर आले आणि दार उघडले. समोरच्या व्यक्तीला पाहून समीरच्या सर्वांगात जणू मुंग्यांच वारुळच उठलं. मेंदूला झिणझिण्या येऊ लागल्या. त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वास च बसत नव्हता. कारण दारात तोच उभा होता. समीर स्वतःलाच पाहत होता. पुढे काय घडणार हे त्याला माहीत होतं.

त्याला आता गोष्टीचा उलगडा झाला होता. या नंतर त्याचे पोस्ट मॉर्टम होणार होते. हा घटना क्रम गेले कित्येक वर्ष तो रोज पाहत होता आणि काळाच्या ओघात त्याला या सगळ्याचा विसर पडायचा. नियती ही इतकी क्रूर की त्याला सगळे आठवून देण्याचा प्रयत्न करण्या साठी हा घटनाक्रम पुन्हा पुन्हा दाखवायची. गेले अनेक वर्ष त्याचा आत्मा त्याच घरात अडकून आहे आणि अजूनही हाच घटना क्रम पाहत आहे. 

Leave a Reply