अनुभव – प्रियंका शेंगळे

अनुभव मागच्या वर्षी मार्च एप्रिल मध्ये आला होता. आम्ही आमच्या घराचं बांधकाम करायला घेतलं होत. पण आमचं राहत घर आणि ती जागा बरीच लांब होती त्यामुळे माझ्या वडिलांना ये जा करायला खूप अडचण व्हायची, वेळ लागायचा. म्हणून तिथे नीट लक्ष देता येत नव्हत. त्यामुळे त्यांनी तिथेच शेजारी एखादे रो हाऊस पाहायला सुरुवात केली. आमच्या घरी दोन पाळीव कुत्रे असल्यामुळे फ्लॅट भाड्यावर घेऊन राहणे शक्य नव्हते कारण बहुतेक सोसायटी परवानगी देत नाहीत. सुदैवाने एक रो हाऊस मिळाले. दोन बेडरूम, हॉल, किचन आणि समोर बऱ्यापैकी मोकळी जागा. छान लॉन वैगरे. आणि भोवती कंपाऊंड. पण इतके छान रो हाऊस असून त्याचे भाडे फक्त ४ हजार रुपये होते. ते रो हाऊस कोणीही पाहिल्यावर इतके कमी भाडे कसे हा प्रश्न पडणे साहजिक होते पण त्या वेळी गरज असल्यामुळे वडिलांनी जास्त काही विचार केला नाही. आम्ही लगेचच गरजे पुरते लागणारे सामान घेऊन तिथे शिफ्ट झालो. २-३ दिवस अगदी नीट गेले पण त्या नंतर मात्र विचित्र गोष्टी घडायला सुरुवात झाली. मला अगदी अस्वस्थ वाटू लागले. ती निगेटिव्ह एनर्जी म्हणतात ना तसे काहीसे. म्हणजे नीट सांगता नाही येणार पण ते मी अनुभवायला सुरुवात केली होती. या सगळ्यात विचित्र म्हणजे त्या रो हाऊस मध्ये एका ही सिम ला नेटवर्क नव्हते. त्यामुळे इंटरनेट सर्फ करून वेळ घालवायचा म्हंटला तर तेही शक्य व्हायचे नाही. 

त्या दिवशी मी घरी एकटीच होते. स्वयंपाक घरात काम करत होते. तितक्यात कोणी तरी मागे उभे असल्याची चाहूल लागली आणि अंगावर शहारे उमटून गेले. एक अनामिक चाहूल. कोण होत माहीत नाही पण त्याच अस्तित्व मला क्षणा क्षणाला जाणवत होत. मी स्वतःला सावरलं. वाटलं की भयकथा जास्तच ऐकते म्हणून भास होत असतील. म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं पण तरीही राहून राहून वाटत होत की मागे नक्की कोणी तरी उभ आहे. न राहवून मी मागे वळून पाहिलं पण मागे कोणीही नव्हत. भासच झाला मला असा विचार करून मी पुन्हा माझ्या कामात व्यस्त झाले. काही वेळ उलटला आणि मी सहज तिरक्या नजरेने त्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न केला आणि तिथे खरंच कोणीतरी उभ असल्याचं जाणवलं. अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. आता मला राहवले नाही. मी मोबाईल घेऊन वडिलांना फोन केला पण नेटवर्क नाही. जिथे मला ते उभ असल्याचं जाणवलं होत, तिथूनच मला बाहेर जायचं होत. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि अंदाज घेत दबक्या पावलांनी चालत घराबाहेर आले. आई वडिलांना फोन केला. जो पर्यंत माझ्या घरचे येत नाहीत तो पर्यंत मी बाहेरच थांबले. पण हा प्रकार इतक्यावरच थांबणार नव्हता कारण ही फक्त या सगळ्याची सुरुवात होती. 

आमच्यासोबत माझी बहिण आणि तिचा २ वर्षांचा लाहान मुलगा रहायला आले होते. माझी आई आणि ती बेड बर झोपायचे आणि मी आणि माझी लहान बहीण आम्ही खाली गादी टाकून झोपायचो. ती रात्र मला अजूनही आठवतेय. मी अगदी गाढ झोपेत होते. तसे मला जुन्या गाण्याचा आवाज येऊ लागला. मला जसे जाणवले मी झटकन अंथरुणात उठून बसले. माझी आई आणि बहिण दोघीही जागे होते. मी त्यांना म्हणाले की तुम्हाला जुन्या गाण्याचा आवाज ऐकू आला का.? त्यावर त्या नाही म्हणाल्या आणि सांगू लागल्या की तू एखादे स्वप्न पाहिले असशील. पण मला चांगल माहीत होत की ते स्वप्न नव्हत. जस जसे दिवस पुढे सरकू लागले रोज रात्री मी दचकून उठायचे. एकदा अशीच घाबरून उठले आणि समोर लक्ष गेले. तर समोर बरीच माणसे उभी दिसली. मी इतकी घाबरले की माझ्या तोंडून आवाजच फुटत नव्हता. म्हणून मी ब्लँकेट डोक्यावर घेऊन तशीच झोपून गेले. रोज रात्री घडणाऱ्या गोष्टी मी घरच्यांना सांगितल्या पण त्यांचे एकच म्हणणे होते की तू त्या भयकथा ऐकतेस आणि मग तुला रात्री स्वप्न पडतात, नको नको ते भास होतात. त्यांच्या बोलण्याचा ही मी विचार केला. पण खूप आधीपासून भयकथा ऐकायचे, मग भास मला आत्ताच का होतील, भीती अचानक कशी वाटेल हे मला उमगत नव्हत. 

आमच्याकडे २ कुत्रे होते किझी आणि कुकी नावाचे. ते माझ्या सोबतच बाजूला झोपायचे. एके रात्री मला जाग आली तेव्हा ते दोघेही उठले आणि खोलीच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन गुरगुरू लागले. मी इतकी घाबरले की घरच्यांना उठवून त्यांना दाखवले. तेव्हा कुठे त्यांना कळू लागले की हे माझे भास नाहीत. आणि याला दुजोरा मिळाला तो माझ्या बहिणीला आलेल्या अनुभवामुळे. तो २ वर्षांचा छोटा खूप आजारी पडला, ताप यायचा आणि संध्याकाळी उतरायचा. औषध सुरू होती पण तरीही काही फरक पडत नव्हता. एके रात्री २ च्या सुमारास अचानक उठून जोर जोरात रडायला लागला. ताई ला खुणावू न सांगू लागला की हॉल मध्ये चल. कदाचित त्याला त्या खोलीतून बाहेर जायचे होते. काही केल्या तो शांतच होत नव्हता. त्याच्यासोबत काही तरी घडलं असेल किंवा त्याने काही तरी पाहिलं असेल पण ते त्याला सांगता येत नव्हतं. असे सलग ३-४ दिवस घडले. रोज रात्री २ वाजता तो रडत उठायचा. एकदा तर तो उठून बसला आणि खोलीच्या एका कोपऱ्यात बघून हसू लागला. जसे कोणाला तरी पाहून हसतोय. ताई इतकी घाबरली की त्याला झोपवायचा प्रयत्न करू लागली. आम्ही सगळे जागेच होतो. तितक्यात तो उठून बसला आणि त्या अंधाऱ्या कोपऱ्यात पाहून बोबड्या स्वरात म्हणाला “दादा बस बस..” त्याला म्हणायचे होते की इथे एक दादा बसलाय. 

हा सगळा प्रकार पाहून आम्ही सगळेच घाबरलो होतो. ताई ने कसे बसे त्याला झोपवले. पण रोज रात्री तो तसेच करू लागला. मग मात्र सगळ्यांना शंका येऊ लागली की या घरातच काही तरी वेगळे आहे. ताई वडिलांना म्हणाली की आपण इथून जाऊया. ते सुरुवातीला तिला नाही म्हणाले पण नंतर त्यांनी स्वतः त्याला रात्री तसे बोलताना पाहिले. तेव्हा जो काही प्रसंग घडला तो मी कधीही विसरू शकणार नाही. माझे वडील त्याला म्हणाले की बाळा त्या दादाला जायला सांग आता. तसे त्याने बोबड्या शब्दात त्याला जायला सांगितले. काही मिनिटांनंतर वडिलांनी विचारले की “गेला का दादा..?” तसे तो म्हणाला की “दाद बसलाय, हसतोय..”. आम्ही सगळेच सुन्न झालो. वडिलांना ही आता त्या गोष्टीचे गांभीर्य कळले होते. दुसऱ्याच दिवशी त्यांनी शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. अगदी त्या दिवशी ही तो हॉल मध्ये एका कोपऱ्यात बसून हसत होता, खेळत होता. जसे की त्याच्या सोबत कोणीतरी खेळतय. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही जुन्या घरी शिफ्ट झालो. रात्री पर्यंत बाळाचा ताप ही उतरला. आम्ही जवळपास ४ महिने त्या रो हाऊस मध्ये राहिलो.पण ते कसे राहिलो आमचे आम्हालाच माहीत. कारण विनाकारण लहान सहान गोष्टींवरून घरात वाद व्हायचे. 

त्या घरात कोणी पाहुणे आले तरी अर्ध्या तासाच्या वर थांबायचे नाहीत. कदाचित त्यांना सुद्धा ती निगेटिव्ह एनर्जी जाणवत असावी म्हणून त्यांनी आमच्याइथे येणं च बंद केलं होत. विशेष म्हणजे त्या घरात जे काही होत त्याने ४ महिने घरात देव घर लागूच दिलं नाही. काही ना काही विघ्न येत होती. आम्ही जुन्या घरी राहायला आल्यावर जेव्हा आमचे बोलणे सुरू होते तेव्हा आई ने सांगितले की तिला ही विचित्र अनुभव आला होता. तिथे राहायला गेल्यावर पहिल्याच दिवशी रात्री तिला जाग आली. तिने जसे डोळे उघडले तसे दिसले की तिच्या पासून काही फुटांवर एक म्हातारी बाई झोपली आहे आणि आईकडेच डोळे विस्फारून पाहतेय. तिने ही गोष्ट आम्हाला एकदाही सांगितली नव्हती कारण आम्ही त्याच घरात राहत होतो. आम्ही अजून त्यात घरात राहिलो असती तर काय अनुभवायला मिळाले असते याची आम्ही कल्पना ही करू शकत नाही. 

Leave a Reply