अनुभव – अनिकेत मोहिते.

त्यांचा मनुष्य गण असल्यामुळे त्यांना आजपर्यंत कित्येक भयाण अनुभव आले आहेत. त्यातलेच हे काही अविस्मरणीय अनुभव.

अनुभव क्रमांक – १ 

माझे गाव निसर्गाच्या कुशीत अगदी डोंगर दऱ्यांत वसले आहे. वर्दळ इपासून खूप दूर.. गावातली घर ही अगदी जुन्या पद्धतीची जेमतेम ३०० घर आहेत. शेणाने सारवलेली आणि कौलारू घर. गावात लाईट आणि मोबाईल नेटवर्क चा मात्र नेहमी त्रास असतो. बहुतेक वेळी रात्री लाईट नसतेच त्यामुळे गाव रात्रीच्या अंधारात कुठेतरी गुडूप होऊन जाते

मला आजही तो दिवस आठवतोय. भावाचे लग्न ठरले होते. त्यामुळे त्याच्या लग्नाच्या पत्रिका द्यायला गावी गेलो होतो. मी, माझा भाऊ आणि माझे आई वडील आम्ही सगळेच गावी आलो. आमच्या गावात आणि आजूबाजूच्या इतर गावात राहणाऱ्या नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना आमंत्रण द्यायचे होते. आम्ही दोघांनी काम वाटून घेतले होते. माझा भाऊ बाईक घेऊन गावातच पत्रिका वाटायला निघून गेला. जवळच्या ४ गावात नातेवाईकांना पत्रिका वाटण्याचे काम माझे होते. लग्न घर म्हंटले की इतर काम आलीच. त्यामुळे मी सकाळी घरातली सगळी कामे आटोपून साधारण ११ ला बाहेर पडलो. ३ गावात पत्रिका वाटून झाल्या आणि मी जवळच्याच एका चौथ्या गावात जायला निघालो जे माझ्या आत्याच्या गाव होते. आत्याला भेटलो आणि आसपास च्याच काही ओळखीच्या पाहुण्यांना ही आमंत्रण देऊन झाले. संध्याकाळ झाली होती आणि बघता बघता अंधार पडायला सुरुवात झाली. 

आत्याचा निरोप घेऊन निघणार तसे अत्याना म्हणाली की आता जाऊ नकोस, आजच्या दिवस इथेच रहा आणि हवे तर उद्या पहाटे जा. पण तिला म्हणालो की घरात खूप काम बाकी आहेत म्हणून मी निघतो आता. आत्त्याचे गाव माझ्या गावाच्या डोंगराच्या पायथ्याला असल्याने एवढा काही लांबचा रस्ता नव्हता. मला फक्त डोंगर चढून जायचे होते. मी एका पायवाटेने चालत निघालो. खेडेगाव म्हंटले की रात्री लाईट असून नसल्यासारखे. दिवस भर फोन आणि व्हॉट्सॲप वापरल्यामुळे मोबाईल ची बॅटरी ही उतरली होती. त्यात नेटवर्क ये जा करत असल्यामुळे बॅटरी जेमतेम बाकी होती. मी चालत साधारण १५ मिनिटात तिचे गाव सोडून पुढे आलो. तिथे एक जुना वाडा रस्त्यात लागतो. तो वाडा पार केला की माझ्या गावाच्या डोंगराची सुरुवात होते. बराच वेळ काही वाटले नाही पण तो वाडा जस जसा जवळ येऊ लागला तसे त्या बद्दल गावातल्या लोकांचे किस्से आठवू लागले. शक्यतो त्या वड्याजवळून अंधार पडल्यावर कोणी जात नाही. रात्रीच काय पण दिवसाही लोक तिथून जाणं टाळतात. 

पण माझ्या जवळ दुसरा काही पर्याय नव्हता कारण मला जमेल तितक्या लवकर घरी जायचे होते. तो वाडा ओलांडून जाण्याआधी मी मोबाईल मध्ये वेळ पाहिली तर ९ वाजायला ३ मिनिट बाकी होते. मी मोबाईल खिशात ठेवला आणि त्या वाड्याच्या जवळून जाऊ लागलो. एक अनामिक भीती दाटून आली होती. मी चालण्याचा वेग वाढवला आणि तिथून थोडे पुढे आलो. मी डोंगर चढायला सुरुवात केली. जवळपास १० मिनिट झाली असतील पण मला सतत कसली तरी चाहूल जाणवत होती. जसे माझ्या मागून कोणी तरी चालत येतंय. आणि ती चाहूल एकदा नाही तर बऱ्याच वेळा जाणवली. सुरुवातीला दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला पण ती अनोळखी चाहूल आता माझ्या मागून अगदी जवळ जाणवू लागली. तितक्यात एक भरडा किळसवाणा आवाज कानावर पडला “काय रे.. कुठे चाललास..?” माझ्या सर्वांगावर शहारे येऊन गेले. मी काही क्षणासाठी जागीच स्तब्ध झालो. भीती ने काळीज धड धडू लागले. 

पण मला माहित होते की अश्या वेळेस कधीही मागे वळून पाहायचे नाही आणि कधीही उत्तर द्यायचे नाही. मी भानावर येऊन पुढे चालू लागलो. झपाझप पावले टाकत मी त्या आवजपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागलो. बघता बघता चंद्रप्रकाश की कमी होत होता. मला जाणवले की अचानक वातावरण ढगाळ होऊ लागले आहे आणि चंद्र ढगाआड गेलाय. अंधार इतका गडद झाला की मला पुढची वाट ही दिसेनाशी झाली. मी खिशातून मोबाईल काढला आणि फ्लॅश लाईट सुरू केली. मोबाईल जास्त वेळ साथ देईल असे वाटत नव्हते कारण बॅटरी फक्त १०% राहिली होती. मी जमेल तितक्यात वेगात चालायला सुरुवात केली. थोडे पुढे आलो आणि मला एक बकरी उभी दिसली. पाय वाटेच्या उजव्या बाजूला उभी होती. मी तीला बघून न बघितलेल्या सारखे केले आणि डोंगर चढत राहिलो. तेवढ्यात पुन्हा मागून एक वाक्य कानावर पडले. 

या वेळेस त्या आवाजात राग स्पष्ट जाणवला. “मी तुला विचारले ना.. कुठे चाललास..?”. तो आवाज ऐकून आता माझ्या हातापायाला कंप सुटू लागला. ते जे काही होते त्याच्या घेऱ्यात मी अडकलो होतो. मी भीती ने धावायला सुरुवात केली पण मागून पुन्हा एक आवाज आला “आहेस तिथेच थांब..” मला वाटू लागले की मला मागून कोणी तरी खेचते य. आता डोंगर चढत असल्यामुळे तसे जाणवत होते की खरंच मला मागून कोणी तरी खेचत होत ते कळत नव्हत. मागे वळून पहायची तर हिम्मत च नव्हती. देवाचे नाव घेऊन मी जिवाच्या आकांताने धावत सुटलो. पळता पळता हनुमान चालीसा म्हणू लागलो. काही वेळात मी गावाच्या वेशी जवळ येऊन पोहोचलो आणि काही घरे दृष्टीस पडली. गावातला मुख्य रस्ता लागला. मी तो ओलांडून पुढे आलो आणि एक विचित्र आवाज परिसरात घुमला. मी धावतच घरी आलो. माझी अवस्था पाहून घरच्यांनी विचारायला सुरुवात केली तसे मी त्यांना सगळे सांगितले. मी त्या वाड्या जवळच्या वाटेवरून आलो हे कळल्यावर माझा काका खूप चिडला. त्याने मला विचारले की तू घाला काही उत्तर नाही दिलेस ना..? मागे वळून नाही बघितले स ना..? त्यावर मी नाही म्हणालो. तसे काका जरा शांत झाला आणि मला म्हणाला “खविस होता तो.. त्या वाड्यापासून ते आपल्या गावाच्या वेशीपर्यंत ची हद्द त्याची आहे. देवाची कृपा म्हणून तू सुखरूप घरी आलास. या नंतर पुन्हा कधीही त्या वाटेने येण्याचा विचार करू नकोस.

अनुभव क्रमांक – २

हा अनुभव माझ्या दोन्ही काकूंना आला होता. तेव्हा मी बराच लहान होतो. बहुतेक ७ वीत शिकत होतो. मे महिना होता आणि आमचे गावातले घर बांधायचे काम सुरू होते. काम चालू असल्यामुळे रोज संध्याकाळी कामगार निघून गेले की पाणी मारायला जावे लागायचे. आम्ही त्यासाठी घराजवळ पाण्याची मोठी तोटी ठेवली होती. कधी संध्याकाळी जाता नाही आले की मग घरातले कोणी तरी रात्री जेवण आटोपल्यावर जाऊन पाणी मारून यायचे. त्या दिवशी माझी लहान काकी जेवण झाल्यावर पाणी मारायला निघाली. तिच्या आधी माझी मोठी काकी तिथे गेली होती. तिथून पाण्याची तोटी घेऊन ती गावातल्या पाण्याच्या टाकी जवळ चालत गेली. तितक्यात तिला रस्त्याकडे ला कोणी तरी बसलेले दिसले. अंधार असला तरी चंद्र प्रकाशा त तिला नीट दिसत होते. ती जवळ गेली तर तिथे एक बाई बसली गुढघे पोटाशी घेऊन बसली होती. दिसायला माझ्या मोठ्या काकू सारखी वाटली म्हणून म्हणून तिने विचारले “जाऊ बाई.. अहो अश्या इथे का बसल्या आहात तुम्ही..”

पाणी मारायला आला होतात ना.. पण समोरून कसलाच प्रतिसाद आला नाही. माझी काकी तिला हात लाऊन उठवायला गेली तर ती अचानक ताडकन उठून उभी राहिली. बघता बघता तिची उंची वाढू लागली.. ७ फूट ८ फूट.. लाल रंगाची साडी नेसली होती आणि कपाळावर मोठे कुंकू होते. तो भयानक प्रसंग पाहून माझी काकी किंचाळत तिथून उलट घराच्या दिशेने पळाली. घरी येऊन तिने सगळ्यांना सांगितले तसे माझे वडील आणि काका तिथे काय आहे हे पाहायला गेले. पण त्यांना तिथे कोणीही दिसले नाही.

अनुभव क्रमांक – ३ 

हा अनुभव मी दहावीला असताना मला आला होता. फेब्रुवारी महिन्यात जत्रे साठी आम्ही सगळे गावी गेलो होतो. सगळे एकत्र राहत असल्याने घरात खूप गोंगाट गोंधळ असायचा. एके रात्री जेवण वैगरे आटोपून मी गप्पा मारायला म्हणून मैत्रिणीला फोन केला आणि घराबाहेर पडलो. आधी म्हंटल्याप्रमाणे माझे गाव अगदी डोंगराच्या कुशीत वसले आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर अगदी गर्द झाडी झुडपां चा आहे. मी बोलता बोलता घरापासून बरेच लांब आलो. तिच्या शी बोलता बोलता मला कळलेच नाही की मी एका अंधाऱ्या जागी अगदी झाडा झुडपाच्या मधोमध येऊन फेऱ्या मारतोय. मला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा मी सावध झालो. आजुबाजुला नजर फिरवली आणि जरा घाबरलो च. 

मी तिथून बाहेर पाडू लागलो तसे मला माझ्या सोबत झाडीच्या दुसऱ्या बाजूने कोणी तरी चालत असल्याचा भास होऊ लागला. मी त्या दिशेने पहिले तर झटकन ते जे कोणी होते ते एका झाडाच्या बुंध्या मागे जाऊन लपले. मला वाटले की माझा भाऊ असेल जो मुद्दामून माझ्या मागे येऊन मला घाब रवायला आलाय. मी मुद्दामून लक्ष दिले नाही आणि चालत राहिलो. पण तितक्यात मला एका मुलीचा माझ्याकडे बघून हसण्याचा आवाज आला. मी त्या दिशेने पहिले तर एक मुलगी मला झाडा मागून डोकावून पाहत होती. मी तिला जरा रागातच म्हंटले “कोण आहेस तू..? इथे अंधारात काय करतेय इतक्या रात्री.. घरी जा आपल्या..” पण माझे बोलणे ऐकल्यावर ती बाहेर आली आणि एका विचित्र आवाजात ओरडत किंचाळत माझ्या दिशेने धावू लागली. तिचे असे हे विचित्र रूप पाहून मी घाबरून घराकडे धावत सुटलो. 

धावण्याच्या गडबडीत माझा मोबाईल ही तिथेच कुठे तरी पडला. घरी येऊन मी भावाला सगळा घटनाक्रम सांगितला तसे तो म्हणाला की चल आपण बघू कोण मुलगी आहे. मी माझ्या भावाला आणि वडिलांना घेऊन त्याच जागेवर पुन्हा आलों माझा मोबाईल तर मिळाला पण ती मुलगी.. ती तिथे नव्हती.. 

अनुभव क्रमांक – ४

हा अनुभव मी इंजिनिअरिंग च्याच दुसऱ्या वर्षाला असताना आला होता. ही घटना २०१५ ची आहे. घरची परिस्थिती ठीक नसल्याने मी शिकत असताना जॉब ही करत होतो. त्यामुळे मला अभ्यासाला जास्त वेळ देता येत नसे. म्हणून मग मी माझ्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शाळेत रात्री जॉब वरून आल्यावर अभ्यासाला जायचो. ती शाळा तो पर्यंत बंद होऊन जायची पण त्या शाळेच्या मागे एक मैदान होते. मी तिथे जाऊन बसायचो. आणि मी एकटा नसायचो तर माझा सोबत बरीच इतर मुले ही तिथे असायची. कधी कधी सोबतीला माझा चुलत भाऊ यायचा आणि माझ्याहून मोठा असल्याने त्याची अभ्यासात मदत व्हायची. त्या एका रात्री तो आला नाही म्हणून मी त्याच्या ग्रुप ला विचारले तर ते म्हणाले की तो आत्ताच काही वेळा पूर्वी घरी गेला. त्याला त्याचा प्रोजेक्ट करायचा होता. 

माझ्या सोबत माझे दोन मित्र होते. त्यांच्यासोबत मी अभ्यासाला बसलो. शनिवार ची रात्र असल्यामुळे मी पूर्ण रात्र अभ्यास करणार होतो कारण दुसऱ्या दिवशी ऑफिस ला सुट्टी होती. अभ्यास करता करता पहाटेचे ३ कधी वाजले कळलेच नाही. बऱ्याच वेळाने पुस्तकातून डोके बाहेर काढले आणि आजूबाजूला नजर फिरवली तर माझे मित्र मला दिसले नाहीत. मी मोबाईल घेऊन एकाला मेसेज केला कुठे आहेस विचारायला तर त्याचा रिप्लाय आला की आम्ही तुला आवाज देऊन निघालो पण तुझे लक्ष नव्हते. आम्ही अडीच लाच घरी आलो. ते तिथेच जवळच्या बिल्डिंग मध्ये राहायचे. मला कळले नाही की यांनी मला कधी आवाज दिला जाताना. पण मी जास्त लक्ष न देता पुन्हा माझा अभ्यास करायला सुरुवात केली पण लिंक तुटल्याने माझे आता लक्ष लागत नव्हते. त्यात इतक्या वेळ सलग बसून पाठ ही भरून आली होती. 

मी उठलो आणि आजूबाजूला नजर फिरवली तर त्या मैदानात मी एकटाच होतो. घोटभर पाणी पिऊन मी पुस्तक बॅगेत भरले आणि घराच्या दिशेने निघालो. कानात हेडफोन घातले आणि मस्त गाणी ऐकत चालू लागलो. रस्ता अगदी सामसूम होता. अगदी शांत वातावरण. मी मान खाली घालून चालत होतो. काही अंतर चालल्यावर मी मान वर करून समोर पहिले आणि एकदम दचकलो. समोर एक वृद्ध इसम हातातल्या काठीचा आधार घेऊन उभा होता आणि माझा कडे अगदी एकटक पाहत होता. डोक्यावर टोपी, अंगात पांढरा कुर्ता आणि पायजमा असा काहीसा पेहराव होता. एव्हाना ३.३० होत आले होते. मी त्यांच्या जवळ जाऊन विचारले “आजोबा एवढ्या रात्री इथे काय करताय..? मी तुम्हाला पाहून जरा दचकलो च. तुम्हाला सोडू का कुठे..?” त्यावर तो इसम जे म्हणाला ते ऐकून मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. तो म्हणाला “माझ्या साठी काय दिवस आणि काय रात्र.. मी इथेच असाच फिरत राहणार…”

मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ नीट कळला नाही. मी त्यांना काही विचारणार तोच तो इसम म्हणाला “मला तंबाखू दे..”. मी जरा गोंधळलो आणि म्हणालो “मला कसले व्यसन नाहीये त्यामुळे तंबाखू नाहीये माझ्याकडे..’ मी इतके बोलून पुढे चालत निघून गेलो. मी सहज म्हणून मागे वळून पाहिले तर तो इसम तिथेच उभा राहून मला एक टक पाहत होता. मी घरी येऊन झोपून गेलो. सकाळी उठल्यावर आई ला सांगितले तर ती म्हणाली की असे रात्री बाहेर जात जाऊ नकोस.. त्या रात्री मी पुन्हा तिथे मैदानात अभ्यासाला गेलो. घरून निघा ल्यावर मित्राला फोन केला पण तो फोन उचलत नव्हता. म्हणून मी त्याला बोलवायला त्याच्या बिल्डिंग मध्ये गेलो. विंग मध्ये शिरताना माझी नजर डाव्या बाजूला लावलेल्या बॅनर वर गेली. त्यावर त्या इसमाचा फोटो होता. मोठ्या अक्षरात दोन शब्द लिहिले होते ‘ अकस्मात निधन ‘. ते पाहून भीतीने अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. हिम्मत करून मी त्या बॅनर जवळ गेलो आणि त्यावर लिहिलेले वाचले. ४ दिवसांपूर्वी त्या इसमाचे अकस्मात निधन झाले होते. 

तितक्यात तो मित्र खाली आला आणि मी त्याला इशारा करत विचारले “काय रे.. हे कोण आहेत..” तसे त्याने सांगितले की हे आमच्या बिल्डिंग मध्ये राहायचे. मागच्या आठवड्यात एका अपघातात गेले. पण तू का विचारतोय इतके. तसे मी त्याला काल रात्री घडलेला सगळा प्रसंग सांगितला, त्यांचा पेहराव, त्यांनी तंबाखू मागितला ती गोष्ट. त्यावर तो म्हणाला की तू वर्णन केलेस त्यावरून वाटतेय की ते हेच होते. पण हे कसे शक्य आहे.. मला भेटलेला इसम नक्की कोण होता हे गूढ अजूनही तसेच आहे त्या नंतर मात्र मी पुन्हा तिथे कधीही गेलो नाही. 

Leave a Reply