एक थंड वाऱ्याची झुळूक पूजाच्या कानाजवळून वाहून गेली आणि तिचं अंग शहारलं. गेले कित्येक महिने तिच्यासाठी हाच एक विरंगुळा होता. असं नाही की हा अनुभव तिच्यासाठी खूप सुखद होता पण ती प्रत्येक झुळूक तिला त्याची आठवण करून द्यायची. तिला अस भासवायची की जणू तोच तिला स्पर्श करतोय, तिला स्वतः जवळ बोलावतोय.

काव्याने हाक दिली तशी पूजा भानावर आली “तुझे लक्ष कुठे आहे? काकू कधी पासून तुला बोलवतायत”
पूजा बेड वर बसत म्हणाली “काही काम आहे का आई ला?”
“काम असेल म्हणूनच बोलावलं असेल ना..” काव्या वैतागतच पुढे म्हणाली. “काय ठरवलंय तू? तू घरात कोणाशीच जास्त काही बोलत नाहीयेस आणि लग्नाचा विषय काढला की तो टाळून लगेच निघून जातेस म्हणूनच काकूंनी मला बोलावलं”

तुला तर सगळं माहीत आहे काव्या, तू तरी मला हा प्रश्न विचारू नकोस. माझं अजूनही आदित्य वर प्रेम आहे आणि त्याला नाही विसरू शकत मी”
“अग पण ज्याच्या वर प्रेम आहे तोच आता या जगात नाही हे कधी लक्षात येणार तुझ्या? सत्य किती ही कठोर असलं तरी ते मान्य करावच लागत. काव्या संतापून म्हणाली. पूजा पाणावलेल्या डोळ्यांनी काव्याकडे पाहत होती आणि काव्या पुन्हा तिला समजवू लागली. “काका काकूंना मुलगा मान्य नसता तर तुझं प्रेम मिळवून देण्यात मी नक्की तुझी साथ दिली असती. पण गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत जगणं मूर्खपणा आहे”. पूजा ने कधीच ऐकणं बंद केलं होतं आणि पुन्हा आदित्य च्या आठवणीत गुंतून खिडकीबाहेर एक टक पाहत होती. 

काव्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले “ऐकतेस ना?”. सिद्धार्थ खूप चांगला मुलगा आहे, घरचे ही खूप चांगले आहेत. तू खूप सुखात राहशील आणि जुनं सगळं लवकरच विसरशील. बघ तू आदित्य ला उत्तर देण्यात उशीर केलास आणि तो गेला. आता सिद्धार्थ च्या बाबतीत ही चूक करू नकोस.

पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली “आई ला सांग मी लग्नाला तयार आहे..”
तेवढ्यात जोरात झालेल्या आवाजाने दोघी दचकल्या. दोघींनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. बाजूच्या टेबल वरची एक डायरी खाली पडली होती आणि त्यातून आदित्यने पूजाला पाठवलेली पत्र आणि कविता बाहेर चारी बाजूला पसरल्या होत्या.

काव्या थोडं घाबरतच म्हणाली “ही डायरी अशी कशी अचानक पडली?”
डोळ्यातले अश्रू पुसून पूजा त्यातल्या एका कवितेचे पान हातात घेत म्हणाली “गेले काही महिने अस बरच काही होतंय माझ्या सोबत. मला अस वाटतय की तो आहे अजून ही इथेच आहे माझ्या जवळ..”
काव्या जरा घाबरली पण तिने पटकन विषय बदलला “अरे काकू वाट बघत असतील, मी पटकन त्यांना तुझा होकार कळवून येते” असे म्हणत ती निघून गेली.
पूजा हातात घेतलेली कविता वाचत पुन्हा आदित्य च्या आठवणीत रमली. तिला कॉलेज चे दिवस आठवू लागले.

कलम तुझी आणि तुझीच शाई,केले हे बोल माझे मी तुझ्याच नावी,दिवसा असतेस मनात माझ्या,रात्री स्वप्न ही केवळ तुझीच यावी,पावलो-पावली देईन मी साथ तुला,आयुष्याची संध्याकाळ ही तुझ्याच सोबत व्हावी,ऊन असो किंवा असो वाटेवर पाऊस,तुझ्या सोबत प्रत्येक ऋतू ही अशीच गुलाबी राहावी’
पूजा याने आज परत कविता पाठवली, किती प्रेम करतो हा तुझ्यावर – काव्या म्हणाली.
हा का पाठवतो ह्या कविता. मी माझ्या कडून ह्याला असे काही संकेत दिलेत का आज पर्यंत ? मला भीती वाटते कधी कधी” पूजा ते पत्र स्वतःच्या बॅग मध्ये ठेवत म्हणाली.
“अगं मग कधी देणार आहेस संकेत? तुला ही तो आवडतो पूर्ण कॉलेज ला माहीत आहे, तुला स्वतःला कधी समजणार”.
“मला माहित नाही ग प्रेम वैगरे..” प्रिया अडखळत च म्हणाली.

तशी काव्या जरा चिडूनच म्हणाली “वेडी आहेस का तू? कॉलेज ची 4 वर्ष तो तुझ्या मागे आहे. रोज न चुकता, ऊन पाऊस कसला विचार न करता तुझ्या स्कुटी वर गुलाब ठेवतो आणि त्यात ह्या अश्या कविता ठेवतो. तुझ्या एका हाकेवर धावून येतो तुला कधी ही गरज असेल तेव्हा. बघ खरं प्रेम मिळणं अवघड असत. तुला मिळालंय तर ते ओळख आणि स्वतःच प्रेम मेनी करायचं धाडस कर. आज शेवटचा दिवस आहे कॉलेज चा. पुढे कोण कुठे असेल माहीत नाही. खूप वाट पाहायला लावली आहेस त्याला, आता  अजून उशीर नको करुस”

काव्या चे म्हणणे पटताच पूजा ने पटकन स्कुटी घेऊन कॉलेज गाठले. पण तिथले दृश्य पाहून पूजा थरारली. तीच काळीज धड धडू लागलं. 7 मजली कॉलेज च्या टेरेस वर आदित्य उभा होता. खाली संपूर्ण कॉलेज जमा आलं होतं. काही मैत्रिणी तिच्या जवळ धावत आल्या आणि म्हणाल्या “आग कुठे होतीस तू, कधी पासून तुझा फोन ट्राय करतोय आम्ही, स्विच ऑफ येत होता, बरं झालं तू आलीस इथे, आदित्य ला तुझं उत्तर हवंय, हो किंवा नाही”तितक्यात त्याने पून्हा साद दिली “माऊ मला तुझा निर्णय हवाय, हो किंवा नाही, तुझं उत्तर नाही असेल तर मी या जगात राहणारच नाही, पण प्रॉमिस करतो.. मी मेल्या नंतर ही कायम तुझ्या सोबत असेन”

पूजा नी सगळी हिम्मत ऐकटवून जोरात ओरडून स्वतःच प्रेम व्यक्त केलं “हो आदित्य, मला तुझं प्रेम मान्य आहे, तू प्लिज खाली उतर, असा वेडेपणा करू नकोस”
तिच उत्तर ऐकून त्याच्या आनंदाच्या सगळ्या सीमा पार झाल्या होत्या. तो घाईत खाली येण्या साठी फिरला आणि तितक्यात त्याचा पाय घसरला, 7व्या मजल्या वरून तो खाली पडला आणि जागच्या जागीच जीव सोडला. क्षणार्धात घडलेले दृश्य पाहून पूजा सुन्न झाली होती. तिची लव्ह स्टोरी सुरू होण्या आधीच संपली होती.

जोरात खिडकी आपटण्याच्या आवाजानी पूजा भानावर आली. ती स्वतःशीच बोलत खिडकी जवळ गेली “तू माझ्यावर रागावला आहेस ना? पण मी आई बाबांना दुखवू नाही शकत, ह्या जन्मात आपललं एक होण लिहिलं नव्हतं कदाचित. आता मी सिद्धार्थ शी लग्न करतेय, पण मी प्रॉमिस करते पुढच्या सगळ्या जन्मात मी तुझीच असेन”
काही दिवस उलटले. तीच लग्न झालं होतं सिद्धार्थ शी. आता तिला आदित्य च्या असण्याचा भास होत नव्हता. सिद्धार्थ खूप चांगला पण रिझर्व्हड होता. कधीही प्रेम व्यक्त करायचा नाही. तीचं मन ना जाणता स्वतःची तुलना नेहमी आदित्य शी करायचा. पण तिने काही गोष्टी लपवून ठेवल्यामुळे ती अस्वस्थ व्हायची. तिने ऐके दिवशी ठरवले की सिद्धार्थ ला आदित्य बद्दल सगळे सांगून टाकावे.
त्या दिवशी संध्याकाळी ते सहज कार मधून लॉंग ड्राइव्ह ला निघाले. सिद्धार्थ चा मूड छान होता. पूजा च्या मनात विचार आला की आता याला सगळे सांगून टाकावे. तेवढ्यात पूजा ला लक्षात आले की हा आपल्या कॉलेज चा रस्ता.. काही सेकंदात ते कॉलेज समोर आले. प्रियाची नजर नकळतपणे कॉलेज च्या टेरेस वर गेली आणि तिच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. कारण टेरेस वर आदित्य उभा होता आणि तिच्याकडे पाहून हात हलवत तिला इशारा करत होता. ती प्रचंड घाबरली. ती सिद्धार्थ ला हे सांगणार तितक्यात त्याने करकचून गाडीचा ब्रेक मारला. आणि तिचे लक्ष विचलित झाले. तिने पुन्हा टेरेस कडे नजर वळवली पण तिथे कोणीही उभे नव्हते. 

तिने स्वतःला सावरलं आणि सिद्धार्थ ला विचारलं “इतक्या जोरात ब्रेक का मारलास ? काय झालं” पण तो काहीच बोलला नाही आणि त्याने कार पुन्हा सुरू केली.. सिद्धार्थ एकदम शांत झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. पूजा घाबरली होती त्यामुळे तिने आदित्य चा काहीच विषय काढला नाही. ते दोघेही एकमेकांशी काहीही न बोलता घरी परतले.

दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा बाहेर अंगणात आली. समोरचे दृश्य पाहून पूजा काळजात धस्स झालं. तिच्या स्कुटी वर एक गुलाब होता. तिने जवळ जाऊन पाहिलं. त्यात एक लेटर होत.
“प्रेमाच्या वाटेवर जरी वाळवंट आले होते,वाट पाहून नजरे समोर जरी अंधकार झाला होता.तरीही प्रेमाच्या परीक्षेत आज मी खरा उतरलो,विरहाचे काही क्षण केवळ अल्पविरामाचे तर होते..,

हे वाचून पूजा च्या पायाखालची जमीनच सरकली. स्कुटी वर ठेवलेला गुलाब, तशीच कविता, तसेच अक्षर. सारं काही विपरीत घडत होतं. पण स्वतःवर ताबा ठेवून ती कोणाला काहीच बोलली नाही. त्या रात्री जेवण उरकून ती सिद्धार्थ ची वाट पाहत बसली. आज त्याला यायला थोडा उशीरच झाला होता. ती उठून खिडकीपाशी उभी राहिली. तितक्यात वाऱ्याची एक झुळूक मोकळ्या केसांमधून वाहून गेली. पण या वेळी तिला काहीच वेगळं वाटलं नाही. ती सिद्धार्थ ची खूप आतुरतेने वाट पाहत होती कारण आज तिला सगळं सांगायचं होत. 

“माऊ….” मागून हाक ऐकू आली आणि पूजा शहारली. तिला या नावाने फक्त एकच व्यक्ती हाक मारायचा आणि तो म्हणजे आदित्य. तिने मागे वळून पाहिलं तर सिद्धार्थ उभा होता. 
“मला तुम्ही या नावाने हाक मारली?” पूजा आश्चर्याच्या मुद्रेने म्हणाली.

“माझ्या शिवाय दुसरं कोण तुला या नावाने हाक मारणार होत? सकाळी तुझ्या स्कुटी वर ठेवलेलं सरप्राईज आवडलं?
“ते तुम्ही ठेवलं होतं?” पूजा ला काही समजेनास झालं.
सिद्धार्थ लगेच म्हणाला “हो मी माझं प्रॉमिस कायम पूर्ण करतो”
प्रिया विचारात पडली आणि धीर एकटवून म्हणाली “तुम्ही खूप वेगळे वागताय, खूप वेगळं वाटतंय सिद्धार्थ”.. आता तिला घाम फुटला होता. 
“आपण एकटे असताना तरी मला सिद्धार्थ नको म्हणुस माऊ”

काय घडतंय, सिद्धार्थ असे विचित्र का वागत आहेत, बोलत आहेत हे तिला उमगत नव्हतं. तिच्या मनात प्रश्नाचं काहूर माजलं होत. ती न राहवून म्हणाली “मग काय म्हणू? आणि तुम्ही कुठल्या प्रॉमिस बद्दल बोलताय? मला अचानक या नावाने का हाक मारताय? मला खूप भीती वाटतेय” पूजा आता थरथर कापू लागली होती. त्यानी तिच्या जवळ येत तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला “माऊ आता घाबरू नकोस, आता मी आलोय ना तुझ्या जवळ कायम साठी, आता पुन्हा तुला सोडून नाही जाणार. आता मला वाऱ्याची झुळूक बनून तुला स्पर्श करायची गरज नाही. तुझी डायरी पाहून माझा राग व्यक्त करायची गरज नाही, मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं जिवंत असतानाही आणि मेल्या नंतर ही.. 

त्या संध्याकाळी कॉलेज समोरून जात असताना आदित्य ने सिद्धार्थ च्या शरीरात प्रवेश केला होता आणि त्याने पूजाला कायम सोबत राहण्याचं वचन पूर्ण केलं होतं. व्यक्ती गेल्यानंतर जरी शरीर नष्ट होत असलं तरी प्रेम ही एक अशी भावना आहे जी मृत्यू नंतर ही कायम अबाधित राहते. 

Leave a Reply