अनुभव – अथर्व महाडिक

ही साधारण दीड ते तीन वर्षांपूर्वीची घटना आहे. आम्ही नवी मुंबईत घर भाड्याने घेतले होते. कमी पैशात मोठे घर मिळत असल्याने मागचा पुढचा विचार न करता वडिलांनी लगेच निर्णय घेतला होता. एका सात मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर ते घर होते. आमच्या घरी मी, आई-वडील आणि दोन लहान भाऊ असा आमचा पाच जणांचा परिवार. एका रविवारच्या दिवशी सगळे समान शिफ्ट करून आम्ही सर्व त्या घरात राहायला गेलो. घर अगदी आलिशान होते. प्रशस्त हाॅल. हाॅल ला लागुनच एक मोठी बाल्कनी आणि बाल्कनीतून समोरच पिंपळाचे एक भले मोठे झाड होते. एवढे मोठे पिंपळाचे झाड कदाचित मी पहिल्यांदाच बघितले असेल. गेल्या बरोबर आम्ही एक छोटीशी पूजा केली. नातेवाईक ही आले होते. सर्व कार्यक्रम आटोपल्यावर पांगापांग झाली. सगळेच धावपळीमुळे थकलो होतो. संध्याकाळ उलटून गेली. अंधार पडायला सुरुवात झाली. घरातला पहिला दिवस अतिशय मजेत जात होता.. मी आणि माझा छोटा भाऊ परब दिवाणखान्यात टीवी बघत बसलो होतो. बराच वेळ उलटून गेला असेल. घड्याळात वेळ पाहिली नाही पण अंदाजे रात्रीचे ९ वाजत आले असावेत. 

अचानक माझ्या सगळ्यात लहान भावाचा म्हणजे तुषार चा जोरात रडण्याचा-ओरडण्याचा आवाज आला. तसे आम्ही सर्व धावत आतल्या बेडरूम मध्ये पळालो. पाहिले तर तुषार खिडकीकडे बोट करून रडत होता. आईने त्याला जवळ घेतले आणि शांत केले. बाबांनी खिडकीचे पडदे बंद करून घेतले. पडदे बंद होता होता माझी ओझरती नजर त्या पिंपळाच्या झाडावर पडली. का कुणास ठाऊक पण रात्रीच्या चांदण्यात त्या पिंपळाची काया खूपच भयावह वाटली. ती रात्र तशीच उलटून गेली. पुढचे काही दिवस खूप मजेत गेले. आम्ही सर्व त्या नवीन घरात हळू हळू रुळू लागलो होतो. पण अचानक त्या दिवशी आणखी एक घटना घडली… आई तेव्हा स्वयंपाक घरात काम करत होती. बाबा कामावरून घरी आले नव्हते. मी, परब आणि तुषार दिवाण खाण्यात बसलो होतो. काही कळते ना कळते तोच अचानक आई जोरात ओरडत स्वयंपाक घरातून बाहेर आली. आम्ही तिघही खूप घाबरलो. काय झाले तेच कळले नाही. आईने आम्हा तिघांनाही जवळ घेतले. तिच्या चेहऱ्यावरची भीती भरपूर काही सांगून जात होती. मी तिला विचारले पण तिने काहीच सांगितले नाही. किंबहुना ती काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. 

रात्री बाबा घरी आल्यानंतर आई बाबांना बाल्कनीत घेऊन गेली आणि काय घडले ते सांगितले. मी तेव्हा चोरून अर्धवट त्यांचे बोलणे ऐकले. आई सांगत होती “मी स्वयंपाक घरात काम करत होते. भाजी चिरून मी शेगडी चालू केली. आणि अचानक माझी नजर खिडकीतून समोरच्या झाडावर पडली. मला तिथे कसलीतरी हालचाल जाणवली म्हणून मी नीट लक्ष देऊन पाहू लागले. सुरुवातीला मला वाटल एखादा पक्षी किव्वा मांजर वगैरे असेल. पण काही क्षण् नीट पाहिल्यावर मला जाणवले. फांदीवरून कोणीतरी माझ्याकडे नजर रोखून बघत आहे, फक्त किलकिले डोळे दिसले. आणि काही कळायच्या आतच एक काळीकुट सावली झाडावरून सरपटत खाली आली…” आईचे इतकेच बोलणे ऐकून मी तिथून आत खोलीत आलो. पुढचे काही ऐकण्याची हिम्मत च नव्हती. आई ने खरंच असे काही पाहिले हे ऐकून माझा थरकाप उडाला होता. बाबांची प्रतिक्रिया यावर काय होती ती काही मी ऐकली नाही पण आठवड्याभरातच आम्ही ते घर सोडून निघून गेलो ते पुन्हा कधीच न येण्यासाठी.

Leave a Reply