अनुभव – अथर्व शिंदे
हा अनुभव माझ्या आजीचा आहे. अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा ती लहान होती. आजीचं गाव मुळशी मधे येत. त्या काळी तिच्या गावातील मोठी माणसे सांगायची की स्मशाना जवळच्या पुलावर रात्री अपरात्री कोणी फिरकत नाही कारण तिथे वेडी सगुणी राहते. आजी लहान असल्यामुळे तिला वाटायचं की तिला घाबरवायला घरातले आणि गावतले अश्या गोष्टी सांगत असतील. आमचं शेत त्या पुलाच्या पुढच्या बाजूला होत. श्रावण महिना होता. आजी आणि तिच्या मैत्रिणी, बहिणीच्या दुसऱ्या गावात मंगळागौर कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. परतायला त्यांना खूप उशीर झाला. रात्र फार झाली होती म्हणून आजी आणि तिच्या दोन मैत्रिणी घरी जायला निघाल्या. रात्रीचे जवळ जवळ २ वाजत आले होते. या आधी कधीच त्या इतक्या रात्री अश्या बाहेर पडल्या नव्हत्या. आजीची एक मैत्रीण वयाने तशी मोठी होती. तिला गावात बोलल्या जाणाऱ्या गोष्टींची कल्पना होती म्हणून ती पटपट चालत होती. तिच्यासोबत ह्या दोघी ही पटापट चालत होत्या. काही मिनिटातच त्या पुलाजवळ आल्या. तिथून चालत जाताना त्यांची चांगलीच तंतरली. कारण आज पर्यंत इतक्या रात्री त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर पडले नव्हते.
जश्या त्या काही अंतर पुढे चालत आल्या त्यांना जाणवले की पुलाच्या अगदी मधोमध कोणी तरी बसले आहे. मध्य रात्र उलटून गेली होती आणि अश्या अवेळी इथे कोण बसलय या नुसत्या विचाराने त्यांच्या अंगावर शहारे आले. जाण्यासाठी तो एकच रस्ता होता म्हणून त्या दिशेने त्या चालू लागल्या. जवळ आल्यावर त्यांना दिसले की एक बाई तिथे बसून काही तरी खात आहे. मळकट कपडे, विस्कटलेले केस असा विचित्र अवतार. चेहरा नीट दिसत नव्हता कारण तिचे तोंड दुसऱ्या दिशेला होते. अधून मधून एखाद्या जनावरासारखी गुरगुरत होती, हे ऐकून त्यांचे हात पाय भित ने लटपटू लागले. तरीही ते हिम्मत करून तिथून पुढे जाऊ लागले. त्यांना दिसले की ती बाई एक कच्चे मांस खात होती. ती त्यात इतकी मग्न झाली होती की आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचे तिला भानच नव्हते. अगदी कड पावलांनी त्या तिघी तिच्या बाजूने पुढे जाऊ लागल्या. तितक्यात त्यांची चाहूल लागली आणि ती बाई कुत्सितपणे हसली. जसे त्यांना याची जाणीव झाली त्या तिघी जिवाच्या आकांताने पळत सुटल्या. मागून त्या बाईचा किळसवाणा हसण्याचा आवाज परिसरात घुमत होता. त्या जरी वेगात पळत होत्या त्यांना जाणवू लागले की काही केल्या तो पुल संपत च नाहीये.
आता मात्र त्या घाबरल्या. बऱ्याच वेळ धावून झाल्यावर त्या एका ठिकाणी थांबल्या आणि काय करायचे विचार करू लागल्या. शेवटी आजी ची वयाने मोठी असलेली मैत्रीण म्हणाली “तिच्या घेऱ्यातून बाहेर पडायचे काहीही झाले तरी. मनात देवाचे नामस्मरण करा, आता आपल्याला दैवी शक्तीच वाचवू शकते.” त्या तिघींनी ही देवाचे नाव घेतले आणि जीव मुठीत घेऊन धावत सुटल्या. काही सेकंदात त्या पुलाच्या बाहेर आल्या. आजीने न राहवून मागे पहिले आणि तिचा उरला सुरला त्राण ही निघून गेला. कारण ती बाई त्याच्या मागे धावत येत होती. इतकेच नाही तर ती बाई त्यांना हाक मारत होती. कधी आईच्या आवाजात तर कधी वडिलांच्या. पुढे काही अंतरावरच विठ्ठलाचे मंदिर होते. त्या तिघीही धावत थेट मंदिरात गेल्या. बराच वेळ धावल्या मुळे खूप दमून गेल्या होत्या. ती रात्र त्यांनी मंदिरातच काढली. रात्री कधी झोप लागली ते ही कळले नाही. पहाटे मंदिरातला पुजारी आला तेव्हा त्याने झोपेतून उठवून विचारले की काय झाले, तुम्ही मंदिरात काय करत आहात. तेव्हा आजीच्या मैत्रिणीने घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर तो पुजारी म्हणाला “थोडक्यात वाचलात तुम्ही, वेड्या सगुणी च भूत होत ते, जो तिच्या फेऱ्यात सापडतो त्याला घेऊन जाते ती, तुम्ही खूप नशीब घेऊन जन्माला आला आहात..” या प्रसंगानंतर माझी आजी जवळपास ३ दिवस अंथरुणाला खिळून होती.