अनुभव – अथर्व शिंदे

हा अनुभव माझ्या आजोबांना आला होता. त्यांच्या तरुण्यातला हा प्रसंग. त्या काळी आमचे शेत होते. सर्व शेताचे काम ते एकटेच पाहायचे. तेव्हा दिवाळी उलटून एक आठवडा झाला होता आणि भाताची कापणी सुद्धा झाली होती. आता भात मार्केट यार्ड मध्ये आणून विकायचा बाकी होता.  त्याकाळी वाहतुकीची साधने जास्त नव्हती म्हणून आजोबांनी शेजारच्या गावातील एका ट्रक वाल्याला गाठून शहरात जायचं ठरवलं. तो ट्रकवाला सुद्धा तयार झाला. पण ऐन वेळी एक घोळ झाला. आजोबांबरोबर मदतीला अजून एक माणूस येणार होता. पण जायच्या आदल्या रात्री तो आजारी पडला त्यामुळे आता आजोबांना एकट्याला त्या ड्रायव्हर सोबत जावे लगणार होते. थांबून ही चालणार नव्हते म्हणून गावातल्या १-२ जणांची मदत घेऊन सगळा माल भरला आणि निघाले. मार्केट मध्ये आल्यावर मालाचा लिलाव होईपर्यंत संध्याकाळ झाली. सगळे आटोपल्यावर त्यांनी तिथल्याच एका खानावळीत जेवण उरकलं. रात्र गडद होत चालली होती. पण तरीही त्यांनी गावची वाट धरली. त्या काळी गावाकडच्या रस्त्यांना दिवे ही नसायचे. म्हणून ड्रायव्हर सुद्धा मंद गतीने ट्रक चालवत होता पण त्याच्या हाताखाल चा रस्ता असल्याने तो अगदी निर्धास्त होता. 

मध्य रात्र उलटून गेली. अजुन जवळपास निम्मा प्रवास बाकी होता. एका मोठ्या धरणाचा रस्ता ओलांडून अर्धा तास झाला असेल. अचानक त्यांना रस्त्याच्या अगदी मधोमध कोणी तरी उभे दिसले. आजोबा जरा गोंधळले. ट्रक ड्रायव्हर ही पाहू लागला की असे रस्त्यात कोण उभे आहे. ट्रक जस जसा जवळ जाऊ लागला तसे त्यांना जाणवले की तो एक अतिसामान्य उंची असलेला माणूस आहे. म्हणजे जवळपास साडे सात ते आठ फूट उंच. पोशाख तसा गावाकडचा सामान्यच. अंगात पांढरा सदरा जो त्याच्या अगदी पायापर्यंत येऊन टेकला होता. आजोबा पटकन म्हणाले “हॉर्न वैगरे देऊ नकोस, हळूच बाजूने काढ ट्रक”. ड्रायव्हर ने ही काही न बोलता अलगद एक चाक रस्त्यावरून खाली उतरवून ट्रक त्याच्या बाजूने काढला. काही अंतर पुढे आल्यावर ड्रायव्हर ने त्यांना विचारले “माहीत होत का कोण होता तो..?” आजोबा म्हणाले “नाही.. माहीत नाही.. का काय झाले..?” त्यांचे संभाषण चालू असतानाच पुन्हा तो माणूस रस्त्याच्या मधोमध उभा दिसला आणि आजोबांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांच्या मनातली शंका खरी ठरली. त्यांनी इतके दिवस ज्याच्या बद्दल गावकऱ्यांकडून फक्त ऐकले होते त्याचा सामना आज पहिल्यांदा होत होता. तो एक खविस होता. त्यांनी ड्रायव्हर कडे पहिले आणि दोघांनाही कळून चुकले को आपण खविसाच्या तावडीत सापडलो आहोत. 

आजोबा झटकन त्याला म्हणाले “ट्रक चा वेग वाढव आणि या वेळेस अजिबात बाजूने नेऊ नकोस, सरळ घेऊन चल.. जे होईल ते बघून घेऊ..” त्याने ट्रक चा वेग वाढवला, तो हळु हळु त्यांच्या जवळ येऊ लागला तेव्हा त्याची भेदक नजर त्यांना दिसली. पण काही कळायच्या आत तो ट्रक भरदाव वेगात त्यांच्या अंगावरून गेला आणि एक कर्णकर्कश किंचाळी कानावर पडली. त्या भयानक आवाजामुळे ड्रायव्हर चे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्यावरून खाली उतरून मातीत जाऊन रुतला. एक भयाण शांतता पसरली. आजोबा पटकन म्हणाले चल लवकर इथून. त्याने रेझ करून तिथून ट्रक काढायचा प्रयत्न केला पण चाक रूतल्यामुळे ती जागच्या जागी फिरू लागली. तितक्यात एक किळस वाणा आवाज कानावर पडला जर कोणीतरी गुरगुरत य. त्या आवाजाने सर्वांग शहारल. पण भानावर येत ड्रायव्हर ने देवाचे नाव घेतले आणि पुन्हा एकदा प्रयत्न केला तसा झटक्यासर्शी ट्रक तिथून बाहेर निघाला आणि पुन्हा रस्त्यावर आला. आता त्यांचा ट्रक रस्त्यावर सुसाट धावू लागला. पण इतक्यावरच त्यांची सुटका होणार नव्हती. तितक्यात ड्रायव्हर चे लक्ष साइड मिरर मध्ये गेले आणि तिथले दृश्य पाहून पुन्हा एकदा त्याचा ट्रक वरचा ताबा सुटला. 

या वेळेस वेगात असल्यामुळे तो ट्रक एका शेतात घुसला आणि मोठ्या झाडावर आदळून भीषण अपघात झाला. आजोबांनी डोळे उघडले तेव्हा ते एका हॉस्पिटल मध्ये होते. जशी शुद्ध आली तसे त्यांनी ड्रायव्हर बद्दल विचारणा केली. तेव्हा कळले की तो जागीच ठार झाला. गावातले लोक त्यांना पाहायला आले होते. तेव्हा जाणत्या लोकांनी विचारले की तुमच्या सोबत मद्य होते का म्हणजे दारूची बाटली वैगरे होती का, कारण त्याच्याच वासावर तो आला असणार. आजोबा माळकरी असल्यामुळे प्रश्नच नव्हता पण खर जाणून घेण्यासाठी जेव्हा ते त्या ठिकाणी गेले, तेव्हा त्यांना दिसल की ट्रक मधे खरच एक दारूची बाटली होती. असं वाटत होतं जणू आत्ताच काही वेळापूर्वी कुणीतरी ती पिऊन फेकून दिलीये. त्या अपघातात आजोबांच्या डोक्यात ट्रकचा पत्रा घुसला होता पण तरीही ते थोडक्यात वाचले होते. त्या जखमेमुळे त्यांच्या डोक्यात मोठी खोप खोच तयार झाली होती जी अजूनही आहे आणि त्यांना त्या भयानक प्रसंगाची आठवण करून देते. 

Leave a Reply