अनुभव – मंदार सुतार

धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून आम्ही एका थंड हवेच्या ठिकाणी ट्रीप प्लॅन केली होती. त्या ठिकाणचे वर्णन करायचे म्हंटले तर आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या पर्वत रांगा, श्वास रोखायला लावणाऱ्या खोल दऱ्या, भरपूर हिरवळ आणि तिथले थंडगार वातावरण असे ते निसर्ग रम्य ठिकाण. हे सगळे अनुभवण्यासाठी सगळ्या नातेवाईकांनी मिळून ही ट्रीप प्लॅन केली होती.

सगळ्यांनी दिवस ठरवला आणि आम्ही एक मोठी बस करून प्रवासाला सुरुवात केली. आमचा प्रवास एकदम सुखकर झाला. तिथे जवळच एक गाव आहे, तिथेच भावाचा मोठा बंगला असल्यामुळे सगळ्यांना राहायची सोय तिथेच केली होती. आम्हाला तिथे पोहोचायला संध्याकाळी ६ वाजले. तिथला निसर्ग रम्य परिसर पाहून मन अगदी तृप्त झाले. वातावरण ही अगदी शांत. अगदी कोणालाही हवे हवेसे वाटेल असेच. आम्ही ८ भावंड होतो. तिथे गेल्या गेल्या आम्ही बाहेर गार्डन मध्ये खेळायला गेलो. 

बॅट आणि बॉल वैगरे घेऊन च आलो होतो. त्यामुळे लगेच टीम वैगरे पाडून आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता बॉल बंगल्याच्या कंपाऊंड बाहेर गेला तसे मी तो आणायला म्हणून भिंतीवर चढलो आणि तितक्यात बाहेरच्या बाजूला लक्ष गेले. तिथे एक काळी बाहुली, लिंबू, कुंकू जसे कोणी उतारा काढून ठेवला असेल असे दिसले. ते पाहताच मी एका क्षणासाठी दचकलोच. मी लगेच मागे फिरलो आणि पुन्हा कंपाऊंड च्या आत उडी मारली आणि कोणाला न सांगता बॅग मधून दुसरा बॉल आणला. 

हा इथला माझा पहिला विचित्र अनुभव होता. पण मी इतके मनावर घेतले नाही. सगळे खेळत असल्यामुळे वेळ कसा गेला कळलेच नाही. हळु हळु अंधार पडायला सुरुवात झाली म्हणून आम्ही आत गेलो. आम्हा भावंडां साठी वर एक वेगळी रूम होती. आम्ही विचार केला की आधी जाऊन फ्रेश होऊ आणि मग पुन्हा खाली जेवायला येऊ. वर जाण्यासाठी जीन्या जवळ गेलो तर तिथे भावाच्या कुत्र्याला बांधले होते. 

मी वर जाणार तितक्यात तो वर पाहत जोरात भुंकू लागला. जसे वर आधीच कोणी तरी आहे आणि त्याला काही तरी दिसतेय. मी त्याला शांत करत वर पाहू लागलो पण मला कोणीही दिसत नव्हते. तितक्यात वरून टेनिस बॉल कोणी तरी खाली टाकला. मला वाटल की आमच्यापैकी कोणी तरी मुद्दामून घाबरवायला म्हणून करत असेल म्हणून मी तो बॉल घेऊन वर गेलो. माझी बॅग घेऊन मी बॉल आत ठेवणार तितक्यात बॅग मधला दुसरा बॉल दिसला आणि काळजात अगदी धस्स झालं. कारण हा तोच बॉल होता जो खेळत असताना कंपाऊंड च्याच बाहेर गेला होता. त्याला कुंकू वैगरे लागले होते. 

माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. मी तर तो बॉल आणायला गेलोच नाही मग हा बॉल इथे आलाच कसा. मी हा विचार करत असतानाच माझा भाऊ तिथे आला. मी मनात म्हंटले की यांना काही सांगितले तर ते हे मलाच वेड्यात काढतील. म्हणून मी तो विषय तिथेच सोडून दिला. मी फ्रेश होऊन काही वेळात खाली गेलो. कॅरम चा बेत मांडला होता. तास भर कॅरम खेळून झाल्यावर आम्ही साधारण ९ ला जेवायला बसलो. शुक्रवार असल्यामुळे नॉन वेज केलं होत. सगळ्यांनी अगदी पोट भर जेवण केलं. 

बऱ्याच दिवसांनी असे सगळे एकत्र जमले होते. त्यामुळे जेवण आटोपल्यावर गप्पा गोष्टी सुरू झाल्या. बोलता बोलता १२.३० होऊन गेले कळलेच नाही. तसे बाकी सगळे जण झोपायला गेले. आता आम्ही ७-८ भावंड राहिलो होतो. आम्ही ही वर रूम मध्ये झोपायला गेलो पण आम्हाला कोणालाही अजिबात झोप लागत नव्हती. म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवल की आज रात्री कोणीही झोपायचे नाही. पूर्ण रात्रभर मस्त मजा करायची. आणि जर कोणी झोपले तर त्याने दुसऱ्या दिवशी पार्टी द्यायची सगळ्यांना. 

पण ती रात्र वैऱ्याची ठरणार होती याची आम्हाला पुसटशी कल्पना ही नव्हती. आम्ही पत्ते खेळायला घेतले. दीड दोन तास पत्त्याचे डाव रंगल्यावर भावाच्या डोक्यात कुठून कल्पना आली कोण जाणे, तो म्हणाला की चला आपण सगळे खाली एक राऊंड मारून येऊया. एव्हाना २.३० वाजत आले होते म्हणून आमच्यातले काही जण जायला तयार नव्हते. त्यात बाहेर अगदी गडद अंधार आणि तिथली शांतता आता जीवघेणी वाटत होती. 

पण शेवटी आम्ही बाहेर फिरून यायचे नक्की केले. एव्हाना घरातले सगळे गाढ झोपी गेले होते. आम्ही हळूच कोणालाही न कळू देता बंगल्यातून बाहेर पडलो. वातावरणात एक वेगळाच थंडावा पसरला होता. त्यात ती निरव शांतता. वातावरण हवेशीर असूनही मला मात्र गुदमरल्यासारखे वाटत होते. १०-१५ मिनिट बाहेर फिरून झाल्यावर मी सगळ्यांना आत जाण्यासाठी सांगू लागलो कारण मला अजिबात करमत नव्हते. तसे आम्ही पुन्हा आत आलो. 

बाहेर फिरून आल्यामुळे सगळ्यांची झोप उडाली होती. मग आता काय करायचं म्हणून आम्ही युट्यूब वर भुतांच्या गोष्टी ऐकायचे ठरवले. सगळे घोळका करून बसलो आणि मधोमध मोबाईल ठेवला होता. खूप भीती वाटतं होती पण मजा ही तितकीच येत होती. ३ वाजून गेले. तितक्यात आमच्यातला एक भाऊ म्हणाला की आपण इथे रूम मध्ये बसून गोष्टी ऐकण्यापेक्षा टेरेस वर जाऊन ऐकू. अजुन मजा येईल. मी आधी नको म्हणालो पण नंतर सगळे तयार झाले म्हणून माझा ही नाईलाज झाला. 

आम्ही टेरेस वर जाताना सतत वाटत होत की आल्या पाऊली पुन्हा मागे जावं. एक वेगळीच अनामिक भीती जाणवत होती. वर आल्यावर चंद्र प्रकाश ही नव्हता. चंद्र ही कुठे लपून बसला होता काय माहीत. होता तो फक्त गडद अंधार. मला तिथे क्षणभर ही थांबण्याची इच्छा नव्हती. आम्ही तिथे ही घोळका करून बसलो आणि गोष्ट ऐकायला सुरुवात केली. साधारण १५ मिनिट झाली असतील. अचानक गारवा वाढायला सुरुवात झाली. आता तो गार वारा अगदी असह्य होत होता. हळु हळु असे जाणवू लागले की आमच्या भोवती कोणी तरी फेऱ्या मारते य. पण अंधार असल्यामुळे नक्की काय आहे तेच दिसत नव्हते. 

या अश्या अनोळखी ठिकाणी आणि भयानक वातावरणात भुताच्या गोष्टी ऐकुन आमच्या बहिणी तर पार घाबरून गेल्या आणि पुन्हा रूम मध्ये जायचा हट्ट करू लागल्या. आम्ही ही त्यांचे ऐकुन पुन्हा खाली जायला निघालो. माझा भाऊ पुढे जाऊन टेरेस चा दरवाजा उघडू लागला पण तो काही केल्या उघडत च नव्हता. मला वाटल की हा मस्करी करतोय. सगळ्यांना घाबरवायला मुद्दामून करतोय. म्हणून मी दरवाजा उघडायला गेलो पण असे वाटत होते की आतून दरवाजा कोणी तरी घट्ट पकडून ठेवलाय. 

पण घरात तर सगळे झोपले होते. आणि जरी कोणाला कळले असते तर आम्हाला चांगलाच ओरडा बसला असता. आम्ही दरवाजाच्या फटीतून काठी टाकून कडी लागली असेल तर उघडायचा प्रयत्न करू लागलो. आता मात्र आम्हाला ही भीतीने घाम फुटायला सुरुवात झाली होती. दरवाजा न उघडण्याचे काही कारण दिसत नव्हते. तितक्यात आम्हाला आमच्या मागून विचित्र चाहूल जाणवू लागली. आम्ही सगळ्यांनी मागे वळून पाहिले. कठड्यावर एक काळी कुट्ट मांजर बसली होती आणि आमच्याकडे पाहून अतिशय विचित्र आवाजात ओरडत होती. तिचा तो आवाज ऐकुन आमच्या बहिणी तर अक्षरशः रडू लागल्या. 

आमचा प्रयत्न चालूच होता. तितक्यात अचानक दरवाजा आपोआप उघडला. सगळे पटापट रूम च्याच दिशेने धावत सुटले. मी सगळ्यात मोठा असल्यामुळे मी शेवटी जायचे ठरवले. हे सगळे घडत असताना माझी नजर त्या मांजरीवरच होती. जसे सगळे खाली गेले तसे मी दरवाजा लाऊन घ्यायला मागे वळलो तितक्यात तो दरवाजा बाहेरच्या बाजूने जोरात ओढला गेला. माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. बाहेर नक्की कोणी तरी होत. फक्त ते आम्हाला कोणाला दिसत नव्हत. जड पावलांनी मी रूम च्याच दिशेने जायला निघालो आणि तितक्यात कोणी तरी कानात पुट पुटले “मी पण येऊ का तुमच्या सोबत”..

आता मात्र माझ्या हातापायाला कंप सुटू लागला. तो आवाज एका लहान मुलीचा होता. मी सरळ धावत रूम मध्ये आलो आणि रूम चा दरवाजा लाऊन घेतला. सगळे मला विचारू लागले की धावत यायला काय झाले. तसे “काही नाही” म्हणत मी उत्तर देणे टाळले. ती रात्र आम्ही खरंच झोपू शकलो नाही. हे सगळे विचित्र अनुभव मला आयुष्यात पहिल्यांदाच आले. आणि यामुळे भीती नक्की काय असते हे मी अनुभवू शकलो. 

Leave a Reply