अनुभव – राजेंद्र तिवारी

ही घटना साधारण ३० वर्षांपूर्वीची म्हणजे १९९० साल ची आहे. त्या काळी मी शिक्षणा सोबत च टेम्पो ड्राइव्हर म्हणून काम करायचो. बहिणीच्या नवऱ्याने तिला नकार दिल्याने ती आणि तिची लहान मुलगी माझ्याच घरी राहायचे. खेडेगाव होते ते त्यामुळे वस्ती अगदी तुरळक. पैश्याची चण चण भासत असल्याने मी नेहमी जास्तीचे काम शोधत असायचो. त्याच वेळी माझ्या ओळखीतल्या माणसाने एका कामा बद्दल सांगितले. आत्महत्या केलेल्या, खून झालेल्या किंवा रहस्यमयी मृत्यू झालेल्या मृतदेहाला टेम्पो मधून पोस्ट मोर्टेम साठी जिल्ह्याच्या इस्पितळात घेऊन जायचे. मी कसलाही विचार न करता लगेच तयार झालो कारण त्या वेळी मला पैसे कमावणे खूप गरजेचे होते.

त्यांनी एक साथीदार ही सोबतीला दिला होता. राजेश नाव होते त्याचे. आम्ही दोघं मिळून हे काम करायचो. साधारण २ वर्ष आम्ही हे काम केलं. कधी कधी अवस्था खूप वाईट असायची. कुजेलेले आणि अतिशय विद्रूप झालेले मृतदेह न्यायचो. त्या रात्री ही पी. एस. आय. साहेबांचा फोन आला की एका गरोदर बाईचा मृतदेह पोस्ट मॉर्ट म साठी न्यायचा आहे. तसे मी निघालो. तिथे गेल्यावर कळले की २ दिवसापूर्वी तिने विहिरीत उडी मारून जीव दिला होता. ती ७ महिन्याची गरोदर होती आणि गावकऱ्यांना २ दिवसानंतर तिचे प्रेत विहिरीत सापडले होते. आम्ही कसे बसे तिला बाहेर काढले. २ दिवस पाण्यात राहिल्याने त्वचा पूर्ण सडून गेली होती. चेहरा विद्रूप झाला होता आणि पोटाला अळ्या लागल्या होता. तो मृतदेह पाहून मी पहिल्यांदा भयभीत झालो होतो. तो घाणेरडा उग्र वास सहन होत नव्हता तरीही कसे बसे आम्ही तिचा मृतदेह टेम्पो मध्ये ठेवला. मागचा दरवाजा बंद करण्याआधी तिच्याकडे एकदा निरखून पाहिले तर असे जाणवले की ती माझ्याकडे क्रूरपणे पाहतेय आणि तिला इथून जायचेच नाहीये. 

मला साधारण २० किलोमीटर प्रवास करून तो मृतदेह पोस्ट मोर्टेम साठी डॉक्टरांच्या स्वाधीन करायचा होता. त्यात नेमका माझा साथीदार राजेश माझ्या सोबत नव्हता. मी साहेबांना विनंती केली की हवे तर मला पैसे कमी द्या पण कोणी सोबत पाठवा. इतक्या रात्री दुसऱ्या कोणाला शक्य नव्हते म्हणून ते म्हणाले की मीच येतो तुझ्या सोबत. मला जरा धीर आला. वेळ न दवडता आम्ही त्या ठिकाणाहून निघालो. प्रवासात आमच्या गोष्टी रंगल्या. अधून मधून त्या मागे लक्ष गेले की धडकी भरल्या सारखे व्हायचे आणि जीव अगदी कंठाशी यायचा. असे करत करत साधारण पावणे तीन व्हायला आले. साहेबांचा ही डोळा लागला. मी नीट लक्ष देऊन ड्राईविंग करत होतो. 

सगळे ठीक आहे की नाही हे तपासण्यासाठी मी मागे वळून पाहिले आणि माझी बोबडीच वळली. त्या बाईचा मृतदेह स्ट्रेचर सहित हवेत तरंगत होता. पुढच्या क्षणी हॅण्डल वरून माझा ताबा सुटू लागला कारण गाडी खूप जोरात हलू लागली. दणके बसत असल्याने साहेबांना हो जाग आली पण त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आम्ही दोघेही देवाचे नामस्मरण करत होतो. आम्हाला आता आर्त किंचाल्या ऐकू येऊ लागल्या पण आम्ही एकदाही मागे वळून पाहिले नाही. बहुतेक स्ट्रेचर वरून सुटण्याचा प्रयत्न ती करत होती. आम्ही हिम्मत एकवटून तसेच बसून राहिलो. मी जीव मुठीत धरून गाडी चालवत राहिलो. 

साधारण पावणे चार ला आम्ही जिल्ह्याच्या इस्पितळात ला येऊन पोहोचलो. तो पर्यंत मागची हालचाल पूर्णपणे थांबली होती. आम्ही तो मृतदेह डॉक्टरांच्या स्वाधीन केला आणि सुटकेचा निःश्वास सोडला. त्या रात्री नंतर ची पहाट पाहायला मिळेल असे वाटलेही नव्हते पण परमेश्वराच्या कृपेने आम्ही यातून सुखरूप पणे बाहेर पडलो. या घटनेनंतर मात्र मी ड्रायव्हिंग कायमचे सोडून दिले. 

Leave a Reply