लेखक – अंकित भास्कर

“हॅलो कुठ आहे ? आणखी किती वेळ लागणार ?”

मोबाईल कानाला लावतच समोरून येणाऱ्या उत्तराची वाट बघत बसलेली ‘ ती ‘ थोडी रागातच बोलत होती.

“फक्त दहाच मिनिटे ग, बॅगेत पाण्याची बाटली व आईने बनवलेलं काही खायला घ्यायचं राहून गेलं होत.”

समोरून येणाऱ्या उत्तराने ‘ ती ‘ पुढे बोलू लागली

” थोड लवकर ग, ११:३० ची शेवटची एस टी आहे ती चुकवू नकोस म्हणजे झालं. वाट बघतेय लवकर ये, ठेवते फोन.”

बोलतच कानाला लावलेला मोबाईल डोळ्याच्या समोर आणून सुरू असलेला कॉल कट केला. 

मोबाइलच्या पांढऱ्या रंगाच्या काचेत डाव्या बाजूला नजर फिरवली तर १०:४५ ची वेळ झालेली तिच्या लक्ष्यात आलं. आजूबाजूला नजर फिरवत आपल्या हातात असलेला मोबाईल बंद केला. एका मागासलेल्या गावाच्या वेशिबाहेर बांधलेल्या एस टी स्टँड च्या ५ फूट उंच भिंतीसमोर येजा करणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून बनवलेल्या लाकडी खुर्चीवर बसून ‘ ती ‘ आपल्या मैत्रिणीची वाट बघत बसलेली.

गाव मागासलेल असल्याने लोकांची वर्दळ खूप मंदावली होती. निमा व तिची मैत्रीण कॉलेजमधून सुट्टी काढून ३ दिवस आधीच गावी परतलेली. शहरातील कॉलेजमध्ये शेवटचा पेपर होता. आणि त्यासाठी रात्रीचा प्रवास करून परतीच्या मार्गाने जायला तिला भाग पाडलं होत. रात्र बरीच झाली होती. दिवसभर गप्पा मारता मारता दिवस कसा क्षितिजाकडे निघून गेला काही कळलंच नाही. तसे रात्री अपरात्री मैत्रिणीबरोबर प्रवास करणे हे तिच्यासाठी काही नवीन नव्हते. कॉलेजची सुट्टी वाया जाऊ नये म्हणून रात्रीचे प्रवास करून घरी परतायचे. प्रवास करण्यासाठी बसेस सुद्धा तुरळक असायच्या. आपल्या मैत्रिणीला यायला उशीर होणार होता हे तिला लक्षात आलं होत पण तिला मैत्रिणीची वाट बघण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच पर्याय नव्हता. लाकडी खुर्चीवर वाट बघत बसलेली ‘ ती ‘ आता आपल्या आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागली. उजव्या बाजूला नजर फिरवली तर रात्रीच्या अंधाराला थोडा कमी करत काळ्या रंगाच्या खंबावरचा बल्ब एकटाच काय तो लुकलुकत होता. त्याची अवस्था खराब झाल्याने अगदी कमी प्रकाश पसरवत होता. त्या फिक्कट नारंगी रंगाच्या उजेडात तिच्यापासून ३० ते ४० पावलांच्या अंतरावर एक भलंमोठं झाड होत. जे हवेच्या झोक्यासरशी हेलकावे घेत असलेल्या आपल्या निरनिराळ्या फांद्यांना सांभाळत उभ होते.

झाडाच्या खाली नजर गेली तर झाड्याच्या बुंध्याभोवती बसण्यासाठी एक गोलाकार कट्टा तयार केलेला. त्याचा एक भाग अक्षरशः तुटून कट्ट्यासाठी लागणारा माल ( सिमेंट, रेती, दगडाचे तुटलेले काही भाग ) इतरेतर पसरलेले होते. तेवढ्यात रस्त्याच्या डाव्या बाजूने येणारा ट्रक कर्णकर्कश हॉर्न वाजवत निघून गेला. तस तिच्या मनात एक विचार चमकून गेला. ती थोडी अस्वस्थ झाली. मनात हळु हळू भीती दाटून येऊ लागली. तोच तिची नजर आपल्या समोरच दृश्य न्याहाळू लागली. समोर काळोखाने माखलेल्या काळ्याकुट्ट निर्जन डांबरी रस्त्याचा पलीकडे एक काळीभोर मांजर आपल्या किलकिल्या डोळ्यांनी एकटक तिच्याकडे पाहत होती. तिचे लाल तांबूस रंगाचे डोळे त्या भयाण काळोखात आणखीनच गडद व भयाण वाटत होते. तिच्याकडे लक्ष जाताच तिच्या मनातली भीती वाढू लागली. तितक्यात नजरा नजर झाली आणि त्या भीतीने मनातल्या एका कोपऱ्याला स्पर्श केला तसा अंगावर सरसरून काटा आला. तिची नजर आता तिला साथ देत नव्हती. काळीज जोरजोरात धडधडत होत. तिने तिथून नजर फिरवली आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. मनात घर करून बसलेली भीती आता चेहऱ्यावर दाटून येऊ लागली. समोरच दृश्य बघून ‘ ती ‘ घाबरून पांढरी पडली. कारण समोर एक काळीकुट्ट मानवी आकृती उभी दिसली. तिला काही कळण्याच्या आत ती आकृती तिच्या दिशेने धावत सुटली. आणि डोळ्याचं पात लवत न लवत तितक्यात ती आकृती क्षणात कुठेतरी नाहीशी झाली. 

तीच सर्वांग शहरलं. त्या धक्क्यातून सावरत नाही तसे कसल्याश्या आवाजाने तीच लक्ष वेधून घेतलं. ती थोडी भानावर आली. आवाज….. कुणीतरी जोरात आपल्या दिशेने चालत येण्याचा आवाज….. तशी ती आवाजाच वेध घेऊ लागली, मनात नको नको ते विचार येत होते. तशी तिला आवाजाची चाहूल लागली, आवाज तिच्या मागच्या बाजूने येत असल्याचं जाणवलं. त्या दिशेने वळली आणि पुन्हा तीच भयाण आकृती तिच्या दिशेने धावत येताना दिसली. या वेळेस ती नाहीशी झाली नाही तर जोरात तिच्यावर झेपावली. ती घाबरून झटकन जागेवरून उठून उभी राहिली. काय झाले काही कळले नाही. अंग पुरतं घामानं भिजल होते. पुन्हा एक नजर समोरच्या निर्जन रस्त्यावर गेली पण तिची मैत्रीण अजूनही आली नव्हती. हातातला मोबाईल खाली जमिनीवर पडला होता. मोबाईल स्क्रीन वर वेळ पाहिली तर ११.३० झाले होते. तिने वाकून मोबाईल उचलला आणि मागे वळली. विजेचा झटका बसावा तशी ती शहारली कारण मागे तीच बसली होती, त्याच अवस्थेत, तिच्या मैत्रिणी ची वाट बघत. पण तिला आता याच अप्रूप नव्हत कारण ती इथेच बसायची वर्शोन वर्षे, अशीच, तिच्या कधीच न येणाऱ्या मैत्रिणीची वाट बघत. ती पुन्हा जाऊन त्या खुर्चीवर बसली. आणि तिचं निष्प्राण झालेलं शरीर कुठेतरी पुन्हा शून्यात पाहत बसले. 

Leave a Reply