अनुभव – महेक राठोड
ही घटना माझ्यासोबत साधारण ३-४ वर्षांपूर्वी घडली होती. माझे काका वारल्यामुळे त्यांचे दिवस कार्य होते म्हणून मी माझ्या गावी गेले होते. माझे गाव गुजरात मध्ये आहे. गावाला येऊन काही दिवस झाले होते. माझ्या गावातल्या घराभोवती खूप मोठी झाडे आहेत आणि त्या व्यतिरिक्त तो परिसरच गर्द झाडीने भरलेला आहे. त्या दिवशी रात्री झोपलेली असताना मला त्या झाडीत एक सळसळ जाणवली म्हणून मी खिडकीतून त्या दिशेला पाहू लागले. अंधार असल्यामुळे नीट काही दिसले नाही पण तिथे कोणी तरी होत एवढे मात्र नक्की. एखादे पांढरे कापड अथवा मोठा फडका. पण त्याकडे दुर्लक्ष करून मी झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी अगदी त्याच वेळेला पुन्हा आवाज आला. मला कळत नव्हते की या बद्दल मी कोणाला सांगू. कोणी तरी आपल्या घरा भोवती आहे आणि आपल्यावर लक्ष ठेऊन आहे असे सतत वाटायचे. ती संपूर्ण रात्र मी त्याच विचारात जागून काढली. तिसऱ्या दिवशी न राहवून मी माझ्या मोठ्या बहिणीला सांगितले. पण ती म्हणाली की काहीच नसेल तुला नक्कीच भास झाला असेल. तिने माझे बोलणे असेच उडवून दिले. मी माझ्या रूम मध्ये आले आणि पुन्हा त्याच विचारात गुंतले. मला इतके माहीत होते की तिथे नक्की कोणीतरी आहे. कारण झाडातली सळसळ साधी सुधी नव्हती. कोणीतरी चालत असल्याचे स्पष्ट जाणवायचे. तिसऱ्या दिवशी रात्री ही अगदी तसाच प्रकार घडायला सुरुवात झाली. मी लपून च खिडकीतून बाहेर पाहू लागले. माझी नजर चौफेर फिरू लागली. तितक्यात दिसले की ते जे कोणी आहे ते एका झाडा मागून मलाच पाहतंय. काळजात अगदी धस्स झाले.
पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले भासत होते. कारण त्या अंधारात ही ते उठून दिसत होते. त्या रात्री मी टेन्शन घेतल्यामुळे जेवण ही नव्हते केले आणि तशीच रूम वर आले होते. खिडकी बंद करून पडदे सरकवले आणि मी झोपायचा प्रयत्न करू लागले. मला झोप लागली पण २ च्या सुमारास अचानक जाग आली. घशाला कोरड पडली होती. म्हणून मी उठून स्वयंपाक घरात पाणी प्यायला गेले. तिथे मी जे काही भयानक दृश्य पाहिले ते मी अगदी आज पर्यंत विसरू शकले नाहीये. स्वयंपाक घराच्या खिडकी बाहेर तीच पांढरट आकृती उभी होती. माझ्याकडे च एक टक पाहत. ते भयानक दृश्य पाहून माझे पाय जागीच थिजले. मला काय करावे काहीच सुचत नव्हते. मी इतकी घाबरले की माझ्या हातातून पाण्याचा पेला निसटला आणि मी जोरात किंचाळले. माझे ओरडणे ऐकून घरातले सगळे जण धावत आले आणि काय झाले ते मला विचारू लागले. पण मी मात्र निशब्द एकटक त्या खिडकी कडेच पाहत होते. जणू माझी नजर तिथेच अडकून पडली होती. माझ्या वडिलांनी मला जोरात हलवून भानावर आणले पण मी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मला खूप ताप भरला. वडिलांनी मला बेडवर नेऊन झोपवले. सकाळी उठल्यावर कला रात्रीचा सगळा प्रसंग मी घरच्यांना सविस्तर सांगितला. पण आज पर्यंत मी शोधू शकले नाहीये की जो मला रात्री दिसायचा तो नक्की कोण होता..