अनुभव क्रमांक – १

अक्षय बचाटे

ही घटना मार्च २०१३ ची आहे. मी अगदी लहानपणापासून माझ्या आजी आजोबा, मामा आणि माऊशी सोबत राहायचो. माझ्या आई वडिलांबरोबर अगदी कमी राहिलो असेन. मामा आणि माझे अगदी चांगले जमायचे. आमचे नाते एखाद्या मैत्री सारखे होते. आमचे घर म्हणजे एक मोठा वाडा होता आणि समोर भले मोठे अंगण. काही जुने लोक म्हणायचे की खूप वर्षांपूर्वी आमचे घर होण्याआधी त्या भागात एक स्मशानभूमी होती. पण मी तश्या गोष्टींकडे लक्ष द्यायचो नाही. 

त्या वर्षी मामाचे लग्न ठरले होते म्हणून मी खूप खूष होतो. त्याच आनंदात त्या दिवशी आम्ही नाईट आऊट करून एन्जॉय कराय चा प्लॅन केला होता. दोघेच असलो तरी आमच्यात भरपूर गप्पा रंगायच्या. मी संध्याकाळी जाऊन कोल्ड ड्रिंक वैगरे घेऊन आलो. आमच्याच घराच्या अंगणात बसणार होतो त्यामुळे काही काळजी करण्यासारखे कारण नव्हते.

जेवण वैगरे आटोपून आम्ही टेबल आणि खुर्च्या अंगणात घेऊन आलो. आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि मामा ने बोलता बोलता भुतांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. मी ही त्याचे बोलणे मन लाऊन ऐकत होतो. नंतर त्याचे सांगून झाले की मी ऐकलेल्या काही गोष्टी त्याला सांगत होतो. रात्रीचा १.३० वाजत आला होता पण आमच्या गप्पा सुरूच होत्या. मामाने कोल ड्रिंक चा शेवटचा घोट घेतला आणि ग्लास खाली ठेवला. तो अचानक एकदम शांत झाला होता.

माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. मी त्याला काही विचारणार तोच मला ही जाणवले की तो कसला तरी आवाज ऐकण्यासाठी शांत झालाय. मी ही काही न बोलता त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागलो. वातावरणात अगदी स्मशान शांतता पसरली होती. आमच्या घराच्या मागच्या बाजूला घुंगरांचा आवाज ऐकू येऊ लागला. तसे मी मामा ला म्हणालो “चोर वैगरे आले असतील, ती कुऱ्हाड घेऊन चल, आपण बघून येऊ नक्की कोण आहे ते”

पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहून वाटले की तो ही बराच घाबरला आहे. तो लगेच काही बोलला नाही पण नंतर त्याने कसला तरी विचार केला आणि आणि म्हणाला “आपण जर आता तिथे पाहायला गेलो तर पुन्हा परत येऊ शकणार नाही कारण आज अमावस्या आहे”. मामाचे बोलणे ऐकून माझ्याही मनात एक अनामिक भीती निर्माण होऊ लागली होती. हळू हळू तो घुंगरा चा आवाज वाढू लागला होता. मी लहान असल्यामुळे लगेच मामा मला घरात घेऊन आला. 

जास्त काही चर्चा न करता आम्ही दोघेही अंथरुणात जाऊन झोपलो. मला तर काही वेळात झोप लागली पण जेव्हा मला अधून मधून जाग येत होती तेव्हा मी पाहिले की मामा जागाच आहे. कदाचित त्याला काळजीपोटी आणि भीतीपोटी झोप लागत नव्हती. रात्री साधारण ३ च्याच सुमारास एक कर्णकर्कश किंचाळी ऐकू आली तसे मी ताडकन उठून बसलो आणि माझा मामा ही दचकून उठून माझ्या कडे पाहत होता. ती किंचाळी ऐकुन असे वाटत होते की कोणी तरी वेदनेने कळवळत आपल्या जीवाची भीक माग तय. मी जाऊन सगळ्यांना उठवले. आम्हाला दोघांना हि भीतीने घाम फुटला होता. ती रात्र आम्ही कशी बशी काढली. पण तो घुंगारांचा आवाज, ती किंचाळी हा नक्की काय प्रकार होता हे आज पर्यंत कळू शकले नाही. 

अनुभव क्रमांक – २

रोहित पाटील

ही घटना माझ्या वडिलांसोबत घडली होती. तेव्हा ते अगदी लहान म्हणजे साधारण १२ वर्षांचे असावेत. त्या काळी टी व्ही वैगरे काही प्रकार नव्हता. त्यामुळे मनोरंजन करण्यासाठी सिनेमा बघायचे म्हंटले तर वर्षा तून १-२ वेळा जत्रे मध्ये पाहायला मिळत असे. त्यासाठी सुद्धा पलीकडच्या गावात जावे लागायचे.

दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही ते सिनेमा पाहण्यासाठी पलीकडच्या गावात जाणार होते. पण त्या रात्री अमावस्या असल्याने आजी त्यांना पाठवायला तयार नव्हती. आजी त्यांना समजावून सांगत होती की आज अमावस्या आहे, त्या गावात जाताना पुल लागतो, तिथे कोणी भेटले तर त्यांच्याशी संवाद साधू नको. माझी इच्छाच नाही तू आज रात्री जावे. माझे ऐक इतक्या रात्री अपरात्री जाणे बरे नाही.

पण ते हट्टी असल्याने आजीचे न ऐकता रात्री जत्रेला जायला निघाले. काही वेळात जत्रेच्या ठिकाणी येऊन पोहोचले. सिनेमा पाहण्यासाठी तिकीट वैगरे काढून आत जाऊन बसले. पण सिनेमा पाहता पाहता त्यांना गाढ झोप लागली. शेवटचा खेळ असल्यामुळे सिनेमा संपल्यावर सगळे लोक निघून गेले. तिथला माणूस जेव्हा आत पाहायला आला तेव्हा माझ्या वडिलांना त्याने उठवले. तो पर्यंत बराच उशीर झाला होता. ते तिथून बाहेर पडले. जत्रेतील दुकान बंद होऊन बराच वेळ उलटून गेला होता त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट पसरला होता. 

त्यात गावाकडचा परिसर असल्यामुळे लोकांची वर्दळ ही नव्हती. ते त्यांच्या गावाच्या दिशेने जायला निघाले. इतक्या रात्री कोणा व्यक्तीची सोबत मिळणे ही शक्य नव्हते. काही मिनिटांचा रस्ता पार केल्यावर ते त्या पुलाजवळ आले. त्यांना आजीने सांगितलेली गोष्ट आठवली तशी हळू हळू त्यांच्या मनात भीती दाटू लागली होती. मन घट्ट करून आजूबाजूला न पाहता ते झपझप पावले टाकत पुलावरून चालू लागले. कधी एकदा हा पुल ओलांडून पलीकडे जातो असे झाले होते. तो काही सेकंदाचा रस्ता ही अगदी तासाप्रमाणे भासत होता. 

ते पुल ओलांडून पलीकडे आले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तसे मागून एक भरडा किळसवाणा आवाज कानावर पडला “कुठे चालला आहेस!”.. ते जागेवरच स्तब्ध झाले. तो आवाज ऐकून त्यांचे काळीज भीती ने धड धडू लागले होते. त्यांनी हिम्मत एकवटून मागे पाहिले पण मागे कोणीही नव्हते. तसे पुन्हा गावाच्या दिशेला जायला ते वळले आणि विजेचा तीव्र झटका लागावा तसे ते शहारले. त्यांच्या समोर एक वृद्ध व्यक्ती उभा होता. काही कळण्या आत त्याने आपला हात मागच्या बाजूला नेला आणि आपल्याच पाठीत खुपसलेला एक सुरा बाहेर काढला. 

ते भयानक दृश्य पाहताच त्यांना भुरळ आली आणि ते तिथेच बेशुद्ध होऊन पडले. जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते स्वतःच्या घरातल्या बिछान्यावर होते. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर त्यांचे बरेचशे नातेवाईक उभे होते. त्यांची विचारपूस करत होते. वडिलांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा सगळे त्यांना ओरडून म्हणाले “आजपासून तू रात्री अपरात्री बाहेर जायचे नाहीस”. त्यानंतर वडिलांनी पुन्हा कधी या बद्दल जास्त पाठपुरावा केला नाही त्यामुळे तो वृद्ध माणूस नक्की कोण होता हे त्यांना कधीच कळले नाही. 

अनुभव क्रमांक – ३

भरत घाडगे

माझे १२ वी पूर्ण झाल्यानंतर मी एका बॉईज हॉस्टेल मध्ये नाईट ड्युटी चा जॉब करायचो. नुकताच जॉब ला लागलो होतो. तिथला परिसर वैगरे सगळे माझ्यासाठी नवीन होता. त्याच वेळी नवरात्रीचे दिवस चालू होते पण या बद्दल मला कल्पना नव्हती कारण आमच्या परिसरात नवरात्र वैगरे साजरे करत नसायचे. 

त्या रात्री मी जॉब ला लवकरच गेलो पण का कोण जाणे खूप झोप येऊ लागली. आता नाईट ड्युटी असल्यामुळे झोपून चालणार नव्हते. झोप उडवण्यासाठी मित्राला फोन केला. त्याच्याशी तास दोन तास बोललो. आणि साधारण १.३० च्या सुमारास बोलणे आटोपून फोन ठेवला. तितक्यात मला एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. बॉईज हॉस्टेल मध्ये मुलगी कुठून आली असा विचार करत मी त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागलो.

तो आवाज हॉस्टेल च्या मागच्या बाजूने येत होता. तसे मी धावतच मागच्या बाजूला गेलो. पण तिथे जात असताना असे जाणवले की तो आवाज माझ्यापासून लांब जातोय. मी हॉस्टेल च्या मागे आलो आणि सगळी कडे पाहू लागलो. पण तिथे कोणीही दिसत नव्हते. भास झाला असेल असा विचार करून मी माझ्या जागेवर जायला निघालो पण अचानक पुन्हा तो आवाज माझ्या कानावर पडला. या वेळेस असे जाणवले की तो आवाज त्या हॉस्टेल च्या दुसऱ्या मजल्यावरून येतोय. मला वाटले की मला येताना पाहून ती मुलगी घाबरून वर गेली असावी.

मी कसलाही विचार न करता त्या मजल्यावर जायला निघालो. तिथे पोहोचल्यावर जाणवले की तो आवाज एका अंधाऱ्या कोपऱ्यातून येतोय. मी नक्की कोण आहे हे पाहायला पुढे जाऊ लागलो आणि अचानक एका क्षणाला तो आवाज यायचा बंद झाला. माझ्या सोबत नक्की काय घडतेय हेच मला उमगत नव्हते. २-३ मिनिटानंतर पुन्हा तो आवाज ऐकू येऊ लागला. या वेळेस तो आवाज तिसऱ्या मजल्यावरून येत होता. आता मात्र मी घाबरलो आणि मला घाम फुटू लागला. हृदयाचे ठोकेही वाढत चालले होते. 

पण हा प्रकार नक्की काय आहे याचा सोक्ष मोक्ष लावायचे ठरवले. आणि सगळी हिम्मत एकवटून त्या आवाजाचा पाठलाग करत मी तिसऱ्या मजल्यावर जायला निघालो. तिथे पोहोचल्यावर तो आवाज पुन्हा बंद झाला. जास्त विचार न करता मी खाली जायला निघालो. खाली आल्यावर पुन्हा एकदा तो आवाज येऊ लागला. या वेळेस तो आवाज माझ्या अगदी जवळून येत होता. मी त्या दिशेने पहिले तेव्हा कळले की तो आवाज एका पडक्या विहिरीतून येतोय. 

आता त्या विहिरी जवळ जाऊन आत कोण आहे हे डोकावून पाहण्या इतका शहाणपणा मी मुळीच केला नाही. पण मला कळून चुकले की हा काही तरी भयंकर प्रकार आहे. मी हॉस्टेल च्या रिसेप्शन ठिकाणी जाऊन गपचुप बसलो. तिथे साईबाबांचा एक फोटो होता. मला एक वेगळाच आधार वाटत होता. मी आई ला फोन करून जे घडत होते ते सांगू लागलो. ती म्हणाली तिथेच बसून रहा. कुठे बाहेर जाऊ नकोस. आज पासून नवरात्री सुरू होतेय. आज पासून देव बांधले जातात आणि भूत मोकळी होतात. आईचे बोलणे ऐकून मी अजुन घाबरलो होतो. ती रात्र मी कशी काढली माझे मलाच माहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी गेलो आणि घरूनच जॉब सोडल्याचे कळवले. 

Leave a Reply