अनुभव – अविनाश शिंदे

मी लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या लाडक्या आत्या कडे जायचो. तेव्हा मी साधारण 10-11 वर्षांचा असेन.. माझी आत्या हि जरा वयस्करच होती. एके दिवशी आम्ही 6 ते 7 मुलं रात्री 8 च्या दरम्यान खेळत असतांनाच त्या पूर्ण परिसरातली लाईट गेली. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवले कि आपण एकमेकांना भुताच्या आणि विचित्र गोष्टी सांगायच्या. आम्ही सर्व आत्याच्या घरा समोरील ओट्या वर गोल करून बसलो आणि गोष्टी रंगायला सुरवात झाली. एकीकडे आमचे हे पोरखेळ चालू असतांना आमच्या कोणाच्याही लक्षात आले नाही कि कधी माझी आत्या आमच्या पासून अगदी थोड्या अंतरावर येउन बसली आणि आमचं सगळं बोलण ती ऐकतेय. आम्ही सर्वांनी तिच्या कडे बघितले तेंव्हा ती आमच्या पोरकट गोष्टी ऐकून हसू लागली आणि आम्ही हि आमची टिंगल झाली म्हणून हसु लागलो. मग ती आमच्या जवळ येऊन बसली आणि हसता हसता म्हणाली कि मुलांनो मी हि एक गोष्ट सांगु का ?? 
आम्ही सगळ्यांनी उत्सुकतेने होकार दिला.

मग आत्याने तिच्या जवळ असलेली मिसरीची पुडी काढून तिच्या एका हातावर घेतली आणि दुसऱ्या हाताचे बोट त्यात बुडवून तिच्या गोष्टीला सुरवात केली.. हि गोष्ट होती माझ्या पणजी ची जी माझ्या आत्याला आजोबांनी सांगितली असावी…

माझ्या पणजी चे नाव रुक्मिणी. पणजोबांच्या धाकटया भावाचे लग्न ठरले होते. पाहुण्यांची ये जा चालूच होती. भरपूर नातेवाईक ही येत होते. माझ्या पणजीचा लाडका गुणा ही नुकताच आला होता. गुणा म्हणजे माझ्या पणजीच्या भावाचा एकुलता एक मुलगा. तसे त्याचे नाव गुणाजी होते पण त्याला प्रेमाने सगळे गुण्याच म्हणत. तेव्हा साधारण 6 वर्षाचा असेल तो. माझ्या पणजीचा गुणावर खूप जीव होता.

घरी लग्न कार्य असल्यामुळे सगळे खूप आनंदी होते.पण त्याच रात्री असे काही विपरीत घडले ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम आटोपल्या नंतर सर्वजण गाढ झोपेत होते. सुमारे 3 वाजेच्या दरम्यान गुण्या शौचास जायचे म्हणून उठला. आणि त्याने त्याच्या वडिलांना ही उठवले. त्यावेळी घरात व बाहेर शौचालय नसल्याने मोकळ्यात च लोक जात असत. गुण्या व त्याचे वडील घरापासून लांब काही अंतरावर गेले आणि गुणा ला लवकर आवर असे म्हणत त्याच्या पासून थोड्या अंतरावर कंदील घेऊन उभे राहिले. इतर लहान मुलांप्रमाणे गुण्या तसा थोडा खोडकरच होता. त्याच्या पासून थोड्या अंतरावर 4 कुत्रे एकमेकांशी भांडत असल्या चे त्याने पाहिले आणि जवळच पडलेला दगड उचलुन त्या कुत्र्यांवर भिरकावला. असे त्याने 4-5 वेळा केले. तेवढ्यात ते 4 हि कुत्रे त्याच्या अंगावर धावून आले आणि त्याचा चावा घेऊ लागले. हे सर्व त्याच्या वडिलांच्या लक्षात तेंव्हा आले जेंव्हा गुण्या ओरडायला लागला. त्यांनी त्या कुत्र्यांना त्याच्या पासुन दूर करायचा खूप प्रयत्न केला. दगड, जवळ असलेली झाडाची फांदी घेऊन त्या कुत्र्यांना दूर करण्यासाठी मारू लागले पण ते कुत्रे काही गुण्याला सोडायचं नाव घेत न्हवते.

शेवटी त्याच्या वडिलांनी आरडा ओरड करून काही गावकरी बोलावले. ते सगळे हातात काही काठ्या घेऊन ताबडतोब धावत आले आणि त्या कुत्र्यांना पळवून लावले. पण तो पर्यंत त्या कुत्र्यांनी गुण्याच्या कोवळ्या त्वचेचे अक्षरशः लचके तोडले होते. रक्तस्त्राव झाल्याने त्याच अवस्थेत तो बेशुद्ध झालेला होता.

आपल्या मुलाची अवस्था पाहून त्याचे वडील खूप घाबरून गेले आणि त्याला उचलून लगेचच घराकडे धावत आले. जोरजोरात दार वाजवू लागले. (रुक्मिणी आग दार उघड). माझ्या पणजीने दार उघडले आणि गुण्या ला त्या अवस्थेत बघून ती खूप जोरात किंचाळली. तो आवाज ऐकून सर्वांची झोपच उडाली. काय करावे काय नाही हे कोणालाच सुचत नव्हते. तितक्यात कोणी तरी उपाय सुचवला तसे गुण्याला गावात असलेल्या हकीमा कडे ताबडतोब घेऊन गेलो. त्याने लगेच त्याची मलम पट्टी करुन काही औषधे दिली. सगळे आटपून पहाटे 5 च्या सुमारास घरी आलो पण गुण्या अजुन हि शुद्धीत आलेला न्हवता.

त्याच्या आईचे हि रडणे थांबतच न्हवते. दुपार उलटली आणि गुण्याने डोळे उघडले. तो अजूनही अस्वस्थ आणि खुप घाबरलेला होता. त्याला खूप भयंकर तापही आला होता. ग्लानीत असल्याने नीट बोलता हि येत नव्हते. रात्री नक्की काय झाले हे त्याच्या वडिलांनाच सगळे विचारु लागले. त्याला एवढी दुखापत होईपर्यंत तुम्ही काय करत होता. तेंव्हा ते म्हणाले कि मला ना त्याच्या जवळ येतांना ते कुत्रे दिसले आणि ना हि मला त्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. जेंव्हा गुण्या ओरडला तेंव्हा मला ते कुत्रे दिसले आणि कळले कि ते 4 हि कुत्रे गुण्या ला चावत आहेत. मी आणि बाकी गावकऱ्यांनी त्या कुत्र्यांना मारायला सुरुवात केली. तेंव्हा हि ते कुत्रे भुंकत न्हवते फक्त एक विचित्र प्रकारे गुरगुरत होते.

हा सगळा प्रकार विचित्रच आहे हे सर्वांच्या लक्षात आल. घरातल्या मोठया लोकांनी सांगितले कि त्याला मांत्रिकाकडे घेऊन जा. संद्याकाळी लगेचच गुण्या ला घेऊन तिथे पोहोचलो. घडलेला सगळा प्रकार मांत्रिकाला सांगितला. त्याने गुणाकडे पाहून नक्की काय घडले ते सांगायला सुरुवात केली आणि सगळ्यांची वाचाच बंद झाली. ते 4 ही कुत्रे नसून श्वापदांच्या रुपात असलेले काही अतृप्त पिशाच्च होते, जे आपसात भांडत होते. गुण्या ने त्यांच्या गोष्टीत व्यत्यय आणल्यामुळे तो त्यांच्या कचाट्यात सापडला आणि त्याची अवस्था अशी झाली. त्याला ह्यातुन बरे करणे खूप अवघड आहे तरी मी माझे प्रयत्न करतो. त्याच्या जवळ असेलेला अंगारा त्याने गुण्याच्या पूर्ण शरीराला लावला आणि गुण्या शांतपणे झोपी गेला. थोडा अंगारा घरच्यांना हि दिला व बजावून सांगितले कि रोज झोपतांना त्याच्या अंगाला हा अंगारा लावून त्याची मलम पट्टी करत रहा.

सांगितल्या प्रमाणे गुण्याची आई दररोज तो उपचार करू लागली. पण कदाचित त्याच्या आई पेक्षा हि माझी पणजी त्याची काळजी घ्यायची. त्याला रोज खाऊपिऊ घालायची त्याचे डोके आपल्या मांडीवर घेऊन झोपी घालायची. हे करत असताना एक विचित्र गोष्ट तिच्या लक्षात आली कि 7 ते 8 दिवस झाले पण ना त्याच्या जखमा भरल्या आणि नाही त्याचा ताप उतरला. त्याचे अंग अजूनही तापाने फणफणतच होते. त्याला परत त्या मांत्रिकबाबा कडे घेऊन गेले. तेंव्हा बाबांनी सांगीतले की इतके उपचार करूनही काहीच फरक पडला नाही म्हणजे हा आता वाचु शकत नाही. खूप भयंकर बाधा झाली आहे. हे ऐकून सर्वांना धक्काच बसला, त्याची आई व माझी पणजी तर जोरजोरात रडू लागले. त्या बाबांच्या विनवण्या करून म्हणू लागले कि कृपया करून गुण्याला वाचवा काही तरी उपाय काढा पण त्याला काही होता कामा नये. तेंव्हा ते बाबा म्हणाले या बद्दल मी कोणालाच सहसा सांगत नाही पण तुम्ही इतक्या विनवण्या करत आहात म्हणून सांगतो 1 शेवटचा जीवघेणा उपाय आहे.

तो उपाय म्हणजे एखाद्या भूत प्रेताच्या पाया खालची माती आणून त्याच्या कपाळी लावायची. हि गोष्ट अशक्य च होती पण त्या बाबांना ह्या गोष्टींची चांगल्याच प्रकारे माहिती असल्याने त्यानें हे कार्य कसे करायचे हे सांगितले. त्या कार्याच्या काही अटी होत्या त्या पाळणे खूप गरजे चे होते.
दर अमावस्येच्या रात्री गावाच्या वेशी बाहेर शेवटच्या वडाच्या झाडा खाली भूत, प्रेत आणि अतृप्त आत्माचा वास असतो. त्या वेळी त्यांची जत्रा दिसते. त्या ठिकाणी जाऊन हे कार्य करावे लागेल. पहिली अट अशी कि हे कार्य एका स्त्रीनेच करावे आणि ती हि कुटुंबातील च असावी.दुसरी अट म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा पेहराव करून जायचे, त्यात केसांचा अंबाडा कपाळी बांधायचा, अंगावरील कपडे उलटे घालायचे म्हणजे नऊवारी काष्टा उलट म्हणजे पुढील बाजू मागे आणि मागची पुढे, पायात पण चप्पल उलटी – डाव्या पायाची उजव्यात आणि उजव्या ची डाव्यात, तिसरी अट होती कि कमरेला देव्हाऱ्यात ठेवतात ती छोटी कट्यार स्वतःच्या रक्षणासाठी आणि चौथी आणि सर्वात महत्वाची अट म्हणजे कि तिथे गेल्या नंतर तोंडातून एकही शब्द काढायचा नाही आणि ती माती घेतल्यावर घरी येई पर्यंत मागे वळून बघायचे नाही. ह्यात काहीही चुक झाली तर त्याही व्यक्तीला वाचवणे अवघड होईल.

हे कार्य आणि त्याच्या अटी ऐकूनच सर्वांना घाम फुटला होता. विशेषतः गुण्याचे आई वडील सुद्धा खूप घाबरून गेले होते त्यांनाही सुचत न्हवते कि आता काय करावे. पण माझ्या पणजी चा म्हणजे रुक्मिणी चा गुणावर खूप जीव असल्याने तिने कुठलाही विचार न करता हा जीवघेणा उपाय करण्यासाठी होकार कळवला. काही दिवस गेले आणि ती आमवास्यां ची काळी रात्र आली. त्या दिवशी घरातले सगळे जण चिंतेत होते, भयभीत होते आणि रुक्मिणी ची हि तशीच अवस्था झाली होती. पण तिने मन घट्ट करून स्वखुशीने गुणसाठी हा निर्णय घेतला होता. म्हणून ती चेहऱ्यावर काहीही दाखवत नव्हती. त्या रात्री सुमारे 12 :30 वाजता बाबांनी सांगितल्या प्रमाणे रुक्मिणी ने तयारी केली आणि गावाच्या वेशीवर असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ जायला निघाली.

तिथे पोहोचल्यावर त्या जत्रेची वाट बघू लागली. त्या रात्रीचा तिचा अवतार हि खूप विचित्र होता. कपाळा वर केसांचा अंबाडा घातलेला, कुंकवाच्या पाण्याने अर्धवट चेहरा लाल केलेला जसा रक्तानेच माखला आहे. कोळश्याने ओठांवर अश्या प्रकारे रेघा ओढलेल्या जसे तोंड शिवले आहे, अंगावरचे कपडे उलटे आणि पायातली चप्पल हि उलटी.
बराच वेळ उलटून गेला होता. रात्री चे 2 वाजत आले होते.

तिला चाहूल जाणवू लागली आणि चित्र-विचित्र आवाजांनी तिचे लक्ष विचलित झाले. भुतांची जत्रा त्या झाडाजवळ येऊन पोहोचली होती. आणि त्यात रुक्मिणी काळीज घट्ट करून सामिल झाली. ती वेळ खूप भयानक होती. आजूबाजूच्या वातावरणात लगेच बदल झाला होता, उन्हाळ्याचे दिवस असून हि रुक्मिणी ला थंडी भरून आली होती. त्यांच्यात चालत असताना तिला मान वर करण्याची मुभा नव्हती पण ती तिरक्या नजरेने आजूबाजूच्या पिशाच्चाना निरखून पाहत होती. रक्ताचे आणि मांस गळालेले, अर्धवट जळालेले विद्रुप चेहरे बघून रुक्मिणी खूप भयभीत झाली होती. तिचा जीव कंठाशी आला होता आणि हा सगळा प्रकार बघून जोरात ओरडावे असे तिला वाटत होते पण शांत राहण्याव्यतिरिक्त तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 

कारण तसे तिला त्या बाबांनी बजावून सांगितले होते. साधारण एक तास हा प्रकार चालू होता आणि रुक्मिणी योग्य संधीची वाट पाहत होती. रुक्मिणी चे नशीब बलवत्तर होते म्हणून अजून हि तिला त्यातले कोणीही ओळखले नव्हते. थोड्या वेळातच रुक्मिणी ने संधी साधून शेजारीच बसलेल्या अतुप्त आत्म्याच्या पायाखालची माती उचलून मुठीत आवळली. त्याच वेळी त्यातल्या काही आकृत्या अदृश्य होत होत्या. 

त्याच संधीचा फायदा घेऊन रुक्मिणी तेथून निघाली. दबक्या पावलांनी घराच्या दिशेने चालू लागली. तिला समोर घर दिसत होते आणि तेवढ्यात तिला मागून गुण्याचा आवाज ऐकू आला. तो ओरडत होता आणि जे नव्हते करायचे तेच रुक्मिणी ने केले. तिने मागे वळून पाहिले. पण तिच्या व्यतिरिक्त त्या वाटेवर कोणीही नव्हते. कसलाही विचार न करता ती घाबरलेल्या अवस्थेत घरी पोहोचली. लगेच तिने मुठीतली माती गुण्याच्या कपाळी लावली. काही दिवस उलटले आणि गुणाच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. गुणा आता पूर्ण बरा झाला होता. पण रुक्मिणी ची अवस्था खूप वाईट झाली होती. ती हळू हळू खूप आजारी पडली. तिच्या वर कुठल्याही औषधांचा फरक पडत न्हवता. खूप वैद्य खूप बाबा केले तरी हि तिच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती.

तीची एक चूक तिच्या आयुष्यावर बेतली कारण येताना तिने मागे वळून पाहिले होते. शेवटच्या काही दिवसात रक्ताच्या उलट्या, पोटात जंतू तिने नरक यातनाच भोगल्या होत्या. 6 महिने मृत्यू शी झुंज देऊन शेवटी तिची प्राणज्योत मालवली. पण मला माझ्या पणजी बद्दल खरच खुप अभिमान वाटतो कारण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने हे धाडस केले होते. आज मी 30 वर्षाचा आहे पण हि गोष्ट ऐकल्या नंतर आजही कुठेही कुत्रे रडत असतांना आणि भांडत असतांना खूप भीती वाटते. ही गोष्ट कितपत खरी आहे माहीत नाही पण आजही आठवल्यावर मनात भीती दाटून येते.

Leave a Reply