माझे नाव राजेश. मी महाराष्ट्रातील इस्लामपूर शहरात राहतो. प्रसंग आहे माझ्या कॉलेज मधला जो मी कधीच विसरू शकणार नाही. कारण माझ्या सोबत इतकं सगळ भयानक घडलय जे विश्वास ठेवण्या पलीकडचे आहे. तो प्रसंग आजही कधी आठवला, कोणी विचारले की माझ्या सोबत काय घडले होते तर ते सांगताना भीती ने जणू ताप भरून येतो. मी कॉलेज मध्ये दुसऱ्या वर्षाचा डिप्लोमा करत होतो. आमच्या कॉलेज ला ३ गेट होते. पण नंबर २ चे गेट कोणीच कधीच उघडत नव्हत. त्या गेट ला लागूनच एक मोठं वडाच झाड होत. हे सगळं सांगायचं कारण ही खूप विचित्र आणि अनाकलनीय होत. त्या गेट च्या समोर दररोज एक अपघात व्हायचा तो ही भीषण. एक तर कोणी जिवानिशी जायचे किंवा त्या व्यक्तीला जबर दुखापत व्हायची. का व्हायचे या बद्दल कोणाला काहीच कळायचे नाही.

पण आम्हा मित्रांना याने काहीच फरक पडायचा नाही. तरुण होतो आणि वयात असताना अश्या गोष्टी नेहमीच बिन बुडाच्या वाटायच्या त्यामुळे आम्ही त्याकडे कधीच जास्त लक्ष दिले नाही. मी आणि माझे काही मित्र, आम्ही काही काम नसताना ही कॉलेज मध्ये जायचो. त्या दिवशी मी आणि माझा एक मित्र अनुज घरी वेळ जात नाही म्हणून कॉलेज मध्ये टाईमपास करायला आलो. खरं तर कॉलेज मध्ये फ्री वाय फाय असायचं म्हणून च आम्ही यायचो. त्या काळी इंटरनेट असेल तरी ते फ्री नव्हते त्यामुळे जिथे वायफाय तिथे आम्ही. आणि कॉलेज मध्ये ते फ्री मध्ये वापरायला मिळायचे. 

“ बरं झालं यार राजेश आपण आलो कॉलेज मध्ये.. घरी खूप कंटाळा आलेला यार बसून बसून.. “ अनुज म्हणाला. 

“ हो ना यार.. आणि घरी असलो की आई काही ना काही काम सांगते बाहेरचं मग ते करावं लागत. त्यातच अर्धा दिवस जातो..” मी त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणालो. 

“आता मी निवांत आहे.  आज मी काही लवकर घरी जाणार नाहीये.. “ अनुज ने आपले मत व्यक्त केलं. मी ही मान डोलावून होकार दिला. 

दुपारचे २ वाजले होते. आम्ही दोघं ही कॉलेज च्या आवारात लॉन वर बसून मोबाईल मध्ये मूव्ही ज् डाऊन लोड करत होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. बराच वेळ होऊन गेला होता. माझ्या २-३ मुव्हीज डाऊनलोड करून झाल्या होत्या. तसे मी अनुज ला म्हणालो “ अंज्या चल लका कंटाळा आला मला.. जाऊ घरी मला परत.. आणि तसंही मला पुन्हा कॉलेज ला यावं लागणार आहे..” त्यावर त्याने मला विचारले “ पुन्हा.. पुन्हा कशाला रे.. ? “ 

“ अरे यार विसरलास का तू..? माझा ड्रामा क्लब नाहीये का ?” मी म्हणालो. 

आम्ही जवळपास ४ ला कॉलेज मधून बाहेर पडलो. अनुज कडे बाईक होती त्यामुळे त्याने मला घरी सोडले आणि तो त्याच्या घरी निघून गेला. घरी आल्यावर बसल्या बसल्या मला डोळा लागला. तास दीड तास झाला असेल आणि अचानक मला घाबरून जाग आली. आश्चर्य म्हणजे मला काही आठवत नव्हत. म्हणजे एखादे वाईट स्वप्न पाहिले असे ही नव्हते पण तरीही मी घाबरून झोपेतून उठलो होतो. वेळ पाहिली तर ५.३० होऊन गेले होते. ६ च्या आत मला कॉलेज मध्ये पोहोचायचे होते कारण आमची तालीम होती. मी तसाच उठलो, तोंडावर पाणी मारून फ्रेश झालो आणि आई ला हाक दिली “ आई .. अग मी ड्रामा क्लब ला निघतोय.. रात्री उशीर होईल यायला.. “ तसे आई चा आतून आवाज आला “ ही सांभाळून जा.. उशिरा निघशील तर एकटा नको येऊस तुला माहितीये ना..” आई चे असे बोलणे ऐकून मला थोड कळेनासं झाले.

पण मी आई शी बोलत बसलो नाही कारण मला आधीच उशीर झाला होता. मी लगेच बाईक काढली आणि कॉलेज ला आलो. ड्रामा क्लब मध्ये आम्ही एका नाटकाची तालीम करणार होतो. मला अभिनयाचे फार वेड होते म्हणून च मी कॉलेजच्या ड्रामा क्लब मध्ये सहभागी झालो होतो. नाटकाची तालीम ६ ते ९ पर्यंत चालायची आणि नंतर ९-१५ ते ९.३० च्या दरम्यान आम्ही सगळे घरी जायचो. दररोज प्रमाणे आमची तालीम सुरू झाली पण आज मात्र मला काही नवीन गोष्टी कानावर आल्या. दोन वेळा तालीम झाल्यावर आम्ही काही मिनिट विश्रांती घेतली. मी तिथेच बसून पाणी पित होतो तसे आमच्या ग्रुप मधले दोन जण संजय आणि संकेत बोलत होते. ज्यांचे बोलणे नकळत माझ्या कानावर पडले. 

“संक्या तुला माहित आहे ना रे की आपल्या कॉलेज चा 2 नं. गेट का उघडतं नाहीत “ संकेत ने प्रश्न केला. 

त्यावर संजय म्हणाला “मला कारण माहीत नाही पण काही तरी अपशकुनी आहे तिथे असे मी ऐकले आहे..”

त्यांचे बोलणे सुरू असतानाच ऋषिकेश दादा तिथे आला जो नाटकाचे पोशाख आणि काही साहित्य आणायला दुसऱ्या ठिकाणी गेला होता. आल्या आल्या त्याने सांगितले “ काय रे.. झाली का तालीम.. टाईमपास काय करताय.. गप्पा कसल्या सुरू आहेत तुमच्या ? “

त्यावर संजय म्हणाला “ दादा ते कॉलेज च्या 2 नं. गेट वर काय आहे माहित आहे का तुला.. उघडत का नाहीत तो गेट ? “

हे ऐकताच ऋषिकेश दादा थोड बिथरलाच. त्याला या बद्दल नक्की काही तरी माहित होते पण तो काहीच बोला नाही. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तसे त्याच्या तोंडावर सरळ सरळ भीती दिसत होती. 

संकेत ने हळूच दबक्या आवाजात विचारले “ अरे हा एव्हढा का घाबरला. काय झालं.?” 

तसा संजय जरा हसतच म्हणाला “ दादा भित्रा आहे रे बाकी काही नाही.. असा काही विषय काढला की त्याचा हावभाव लगेच बदलतो..” 

मी तिथेच बसून सगळ काही ऐकत होतो पण काहीच बोललो नाही. १५ मिनिट विश्रांती घेतल्यावर आम्ही पुन्हा तालमीला सुरुवात केली. रोज आम्ही ९ पर्यंत आटोपायचो सगळे पण त्या दिवशी ९.३० होऊन गेले तरी आमची तालीम सुरूच होती. संपायला आणि तिथून निघायला पावणे दहा झाले. सगळ आल्यावर ग्रुप मधली पोर आप आपल्या घरी गेली आणि जी हॉस्टेल वर राहायला होती ती सुद्धा हॉस्टेल वर निघून गेली. मी क्लब मध्येच बसून होतो.. विचार केला की एक मूव्ही जो डाऊन लोड करायचा राहिला होता तो थांबून करून घेतो आणि मगच निघतो. कारण रात्रीच्या वेळी वायफाय चा स्पीड चांगला मिळायचा. पण त्या दिवशी नेमके उलट झाले. वायफाय अतंत्य स्लो चालत होते. मी एकटाच होतो. इतर कोणाला नाही पण आम्हा ड्रामा क्लब वाल्यांना उशिरा पर्यंत थांबण्याची मुभा दिली होती. आणि त्यामुळेच तिथे कोणी फिरकले ही नव्हते.

मी मूव्ही डाऊनलोड ला ठेवला, मंद आवाजात एक गाणे सुरू केले आणि डोळे मिटून काही वेळ बसून राहिलो. पण नकळत माझा डोळा लागला. वेळेचं भान च राहील नाही. किती वेळ झोपलो होतो माहीत नाही. पण कसल्याश्या आवाजाने जाग आली. आमच्या ड्रामा क्लब च्या बाहेरच्या बाजूने कसलासा आवाज आला होता. मी पटकन मोबाईल हातात घेतला आणि वेळ पाहिली तर साडे अकरा वाजून गेले होते. मूव्ही फाईल डाऊन लोड झाली होती. उशीर झाला होता खरा पण टेन्शन घेण्याचं कारण होत आई चे मिस्ड कॉल्स. एक दोन नव्हे तर तब्बल ४५ मिस्ड कॉल्स. मनात विचार आला आज मी मेलो, आज माझे काही खरे नाही कारण आई मला सोडणार नाही घरी गेल्यावर. मी क्षणा चाही विलंब न करता उठलो आणि बॅग उचलून जिन्याने खाली येऊ लागलो. तिथून चालत जाताना मला कसलीशी चाहूल जाणवू लागली जसे कोणी अगदी माझ्या मागेच आहे. अंगावर भीती ने शहारे उलटले. 

मी एकदा नाही तर बरेच वेळा मागे वळून पाहिले पण मिट्ट काळोख असल्याने कोणी दिसलं नाही. मोबाईल फ्लॅश लाईट सुरू केला पण जिथं पर्यंत प्रकाश जात होता तिथपर्यंत तरी काहीच दिसत नव्हतं. तितक्यात मला माझ्या नावाने हाक ऐकू आली. आवाजावरून तो मला माझा मित्र अनुज वाटला. अनुज कॉलेज मध्येच आहे आणि मला सांगितले नाही असा विचार करून मी मागे वळलो आणि त्याला पाहायला गेलो. माझ्या नावाने त्याचे हाक मारणे चालूच होते. पण तो नक्की कुठे आहे ते कळत नव्हते. त्यामुळे आवाजाचा माग काढत मी पुढे जाऊ लागलो. रात्रीच्या वेळी त्या आवारात लाईट बंद असायच्या. त्यामुळे बहुतेक भागात खूप गडद अंधार जाणवायचा. काही अंतर चालल्या नंतर मला समोर एक गेट दिसले. मनात विचार आला की इतक्या लवकर मी गेट नंबर १ जवळ कसे आलो. मला काही कळेनासे झाले. पण तो गेट वेगळा च वाटत मी मोबाईल चा फ्लॅश लाईट शेजारील भिंती वर मारला आणि एका झटक्या सर्शी मागे आलो. कारण मी गेट क्रमांक २ जवळ उभा होतो.

आमच्या ड्रामा क्लब च्या हॉल पासून गेट क्रमांक २ जवळ यायला संपूर्ण कॉलेज ला वळसा घालून यावे लागायचे ज्याला जवळपास १२ मिनिट लागायची कारण कॅम्पस खूप मोठा होता. पण मी अवघ्या २-३ मिनिटात तिथे कसा आलो हेच मला उमगत नव्हतं. मी घाबरून उलट दिशेने पळत कॉलेज च्या बिल्डिंग जवळ आलो आणि गेट क्रमांक ३ च्या दिशेने चालू लागलो कारण माझी बाईक मी तिथेच पार्क केली होती. जवळपास ७-८ मिनिट चालावं लागणार होत. पण तितक्यात मला पुन्हा एकदा माझ्या नावाने हाक ऐकू आली. आवाज अनुज चाच होता. अनुज नक्कीच माझी मस्करी करत असणार. मुद्दामून मला लपून हाक मारत असणार. असा विचार करून मी त्याला फोन केला. पण २-३ वेळा पूर्ण रिंग वाजून सुद्धा तो फोन उचलत नव्हता. मला थोडा का होईना पण राग आला होता म्हणून मी त्याला फोन ट्राय करत राहिलो. तसा त्याने फोन उचलला. 

फोन उचलताच मी त्याच्यावर चिडलोच “ अरे साल्या अंज्या काय फालतुगिरी लावली आहेस तू.. किती घाबरलो मी, असे काय वागतोय अश्या वेळेला.. बस झाली तुझी नाटकं आता.. “ 

अनुज म्हणाला “ अरे भावा मी नक्की काय केलंय गे सांगून मग शिव्या घाल रे..” 

त्याच्या आवाजावरून तो गाढ झोपेतून उठून माझ्याशी बोलतोय असे मला वाटत होत. पण तरीही मी त्याला प्रश्न केला “ अँज्या तू कुठे आहेस ते सांग आधी..? “ 

आता अनुज जरा रागाच्या स्वरात च मला बोलला “ काय डोक्यावर पडलाय का..? इतक्या रात्री मी कुठे असणार..? एक तर गाढ झोपेतून उठवलस आणि विचारतोय कुठे आहे. अरे घरी आहे बाबा अजुन कुठे असणार..” 

त्याचे ते शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याच्या आवाजावरून आणि एकंदरीत बोलण्या वरून तो घरूनच बोलतोय याची मला खात्री पटली. पण मग मगास पासून अनुज च्या आवाजात ऐकू येणाऱ्या हाका..? त्या कोण मारतय. भीतीने सर्वांगाला घाम फुटला आणि त्या घामाने ओलाचिंब झालो होतो. काय करावं सुचेनास झालं. माझे हात पाय थर थर कापत होते. त्यामुळे पाऊले जागीच थिजली. काही क्षण जात नाहीत तेवढ्यात परत तेच घडले. पुन्हा माझ्या नावाने हाक ऐकू येऊ लागली. माझ्या अंगात आता त्राण उरला नव्हता त्यामुळे भोवळ येऊन मी तिथेच बेशुद्ध झालो. या पुढे जे घडणार होते ते खूप च भयानक आणि कल्पना शक्तीच्या पलीकडचे होते कारण खऱ्या काळचक्राला आता सुरुवात झाली होती. मला झोपेतच ३-४ जणांचे आवाज ऐकू येऊ लागले. त्या आवाजाने मी शुध्दीवर आलो. प्रचंड ग्लानीत होतो.

डोकं सुन्न झालं होत. उठून पाहिलं तर रात्र अजुन संपलेली नव्हती. रात्रीचे २ वाजले होते. ती चार मुलं माझ्या आजू बाजूला उभी होती. मला त्यांच्या कडे पाहून कळेनासे झाले की एवढ्या रात्री ते कॉलेज मध्ये कसे कारण हॉस्टेल चा गेट ही बंद होतो आणि तिथून असे कोणाला ही कॉलेज मध्ये जाता येत नाही. त्यात त्यांनी कॉलेज युनिफॉर्म घातला होता, पाठीवर सॅक होती. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे त्यांचे चेहरे अंधारात नीट दिसत नव्हते. मी त्यांना न राहवून विचारलं “ भावांनो खरंच थँक यु.. पण तुम्ही इतक्या रात्री इथे कसे. लायब्ररी पण १२ लां बंद होते. पण त्यातले कोणी काहीच बोलेना. की ते बोलत होते पण मला कळत नव्हते. डोकं बधीर व्हायची पाळी आली होती. मला खूप अस्वस्थ वाटू लागले. तेवढ्यात त्यातल्या एकाने जे शब्द उच्चारले ते ऐकून मला कळलं की ते माझे नाव घेत आहेत.. राजेश.. आमच्या बरोबर चल. 

मला जायचं नव्हत पण आता तेच काय ती सोबतीला होते माझ्या म्हणून मी त्यांच्या बरोबर गेलो. मला ते कुठे नेत आहेत हे दिसत नव्हत कारण खूप अंधार होता. बघता बघता ते मला जिथे जायचे नव्हते तिथेच घेऊन आले. गेट नंबर २. जसे मला लक्षात आले तसे मी त्यांच्याकडे पाहून विचारायला गेलो आणि मला धक्काच बसला. कारण माझ्या आजी बाजूला कोणीच नव्हत. मी फक्त एकटाच तिथे उभा होतो. शरीरातला होता नव्हता तो त्राण संपत चालला होता. भीतीने सर्वांग शहारत होत. मी मोबाईल चा फ्लॅश लाईट सुरू करून चोहो बाजूंना पाहू लागलो पण ते कुठेच दिसत नव्हते. तो फ्लॅश मी तसाच गेट नंबर च्या भिंती जवळ नेला तसे या वेळेस तिथे वर इशारा केलेला एक बाण उमटला होता. माझे काळीज भीती ने धड धडत होत पण तरीही मी फ्लॅश मी वर नेऊ लागलो. आणि त्याच सोबत माझी नजर ही त्या दिशेला हळु हळु वर जाऊ लागली. आणि समोर मी जे काही पाहिलं ते खूप च भयाण होत.

संपूर्ण शरीरात जणू लाल मुंग्यांच वारूळ उठाव तस जाणवत होत. कारण त्या गेट जवळच्या झाडाला त्या मुलांनी लटकून गळफास घेतला होता. सगळ्यात जीवघेणे दृश्य म्हणजे त्यांचे डोळे सताड उघडे होते जे माझ्यावर च रोखले होते. मी तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागलो पण माझे हात पाय जणू सुन्न झाले होते. तितक्यात त्या तिघांचा छद्मी हसण्याचा आवाज येऊ लागला आणि त्या भीषण किळसवाण्या आवाजाने जणू माझे हृदय बंद पडतेय की काय असे वाटू लागले. पण एवढ्या भीतीत आणि गदारोळात देखील माझ्या मनात एक विचार आला की मी माझ्या सोबत चार जण आले होते पण हे तर तिघेच आहेत चौथा कुठे गेला? तेवढ्यात माझ्या मागून जोरात काही तरी पडल्याचा आवाज आला. तसे मी एका क्षणात मागे पाहिले आणि जे काही पाहिले ते पाहून हातपाय च भीती ने गळून गेले.

कारण माझ्या मागच्या बाजूला म्हणजे कॉलेज इमारती वरून एका मुलाने खाली उडी घेऊन जीव दिला होता. इतकंच नव्हे तर त्याचे डोके फुटून रक्ताचा सडा पसरला होता. दोन्ही हात आणि पाय तुटले होते. आणि या सगळ्या जीवघेण्या दृश्याहून भयानक म्हणजे तो त्याच अर्धमेल्या अवस्थेत माझ्या कडे सरकत येत होता. आता त्या गळफास घेतलेल्या तीन जणांसोबत तो मुलगा ही छद्मी हास्य करू लागला. तो आवाज मला असह्य होऊ लागला आणि माझी शुद्ध हरपू लागली. पण डोळे बंद होण्या आधी मला दिसले की माझा दादा पळत माझ्याकडे येतोय.. 

जेव्हा जाग आली तेव्हा मी एका हॉस्पिटल मध्ये होतो. घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे ११ वाजले होते. रूम च्या बाहेरून आवाज ऐकू येत होता. 

नर्स.. तो राजेश नावाचा पेशंट शुध्दीवर आला का बघून या.. 

(दरवाजा उघडण्याचा आवाज).. एक नर्स आत आली आणि मला शुद्धीत पाहून माझी विचारपूस करू लागली. 

कसं वाटतंय आता तुम्हाला.. ? 

मी ठीक आहे पण डोकं खूप जड झालय. 

त्या पुढे काही बोलणार तितक्यात डॉक्टर आत आले आणि मला विचारू लागले.. “ काय रे बाळा काय झालेलं एवढं.. काल बेशुद्ध कशामुळे पडलास आणि कशाला घाबरलास एवढं ? “

मी काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्यामुळे मी काहीच बोललो नाही. 

तसे नर्स ला सांगून माझ्या आई ला आत बोलावलं. माझी आई खूप काळजी करत होती, घाबरली होती. ती रडतच मला बोलू लागली. 

“ काय रे.. ड्रामा क्लब ला जातो सांगून कुठे गेला होतास..? बेशुद्ध कसा पडलास..? मी तुला किती फोन केले एकही फोन का उचलला नाहीसे..? इथे तुझ्या काळजीने माझा जीव कासावीस झाला होता.. कुठे होतास तू..?” 

तिचे प्रश्न थांबतच नव्हते. मी तिला शांत करायला म्हणालो “ आई थोडा वेळ शांत बस.. मी सांगतो नंतर तुला.. “ 

मला पुन्हा एकदा तपासून झाल्यावर डॉक्टरांनी दुपारी २ वाजता डिस्चार्ज दिला आणि आम्ही घरी आलो. घरी येताच मी आईला सगळ काही सांगितलं. आई देवघरात जाऊन देवीचा अंगारा घेऊन आली आणि माझ्या कपाळाला लावला. तिच्या डोळ्यात पाणी तराळले होते. ती माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवत सांगू लागली.. बाळा तुझा दादा ज्या वर्षी त्या कॉलेज मध्ये शिकत होता त्या वेळी त्याचे चार मित्र होते – ओंकार , जयंत , रमेश आणि श्रीधर. जवळचे मित्र पण जणू त्यांच्या मैत्रीला कोणाची नजर लागली. कॉलेज मध्ये जेव्हा परीक्षा झाली तेव्हा तुझा दादा तर सगळे विषय सोडवू शकला पण बाकीचे चौघे ही ते करू शकले नाहीत. त्यांचे एक वर्ष वाया गेले, ते ड्रॉप लागणे म्हणतात ना तेच. एकत्र अभ्यास करून ही आमच्यातला हाच कसा काय सगळे विषय सोडवून पास होऊ शकतो , यानेच काही तरी प्रॉब्लेम केला असणार असा विचार त्यांच्या मनात आला.

त्यांना कोणी तुझ्या दादा बद्दल भरवले माहीत नाही पण मैत्री एका वेगळ्याच रागात बदलली. एकदा याच विषयावरून वाद झाला आणि तो इतक्या विकोपाला गेला की त्यांनीच तुझ्या दादाला…. आई हुंदके देत रडू लागली. मी कसे बसे आई ला शांत केले तसे ती पुढे म्हणाली “ या सगळ्या बद्दल जसे बाहेर कळले तसे ते चौघे ही घाबरले कारण त्यांना वाटले की केस होईल, आपण कायमचे अडकून जाऊ.. याच भीतीने एकाने कॉलेज च्या टेरेस वरून उडी मारून जीव दिला. या प्रकाराने बाकीचे तिघे इतके घाबरले की त्यांनी ही त्या गेट नंबर दोन जवळच्या झाडाला लटकून आत्महत्या केली. त्या दिवशी तुझा दादा च तुला वाचवायला आला हे एकूण मला विश्वास बसत नाहीये.. “ इतके बोलून आई पुन्हा हमसून रडू लागली. तिचे रडणे ही मला समजत होते कारण तिने आपल्या एका मुलाला गमावले होते. घडलेला सगळा प्रकार आणि नंतर आई ने सांगितलेले हे सगळेच माझ्यासाठी अनाकलनीय होते. आज ही त्या गेट समोर नेहमी अपघात होतो आणि कधी कोणी त्या बद्दल विषय काढल की अंगावर काटा येतो.

Leave a Reply