अनुभव – प्रसाद केळकर
घटना आहे २०११ ची. मी एका नामांकित कंपनी मध्ये आय टी इंजिनियर म्हणून काम करत होतो. कंपनी च्या चार इमारती होत्या. मी पहिल्या इमारती मध्ये कामाला बसायचो. तिथे रुजू झाल्यानंतर २ आठवड्यांनी लगेच नाईट शिफ्ट मिळाली. कामासोबत च मी माझा अभ्यास ही करत होतो. नाईट शिफ्ट मध्ये काम बरच कमी असायचे त्यामुळे मला अभ्यास करायला वेळ मिळायचा. नाईट शिफ्ट बद्दल मला काही माहिती नव्हती म्हणून मी टीम लीडर ना कामाचे स्वरूप विचारून घेतले आणि त्यांनी ही मला सगळी मदत केली, सगळे समजाऊन सांगितले. सगळी माहिती मी नोटपॅड मध्ये लिहत जायचो. मी खुश होतो आणि सगळ मनासारखं सुरू होत. माझा सहकारी मित्र नाईट शिफ्ट ला सोबत असणार होता त्याला मी एकदा सहज विचारले “ काय रे.. कशी असते नाईट शिफ्ट इकडे..? “ तो त्या ठिकाणी बरेच वर्ष काम करत होता आणि त्याला त्या कंपनी च्या ४ ही बिल्डिंग आणि कोपरा न कोपरा माहीत होता.
मी असा प्रश्न विचारताच तो म्हणाला “ चल चहा प्यायला खाली जाऊ.. “ आता कंपनी मध्ये ही चहा कॉफी चे मशीन होते पण त्याने असे सांगितल्यावर मला कळून चुकले की त्याला असे काही सांगायचे आहे जे सगळ्यांसमोर तो संघ शकत नाही. आणि मला खात्री पटली कारण अवघ्या दहा मिनिटा पूर्वीच तो खालून चहा पिऊन आला होता. आम्ही लिफ्ट ने खाली आलो आणि त्याने सगळा इतिहास सांगायला सुरुवात केली. आपल्याच कंपनी च्या बिल्डिंग नाही तर आजू बाजूच्या २ बिल्डिंग ही ज्या जागेवर बांधल्या गेल्या आहेत त्या जागेवर पूर्वी मोठे स्मशान होते. काही वर्षांनी डेव्हलपमेंट झाली आणि स्मशान तोडून इथे या टोलेजंग इमारती बांधण्यात आल्या. आता तू आलाच आहेस या कंपनी मध्ये आणि नाईट शिफ्ट करणार आहेस तर एक गोष्ट लक्षात ठेव. काही झाले, काही काम जरी असेल तरीही रात्री २ ते ४ या वेळेत बिल्डिंग च्या डी विंग मध्ये जायचे नाही.
त्या विंग मध्ये संध्याकाळी ६ पासून सकाळी ६ पर्यंत जास्त कोणी जात नाही. अगदी त्या बिल्डिंग मधला जास्त काम करणारा स्टाफ ही ६ नंतर घरी जातो. नाईट शिफ्ट साठी ती विंग बंद असते. आणि असे ही त्या डिपार्टमेंट ला रात्री थांबून काम करण्याची आवश्यकता नसते. हे सगळे ऐकल्यानंतर मी त्याला उत्सुकते पोटी विचारले “ तिकडे काय आहे असे की कोणी जात नाही..? “ त्यावर तो म्हणाला “ तिथे आहे काही तरी.. कोणी तरी.. आवाज येतात, गोष्टी आपल्या जागेवरून आपोआप हलतात.. इतकेच नाही तर.. “ त्याचे वाक्य पूर्ण होण्या आधी त्याचा फोन वाजला आणि त्याला ऑफिस मध्ये जावे लागले. त्यामुळे आमचे बोलणे अपूर्ण च राहिले. मी तसा ही एकदम निडर होतो त्यामुळे त्याचे बोलणे हसण्यावरी नेले आणि त्याच्याकडे पाहत मिश्कीलपणे हसलो. पुढच्या आठवड्यात मी ठरल्या प्रमाणे रात्री नाईट शिफ्ट ला आलो.
आमचे सुरुवातीचे आणि मुख्य काम मीटिंग रूम मध्ये जाऊन सगळी उपकरणे चालत आहेत की नाही हे बघणे होते. मला सगळे म्हणाले की हे काम १२ च्या आतच काही करून पूर्ण व्हायला हवे. पण याच कारण मात्र कोणीच सांगायला तयार नव्हत. मी मुळात थोडा आळशी असल्याने विचार केला की करू आरामात काम की घाई आहे. पूर्ण नाईट शिफ्ट आहे, काम होत राहील. मी आमच्या ऑफिस मधल्या मीटिंग रूम मधले काम आटोपून इतर मीटिंग रूम मध्ये जात होतो. रात्री चे २ वाजले असतील. डी विंग चे काम बाकी होते म्हणून मी तिथे गेलो आणि तिथे जाताच मित्राने सांगितलेली गोष्ट आठवली. अजुन उत्सुकता वाढली आणि नक्की काय आहे ते आज अनुभवायला मिळेल म्हणून तिथे गेलो. माझ्या सोबतचा सहकारी माझ्याच ऑफिस बिल्डिंग मध्ये बसला होता. त्यामुळे मी एकटाच इथे आलो होतो. जसा इथे शिरलो तसे अस्वस्थ वाटू लागले. म्हणजे मला नक्की सांगता येणार नाही कसे पण वेगळेच वाटू लागले.. बंदिस्त, जीव गुद्मरल्या सारखे.
पण नंतर विचार आला की ए सी बंद आहे त्यामुळे व्हेंटीलेशन नाहीये म्हणून असे वाटत असेल. हवा खेळती राहिली नाही की मग असे वाटते. तिथल्या मीटिंग रूम मधली सगळी उपकरणे तपासून झाल्यावर पाणी प्यायला म्हणून मी वॉटर डिस्पेन्सरी मध्ये थांबलो. पाणी पीत उभा होतो तसे मला अचानक २ माणसे आप आपसात बोलत असल्याचे जाणवले. भाषा कळत नव्हती पण आवाजावरून स्पष्ट होत की मनात विचार केला की बघा.. मला सांगत होता की इथे कोणी येत नाही आणि ही माणसं मस्त गप्पा मारत बसली आहेत. कोण आहे बघायला मी वर्क फ्लोअर वर आलो. रात्र असल्यामुळे डेस्क वरचे लाईट जेमतेम च लावले होते त्यामुळे थोडा अंधार जाणवत होता. मी संपूर्ण फ्लोअर वर नजर फिरवली पण मला कोणीच दिसले नाही. तरीही आवाज मात्र येत होता. आवाजाचा कानोसा घेत मी एका डेस्क जवळ येऊन पोहोचलो.
तिथे येताच माझ्या सर्वांगाला घाम फुटला. भीतीची एक लहर संपूर्ण शरीरात उलटली. कारण तो आवाज एका बंद कॉम्पुटर च्या सिपियु मधून येत होता. मी इतका जवळ आलो होतो की मी तो आवाज आता अगदी स्पष्ट ऐकू शकत होतो. आवाज ऐकताच मला कळले की जी भाषा वापरली जात होती ती मी या आधी कधीच ऐकली नव्हती. त्या सिपियू ला पॉवर केबल ही कनेक्ट केली नव्हती आणि तसे ही त्यात स्पीकर नसतोच. पण एकदा वाटले की कदाचित आत काही ठेवले असेल, एखादा मोबाईल किंवा टेप रेकॉर्डर ज्यातून आवाज येत असावा. म्हणून मी हिम्मत करून तो सीपियु उघडायला गेलो, आणि जसा हात लावणार तसा आतून एक आवाज आला. भीती ने मी घाबरून मागे सरकलो. माझे हात पाय गळून गेले होते. बस.. झालं तेवढं बस झाल. इथून निघून जाणे च बरे. मी दबक्या पावलांनी मागे वळलो आणि वर्क एरिया मधून बाहेर आलो. पण ही फक्त सुरुवात होती या सगळ्या गोष्टींची.
कॉरिडॉर मध्ये सिक्युरिटी गार्ड चे टेबल आणि खुर्ची ठेवली होती. साहजिक च तिथे गार्ड नव्हता. मी जसा तिथून चालत जाऊ लागलो ती खुर्ची हळुवार पणे हवेत उचलली गेली जणू कोणी उचलून धरली आहे. पण तिथे कोणीही नव्हते. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की हे मी काय पाहतोय. या आधी असे भयाण दृश्य मी कधीच पाहिले नव्हते. कधीच कोणत्या गोष्टीला न घाबरणारा मी मात्र हतबल झाल्या सारखा घडणाऱ्या विचित्र आणि भयानक गोष्टींकडे पाहत होतो. पावलं जड झाली होती पण तरीही जीव एकवटून मी तिथून पळतच बाहेर निघालो आणि आमच्या वर्क रूम मध्ये आलो. माझ्या सोबत असणाऱ्या मुलाने विचारले “ काय रे.. एव्हढा घाम का आलाय? कुठे मॅरेथॉन ला गेला होतास की काय ?” मी आधीच इतका घाबरलो होतो की त्याच्या विनोदावर काय बोलावं तेच कळत नव्हतं.
वेळ मारून न्यायला त्याला उत्तर दिलं की सगळ्या बिल्डिंग मध्ये जाऊन आलोय म्हणून असेल कदाचित. हे सांगत असतानाच आमच्या मागच्या सर्वर रूम मधला लाईट अचानक फ्लिकर होऊ लागला. तसे मी विचारले “ हे काय होतंय आपल्या ऑफिस मध्ये? त्यावर तो म्हणाला की सर्वर रूम मधली ट्यूब कायम बिघडते आणि बदलावी लागते. थांब मी ईलेक्ट्रीशियन आहे का बघतो, आपल्या ऑफिस च्या खालीच असतो, कधी कधी नाईट शिफ्ट ला असतो, असेल तर बोलवतो त्याला. त्याने फोन उचलला आणि ५-१० मिनिटात येतो असे बोलला. आमच्या सर्वर रूम ला दोन दरवाजे होते. एक आमच्या वर्क रूम मधून जाण्यासाठी आणि दुसरा बाहेरच्या बाजूला होता. म्हणजे वर्क रूम बंद असेल तरी बाहेरून आत जाता येईल. लाईट बंद चालू होत असल्यामुळे मी सर्वर रूम कडे एक टक बघत होतो.
ती एक काचेची रूम होती, म्हणजे २ बाजूंना मोठ्या काचा होत्या आणि त्याला आतून पांढरा लेयर होता म्हणजे आत कोणी असले तर दिसेल पण नक्की कोण व्यक्ती आहे ते कळणार नाही. साधारण ५ मिनिटांनी बाहेरच्या बाजूने एक सावली आत आली आणि ईलेक्ट्रीशियन आला असेल असा विचार करून मी माझ्या सहकारी मित्राला म्हणालो “ ईलेक्ट्रीशियन आला बहुतेक..” आणि त्याला सांगायला आत गेलो तर आत कोणीच नव्हते. मला वाटले आत कोणी नाही पाहून पुन्हा लगेच निघून गेला असेल. मी पुन्हा सहकारी मित्राला म्हणालो “ फोन कर त्याला परत, येऊन निघून गेला लगेच, विचारले पण नाही आपल्याला..” तितक्यात मुख्य दरवाजा वाजला आणि एक व्यक्ती आत आला “ सर, तुम्ही फोन केला होता, कोणत्या ट्यूब चा प्रॉब्लेम होतोय..? “ आम्ही दोघं ही त्यांना जरा चिडून च बोललो “ कुठे फिरून आलास तू.. सर्वर रूम मध्ये गेलेला तर थांबून चेक करायचे ना.. लगेच निघून जायचे का..? “ त्यावर तो जरा विचारात पडला आणि म्हणाला “ सर मी आत्ताच आलोय. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. मी या फ्लोअर वर आल्यावर थेट इथे आलो, कुठेच फिरलो नाही..”
त्याच्या बोलण्यावरून मला वाटले की तो अगदी खरे बोलतोय. पण दुसऱ्याच क्षणी भीती ची एक लहर सर्वांगात उलटली. कारण जर हा सर्वर रूम मध्ये गेला नाही मग ती सावली..? माझ्या हृदयाची धड धड नकळत वाढू लागली. हा सगळा विचार डोक्यात चालू असतानाच सहकाऱ्याने विचारले “ तू डी विंग मध्ये गेला होतास का..? “ त्याच्या या एका वाक्याने मी एकदम शहारलो आणि काहीच न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली. तसा तो एकदम रागात म्हणाला “ तुला सांगितले होते रात्री तिथे जाऊ नकोस.. काय गरज होती हिरो बनून तिथे जायची तुला..? तू येताना एकटा नाही आलास. तिथे जे काही आहे ते सोबत घेऊन आला आहेस कळतेय का तुला.?”
त्याचे असे बोलणे ऐकून मी निशब्द झालो होतो. ती रात्र आम्ही तशीच काढली. दुसऱ्या दिवशी मी त्याला विचारले की आता आपण काय करायचे. आपल्याला नाईट शिफ्ट च असणार आहे काही दिवस. त्यावर तो म्हणाला की आपण विचारून बघू मॅनेजर ला पण काही बदल करतील असे वाटत नाही मला. त्याने सांगितल्या प्रमाणे आम्ही मॅनेजर शी बोललो पण आम्हाला डे शिफ्ट मिळाली नाही. आता ती डी विंग मध्येच च नाही तर आमच्या बिल्डिंग मध्ये ही चित्र विचित्र प्रकार घडू लागले. कालांतराने मी तिथली नोकरी सोडून दिली आणि नंतर कळले की माझ्या नंतर त्या सहकाऱ्याने ही ती नोकरी सोडून दिली. तिथे काम करणाऱ्यांना कदाचित आजही अनुभव येत असतील. ते कसे नाईट शिफ्ट करत असतील त्यांचे त्यांनाच माहीत. पण माझ्या सोबत घडलेले प्रसंग आज ही कधी आठवले की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.