अनुभव – मिहिर चव्हाण
अनुभव २०२० चा आहे. मी मुंबईत राहतो. दर वर्षी प्रमाणे त्या वर्षी ही शिमग्याला गावी गेलो होतो. माझे गाव संगमेश्वर तालुक्यात आहे. आणि गावाला खूप मोठा उत्सव असतो जो रात्री उशिरा पर्यंत चालतो. आणि शेवटी भाकरी आणि मटणाचे जेवण असते. बऱ्याच महिन्यांनी गावी आल्यामुळे जुन्या मित्रांसोबत रात्री बऱ्याच गप्पा रंगल्या. त्यामुळे आम्हा कोणालाच वेळेचे भान राहिले नाही. सगळा कार्यक्रम आटोपत आला, आम्ही ही जेवण उरकले. आणि तिथून निघायला जवळपास २ वाजले. माझ्या सोबत माझा भाऊ होता. दोघंही चालतच निघालो. घर तसे बरेच लांब नव्हते, पायी गेल्यावर अर्धा तास जास्तीत जास्त. पण उशीर झाल्याने माझ्या भावाने वस्ती वरचा रस्ता सोडून आतली वाट धरली. जो एक जुना रस्ता वजा पायवाट होती. आम्हाला कसलीच कल्पना नव्हती की आमच्या सोबत नक्की काय घडणार आहे. आम्ही त्या रस्त्याला लागलो खरे पण बराच वेळ चालून झाल्यावर लक्षात आले की आम्ही फिरून फिरून एकाच ठिकाणी येतोय. आणि आम्हाला बहुतेक चकवा लागलाय. लक्षात येताच दोघे ही थोड्यावेळ थांबलो, डोळे मिटले आणि हात जोडून क्षमा मागितली की काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा. आम्ही जसे डोळे उघडले तसे आमच्या समोर काही अंतरावर एक आकृती उभी दिसली. भीती ने अंगावर सरसरून काटा येऊन गेला. किती ही प्रयत्न केला तरी आम्ही पावले उचलू शकत नव्हतो. जणू आमचे दोन्ही पाय जमीनीत रुतले आहेत.
मी अतिशय जोर लाऊन पाऊल टाकायचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात लक्षात आले की आम्ही जेवढे हलायचा प्रयत्न करतोय तेवढी ती आकृती आमच्या दिशेने सरकत जवळ येतेय. आम्हाला दोघांना हि कळून चूकले की यातून सहजा सहजी सुटणे शक्य नाही. मी स्वामींचा धावा करायला सुरुवात केली. तसे पुढच्या क्षणी चारही बाजूंनी घंटी वाजवण्याचा आवाज येऊ लागला. जसा तो आवाज आमच्या कानावर पडला आमचे पाय एका एकी मोकळे झाले. तो घंटा नाद आवाज हळु हळु वाढत चालला होता. आम्ही कसलाही विचार न करता तिथून पळ काढला. पुढच्या १० मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. मला राहून राहून फक्त एकच वाटतेय की ते जे काही आमची वाट अडवून उभ होत, त्याच्यापासून सुटका होणे सहजा सहजी शक्य नव्हते. पण स्वामींच्या कृपेने आम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडू शकलो.