अनुभव – शूभम कुपटे

मी तेव्हा शाळेत शिकत होतो. २०१० साल. मला चांगलेच लक्षात आहे. शाळेला नुकताच सुट्टी लागली होती आणि मी हॉस्टेल मध्ये राहत होतो. सुट्ट्या लागल्या की लगेच सगळी मुले आप आपल्या घरी जायची. पण मी व माझ्या काही मित्रांनी २ दिवस हॉस्टेल वरच थांबून मग घरी जायचा बेत आखला होता. पण इथेच आमची चूक झाली. कारण आम्हाला माहीत नव्हत की जेव्हा संपूर्ण हॉस्टेल रिकामं होत तेव्हा इथे काय घडतं. या आधी असे २-३ मित्रांसोबत थांबण्याचा योग आला नव्हता. अवघी २ दिवसांची सुट्टी जरी आली तरी आम्ही सगळे मित्र घरी जायचो. पण ते २ दिवस थांबायची कसली दुर्बुद्धी सुचली माहीत नाही. ती एक रात्र आणि त्या रात्री घडलेले सगळे प्रसंग मला अगदी नीट आठवत आहेत, माझ्या डोळ्यांसमोर आहेत.

नेहमी प्रमाणे मी व माझे मित्र रात्री ८ ला मेस मध्ये जेवायला गेलो. मेस खालच्या मजल्यावर च होती. जेवण लवकर आटोपले म्हणून आम्ही बाहेर थोडा फेर फटका मारायला गेलो. खरे तर आम्हाला जास्त वेळ बाहेर फिरायची परवानगी नव्हती पण हॉस्टेल गेट वर असणाऱ्या काकांचे आमच्याशी चांगले होते त्यामुळे ते सांभाळून घ्यायचे. फेर फटका मारता मारता आमच्या गप्पा सुरू होत्या. सगळे घरी गेल्यामुळे मी ही मित्रांना म्हणालो की उद्याच मी माझ्या गावी चाललो आहे, तुम्हाला थांबायचे असेल तर तुम्ही थांबा. रात्री ११ पर्यंत आमच्या गप्पा सुरू होत्या आणि मग आम्ही हॉस्टेल रूम वर परतलो. फिरून आल्यामुळे पडल्या पडल्या गाढ झोप लागली. 

पण झोप लागली आणि माझ्या मित्राने मला पुन्हा उठवले. कारण त्याला वॉश रूम ला जायचे होते. आणि हॉस्टेल चे वॉश रूम कॉमन होते. आमची रूम एका टोकाला आणि ते वॉश रूम हॉस्टेल च्या दुसऱ्या टोकाला होते. माझा मित्र एकटा जायला घाबरत होता आणि त्यात संपूर्ण हॉस्टेल रिकामे होते. म्हणून त्याने मला सोबत जायला उठवले. माझी झोपमोड झाली होती पण काय करणार. मित्र आहे म्हणून उठलो आणि सोबत गेलो. येताना मात्र मला आमच्या मागून कोणी तरी चालत येतंय अस वाटू लागले. मी १-२ pवेळा थांबलो ही जेणेकरून अंदाज घेता येईल पण मागे वळून पाहिले नाही. ही चाहूल मलाच नाही पण मित्राला ही जाणवली. त्याने ३-४ वेळा मागे वळून पाहिले पण त्याला काहीच दिसले नाही. पण आम्हाला दोघांना हि सतत वाटत होत की आमच्या मागे नक्की कोणी तरी आहे.

दोघं ही रूम मध्ये आलो आणि झोपून गेलो. आणि सुरुवात झाली ती विचित्र आणि अनाकलनीय गोष्टी घडायला. मी भिंती कडे तोंड करून झोपलो होतो. तसे मला मागून आमच्या रूम मध्ये कोणी तरी फेऱ्या मारत असल्याचा आवाज येऊ लागला. एव्हाना भीती ने मनात घर करायला सुरुवात केली होती. त्यामुळे मागे वळून पहायची हिम्मत होत नव्हती. कुशीवरून न वळताच तिरक्या नजरेने मी मागे पाहण्याचा प्रयत्न केला आणि काळजात अगदी धस झालं. कारण रूम मध्ये आमच्या तिघांव्यतिरिक्त कोणी तरी होत. हे मी सांगू शकलो कारण ते जे काही होत ते खूप उंच होत. माझ्या मित्राची तेवढी उंची नव्हतीच त्यामुळे तो फेऱ्या मारत नव्हता. भीती ने माझे काळीज धड धडू लागले. माझ्या मित्राला मी हळु आवाजात हाक मारू लागलो पण तो काही उठत नव्हता.

काही मिनिट हा प्रकार असाच सुरू राहिला आणि मग एका एकी तो आवाज यायचा थांबला. तसे मी झटकन मागे वळून पाहिले. तर आमच्या रूम मधला माझा दुसरा मित्र सुनील त्याच्या बेड वर उठून बसला होता. सुनील खूप गाढ झोपेत असायचा. रात्रीच नाही पण कधी कधी तर दिवस शाळेत ही झोपून जायचा. त्यामुळे त्याचे असे एकदम भर रात्री उठून बसणे मला उमगत नव्हते. मी त्याला आश्चर्य चकित होत विचारले “ सुनील.. काय झालं रे.. असा का बसला आहेस.. झोपायचे नाहीये का..? “ त्यावर तो अतिशय घोगऱ्या आवाजात म्हणाला “ चल आपण टेरेस वर फेरी मारून येऊ..” साहजिक च तो आवाज सुनील चा नव्हता. तो किळसवाणा भरडा आवाज ऐकून मी इतका घाबरलो की माझी शुद्ध च हरपली. डोळे उघडले ते थेट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. म्हणजे मी दुसरा संपूर्ण दिवस बेशुद्ध होतो.

हॉस्टेल चे केअर टेकर येऊन माझ्या जवळ च बसले होते, ते मला म्हणाले की डॉक्टर येऊन पाहून गेले. काय झाले , तू इतका वेळ झोपून का होतास..? मी त्यांना काहीच बोललो नाही. काही वेळानंतर हॉस्टेल मध्ये साफ सफाई करणाऱ्या आजी होत्या. त्या नेहमी माझी विचारपूस करायच्या म्हणून मी त्यांना विचारणे योग्य समजलो. त्या मला म्हणाल्या की मला माहित असते की तू अजून इथेच आहेस तर मी तुला आधीच घरी जायला सांगितले असते. हे हॉस्टेल होण्या पूर्वी पासून च इथे एका व्यक्तीला मारून टाकले होते तेव्हा पासून त्या व्यक्तीचा आत्मा इथे भटकतो. जेव्हा हॉस्टेल भरलेले असते तेव्हा काही जाणवत नाही पण जसे सुट्ट्या लागतात, हॉस्टेल रिकामे होते तसे इथे थांबणाऱ्या ना विचित्र अनुभव यायला सुरुवात होते. तुझे नशीब चांगले आहे म्हणून थोडक्यात निभावले.. त्या प्रसंगानंतर मी लगेच माझ्या गावी घरी निघून आलो. 

Leave a Reply