गोष्ट साधारण ७ वर्षांपूर्वीची आहे. १५ डिसेंबर २०१५ ची. माझ्या ताई चे लग्न होऊन महिना झाला होता. मला एक बहिण आणि एक भाऊ. त्यात मी सगळ्यात वयाने लहान. माझा भाऊ सर्वात मोठा. बहीण सासरी गेल्या नंतर तिचे काही राहिलेले सामान देण्याकरिता भाऊ तिच्या सासरी गेला होता. जाताना तो ट्रेन ने गेला. भाऊजी ना ही काही काम असल्यामुळे येताना त्यांच्या सोबत तो बाईक वर येणार होता. माझं घर ताई च्या घरापासून तसे खूप लांब नाहीये. जवळपास ४५-५० किलोमिटर चे अंतर असेल. भाऊ समान घेऊन गेला आणि त्याला रात्री जेऊन निघायचा आग्रह केला. म्हणून मग तो ही थांबला. जेवण वैगरे आटोपून ११.३० ला ते दोघे ही घरी यायला निघाले. ताई च्या घरापासून १५ मिनिटांवर हाय वे आहे. भाऊ जी गाडी चालवत होते आणि भाऊ मागे बसला होता. काही अंतर पार केले असेल तितक्यात त्यांची बाईक धक्के खात बंद पडली. हायवे असला तरी त्या रात्री जास्त रहदारी नव्हती. आणि त्यात इतकी रात्र झाली असल्यामुळे रस्ता ही निर्मनुष्य झाला होता. त्यांनी बाईक रस्त्याकडे ला घेतली आणि चालू करायचा प्रयत्न करू लागले. बऱ्याच वेळानंतर बाईक सुरू झाली आणि ते पुन्हा घराच्या रस्त्याला लागले.
एव्हाना बराच उशीर झाला होता. रस्ता सामसूम असल्यामुळे फक्त बाईक चा आवाज च येत होता. त्यात अजिबात रहदारी नाही म्हंटल्यावर भाऊजी नी बाईक चा वेग ताशी १०० जवळ नेला. पण माझ्या भावाला जरा आश्चर्य च वाटले. कारण त्यांना या आधी त्याने इतक्या वेगात वाहन चालवताना पाहिले नव्हते. भावाने न राहवून त्यांना विचारले सुद्धा “काय झाले दाजी..”. पण ते फक्त एकच वाक्य बोलले आणि त्याच्या अंगावर शहारे च आले. ते म्हणाले “काही बोलू नकोस.. गप्प रहा.. ती आपल्या सोबत आहे..”. भावाने घाबरतच चौ फेर नजर फिरवली पण त्याला कोणीही दिसले नाही. बऱ्याच वेळा नंतर त्यांनी बाईक चा वेग कमी केला. एक दीर्घ श्वास घेत च म्हणाले “तू काही पाहिलेस का..?”. तसे भाऊ म्हणाला “नाही दाजी.. कशा बद्दल बोलताय तुम्ही.. मला कोणीच दिसले नाही..” तसे ते म्हणाले “अरे वेड्या आपल्या सोबत एक बाई होती.. तिच्या अंगावर फाटकी वस्त्र होती.. केस मोकळे सोडले होते.. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे ती आपल्या बाईक सोबत धावत होती.. म्हणूनच तर मी बाईक इतक्या वेगात घेतली होती..”
त्यांचे बोलणे ऐकून माझी वाचाच बंद झाली होती. घरी आल्यावर आम्ही सर्वांना प्रसंग सांगितला. पण कोणीच जास्त काही बोलले नाही. घरचे फक्त एकच म्हणाले “खूप उशीर झालाय.. झोपायला जा आता..” बहुतेक ते ही प्रसंग ऐकून घाबरले असावेत असे मला वाटून गेले.