मी आता तीस वर्षांची आहे. शहरात राहते, नोकरी करते, आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या. पण एक गोष्ट मात्र कधीही बदलली नाही ती म्हणजे माझ्या लहानपणी घडलेला तो एक भयाण अनुभव. आज इतक्या वर्षांनीसुद्धा मी तो प्रसंग विसरू शकले नाही. आज ही कधी एकटी असले, वातावरण शांत असले आणि मी डोळे मिटले की अजूनही तो अंधार आणि तो विचित्र आवाज माझ्या कानात घुमतो.
मी तेव्हा गावात राहत होते. आमचं छोटंसं खेडं – लाल मातीचे रस्ते, घराच्या मागे विहीर, आणि भरपूर झाडं. पावसाळ्यात सतत ओलसरपणा पसरलेला असे. वीज क्वचितच यायची. रात्र म्हणजे आमच्यासाठी गडद अंधार.. चंद्र असेल तर बरे, नाहीतर संपूर्ण गाव काळोखात बुडायचं. मी तिसरीत शिकत होते. आमची शाळा गावाच्या कडेला होती. छोटी शी शाळा – दोन वर्ग, मातीच्या भिंती आणि समोर मोठं मैदान. दिवसभर तिथं खेळायला आम्हाला मजा यायची. तो दिवस आठवतोय. पावसाळा संपत आला होता. अधून मधून पावसाच्या सरी यायच्या. संध्याकाळी शाळा सुटली, पण मला माझ्या वहीसाठी थांबावं लागलं. बाकी सगळी मूल घरी गेली. बाहेर हलकासा पाऊस सुरु होता. कारण अंगणातल्या झाडावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज सुरु होता. मी एकटीच वही शोधत होते आणि काही केल्या ती सापडत नव्हती. आमच्या बाई म्हणजे शिक्षिका बाजूच्या वर्गात होत्या. त्यांना माहित ही नव्हतं की मी अजूनही वर्गात आहे.. ते ही एकटी.. बऱ्याच वेळा नंतर मला एका बाका खाली माझी वही सापडली. बहुतेक कोणीतरी लपवून ठेवली होती. आणि तेवढ्यात लक्षात आलं की बाहेर ढग दाटून आलेत आणि अंधार पडायला सुरुवात झाली आहे.
मी वही बॅगेत ठेऊन पटकन बाहेर आले. घरी परतायचा रस्ता शाळेच्या बाजूने थोडा आतल्या गल्लीतून जायचा. साधारण वीस मिनिटांचं अंतर होतं. सुरुवातीला ठीक वाटत होतं. पण जसं गावाबाहेरच्या पायवाटेवर आले, तसा अंधार जास्त गडद होत गेला. मी त्या वाटेवर एकटीच होते. तेव्हा वेळेच इतकं भान नव्हतं पण साडे सहा पावणे सात झाले असावेत. त्यात आभाळ भरून आलं होतं, काळसर ढगानी परिसर अजून अंधारमय केलाय. तितक्यात कुठून तरी अचानक वाऱ्याची एक थंडगार झुळूक आली आणि माझ्या अंगावर सर्रकनं काटा आला. पायवाटेच्या दोन्ही बाजूला मोठी झाडं होती. वाऱ्यात त्यांच्या फांद्या आपटून एक विचित्र आवाज होतं होता.. मला अस्वस्थ वाटू लागलं म्हणून मी चालण्याची गती वाढवली. कधी एकदा घरी पोहोचतेय असे झाले होते. तेवढ्यात मला पहिल्यांदा तो आवाज ऐकू आला. जणू कोणीतरी माझ्या मागे चालत होतं. माझ्या पावलांबरोबर अजून एका पावलांचा आवाज. मला मागे वळून पाहायचे सुचले नाही तेव्हा. पण मी थांबले की तो आवाज ही थांबायचा. आणि मी चालू लागले की तो आवाज पुन्हा ऐकू यायचा. मी धास्तावले होते. मागे वळून बघितलं तर काळोखाशिवाय काही दिसत नव्हतं. माझी पावलं जड वाटू लागली. तितक्यात
अचानक पायवाटेच्या कडेला असलेल्या झुडपात कसलासा आवाज आला.
घाबरल्यामुळे माझं हृदय जोरात धडधडू लागलं. खरं सांगायचं तर याआधी मी इतकी कधीच घाबरले नव्हते. किंबहुना खरी भीती काय असते हे मला तेव्हा कळलं होतं. नंतर मला वाटलं एखादा प्राणी असेल – आणि पुढच्या क्षणी एक विचित्र आवाज ऐकू आला. आता मात्र मला राहवलं नाही म्हणून मी धावत सुटले.
पण रस्ता लांबच लांब वाटत होता. माझं श्वास घेणं अवघड झालं. आणि तेव्हाच तो आवाज पुन्हा आला. पण यावेळी तो माझ्या मागून आला नव्हता तर माझ्या डावीकडून झाडांच्या आडून आला होता. खरंच कोणी तरी होतं तिथे. मी थिजले. माझे पाय हलत नव्हते. तिकडे पाहायचा प्रयत्न केला आणि त्या क्षणी, अचानक मला काहीतरी दिसलं. असामान्य उंच बांधा, हिरवट डोळे. ते जे काही होतं ते झाडामागून माझ्याकडे पाहत होत. मी किंचाळायचा प्रयत्न केला, पण तोंडातून आवाजच निघाला नाही. मी जिवाच्या आकांताने पळायला सुरुवात केली.
मागून ही धावण्याचा आवाज येत होता – जो माझ्या हृदयाची धड धड वाढवत होता. मी कशी बशी तिथून लांब आले. घरी पोहोचले तेव्हा अंग थरथरत होतं. आईने विचारलं, की “काय झालं एवढं घाबरायला, धापा टाकत कां आलीस?” पण मी काहीच बोलले नाही. फक्त रडतच तिच्या मिठीत शिरले. त्या रात्री मी झोपलेच नाही. पुढचे काही दिवस मी शाळेत ही गेले नाही. तापाने फण फणत होते. आज तीस वर्षांची झाल्यावर मागे वळून पाहते तेव्हा वाटतं – ते नक्की काय होतं..? अमानवीय काही? ते माझ्यामागे का लागलं होतं..? हे सगळे प्रश्न मला आजही अनुत्तरित आहेत.