अनुभव – अजय नरवाडे
ही घटना मी जेव्हा दहावी इयत्तेत शिकत होतो तेव्हाची आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मी अधून मधून वडिलांसोबत शेतावर पाणी देण्यासाठी जायचो. आमच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक जुनी, खोल विहीर होती. मी नुकताच त्या विहिरी बद्दल काही भयानक गोष्टी ऐकल्या होत्या पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. त्या रात्री, वडील आणि मी संध्याकाळी शेतावर पोहोचलो होतो. लाईट दुपारी दोनपासून रात्री दहापर्यंत होती, त्यामुळे आम्ही सहाच्या सुमारास मोटर चालू केली. पण अचानकच वडिलांना घरून फोन आला – माझ्या काकांचा अपघात झालाय! वडिलांना ताबडतोब घरी निघावं लागलं. जाताना त्यांनी मला सांगितलं, “मोटर बंद करून माधव काकांसोबत घरी ये.” मीही निर्धास्त होतो, कारण शेजारच्या शेतात माधव काका होते.
दोन अडीच तास शेतात थांबलो, पाणी देऊन झाल्यावर साडेआठच्या सुमारास मी मोटर बंद केली आणि माधव काकांकडे गेलो. पण मी तिथे पोहोचल्यावर समजलं की ते आधीच घरी निघून गेले आहेत! आता मात्र माझ्या छातीत धडधड सुरू झाली. एकटं कसं जायचं? पण दुसरा काहीही पर्याय नव्हता. मी विचार केला, “चालत जावं, एखादी गाडी मागून येईलच.” माझं घरं शेतापासून तसं बरच लांब होतं. मी रस्त्यावरून चालायला लागलो. रस्ता कसला पायवाट होती ती. आकाशात चंद्र अस्पष्ट दिसत होता, आजूबाजूला फक्त झाडांची सळसळ. मी थोड्या वेळात त्या विहिरीच्या जवळ पोहोचलो. नकळतच माझ्या पावलांचा वेग वाढला. शरीर थोडंसं शहारलं, पण मी स्वतःला समजावलं की काहीही होत नाही. मी काही अंतर पुढे गेलो आणि अचानकच मला मागून कुणीतरी चालत असल्याचा आवाज येऊ लागला. पावलांचा आवाज! मी थांबून मागे वळून पाहिलं… पण कोणीच नव्हतं.
“कदाचित माझाच भास असेल,” मी स्वतःला समजावत पुढे चालायला लागलो. पण मग पावलांसोबतच बांगड्यांचाही आवाज ऐकू येऊ लागला. जणू कुणीतरी माझ्या मागे चालत होतं, आणि हातात बांगड्या वाजत होत्या! आता मात्र माझ्या हृदयाचे ठोके वाढले. त्या आवाजात अजून भर पडली, “अजय ए.. अजय…” कोणीतरी माझ्या नावाने हाका मारत होतं! मी थरथरत होतो, पण आता मागे वळायचं नव्हतं. शरीरात जी काय ताकद होती ती लावून मी पुढे धावू लागलो. अंग थरथरत होतं, पाय लटपटत होते. वाट सुचत नव्हती, फक्त गाव गाठायचं होतं. मी धावत होतो, आणि तेव्हाच अजून एक नवा आवाज माझ्या कानावर आला—घंटेचा आवाज! जशी बैलाच्या गळ्यात असते तशी! आधी बांगड्या वाजत होत्या, आता घंटाही वाजू लागली. हे सगळं काय घडतंय? नक्की माझ्या मागे कोण आहे कोणी? मी धावायचं थांबवलं तर काहीतरी होईल असं वाटत होतं. गाव अजूनही दूर होतं. मी न थांबता धावत होतो आणि शेवटी गावाच्या वेशीवर पोहोचलो. समोरून माझे वडील गाडीवरून येताना दिसले, आणि तो क्षण म्हणजे जीवात जीव आल्यासारखा वाटला. मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागलो.
जेव्हा मी घरी पोहोचलो आणि सगळं सांगितलं, तेव्हा माझी आजी शांतपणे म्हणाली – काही महिन्यांपूर्वी सिंधू नावाच्या महिलेने आत्महत्या केली होती. म्हणतात, घरच्या जाचाला कंटाळून तिने या विहिरीत उडी घेतली. तिच तुझ्या मागे लागली होती खरंच. पण ज्या क्षणी तुला घंटेचा आवाज ऐकू यायला लागला, त्या क्षणी तिला मागे हटावं लागलं. कारण तो आवाज साधा नव्हता… तो आपल्या शेताच्या शंकराच्या नंदीचा होता! नंदी असा संकटात असलेल्या वाटसरूंना मदत करतो आणि वेशीपर्यंत सुरक्षित आणून सोडतो.”
हे ऐकून मी थरारून गेलो. खरंच, त्या क्षणी नंदी माझ्यासोबतच होता का? कदाचित. मी मनोमन त्याचे आभार मानले. आजही, त्या घटनेच्या आठवणी अंगावर काटा आणतात.