अनुभव – अंकुर मोरे

अनुभव माझ्या ताई च्या मैत्रिणीचा आहे. त्या घटनेच्या आठवणी आजही तिच्या परिवारासाठी एक वेगळीच भावना निर्माण करतात. हे भयानक अनुभव त्या सर्वांच्या मनावर खोल वर कोरले गेले आहेत, आणि प्रत्येक वेळी त्याची आठवण आली की अंगावर काटा येतो. 2014 सालची गोष्ट आहे. माझ्या ताई ची एक मैत्रीण आपल्या लहान बहिणीसोबत आणि वडिलांसोबत एक छोट्या घरात राहत होती. एका जुन्या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर त्यांचं दोन खोल्यांचं घर होतं. तिची आई काही वर्षांपूर्वीच निधन पावली होती, आणि त्यामुळे घरात फक्त ते तिघंच होते. घटना घडली त्या दिवशी तिच्या घरी पाहुणे आले होते. त्यांचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. काही वेळ गप्पा गोष्टी करून ते जायला निघाले तेव्हा ताई त्यांना सोडायला जवळच्या हायवे पर्यंत गेली. आमच्या भागात बोलले जायचे कि त्या हाय वे वर नेहमी अपघात घडतात आणि ती जागा चांगली नाही. ताई तिथे गेली तेव्हा बरीच रात्र झाली होती. पाहुण्यांना सोडून ती घरी यायला निघाली.

पण येताना ती एकटी आली नाही बहुतेक. घरात पाऊल ठेवताच ती विचित्र वागू लागली. सगळ्यात आधी ती येउन 15 मिनिट शांत बसून राहिली. ना काही बोलली, ना जागेवरून हलली ना साधी डोळ्याची पापणी हलवली. तिची लहान बहीण घरातच होती. तिचे अचानक बदललेले वागणे तिने लगेच ओळखले. तिला भानावर आणायचा प्रयत्न केला पण काहीच प्रतिसाद देत नव्हती. तसे लहान बहीण तिच्यासाठी स्वयंपाक घरात पाणी आणायला गेली. तितक्यात अचानक ती उठली आणि समोरच्या काचेच्या छोट्या टीपॉय वर जोरात हात आपटला. ज्यामुळे काच फुटून मोठा आवाज झाला. तिच्या आवाजातली घर घर खूप वाढली होती. तिने घरातल्या सगळ्या वस्तू उचलून आदळ आपट करायला सुरुवात केली. लहान बहिणीने तिला सावरायचा प्रयत्न केला पण ती काही केल्या तिला ऐकत नव्हती. परिस्थिती हाताबाहेर जातेय हे लक्षात येताच तिने वडिलांना आणि काही मैत्रिणींना फोन लावला..

त्यात तिने माझ्या ताई ला ही फोन लावून घरी यायची विनंती केली. माझी ताई मदतीसाठी लगेच त्यांच्या घरी गेली. त्यांचे वडील येईपर्यंत ती रात्र भर तिथेच थांबली. त्या सगळ्यांनी मिळून तिला शांत करायचा प्रयत्न केला पण तिच्या अंगात जणू अमानवीय शक्ती संचारली होती. शेवटी माझ्या ताईने घरी फोन करून बाबांशी बोलून घेतले आणि एका बाहेरची बाधा बघणाऱ्या व्यक्तीचा नंबर दिला. जेव्हा माझ्या ताईचे आणि बाबांचे बोलणे चालू होते तेव्हा बाबांनी फोन स्पीकर मोड वर ठेवला होता. त्यामुळे तिच्या मैत्रिणीचे भयाण आवाज, तिचे किंचाळणे मी ऐकत होतो. खरं सांगायचं तर हा प्रकार भीती दायक तर होताच पण त्याहून जास्त मन अस्वस्थ करणारा होता. काही वेळातच तो जाणकर व्यक्ती आला आणि त्यांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणून तिला शांत केलं. तिला त्या हाय वे वरच्या एका अतृप्त आत्म्याने झापटले होते. पण हे सगळं इतक्या वरच थांबलं नाही. काही दिवस उलटले. त्यांचे वडील संध्याकाळी सहज फेरफटका मारायला बाहेर पडले होते.

दोघी बहिणींना भूक लागली होती म्हणून लहान बहीण जवळच असलेल्या एका किराणा दुकानात काही वेफर्स, बिस्कीट वैगरे आणायला घरा बाहेर पडली. घराचा दरवाजा अलगद लावून घेतला आणि खालच्या मजल्यावर चालत आली. तसे तिला कसलीशी चाहूल जाणवली, एक वेगळाच आवाज आला. तिने दुर्लक्ष केलं आणि ती दुकानात आली. खायच्या वस्तू घेतल्या आणि ती पुन्हा घरी आली. जशी ती घरात आली तसे समोर चे दृश्य बघून तिची वाचाच गेली होती. तिच्या ताई ला पुन्हा त्या अतृप्त आत्म्याने झपाटले झाले होते. तिला समजायला वेळ लागला नाही. या वेळेस ती जे करत होती ते विश्वास न बसण्या सारखं होतं. तिने पहिल्या खोलीतला मोठा सोफा दोन्ही हातानी उचलला आणि जोरात टीव्हीच्या दिशेने भिरकावला. तसा जोरात आवाज झाला. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं, तिच्या वर्तनात खूपच अंघोरी कृत्य होती. तिने जास्त वेळ न घालवता घरातून धावत बाहेर जाऊन त्यांच्या वडिलांना कॉल केला. 

त्यांनी ताबडतोब त्या काकांना फोन केला, जे एक जाणकार व्यक्ती होते आणि त्यांना तू असे का वागतेय ते माहित होते.. ते तासाभरात घरी आले, या वेळेस त्यांच्या कडे एक नारळ आणि इतरही पूजे साठी लागणारे काही साहित्य होते. त्यांनी तिचे हात पाय बांधून बसवून ठेवायला सांगितले होते. आल्यावर त्यांनी एक विधी केला, विशिष्ट मंत्र पठण केले. नंतर तिच्यावरून एक नारळ ओवाळून टाकला आणि वडिलांना दूर जाऊन फोडून यायला सांगितला. जसे बाबा तो नारळ घेऊन घरा बाहेर पडले तसे हळू हळू ताई शांत झाली. तिच्या वर्तनात बदल झाला आणि ती परत आपल्या स्वाभाविक स्थितीत परतली. त्या रात्री घडलेली भयंकर घटना त्या सर्वांच्या मनावर जणू कोरली गेली. आज 10 वर्षांनी देखील ती आठवण काढली तरी अंगावर काटा येतो..

Leave a Reply