तो मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता. मुंबई उन्हात तापुन निघत होती म्हणून माझा मित्र विशालने त्याच्या गावी पुण्याला पिकनिक ला जायचा प्लान बनवला आणि बाकी मित्रानाही तो प्लान आवडला म्हणून आम्ही सगळे मित्र गाडी करून पुण्याला निघालो. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर सुसाट गाडी हाकून अवघ्या काही तासात आम्ही गाव गाठले..

३ दिवस खूप धमाल मस्ती केली आणि परतीच्या प्रवासावर निघालो. संध्याकाळी साधारण ५ ला आम्ही निघालो. दोन तासांचा हसत खेळत प्रवास झाला होता आणि अचानक आमची गाडी बंद पडली. मी विशाल ला विचारले काय झाले. यावर विशालला सुधा उत्तर देता आले नाही कारण मागच्या आठवड्यात servicing केलेली गाडी अचानक बंद पडली होती. खूप प्रयत्न केला पण गाडी चालू झाली नाही शेवटी त्यांनी बाजूने जाणाऱ्या एका गाडीला ला थांबवले. एखादा ओळखीचा Mechanic आहे का असे विचारले. त्या गाडी वाल्याने सांगितले कि इथून १५ मिनिटांच्या अंतरावर एक Mechanic आहे तुम्ही तिथे जा. मग आम्ही मित्रांनी गाडी ढकलत तिथपर्यंत नेली . Mechanic ने ती गाडी पहिली आणि म्हणाला साहेब वेळ लागले इंजिन मध्ये प्रोब्लेम वाटतोय.. हे ऐकून आम्ही निराश झालो आणि गाडी दुरुस्त होण्याची वाट पाहू लागलो. गाडी दुरुस्त करण्यासाठी तब्बल ४ ते ५ तास लागले. इथे आम्ही उभे राहून कंटाळलो होतो. काही वेळाने Mechanic चे बोलावणे आले आणि आम्ही निघायला तयार झालो.

गाडी विशाल चालवायचा पण त्याने कधी रात्रीची गाडी चालवली नव्हती. गाडी ढकलून आम्ही पार थकून घेलो होतो आणि आता मात्र ११ वाजत आले होते. आम्ही असे ठरवले कि ती रात्र आसपास कुठे छोटस हॉटेल बघून तिकडेच घालवावी आणि सकाळी निघावं. आम्ही त्या Mechanic कडे विचार पूस केली. तेव्हा तो Mechanic म्हणाला साहेब या मुख्यरस्त्यावरून पुढे डावीकडे वळलात कि ८ किलोमीटर अंतरावर एक गेस्ट हाउस आहे तिथे तुम्हाला राहायला जागा मिळेल. विशाल ने गाडी काढली आणि mechanic ने सागीतल्या प्रमाणे काही अंतर जाऊन डावीकडे वळला. तो रस्ता गर्द दाट झाडीचा होता. उंच आणि दाट झाडांमुळे रस्त्यावर गडद अंधार पडला होता. अवघ्या काही मिनिटात आम्ही लोक त्या गेस्ट हाऊस जवळ पोहचलो. ते गेस्ट हाउस मुख्यत्वे सरकारी अधिकारी, आमदार, खासदार अशा लोकांना त्या भागाच्या दौर्यावर आल्यावर राहण्यासाठी बनवले होते. पण मुळात तिथे जास्त वर्दळ दिसली नाही. आवारात फक्त एक गाडी उभी होती.

विचारपूस केल्यावर आम्हाला एका तळमजल्यावरची एक खोली दिली गेली. खोली तशी लहानच पण एक मोठी खिडकी असल्यामुळे हवेशीर होती. सगळे थकले होते त्यामुळे मिळेल ते खाऊन सगळे झोपी गेले. पण विशाल ला मात्र झोप येत नव्हती म्हणून तो त्याच्या मोबाईल वर सिनेमा पाहत बसला होता. रात्रीचे २ वाजले होते. सिनेमा पाहत असताना अचानक विशाल ला कसला तरी आवाज ऐकू आला. तो आवाज कोणी तरी वेगात चालण्याचा होता. प्रथम त्याला वाटले कि त्याला भास झाला असेल पण पुन्हा तोच आवाज आला. थोडी चाहूल घेतल्यावर जाणवले कि तो विचित्र आवाज खिडकीच्या दिशेकडून येतोय. तो आवाज असे भासवत होता कि कोणी तरी खिडकी बाहेर वेगात येरझऱ्या घालतेय. विशाल ने विचार केला कि कोणी गावातील व्यक्ती असेल पण त्या आवारात फिरण्याची ती वेळ नक्कीच नव्हती. विशाल घाबरणारा नव्हता म्हणून तो उठला आणि त्याने खिडकी उघडली बाहेर काळाकुट्ट अंधार होता. त्याने वाकून सगळी कडे पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या दृष्टीस काहीच पडले नाही. पण तो आवाज मात्र थांबत नव्हता.

त्याला काय करावे सुचेना. त्याने लगेच आपला मोबाईल घेतला आणि विडीओ कॅमेरा सुरु केला आणि आवाजाच्या दिशेने फिरवू लागला. काही क्षण गेले असतील, अचानक त्याच्या पाठीवर एक थाप पडली “काय करतोयस रे विशाल” अचानक झालेला स्पर्श आणि आवाज यामुळे विशाल भीतीने दचकला आणि मागे वळून पहिले तर तो आमचाच मित्र आनंद होता. विशाल स्वताला सावरत म्हणाला काही नाही चल झोपूया. विशाल ने खिडकी बंद केली आणि आनंद च्या शेजारी येऊन झोपला. काय शूट झाले ते बघण्यासाठी त्याने पुन्हा मोबाईल घेतला आणि त्याने जे पाहिलं ते कल्पना शक्तीच्या पलीकडच होत. त्याला दरदरून घाम फुटला. त्याने लगेचच सर्वाना उठवल आणि जे शूट केल होत ते दाखवल. एक माणसासारखी दिसणारी लालसर आकृती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फेऱ्या मारत होती. आमच्यातला एक जण म्हणाला थोडा brightness वाढव.. नक्की कोण आहे ते कळेल. विशाल ने brightness वाढवला आणि आमची वाचाच बसली. पूर्ण जळलेले शरीर, रक्ताने माखलेले कपडे, अर्धवट जळून विद्रूप झालेला चेहरा.. हा प्रकार तरी नक्की काय आहे ?? आमच्यातला एक जण ओरडला आणि म्हणाला विशाल आत्ताच्या आत्ता हे डिलीट कर..

पण विशाल तसा निडर होता. तो म्हणाला हे जे शूट झालय ते सगळ्यांना कळाल पाहिजे. त्याने कोणाचेच ऐकले नाही आणि मोबाईल बंद करून खिशात ठेवला. सगळे घाबरले होते. इतके थकलेले असताना हि भीतीमुळे एका क्षणात तो थकवा, झोप कुठच्या कुठे निघून गेली. त्या रात्री आम्ही कोणीच झोपू शकलो नाही. जसे उजाडायला सुरुवात झाली आम्ही तडक उठलो आणि परतीचा प्रवास करायच ठरवलं. सगळ आटोपून आम्ही ते गेस्ट हाऊस सोडलं. सगळ्यांनी पुन्हा एकदा विशाल ला तो विडीओ डिलीट करण्याचा आग्रह धरला पण विशाल ने ते टाळल कारण त्याला ला तो विडीओ सगळ्यांना दाखवयाचाच होता. 

विशाल च्या हट्टी पणामुळे आम्ही सगळेच शांत होतो. झालेल्या प्रकारामुळे कोणीच कोणाशी जास्त बोलत नव्हत. आम्ही मुख्य रस्त्याला लागण्याआधी अवघ्या १० मिनिटात बघता बघता आभाळ भरून आल. मुसळधार पाउस पडायला सुरुवात झाली. थोड आश्चर्य वाटल कारण वातावरण इतक्या लगेच बदलले होते. बाजूच्या गर्द झाडीमुळे त्या रस्त्यावर अंधार वाटत होता. मी सहज म्हणून बाजूच्या आरशात पहिले आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मागे तीच आकृती आमचा पाठलाग करताना दिसली. मी घाबरलेल्या आवाजात विशाल ला म्हणालो “विशाल मागे बघ.. आज आपले काही खरे नाही..”. विशाल ने पहिले आणि एकही शब्द न बोलता गाडी सुसाट पळवायला सुरुवात केली. मुसळधार पावसात काहीच दिसत नव्हते, रस्ता अनोळखी असल्यामुळे खड्डे, वळण काहीच माहित नव्हते. व्हायचे नव्हते तेच झाले. विशाल चा गाडी वरचा ताबा सुटला आणि गाडी 20 फुट नाल्यात जाऊन पडली. 

शुद्ध आली तेव्हा हॉस्पिटल मध्ये होतो. डोळे उघडताच झालेला प्रकार आठवला. उठता येत नव्हत कारण डोक्याला जबरदस्त मार लागला होता. मित्रांची चौकशी केल्यावर कळले कि सगळे सुखरूप आहेत. जीवात जीव आला. 

काही दिवसा नंतर आम्हाला discharge मिळाला. एक विचित्र गोष्ट म्हणजे त्या अपघातात विशाल चा मोबाईल पूर्ण फुटला. आम्ही त्या मोबाईल मधला data मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो मिळू शकला नाही. विशाल इतक्यावर थांबला नाही. त्याने त्या गेस्ट हाउस ची माहिती मिळवली. ते सरकारी गेस्ट हाउस आहे. पण सरकारी अधिकारी तिथे जाण्यास टाळतात कारण त्या ठिकाणी कित्येकांना असे अमानवीय अनुभव आले आहेत. त्यामुळे सहसा तिथे जाणं सगळे टाळतात.

कुठे हि आसरा घेण्या आधी त्या ठिकाणाची नीट माहिती करून घेतलेली कधीही चांगली. ते म्हणतात ना ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ म्हणूनच कदाचित आम्ही मरणाच्या दारातून परतू शकलो.

https://youtu.be/9A7ACvF7UEI

Leave a Reply