अनुभव – श्रेयस पांचाळ

अनुभव १९७० – १९८० च्या दशकातला असावा जो माझ्या वडिलांसोबत घडला होता. त्या वेळी माझ्या वडिलांचे लग्न ही झाले नव्हते. तेव्हा ते आपल्या बहिणीकडे म्हणजे माझ्या आत्याच्या गावाला गेले होते. त्या काळी सगळा प्रवास बस ने व्हायचा. रात्री ची बस होते. निघताना त्यांनी जास्त समान घेतले नाही पण खिशात एक दारूची बाटली ठेवली. वेळेत बस स्टॉप वर पोहोचले आणि बस ही ठरल्या वेळी सुटली. रात्रीची वेळ असल्यामुळे बस मध्ये अगदी तुरळक लोक होती. त्यामुळे मग दारू प्यायले. साधारण रात्री अडीच तीन ला गावात पोहोचले. स्टॉप वर उतरले आणि आजू बाजूला नजर फिरवली तर मिट्ट अंधार पसरला होता. तितक्यात त्यांना लक्षात आले की आपण चुकीच्या स्टॉप वर उतरलो आहोत. पण तो रस्ता अगदी सामसूम झाला होता. त्यामुळे आता एखादे वाहन मिळणे ही जवळ जवळ अशक्य झाले होते.

आत्याच्या घरी जायचे असल्यामुळे त्यांनी पायीच प्रवास सुरू केला. बराच वेळ लागणार होता पण दुसरा काही मार्ग नव्हता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवी गार शेतं आणि चंद्राचा हलकासा प्रकाश तेव्हढाच काय तो मार्ग दाखवत होता. अधून मधून वाऱ्याची एक झुळूक आली की शेतातून सळसळ ऐकू यायची. चालता चालता अचानक एका मोठ्या दगडाला पाय लागून ते धडपडले आणि तोल जाऊन रस्त्याच्या बाजूला शेतात जाऊन पडले. पडल्यामुळे पायाला थोड लागलं होत ते पाहत ते तिथेच बसून राहिले. अवघे काही क्षण उलटले असतील आणि त्यांना त्यांच्या नावाने हाक ऐकू आली. ” काय रे कुठे चालला आहेस “. ते तसेच घाबरत उठून उभे राहिले आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागले. 

त्यांच्या पासून अवघ्या ७-८ फुटांवर कोणी तरी उभ होत. अंधार असल्यामुळे आणि त्यात शेताचा भाग असल्यामुळे नीट दिसत नव्हत पण तिथे कोणीतरी उभ आहे हे नक्की होत. त्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही आणि हळु हळू एक एक पाऊल मागे टाकत रस्त्याच्या दिशेने जाऊ लागले. तसे ते जे काही होत ते वाढलेल्या शेताच्या पिकांमधून सरकत पुढे येऊ लागलं. जसं ते बाहेर आल तस चंद्राच्या प्रकाशात त्याच भयाण रूप दिसलं. माझे वडील निरखून पाहू लागले आणि दिसलं की त्याला मुंडकं च नाहीये.. फक्त धड त्यांच्या समोर उभ आहे. ते भयानक दृश्य पाहून जणू काळीज भीती ने छाती फाडून बाहेर येईल की काय असं वाटू लागलं.

पण स्वतःला कसे तरी सावरत ते उठले आणि जिवाच्या आकांताने धावत सुटले. पण ते जे काही होत ते त्यांच्या मागे येतच होत. बऱ्याच वेळानंतर ते गाव देवीच्या मंदिराजवळ आले आणि झटकन त्या मंदिराच्या आवारात आले. तसे मागून एक किळस वाणा आवाज कानावर पडला. सकाळ होईपर्यंत ते तिथेच थांबले आणि पहाटे आपल्या बहिणीच्या घरी गेले. गेल्या गेल्या तिला सगळा प्रकार सांगितला तेव्हा ती सुद्धा खूप घाबरली होती. या प्रसंगाला आज ३०-४० वर्ष उलटली पण आज ही कधी वडिलांनी या बद्दल सांगायला सुरुवात केली तर अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही.

Leave a Reply