अनुभव – अजय पवार

अनुभव मला आणि माझ्या मित्रांना २०१८ साली आला होता. आम्हा तीन मित्रांचा ग्रुप. नुकतीच शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती. निकाल लगायला अजुन बराच अवधी बाकी होता म्हणून आम्ही त्या वेळात एक कोर्स लावला. पण तो ही २ तासांचा असल्यामुळे दुपारी आम्हाला बराच रिकामा वेळ मिळायचा. त्यामुळे आम्ही तिघांनी परत टाईम जॉब करायचा विचार केला. काही दिवसातच आम्हाला एका मल्टी नॅशनल फूड चेन च्या रेस्टॉरंट मध्ये पार्ट टाईम जॉब मिळाला. सुरुवातीला आमची शिफ्ट संध्याकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत होती. पण काही आठवड्यात आम्ही काम शिकल्यावर आम्हाला ६ ते १२ बोलवण्यात आले. त्यात पगार ही जास्त मिळणार होता म्हणून आम्ही होकार दिला आणि आमचे रूटीन सुरू झाले. आमच्यातल्या एका मित्राकडे बाईक होती, एक मित्र बस ने यायचा आणि माझे घर त्या रेस्टॉरंट पासून अवघ्या ५ मिनिटांवर होत. रोज कामावरून निघाल्यावर आम्ही शिल्लक राहिलेले नॉन वेज खायचो आणि मग घरी जायला निघायचो.  

आमच्या भागात रात्री १२ नंतर पब्लिक ट्रान्स पोर्ट इतके ॲक्टिव नसायचे. त्यामुळे एका मित्राला बाईक वर सोडायला जावे लागायचे. रोज काम संपल्यावर बाईक असलेला मित्र दुसऱ्याला सोडायला जायचा आणि मग तो त्याच्या घरी जायचा. एक दिवस आमच्याकडे ऑडिट होणार होत म्हणून आदल्या दिवशी सगळे बंद झाल्यावर आम्हाला डी प क्ली निंग करायची होती. त्यामुळे सगळे काम आटोपून निघे पर्यंत आम्हाला निघायला बराच उशीर झाला. आम्ही जवळपास रात्री २ ला सगळे आवरून बाहेर पडलो. शिल्लक राहिलेले नॉन वेज पार्सल करून घेतले. कारण तिथे खात बसलो असतो तर अजुन उशीर झाला असता. म्हणून बाहेर कुठे तरी थोड्या वेळ थांबून खाऊयात असे ठरले. त्यावेळी कधी भीती वैगरे अजिबात वाटली नाही. कारण या आधी ही आम्ही रात्री अपरात्री भटकायचो. त्या दिवशी आम्ही जवळच्या एका टेकडीवर जायचे ठरवले. अगदी सामसूम परिसर आहे म्हणून मग तिकडेच बसून नॉन वेज वर ताव मारायचा निर्णय झाला. तसे दिवसा त्या टेकडीवर गेले की अगदी प्रसन्न वाटते, निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखे वाटते. कारण तिथे बरीच हिरवळ आहे, झाडी झुडूप आहेत. 

आम्ही सकाळच्या वेळी बऱ्याचदा त्या टेकडीवर गेलो होतो. पण रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच आलो होतो. गडद अंधारात त्या टेकडीच रूप काहीस वेगळेच होत. मध्यरात्र उलटून गेल्यामुळे तो भाग अगदी निर्मनुष्य होता. स्मशान शांतता पसरली होती. फक्त रात किड्यांचा आवाज कानावर पडत होता. टेकडी उतरून थोड पुढे चालत गेलं की रस्त्याच्या पलीकडे देवीच एक सुंदर मंदिर आहे. ते तिथून दिसत नव्हत पण त्याचा उजेड जाणवत होता. आम्ही तिथेच गाडी पार्क केली आणि एका बाकावर सगळ्या बाग काढून उघडल्या. त्या थंड वातावरणात नॉन वेज चा घमघमाट सुटला. आम्ही त्या बरोबर आणलेला सॉस आणि चटणी वैगरे काढायला सुरुवात केली. आणि तितक्यात पावलांचा आवाज झाला. एखादा कुत्रा वासावर झाडी मागून धावत आला असे जाणवले. तसे ही या भागात सतत कुत्रे फिरत असतात त्यामुळे नवल वाटण्याचे काही कारण नव्हते. मित्राने एक नॉन वेज चा तुकडा त्या आवाजाच्या दिशेने भिरकावला. आणि सॉस वैगरे फॉइल पेपर वर काढू लागला. तितक्यात त्या फेकलेल्या तुकड्याची हाडे अगदी कडकडून चावून खात असल्याचा आवाज त्या शांत परिसरात घुमला. 

मित्र म्हणाला “आपल्या सारखाच उपाशी दिसतोय हा कुत्रा पण..” आणि आमच्यात हशा पिकला. आम्ही खायला सुरुवात करणार तेवढ्यात मित्र उठला आणि का कोण जाणे त्या झाडीच्या मागे पाहायला गेला. तिथले दृश्य पाहून त्याला धडकीच भरली. एक फाटक्या वस्त्रातली बाई तो तुकडा अधाश्यासारखी चावून खात होती. सगळ्यात भयानक आणि किळसवाणा प्रकार म्हणजे खाताना त्या तुकड्याची हाडे तिच्या ओठांमध्ये घुसून रक्त येत होत. आणि त्यामुळे तिचे तोंड रक्ताने माखले होते. ही नक्की साधी बाईचं आहे की.. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. तो सुन्न होऊन तिच्याकडे पाहत होता. ओरडा वेसे वाटत होते पण भीतीमुळे आवाजच फुटत नव्हता. बराच वेळ झाला हा आला नाही म्हणून आम्ही उठून त्याला पाहायला गेलो. आणि आम्हीही तो भयानक प्रकार पाहू लागलो. मी पटकन त्याला भानावर आणले आणि आम्ही तिथून धावत सुटलो. या आधी मी असा प्रकार कधीच अनुभवला नव्हता म्हणून मी प्रचंड घाबरलो होतो. 

धावत असताना हिम्मत करून मी मागे वळून पाहिले तर आम्ही बाकावर ठेवलेल्या नॉन वेज च्याच पार्सल वर ती अक्षरशः तुटून पडली होती. एखाद्या जनावरासारखे खात होती. आम्ही बाईक तिथेच टाकून पळालो. टेकडीवरून खाली उतरून रस्ता ओलांडला आणि समोरच्या मंदिरात शिरून थेट गाभ्याऱ्यात आलो. काही अवधी उलटला असेल. ती बाई टेकडीवरून खाली धावत येताना दिसली आणि आम्ही तिला विस्फारलेल्या डोळ्यांनी पहातच राहिलो. एव्हाना तिचे कपडे रक्ताने बरबटले होते. ती मंदिराच्या आवारात प्रवेश करू शकत नव्हती म्हणून बाहेरच येरझाऱ्या मारू लागली. बहुतेक ती आमच्या बाहेर येण्याची वाट पाहत होती. आम्ही घरी फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्या भागात नेटवर्क नसते हे नंतर लक्षात आले. मी वेळ पाहिली तर ३.१५ वाजले होते. आम्ही मंदिरात च बसून राहिलो. भीतीमुळे झोप येत नव्हती पण दमायला झाले होते म्हणून क्षणभरासाठी डोळा लागला. पुन्हा कसल्याश्या आवाजाने जाग आली. बाहेर चौफेर नजर फिरवली पण ती कुठे दिसली नाही. 

वेळ पाहिली तर ४ वाजून गेले होते. साधारण तासा भराने माझ्या हातावर एक थंड स्पर्श जाणवला. थोडा ताण देऊन मी डोळे उघडले. पेहरावावरून ते मंदिराचे पुजारी असावे असे वाटले. त्यांनी जरा रागातच विचारले “कोण आहात तुम्ही.. ही काय जागा आहे का झोपायची..?” त्यांचे असे हे विचारणे साहजिक होते कारण त्यांना वाटले असावे की आम्ही मद्यपान वैगरे करून आलो असू. पण तसे काहीच नव्हते. आम्ही घडलेला प्रसंग सांगून त्यांची माफी मागितली. त्यावर ते म्हणाले की काल अमावस्या होती, बरे झाले तुम्ही इथे आलात.. या पुढे असे काही करू नका.. नाही तर उगाच नको त्यात अडकाल.. त्यांनी समोर च ठेवलेल्या एका कलाशातले पाणी आमच्या अंगावर शिंपडले. काही थेंब हातावर दिले आणि प्यायला सांगितले. ते म्हणाले “काळजी करू नका.. ब्रम्ह मुहूर्ताची वेळ झाली आहे.. आता तुम्ही खुशाल घरी जाऊ शकता..” आम्ही त्यांचे पुन्हा एकदा आभार मानले, देवासमोर हात जोडले आणि तिथून बाहेर पडलो. पार्क केलेली गाडी आणण्यासाठी पुन्हा टेकडीवर गेलो. त्या बाकावर पाहिलं तर तिथे रक्त पडल होत, जे एव्हाना सुकल होत. आम्ही जास्त विचार न करता गाडीवर बसलो आणि घरचा रस्ता धरला. 

Leave a Reply