अनुभव – अक्षय पंडित

मी एका नावाजलेल्या अड एजन्सी मध्ये जॉब करतो. हे चारही अनुभव मला माझ्या ऑफिस मध्ये आले आहेत. जॉब रूटीन जरा वेगळे असल्यामुळे बऱ्याच वेळा लेट नाईटस आणि वीकेंड ला वर्कींग असते मला. 

पहिला अनुभव – 

त्या दिवशी नेहमी प्रमाणे सगळे काम करत होतो. पण कामाचा अंदाज नसल्याने खूप उशीर झाला. काही करून दुसऱ्या दिवशी क्लायंट ला प्रेझेन्टेशन द्यायचं होत. त्यामुळे काम पूर्ण करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. कामाच्या नादात रात्री चे १२.३० होऊन गेले होते. पावसाचे दिवस असल्यामुळे सगळे टीम मेट्स कॅब वैगरे करून घरी जायला निघाले. माझ्याकडे बाईक असल्याने मी ऑफिस मध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. कारण पावसाने ही जोर धरायला सुरुवात केली होती. 

माझ्या ऑफिस मध्ये खूप मोठा बाल्कनी एरिया आहे. जिथे टीम मीटिंग आणि डिस्कशन साठी सोफा, टेबल वैगरे ठेवले आहे. कधी रात्री ऑफिस मध्ये थांबायची वेळ आली की मी तिथेच झोपायचो. रात्री एकच सेक्युरिटी गार्ड असायचा. तो ही रिसेप्शन च्याच ठिकाणी दरवाजा वैगरे लाऊन आत झोपलेला असायचा. सकाळी ७ ला साफ सफाई करायला स्टाफ यायचा तेव्हा त्यांच्याच आवाजाने मला जाग यायची. आणि मग मी उठून थोडे फ्रेश होऊन घरी जायला निघायचो. 

त्या दिवशी दिवसभर काम करून खूप दमलो होतो. जेमतेम काम पूर्ण करून सोफ्यावर अंग टाकले आणि काही क्षणात डोळा लागला. काही वेळात मी गाढ झोपी गेलो. काही वेळा नंतर नेहमी प्रमाणे साफ सफाई करण्याचा आवाज येऊ लागला. माझ्या बाजूचे टेबल सरकवून झाडू वैगरे मारायला सुरुवात केली असे समजून सकाळ झाली आता उठायला हवे असा विचार येत झोपमोड झाली. म्हणून झोपेतच वेळ पाहायला म्हणून खिशातून मोबाईल काढला आणि झटकन उठून बसलो. रात्रीचे ३ वाजले होते. ऑफिस मध्ये माझ्या शिवाय दुसरे कोणीही नव्हते. त्या भयाण शांततेत तो टेबल सरकवण्याचा आवाज अजूनही कानात घुमत होता. मी वळून पाहिले तर ते टेबल खरच सरकून बाजूला झाले होते. म्हणजे तो माझा भास नक्कीच नव्हता. 

त्या संपूर्ण मजल्यावर झोपलेल्या सेक्युरीटी गार्ड शिवाय कोणी ही नव्हते. तरीही सतत आसपास कोणी तरी असल्याची चाहूल जाणवत होती. एक अनामिक भीती दाटून आली होती. मी तिथून उठलो आणि रिसेप्शन कडे गेलो. तिथे सिक्युरिटी गार्ड गाढ झोपेत होता. बाहेर मुसळधार पाऊस सुरू असल्याने बाहेर पडणे ही योग्य नव्हते. त्यामुळे ती संपूर्ण रात्र मी ऑफिस च्याच रिसेप्शन वर बसून काढली. सकाळी पाऊस थांबल्यावर तिथून बाहेर पडलो आणि सरळ घरं गाठल. 

दुसरा अनुभव – 

माझे ऑफिस २२ व्या मजल्यावर आहे. ऑफिस मोठे असल्याने संपूर्ण मजला आमच्या ऑफिस नेच घेतला आहे. २ मुख्य भाग आहेत. मी जिथे बसतो त्या भागात कॅन्टीन नाहीये त्यामुळे कॅन्टीन मध्ये जायचे म्हंटले की रिसेप्शन समोरून दुसऱ्या बाजूला जावे लागते. आणि तिथून जाताना समोरच्या लिफ्ट ही दिसतात. 

ऑफिस मध्ये २ सिक्युरिटी गार्ड असतात. एक दिवसा आणि एक रात्री. म्हणजे १२ तासांची ड्युटी प्रत्येकी. त्या दिवशी एकच गार्ड आला होता. मी विचारपूस केल्यावर कळले की दुसऱ्या गार्ड ची मुलगी खूप आजारी आहे म्हणून तो आज सुट्टीवर आहे. त्या दिवशी ही मला खूप उशीर झाला. रात्री चे २ वाजले असतील. मी आणि माझ्या टीम मधले २-३ जण आम्ही काम करत बसलो होतो. मला खूप झोप येत होती. म्हणून उठून कॉफी घेऊन येऊ असा विचार करत कॅन्टीन मध्ये जायला निघालो. तितक्यात माझे लिफ्ट जवळ लक्ष गेलं. तिथे रात्र पाळी करणारा गार्ड उभा होता. मी २ पावले चालत पुढे आलो तर दुसरा गार्ड रिसेप्शन कडे मस्त कानात हेडफोन्स टाकून गाढ झोपला होता.

तितक्यात लक्षात आले की रात्रपाळी करणारा एक गार्ड तर आज सुट्टीवर होता. मी पुन्हा मागे वळून पाहिले तर तिथे कोणीही नव्हतं. हे सगळे काही क्षणात झाले. का कोण जाणे पण मला वाटले की हा माझा भास नक्कीच नव्हता. तिथे तोच गार्ड उभा होता. मी झोपलेल्या गार्ड ला उठवले आणि विचारले “काय हो, ते रात्री सिक्युरिटी साठी मामा येतात ते आलेत का?”. त्यावर तो जे म्हणाला ते ऐकुन मी थंड च पडलो. तो सांगू लागला “तुम्ही सगळी तरुण पोरं. आज कालच्या पोरांना असल्या गोष्टींवर विश्वास बसणार नाही. पण पोरा तू स्वतःहून विचारले स म्हणून सांगतो. इथे दोन्ही शिफ्ट मीच करतोय दुसरे कोणी नाहीये. तुला जो दिसला तो सिक्युरिटी गार्ड नव्हता. ते जे काही आहे ते कोणाचेही रूप घेऊ शकते. पण घाबरु नकोस ते कोणाला काही त्रास देत नाही. आज पर्यंत तरी त्याने कोणाला कसलाच त्रास दिला नाहीये”.

तिसरा अनुभव – 

खर तर मी ऑफिस जॉईन केल्यानंतर आलेला हा सगळ्यात पहिला अनुभव आहे. तेव्हा मला ऑफिस बद्दल काहीच माहीत नव्हते. त्या आठवड्यात मला वीकेंड वर्किग होते. आम्ही फक्त ४ जण ऑफिस ला आलो होतो आणि सिक्युरिटी गार्ड. संध्यााळपर्यंत म्हणजे साधारण ४ वाजे पर्यंत सगळ्यांचे काम आटोपले होते. माझ्या अनिमेशन रेंडरींग ला अजुन बराच वेळ लागणार होता म्हणून बाकीच्यांना म्हणालो की तुम्ही निघा माझे काम झाले की मी ही सगळे बंद करून निघेन. 

त्या सगळ्यांनी ठीक आहे म्हणत माझा निरोप घेतला. माझ्या ऑफिस मध्ये सगळे ग्लास डूअर्स आहेत. त्यामुळे कोणतेही केबिन जरी असले तरी आतले सगळे दिसते. वॉश रूम कडे जाताना माझ्या बॉस चे केबिन ही दिसते. फाईल रेंडर होता होता ६.३० वाजले. सिक्युरिटी गार्ड ही चहा प्यायला म्हणून खाली गेला होता. त्यामुळे आता मी ऑफिस मध्ये एकटाच होतो. सगळे आटोपल्यावर पिसी बंद केला आणि बॅग घेऊन जायला निघालो. जाताना वॉश रूम कडे वळलो. तर माझे बॉस केबिन मध्ये बसून माझ्या कडे पाहत होते. मी त्यांना एक फॉर्मल स्माई ल देऊन आत वॉश रूम मध्ये गेलो. 

फ्रेश होऊन २ मिनिटात बाहेर आलो आणि पुन्हा एकदा केबिन कडे नजर गेली. तिथे कोणीही नव्हते. मी ऑफिस मधून बाहेर पडलो आणि लिफ्ट मध्ये शिरलो. काही वेळात लिफ्ट मधून बाहेर पडलो आणि समोर सिक्युरिटी गार्ड दिसला तसे त्याला विचारले “काय हो मामा आज आपले बॉस पण आलेले का? मला माहीतच नव्हते. आता निघताना त्यांना पाहिले मी”. तसे तो म्हणाला “नाही, सकाळ पासून तुम्ही चौघेच होता ऑफिस मध्ये”. हे ऐकताच मला जरा विचित्र वाटले. बहुतेक भास झाला असेल असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. 

चौथा अनुभव – 

हा अनुभव काही आठवड्यांपूर्वी चा आहे. शनिवार होता. त्या दिवशी पुन्हा एनिमेशन च्या कामामुळे मला थांबावे लागले. ६ वाजून गेले होते. मी इअर फोन्स घालून गाणी ऐकत माझे काम करत होतो. काही वेळा नंतर वॉश रूम ला जायला म्हणुन उठलो. कानातले इअर फोन्स काढले आणि पीसी स्लीप मोड वर ठेऊन मी जायला निघालो. तितक्यात पुढच्या रो मधून कोणी तरी खुर्चीवर बसल्याचा आवाज आला. त्या दिवशी ऑफिस मध्ये कोणीही नसल्याने त्या शांततेत तो आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. 

मी पटकन वळून पाहिले तर तिथे कोणीही दिसले नाही. वॉश रूम चा मेन डोअर उघडून मी आत गेलो. तिथे ४ टॉयलेट्स आहेत. त्या चारही टॉयलेट्स चे दरवाजे खालून अर्धा फूट वर आहेत. जर तुम्ही एखाद्या मॉल मध्ये गेला असाल तर तुम्हाला माहीत असेल कसे असतात. अगदी तसेच. मी नेहमीच्या सवई प्रमाणे हातात मोबाईल घेऊन आत बसलो होतो. तितक्यात कोल्हापुरी चपला घालून चालत येण्याचा आवाज येऊ लागला.

एक विचित्र गोष्ट म्हणजे वॉश रूम चा मुख्य दरवाजा उघडण्याचा आवाज आला नव्हता. तरीही कोणी तरी आत होत. बहुतेक आधी पासून. पण माझ्या व्यतिरिक्त ऑफिस मध्ये दुसरे कोणीही नव्हते. २-३ फेऱ्या मारून झाल्यावर ते माझ्या दरवाज्याच्या समोर येऊन थांबले. मला प्रचंड घाम फुटला होता. १०-१५ सेकंद उभे राहून पुन्हा ते फेरी मारू लागले. आणि अचानक एका क्षणी आवाज यायचा बंद झाला. त्या नंतर किती तरी वेळ मला बाहेर यायची हिम्मत च होत नव्हती. 

या सगळ्यात एकदाही वॉश रूम चा मुख्य दरवाजा उघडण्याचा किंवा बंद करण्याचा आवाज आला नव्हता. मी दबक्या पावलांनी बाहेर आलो आणि सरळ कॅन्टीन कडे धावत आलो. तिथे गार्ड बसला होता. त्याच्या पायांकडे लक्ष गेलं. त्याने बूट घातले होते. आम्हाला दोघांना सोडून ऑफिस मध्ये त्या दिवशी कोणीही नव्हते. त्यामुळे त्याला विचारणार तरी काय. म्हणून मी त्याला काहीही न बोलता घरी निघून गेलो. 

Leave a Reply