माझे खूप दिवसांचे स्वप्न होते, स्वतःच घर घेण्याचे. शहरात आल्यापासून रेंट च्या घरात राहायचा कंटाळा आला होता. पण लवकरच मी माझी परिस्थिती बदलण्यात यशस्वी झालो. आज माझ्या आयुष्यातील एक ध्येय पूर्ण झाले. शहरा बाहेर पण तरीही शहारालगतच सुंदर निसर्गमय परिसरात मला एक घर मिळाले, छान मोठा टुमदार बंगला, आणि शेजारीही असेच अनेक आकर्षक बंगले होते. मी सगळे व्यवहार पूर्ण करुण अगदी एकरकमी बंगला विकत घेतला. मी लागोलग इथे राहण्यास आलो. माझे सगळे कुटुंब दुसऱ्या शहरात राहत होते. बाबांची सर्व्हिस अजून एक वर्ष बाकी असल्या कारणाने मला काही दिवस एकटं राहणं भागच होतं, पण माझ्याबरोबर माझा अत्यंत जिव्हाळ्याचा दोस्त ‘टायगर’ नावाचा boxer जातीचा कुत्रा होता. तो माझ्याकडे जवळपास दोन वर्षांपासून होता. माझ्या कुटुंबातील एक सदस्यच होता असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

माझ्या घराभोवती खूप झाडी होती, पण हॉल च्या खिडकीमधून दोन्ही बाजूचा रस्ता दिसे. घरासमोर जागाही खूप रिकामी होती. दिवसभर मला कामावर जायचे असल्याने टायगर आणि घराची काळजी घेण्याकरिता मला एका वॉचमन ला कामावर ठेवावे लागले. तसेच घराची साफ सफाई करण्यासाठी आणि जेवण वैगरे बनवण्यासाठी शेजारील बंगल्यात काम करणाऱ्या दुर्गाताई येऊ लागल्या. तो पहिला आठवडा फार छान गेला. रविवारी टायगर ला बाहेर फिरायला घेऊन गेलो. आज तो फार खुष होता कारण खूप दिवसानंतर बाहेर फिरण्यासाठी त्याला माझी सोबत लाभली होती. माझ्या बंगल्यापासूनच थोड्या अंतरावर एक रिकामा बंगला होता. मी तिथेच टायगर ला फिरवत होतो. माझे लक्ष नकळपणे त्या बंगल्याकडे जात होते. ती एक खूप आकर्षक वास्तू होती, कोणीही तीच्या मोहात पडेल अशी तिची रचना होती. 

मी ते पाहण्यात मग्न होऊन गेलो पण तितक्यात टायगरच्या जोरजोरात भुकण्याने मी भानावर आलो. त्याच्याकडे पाहिले तर तो बंगल्याकडे पाहून जोरजोरात भुंकत होता. मला वाटले की थोड्या वेळाने तो शांत होईल. पण तो इतका भुंकू लागला की मला आवरेनासा झाला. कळलं नाही की अचानक त्याला काय झालं. मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो मला प्रतिसादच देत नव्हता. फक्त त्या बंगल्याकडे पाहत ओरडणे, भुंकणे तेव्हढेच काय ते सुरू होते. आमचा गोंधळ पाहून आजूबाजूच्या घरातील लोक डोकावून तर काही बाहेर येऊन पाहू लागले. मी त्यांना पाहून मलाच ओशाळ ल्यासार खे झाले. मी कसेबसे टायगरला तिथून खेचत ओढत घराकडे आणले. थोडावेळ तो खूप अस्वस्थ वाटला पण नंतर काही वेळाने शांत झाला. असं आज तो पहिल्यांदाच वागला होता. 

मी वॉचमन काकांकडे याबाबतीत विचारपूस केली तर ते म्हणाले की मी यापूर्वी टायगरला त्या रस्त्यावरून कधीच फिरवले नाही आणि टायगर ही याआधी कधी असा वागला नाही. कदाचित हा प्रकार पहिल्यांदाच घडला म्हणून मी झाल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. पुढच्या रविवारी मी टायगर ला घेऊन पुन्हा फिरायला बाहेर पडलो. त्या रिकाम्या बंगल्याकडे जाण्याचे मुद्दामून टाळले. पण चालत असताना जसे मी तो रस्ता बदलायचा प्रयत्न केला तसे टायगर मला खेचत तिकडे घेऊन जाऊ लागला. या वेळेस अगदी पूर्वीसारखाच किंबहुना त्याहून जरा जास्त त्वेषाने भुंकू लागला. मला काही उमजेनासे झाले की याला आज पुन्हा इथे आल्यावर असे का झाले. मी त्याला कसे बसे ओढून घरी आणले. तिथून पुढचे काही आठवडे टायगरला बाहेर फिरायलाच घेऊन गेलो नाही, त्याला घरासमोरील जागेतच फिरवले.

त्या दिवशी मी कामावरून जरा उशिरा घरी आलो. जेवण वैगरे आटोपून झोपायला नेहमी पेक्षा बराच वेळ झाला. डोळा लागतो न लागतो तोच टायगरच्या भुंकण्याचा आवाजाने जागा झालो. घड्याळात वेळ पहिली तर साधारणपणे १.३० वाजले होते. मी उठलो आणि हॉलमध्ये येऊन पाहिले तर हॉलच्या खिडकीजवळ जाऊन टायगर जोरजोरात भुंकत होता. मला वाटले कोणत्यातरी व्यक्तीला किंवा प्राण्याला पाहून भुंकत असावा. म्हणून मी खिडकीकडे जाऊन रस्त्यावर पाहण्याचा प्रयत्न केला पण तिथे कोणीही दिसले नाही. रस्ता लाईट च्याच प्रकाशात अगदी निर्मनुष्य वाटत होता. मला वाटले की कोणी तरी असेल पण आता निघून गेले असेल. मी त्याला शांत करतच होतो एवढ्यात दारावरची बेल वाजली.

दार उघडले तर समोर वॉचमनकाका, टायगर चा आवाज ऐकून आले होते. मी दार उघडताच टायगर चपळाईने बाहेर पळाला आणि रस्त्याकडे ला त्याच बाजूला जाऊन जोरजोरात भुंकू लागला. मी आणि वॉचमनकाका त्याला आवरण्यासाठी बाहेर आलो. कुंपण असल्यामुळे टायगर बाहेर जाऊ शकला नाही, कसेतरी प्रयत्न करून आम्ही त्याला घरात आणले. मला आता खरच टायगरची काळजी वाटू लागली. मी अगदी लहान असल्यापासून आमच्या घरी पाळीव प्राणी पळाले जातात आणि मी शहरात राहायला आल्यापासून माझ्या घराचा साथी टायगर होता. त्याची काळजी वाटणे साहजिक होते. दुसऱ्या दिवशी मी जरा उशीराच कामावर गेलो. डॉक्टरांना घरी बोलावले. त्यांनी टायगर ला तपासले आणि म्हणाले की सगळं काही ठीक आहे, टायगरला काहीही झालेले नाही. त्यांचे बोलणे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. त्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर मी या प्रकाराबाबत माझ्या मित्रांबरोबर चर्चा केली, अनेकांनी अनेक उपाय सांगितले, त्यांची वयक्तिक मते मांडली.

काहींच्या म्हणण्यानुसार तर मी टायगरच्या बाबतीत ओव्हरप्रोटेक्टिव्ह झालो होतो. पण विनायकने सांगितलेली गोष्ट माझ्या मनाला चटक लाऊन गेली, विनायक म्हणाला “असं म्हणतात की मुक्या प्राण्यांना वाईट गोष्टीचा,आत्म्याचा वास लागतो.. ते त्यांना पाहू शकतात-ओळखू शकतात”. हे ऐकताच सगळे त्याच्यावर हसले, मीही त्याची थट्टा केली. पण माझ्या मनात त्याचे ते शब्द सतत घोळत राहिले. त्याच रात्री परत टायगर ने गोंधळ घातला. त्या रात्री तो पूर्ण हॉलभर वेड्यासारखा धावत भुंकत होता. त्याने सर्वत्र पसारा केला होता त्यामुळे त्याचा मला खूप राग आला. मी टायगरवर जोरात ओरडलो. पटकन साखळी घेतली, त्याच्या गळ्यातील पट्याला लावली आणि त्याला बांधून टाकले. पुन्हा त्याच्यावर ओरडू लागलो तसे तो शांतपणे माझे ऐकून घेत होता. पण त्यांचे असे अचानक शांत बसणे मला रुचले नाही. एवढ्यात मला जाणवले की माझ्या पाठीमागे कोणीतरी उभे आहे. तसे मी दचकून मागे पाहिले पण मागे कोणीही नव्हते.

तितक्यात दारावरची बेल वाजली. वॉचमनकाका आत येताच मी त्यांना घराचा कानाकोपरा शोधायला लावला पण घरात कोणीही नव्हते. ते बाहेर गेले तसे मी दरवाजा लॉक करून आत झोपायला गेलो. विनायकचे बोलणे ऐकल्यापासून नको नको ते विचार येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. सुट्टी होती पण तरीही दिवसभर विनायकचे बोलणे, टायगरचे वागणे याचाच विचार चालला होता. बघता बघता दिवस कसा निघून गेला कळलेच नाही. टायगरने सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते आणि तो भुंकलाही नव्हता. त्याच्यावर रात्री रागवल्याबद्दल मलाच खूप वाईट वाटले. त्याच्या पट्ट्याला बांधलेली साखळी मी सोडली. त्या दिवशी मी जरा लवकरच झोपी गेलो. मध्यरात्र उलटुन गेली. साधारण २.०० च्या सुमारास मला जाग आली. खूप तहान लागली होती. नेहमी पाण्याची बॉटल घेऊन झोपायचो पण आज नेमके ती विसरलो होतो. मी उठून किचन मध्ये गेलो आणि पाणी प्यायलो. उठलोच होतो म्हणून टायगर ला पाहण्यासाठी हॉल मध्ये आलो. 

घराचा दरवाजा सताड उघड होता आणि टायगर हॉलमध्ये कुठेही दिसत नव्हता. बाहेर आलो तर गेटही उघडेच. मी वॉचमनकाकांना हाक मारली आणि त्यांना चिडून म्हणालो “तुम्हाला मी बऱ्याच वेळा बोललोय की गेट बंद करा पण तरीही गेट उघडाच ठेवता”. तसे ते म्हणाले की मी गेट बंद करूनच आत आलो होतो. मी एका क्षणासाठी शांत झालो आणि डोक्यात विचार चमकून गेला. रात्री झोपताना मी ही दरवाजा आतून लोक च केला होता तरीही तो आता सताड उघडा होता. मी त्यांना काहीच बोललो नाही. फक्त टायगर घरात नाहीये बंगल्याच्या मागच्या बाजूला बघा इतकेच म्हणालो. मी ही घरात जाऊन टॉर्च आणली आणि त्याला शोधायला बाहेर पडलो. थोडे पुढे चालत गेलो आणि मला भुंकण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज टायगर चा होता. मी आवाजाच्या दिशेने चालत जाऊ लागलो. 

काही पावले चालल्यावर टायगर दिसला. त्या रिकाम्या बंगल्याच्या गेटच्या आत होता आणि बंगल्याकडे पाहून जोरजोरात भुंकत होता. मी खरच घाबरलो होतो कारण तो पुन्हा त्याच बांगल्याकडे आला होता. त्यांचे त्वेषाने भुंकणे चालू होते. मी त्याला तिथून बाहेर काढायला म्हणून त्याच्या दिशेने जाऊ लागलो. पण अचानक तो एका क्षणी गप्प झाला. त्याचा आवाज थांबल्यामुळे वातावरणात कमालीची शांतता जाणवू लागली. मी त्याच्याकडे पाहिले. असं वाटत होतं की त्याचे दोन्ही जबडे कोणीतरी बंद करण्याचा प्रयत्न करतंय आणि तो तडफडतोय. बघता बघता एक धुरकट काळी आकृती त्याच्यासमोर तयार होऊ लागली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास च बसत नव्हता. पुढच्या काही क्षणांत अगदी पूर्ण आकृती तयार झाली. त्याच आकृतीने आपल्या दोन्ही हातांनी टायगर चा जबडा पकडला. तितक्यात त्या आकृतीने माझ्याकडे पाहिले. क्षणार्धात त्या आकृतीचा रंग पालटून पांढराफटक झाला. आता तो एक पुरुषी चेहरा भासत होता..

तो चेहरा रक्ताळलेल्या अवस्थेत होता आणि माझ्यावर रोखलेली ती शून्यातील भेदक नजर.. शरीराचे लचके तोडल्यासारखे भासत होते त्यामुळे बऱ्याच जखमा होऊन त्वचा अक्षरशः लोंबत होती. त्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहून कुत्सित हास्य केले आणि पुढच्याक्षणी टायगर चे दोन्ही जबडे आपल्या दोन्ही हातात धरून एका लाकडाचे दोन तुकडे करावेत तसे वेगळे केले. खटकन असा आवाज झाला आणि टायगर ची ती आर्त किंकाळी मला ऐकू आली. घडलेला प्रसंग मला सहनच झाला नाही, मला घेरी आली आणि मी जागीच कोसळलो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी घरी होतो. आई, बाबा, भाऊ सगळे आले होते. एव्हाना घडलेला प्रकार समजला होता. टायगरला दफनही करण्यात आले होते, तो त्यांना रक्ताळलेल्या अवस्थेत आमच्याच बंगल्यासमोर मिळाला होता. दुर्गाताईही त्यांच्या आईसोबत आल्या होत्या. त्यांच्या आईने सांगितलेल्या गोष्टीवरून आम्हाला साऱ्या घटनेचा उलघडा झाला.

त्या रिकाम्या बंगल्यात साधारण १० वर्षांपूर्वी एक पन्नाशी ओलांडलेला इसम राहायचा.. त्याला पाळीव प्राण्यांविषयी विशेषतः कुत्र्यांविषयी फारच चीड होती, तो त्यांना मारत असे. त्या भागातील इतर लोकांबरोबर या विषयावरून त्याचे बरेचसे खटके उडाले होते. रोज या विषयावरून त्याचा कोणाशी तरी वाद व्हायचा. एका रात्री तो उशिरा बाहेरून येत होता. नेमके घराजवळच काही कुत्रे झोपले होते. त्याने त्यांना लाथ मारून हकलून द्यायचा प्रयत्न केला तसे ते कुत्रे त्याच्यावरच भुंकू लागले. तो अजूनच चिडला आणि हातात दगड काठी जे काय मिळेल त्याने त्या कुत्र्यांना मारू लागला. पिसाळले ले ते कुत्रे त्याच्या अंगावर धाऊन गेले आणि त्याला चाऊ लागले. त्याच्या शरीराचे लचके तोडू लागले. आधीच दारूच्या नशेत असल्याने तो त्यांचा प्रतिकार करू शकला नाही. परिसरात ले उतार लोक एव्हाना जागे झाले होते पण कुत्र्यांचे ते भयानक रुप पाहून कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. बऱ्याच वेळ तो तसाच पडून राहिला, भरपूर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा तिथेच जीव गेला.

हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर मला एक गोष्ट खूप उशिरा लक्षात आली की त्या भागात कोणाच्याच घरी पाळीव प्राणी नव्हते..

Leave a Reply